Marathi Kavita – Stree – स्त्री
कवयित्री – सौ.विशाखा जेवळीकर
देवलोकातून अवतरली एक सुंदर परी
स्त्री जन्म घेऊन आली घरोघरी
कुणी म्हटले लक्ष्मी तिला कुणी सरस्वती
कुणा भासे नारायणी कुणा पार्वती
आली जशी पृथ्वीवर मनात घेऊन आशा
कुणी जपले फुलापरी कुणी केली निराशा
कुठे पिता मनामध्ये आनंदतो भारी
कुणी बाप कसा तिला उदरातच मारी
कुणा लाभे प्रेम सखा जन्माची ती साथ
कुठे मना ओरबाडी वासनेचा हात
कुणी स्वप्न साकाराया घेती त्या भरारी
कुठे स्वप्न जायबंदी आपुल्याच दारी
कुणी होई झाशी राणी करुनिया वार
कुणा नशिबी पद्मिनीचा असे तो जोहार
कुणा मिळे भाग्य नांदे सुखाने ती घरी
कुठे सून होरपळते आगीत सासरी
कुणी असे रमाबाई कुणी आनंदी गोपाळ
कुणा लाभली प्रसिद्धी कुणा करंटे कपाळ
कुणी भोगला कढ कसा अतीव दु:खाचा
कुणा लाभला वारसा तो अपार सुखाचा
कथा वेगळी वेगळी प्रत्येक माऊलीची
कुठे रखरखित ऊन्हे कुठे सुख साऊलीची
कधी मना हर्ष होई कधी येई डोळा पाणी
स्त्री जन्माची ही कथा सुख दु:खाची कहाणी
— सौ.विशाखा जेवळीकर
[…] http://marathiboli.in/marathi-kavita-80/ […]