God on Sale – इथे देव विकत मिळतो- भाग -१

0
1340

God on Sale – इथे देव विकत मिळतो,

जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात ईद ची सुट्टीला धरून मस्त ५ दिवस गोव्याला जाऊया, असा ऑफिस मधील मित्रांबरोबर मिळून प्लॅन केला, कोण कोण येणार हे ठरवण्यासाठी लगेच सगळ्यांना मेल केला.  DONE, DONE म्हणत मेल येऊ लागले, जो येत नव्हता त्याला इमोशनल ब्लॅकमेल करण्यासाठी लंच टेबल वर चर्चा जमू लागल्या.

अश्यातच, नेमकी बाबांनाही तेव्हाच सुट्टी असल्याने, आपणही कोठेतरी फिरायला जाऊ असा आईचा हट्ट सुरू झाला, पण मी आधीच गोव्याचा प्लॅन सांगितलेला असल्याने वाचलो.

गोव्याला जायचा दिवस जवळ येत होता, तसे एकेकांचे प्रॉब्लेम सुरू झाले, २ मिनिटात DONE म्हणून रीप्लाय करणार्‍यांनी २ दिवस आधी CAN’T म्हणून सांगायला सुरुवात केली. आणि याच गोंधळात माझी गोव्याची पाच दिवसांची पिकनिक, दोन दिवसांची धार्मिक सहल झाली.

आईची तयारी जोरात सुरू झाली, काय न्यायाचे काय नाही, नारळ,पेढे फुलांचे हार सगळी तयारी झाली आणि रविवारी सकाळी सात च्या सुमारास आमची गाडी खोपोलीतून शिर्डीच्या दिशेने निघाली.

जवळ जवळ आठ वाजता खोपोलीपासुन २० किलोमीटर अंतरावर असलेल्या पहिल्या धार्मिक स्थळावर म्हणजेच कार्ला,

Karla marathi boli

या एकवीरा देवीच्या गडावर आम्ही पोचलो. पौष उत्सव असल्याने गर्दी ठीक ठाक होती. मोठे मोठे ग्रुप गुलाल उधळत ढोल ताश्यांच्या गजरात धुंद होऊन नाचत गड चढत होते, गर्दीला मागे टाकत गुलालापासून स्वताचा आणि कपड्यांचा बचाव करत आम्ही एक एक ग्रुप मागे सोडत गडावर पोचलो.

मंदिराच्या बाजूलाच फटाक्यांच्या मोठ्या माळेची कागडे पडली होती, बघून मनात विचार आला, फटाके आणि देवस्थानात ? पण उत्तर काही मिळाले नाही.

याच विचारात सापशिडीच्या डावाप्रमाणे एक एक घर असलेल्या रांगेत उभे राहिलो, रांगेत देवीच्या नावाचा गजर जोरात सुरू होता, थोड्या वेळाने रांगेतूनच दोन बायका, सगळ्यांना बाजूला करत पुढे येत होत्या, डोक्यावर खूप कुंकू, गळ्यात हार, डोळे अर्धे बंद आणि दोन्ही हात एकत्र बांधलेले असा त्यांचा वेश, सगळे त्यांना पुढे जाण्यास जागाही देत होते, बहुदा त्यांच्या अंगात देवी आली होती.

पुन्हा प्रश्न पडला, जर यांच्या अंगात देवी आली तर मग यांना देवीचे दर्शन का घ्यायचे आहे, ह्याच मंदिराबाहेर भक्तांना दर्शन का देऊ शकत नाहीत, आणि देवी अंगात आली तर दोघींच्याही अंगात एकाच वेळी कशी? याच विचारात ५ -१० मिनिटे गेली आणि रांगेतून पुढे प्रवास सुरू झाला.

पुढे आल्यावर, मंदिराच्या बाहेर, बरोबर देवीच्या समोर, लोकांची गर्दी दिसू लागली, गर्दीत गळ्यात हार घातलेलं एक पांढर शुभ्र कोकरू दिसलं, आणि सगळा प्रकार लक्ष्यात आला. श्रद्धा की अंधश्रद्धा या वादात न पडता मी मंदिरात प्रवेश केला.

