Marathi kavita – शब्द फुलांचे
आम्हाला असं कधीच वाटलं नव्हतं
बाजारपेठेतील आपण खरेदीची वस्तू व्हावं…
स्टेजवरल्या मान्यवरांच्या स्वागतासाठी प्रेमाचं प्रतिक व्हावं अन-,
स्वागतानंतर,विरहामुळे वा आणि कशाने कचरा पेठीत जायचं नव्हतं
कुणाच्या केसात तर कुणाच्या दप्तरात जावून कोमेजायचं नव्हतं
हिवाळ्यात काही दवबिंदू शरीरभर आदळून घ्यायचे होते
आम्हालाही काही दिवस आनंदाने जगायचं होतं
एकाच्या स्वागतासाठी दुसर्याच्या गळ्यावर घाव-
हाच का भूतलावरचा न्याय म्हणून विचारायचं होतं
स्वप्नात तुम्हाला भीती घालावी तर आमच्यामुळे अधिकच चेकाळणार
आम्हावर तुम्ही अखेरपर्यंत अत्याचार करणार पण,
आम्हालाही काही दिवस आनंदाने जगायचं होतं.
आम्ही स्वतः आमच्यातीलच काहींना चिरडलेलं पहात होतो,
पण आम्हालाही इथे थांबायला फारच कमी वेळ होता.
पांडुरंग वाघमोडे (जत)