सोनसळी काळोख – Marathi Kavita Sonasali Kalokh

0
1003

Marathi-Kavita-Sonasali-Kalokh
कवयित्री – मीनाक्षी मोहरील
संपर्क – meenakshi.moharil@gmail.com

सोनसळी काळोख – Marathi Kavita Sonasali Kalokh

आला दाटून काळोख…
पसरला दूरवर…
काळ्या अंधाराची शाल…
ऊबदार अंगावर…. ||

आला दाटून काळोख…
गर्द निळ्या नभावर…
शुभ्र चांदण्याची जाळी…
झिरिमिरी अंगावर…. ||

आला दाटून काळोख…
रानारानात वनात…
मंद अल्गुजाची शीळ…
झुळझुळे वेळूवर…. ||

आला दाटून काळोख…
चिंबचिंब भुईवर…
काळासावळा सुगंध…
शिरशिरी अंगावर….||

आला दाटून काळोख…
निजलेल्या निजेवर…
बंद पापणीच्या आड…
स्वप्नफुलांचे झुंबर…. ||

आला दाटून काळोख…
काजळल्या तमावर …
अंधाराच्या कुशीमध्ये…
सोनसळी सळसळ…. ||

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here