देवीला मना पासून नमस्कार करून २ मिनिटातच बाहेर पडलो. आत्ता कुठे तो गुलाल आणि ढोल ताश्यांचा ग्रुप वर पोहोचला होता. पुन्हा एक गोंडस कोकरू दिसले, त्याला मानेला बांधलेल्या सुतळीने खेचत खेचत आणले जात होते, आणि ते कोकरू त्याची पूर्ण ताकद लावून त्यांचा विरोध करत होते. कदाचित त्यालाही गळयातील हार आणि अंगावरील गुलालाच्या पुढचे त्याचे भविष्य आता दिसू लागले होते.

मनातील वादळ शांत करत मी गाडी जवळ पोहोचलो आणि काही वेळातच पुढील प्रवास सुरू झाला, भीमाशंकरच्या दिशेने..

अकरा वाजत आले होते आणि भीमाशंकरला पोहोचायला अजून ३ तास तरी लागतील या विचाराने वाटेतच तळोजा मध्ये आनंद वडेवाले या हॉटेल मध्ये थांबलो. हॉटेल तसे खूपच साधे होते, अगदी गावाकडच्या हॉटेल सारखेच.. फक्त एक फलक त्या हॉटेल किंवा ढाब्याला इतरांपासून वेगळे करत होता. तो म्हणजे SELF SERVICE. पाष्शिमात्य देशातील हा फलक आमच्या गावांपर्यन्त पोचल्याचे पाहून अभिमान वाटला.

पोटपूजा झाल्यावर चाकण पार करून कधी राजगुरूनगरला येऊन पोहोचलो कळलेच नाही, तेवढ्यात रस्त्यावर फलक दिसला भीमाशंकर ५६ किमी वाडा मार्गे. आणि मी गाडी वळवली. थोड्याच वेळात एकदम शांत रस्ता सुरू झाला. त्या रस्त्याची मजा काही औरच होती, गावातला रस्ता होता पण ठीकठाक होता, दूर वर पसरलेली शेते आणि मधून वेडा वाकडा जाणारा रस्ता कधी खूप वर तर कधी सरळ खाली जाणारा रस्ता मला गाडी चालवण्याची हौस पूर्ण करून देत होता.

Bhimashankar Marathi Boli

P1140922

P1140928

एका मोठ्या धरणाच्या बाजूने जाणारा रस्ता निसर्गाची सुंदरता दाखवत होता. ४-५ गावे ओलांडल्यावर वाडा हे गाव आले. आणि त्यानंतर सुरू झाला एक अप्रतिम घाट, एकच ट्रक जाऊ शकेल आणि पूर्ण ३०० अंशाची वळणे असलेला घाट, आमच्या लोणावळ्याच्या घाटापेक्षाही कठीण असा घाट कधी एकदा संपतो असे झाले. लांब सडक रस्त्यांवरून हिरव्या जंगलांच्यामधून  माझी लाल फिगो वेगात चालली होती. एव्हाना आपण चुकीच्या रस्त्याने जात आहोत हे लक्ष्यात आले होते.  जवळ जवळ ४-५ छोटे मोठे घाट पार करून आमची गाडी भीमाशंकरच्या मुख्य रस्त्याला लागली. आणि झालेली चूक सुधारल्याची खुशी माझ्या चेहर्‍यावर आली.

पुढे तासाभरातच आम्ही भीमाशंकरचे जंगलपार करून देवस्थानाजवळ पोहोचलो, तेवढ्यातच ४-५ गावाचे तरुण गाडी जवळ आले, आणि पुढे पार्किंग नाही गाडी इथेच लावावी लागेल असे सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेऊन मी पण गाडी तिथेच पार्क करण्याचा निर्णय घेतला. लगेच त्यांची पुढील विचारणा सुरू झाली, डोली हवी का मंदिरात जाण्यासाठी ३०० पायर्‍या उतराव्या आणि चढाव्या लागतील. डोलीतून चला .  पण आईनि नाही सांगितल्यावर मी त्यांना नाही सांगून पुढे निघालो. तो पर्यन्त मला या लोकांनी आपल्याला मंदिरापासून जवळजवळ ७००-८०० मीटर अंतरावर गाडी का लावायला संगितले ते कळले होते.

