” ती ” – Marathi Kavita

0
161
Marathi Kavita -Ti

Marathi Kavita – Ti – ” ती “

कवयित्री – रुपाली बाळू हिंगमिरे

रात्र रात्र
अभ्यास करून
उत्तम यश
मिळवते
तेव्हा “ती”
‘हुशार ‘ असते

डोक्यावर
पदर घेते
खाली मान
घालून चालते
तेव्हा “ती”
‘घरंदाज’ असते

माहेरहून येताना
भरपूर हुंडा
घेऊन येते
तेव्हा “ती”
‘लक्ष्मी’ असते

सर्वाचं निमूटपणे
ऐकते
प्रत्येकाची मर्जी
सांभाळते
तेव्हा “ती”
‘आज्ञाधारक’ असते

घर आणि नोकरी
समतोल साधते
नोकरी करून
पैसे कमवते
तेव्हा “ती”
‘घराण्याची शान’ असते

प्रसंगी घरचा
कर्ता पुरूष बनते
सर्व जबाबदाऱ्या
धाडसाने पेलते
तेव्हा “ती”
‘धाडसी’ असते

पण तीच…..

आपले विचार
ठामपणे मांडते
लाचार न होता
स्वाभिमानी जगते
तेव्हा “ती” का
‘गर्विष्ठ’ ठरते????

स्वतःच्या हक्कांसाठी
स्वतःच उभी राहते
अन्यायाविरुद्ध
बंड पुकारते
तेव्हा “ती”
का ‘वाईट’ ठरते????

रुपाली बाळू हिंगमिरे
प्राथ. शिक्षक
पालघर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here