ती – Marathi Kavita Ti

7
1851

Marathi-Kavita-ti-1

कवयित्री – डॉ. सोनाली वाळवेकर – शेटे
संपर्क – sonaliwalvekar9@gmail.com

ती – Marathi Kavita Ti

अवळलेल्या मुठी
अन स्तनांवर
होणारा
‘तिचा ‘
लुसलुशीत स्पर्श

वर्तमानच्या चौकटीत
भिंतीवर तस्बीर
झालेली ‘ती ‘
जिच्या
इरकल साडीच्या
गोधडीत
शांत विसावलेले
भविष्य

जनुकावर
असते मोहर
अलवार
त्या प्रत्येक संचिताची
जे जोडत जातात
आपल्यातील
पिढी दर पिढी धागे
आपण त्या बिंदूपासूनच असतो एकमेकांत वास्तव्यला

मागच्या पानांवर
नात जन्मली म्हणून
सासनकाठी नाचवणारी
भेगाळ पावले

घरी लक्ष्मीची
सोनपावले आली म्हणून
उंबरठा ओला करणाऱ्या कळश्या…
कानशीलावरून
कडकडणारे
राबते हात

सटवाईची पूजा
फेडलेले नवस

सारे तसेच
काल घडल्यासारख्या

वर्तमानातील
चौकटीतसुद्धा
स्वप्नातील त्या
धूसर प्रतलावर
उभे राहून
जीव ओवाळून
टाकणारे
तेच आशीर्वादाचे हात

बाईची जात
असतेच
अखंड प्रवाही…
जीवनदायिनी
म्हणून पूजा होवो
वा वांझपणाची बीभत्स शिवी…

ती वाहते
कधी समजूतीने
कधी निगूतीने
क्वचित बेभान
भिजवतेच काठ
निरंतर…

भूत वर्तमान
अन भविष्य
पदरांत घेऊन
फिरताना
उमगतेच
संक्रमणाचे मोल

पदराआड
वाहणाऱ्या
स्मृतींचा पान्हा

सोनसळी
उद्याचा
आशीर्वाद
सायीला

7 COMMENTS

  1. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी …
    खुपच सुंदर शब्दरचना.

  2. खूप छान…मस्त… ती म्हणजे आजी आई मावशी निस्वार्थ प्रेम करणारी प्रतेक स्त्री , ती म्हणजे एक आरंभ , ती म्हणजे एक मध्य, ती म्हणजे एक सृजन, ती म्हणजे एक नव निर्माती, ती म्हणजे शक्ति… ????????

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here