मंदिराच्या पायर्‍या हळू हळू उरण्यास सुरुवात झाली, काही अंतरावर आल्यावर एक भली मोठी रंग दिसली. रांगेत उभे रहाताच बाजूच्या दुकानातील एक जण जवळ आला आणि म्हणाला  माझे एक दुकान पुढे आहे तिथपासून पुढे फक्त १५-२० मिनिटे लागतील, २०० रुपये द्या तिथे सोडतो तुम्हाला. त्याच्या कडे दुर्लक्ष्य करून आम्ही रांगेतच उभे राहिलो.

संथ गतीने पुढे जाणार्‍या रांगेतून पुढे जाता जाता २ तासांनंतर भीमाशंकरचे दगडी मंदिर आणि प्रशस्थ गाभारा दिसू लागला. पण त्याच गाभार्यात जे काही चित्र दिसले त्याने मनाला चक्रावून सोडले.

गाभार्यात उजव्या बाजूला ५-६ ऑफिस टेबल्स होती, आणि ८ ते १० जाडजूड भटजी. आता जाडजूड लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे ते एवढे मोठे होते की तिथे सुमोंची फाईट वगैरे आहे की काय असे वाटत होते. त्यात त्यातील काही अधिक जाडजूड भटजी चक्क टेबल्सवर मांड्या घालून बसले होते. प्रत्येकाच्या समोर पावती पुस्तक….

हळू हळू चित्र स्पष्ट होऊ लागले, मंदिराचा मुख्य दरवाजा, जेथून रांगेतून दर्शन घेणारी माणसे दर्शन घेऊन बाहेर पडत होती. तेथूनच काही माणसे आत येत होती. आता येऊन या भटजींच्या पायावर डोके ठेवायचे. पावती फाडायची म्हणजे कदाचित अभिषेक वगेरे.. आणि देवाचे दर्शन घेण्यास पुढे जायचे.

मनात वाटले असेल व्हीआयपी दर्शन , पण जस जसे रंग पुढे सरकत गेली तसा एक भटजी चक्क लाइन मधेच पावती पुस्तक घेऊन बसलेला दिसला. माझ्या पुढील व्यक्तीने त्यांना विचारले अभिषेकाचे किती, तेव्हा त्याने चार्ट दाखवून पाचशे एक्कावन्न संगितले आणि पाचशे दिलेत तरी चालेल असे बोलला.

त्याची शेवटची लाइन माझ्या डोक्यात गेली. पाचशे दिलेत तरी चालतील?? म्हणजे .. शक्यतो देवस्थानाचे अभिषेक आणि पुजांचे दर फिक्स असतात, मग हे असे कसे.

तेव्हा लक्ष्यात आले, इथे या भटजींची दुकाने आहेत, पावती पुस्तके ही त्यांची स्वताची आहेत. देवस्थानाची नाहीत आणि याच कारणासाठी ते अभिषेक केला की रांगेशिवाय दर्शन घेऊ देत होते.

बाहेर सुरक्षारक्षक काही रुपये घेऊन लोकांना आता सोडत होता.

भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगामधील एक जागृत देवस्थानात,  शंकराच्या समोर , हे लोक शंकरालाच विकत होते, आणि भक्त म्हणवून घेणारे लोक शंकराला विकत घेत होते.

देवाचा बाजार मांडलेला या लोकांनी, कोणामुळे… याला आपणच कारण आहोत …. काय गरज होती देवळात लांब लांब रांगा लावून दर्शन घेण्याची .. पण काय करणार आम्हाला माणसातल्या जाती आणि धर्म दिसतात त्यातील देव दिसत नाही.. म्हणून अश्या मंदिरांकडे आमचा मोर्चा वळतो.

याच गोंधळात शंकराचे दर्शन झाले. मनातील विचार पुसले गेले. आणि दर्शन घेऊन आम्ही बाहेर पडलो … ते पुढच्या प्रवासासाठी…. आणि साईबाबांच्या शिर्डीच्या दिशेने आमची गाडी सुटली….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here