Marathi Movie Narabachi Wadi Review – नारबाची वाडी चित्रपट परीक्षण
आदित्य सरपोतदार दिग्दर्शित नारबाची वाडी हा विनोदी चित्रपट मागील आठवड्यात प्रदर्शित झाला. नारबाची वाडी हा चित्रपट शज्जानो बागान या मनोज मित्रा लिखित बंगाली नाटकावर आधारित आहे.
चित्रपटात दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, निखिल रत्नपारखी, अतुल परचुरे, विकास कदम, सुहास शिरसाट, ज्योति मालशे आणि किशोरी शहाणे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
चित्रपटची कथा १९४६ सालात सुरू होते. नारबा (दिलीप प्रभावळकर) याची एक सुंदर हिरवीगार अशी एक वाडी आहे. स्वता मेहनत घेऊन नारबा ती वाडी फुलवतो. नारळ, सुपारी केळी हे या वाडीत भरभरून पिकत. अश्यातच गावातील खोताची म्हणजेच रंगरावाची(मनोज जोशी) याची नजर या वाडीवर पडते आणि चित्रपटाची सुरुवात होते.
पुढे खोटाची पुढची पिढी म्हणजेच रंगरावाचा मुलगा मल्हारी(मनोज जोशी) हा देखील वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही वाडी मिळवण्याचे ठरवतो. त्यासाठी तो नारबाबरोबर एक करार करतो. या करारा प्रमाणे नारबा जो पर्यन्त जीवंत आहे तो पर्यन्त वाडी त्याची आणि त्याच्या मरणानंतर वाडी खोतांची. करारा मध्ये तो नारबाला दरमहिना दीडशे रुपये देण्याचे देखील कबुल करतो. आणि जर नारबाच्या आधी मल्हारी चा मृत्यू झाला तर मात्र हा करार रद्ध होणार.
यानंतर सुरू होतो एक मजेशीर प्रवास. नारबाच्या जगण्याचा.
चित्रपटची कथा खुपच सरळ साधी आणि सोपी आहे. पण चित्रपटातील संवाद , हलके फुलके विनोद आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात. चित्रपट कोकणात घडतो तरी सुद्धा तो फक्त नारबाची वाडी आणि खोतांचे घर या दोन ठिकाणांमध्येच फिरतो तरीही त्याचा कंटाळा येत नाही.
दिलीप प्रभावळकर आणि मनोज जोशी या दोघांचाही अभिनय उत्तमच तर त्यांना साथ देणार्र्या निखिल रत्नपारखी, किशोरी शहाणे, अतुल परचुरे, विकास कदम यांच्या भूमिका चित्रपटाची मजा आणखी वाढवतात.
चित्रपटात दोनच गाणी, त्यातील गझाल खरी काय? हे गाणे अधिकच मजेशीर. चित्रपटातील संवाद आणि गाणी गुरु ठाकुर यांनी उत्तम लिहिली आहेत. गुरु ठाकुर यांनी पटकथेत मिश्किल विनोदांची पेरणी करून गोष्ट हलकी फुलकी बनवली आहे.
[tube]5L7Rtw5DJck[/tube]
चित्रपट छोट्याश्या कथेवर आधारित असला तरी तो रसिकांना मनापासून हसवण्यात यशस्वी होतो.
मराठी मातीचा गंध, आणि साधा सरळ मनाला भिडणारा , मनोसोक्त हसवणारा चित्रपट पाहायचा असेल तर नारबाची वाडी नक्की पहा.
[tube]QzeJplB03gU[/tube]
*मराठी चित्रपट, चित्रपटगृहातच जाऊन पहा, डाऊनलोड करणे किंवा डाऊनलोड केलेले चित्रपट पसरवणे बंद करा. मराठी चित्रपटसृष्टी आपल्या मनोरंजांनासाठी आहे ती टिकवण्यासाठी एवढेतरी करा. निर्माते, कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गायक तसेच चित्रपटसृष्टीवर अवलंबून असणार्या प्रत्येकाला त्यांच्या मेहनतीची दाद द्या.
मराठी असण्याचा नुसता अभिमानच बाळगु नका .. तर मराठी बाणा जगाला दाखवा.
शपथ घ्या मराठी चित्रपट, चित्रपटगृहातच पाहण्याची.
aamchya sawantwadit shoot jhalela ha movie sundar aahe