Marathi Kavita – एकटाच…
एकाकी परंतू प्रभावी जीवन जगलेल्या व्यक्तीच्या आयुष्याअंतीच्या भावनांना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न …
जन्मलो एकटाच,
विसावलो एकटाच
भोग एकटयाचे,
भोगलो एकटाच…
गर्दी सभोवताली,
सुख-दु:खात होती
परी खेळ भावनांचा,
खेळलो एकटाच…
क्षणभंगूर सर्व नातीं,
अन नात्यांतील ते बंध
तरी नात्यांच्या त्या गर्दीत,
चाललो एकटाच…
तळपता सूर्य एकटाच,
देई प्रकाश दशदिशांत
आदर्श घेऊनी तयाचा,
जगलो एकटाच…
– मिलिंद डोंबाळे (देशमुख)