Marathi Movie Investment Review – इन्वेस्टमेंट
रत्नाकर मतकरी दिग्दर्शित इन्वेस्टमेंट हा चित्रपट मागील आठवड्यात प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला आहे तर अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय चित्रपट मोहोत्सवात इन्वेस्टमेंटची दखल घेण्यात आली.
चित्रपटाची कथा रत्नाकर मतकरी यांच्या दहा वर्षांपूर्वी लिहीलेल्या इन्वेस्टमेंट या कथेवर आधारित आहे. ही कथा जरी दहा वर्षांपूर्वीची असली तरी ती आजचे वास्तव दर्शवते. प्रत्येक घरात घडणारी किंवा घडू शकणारी अशीच कथा वाटते.
आज शहरातील ७०% घरांमध्ये इंटरनेट आहे तर ९०% पेक्षा अधिक घरात मोबाइल्स आहेत. आज मोबाइल इंटरनेट टीव्ही या गोष्टी चैनीच्या नसून गरजेच्या वाटू लागल्या आहेत. यातूनच लहान मुलांचे या वस्तु वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात काही गैर आहे असेही नाही. पण प्रत्येक गोष्टीचे दुष्परिणाम असतात इंटरनेट म्हणजे माहितीचे जाळे त्यावरून आपल्याला हवी ती माहिती आपण मिळवू शकतो. पण आपण जे शोधणार ते आपल्याला मिळणार. कोणत्या वयात कोणती माहिती कोणाला द्यावी हे काही इंटरनेट ठरवू शकत नाही.
असो सांगण्याचा मुद्दा , आज लहानमुले जे मागता ते पालक त्यांना पुरवतात. ( आपण जे काही करतो, ते आपल्या मुलांसाठीच ना? )
इन्वेस्टमेंट ही कथा आहे शहरी भागातील उच्चमध्यमवर्गीय किंवा मध्यमवर्गीय कुटुंबाची. हे कुटुंब आहे आशीष(तुषार दळवी) आणि प्राची घोरपडे(सुप्रिया विनोद) यांचे. सोहेल(प्रहर्ष नाईक) हा त्यांचा १२-१३ वर्षांचा एकुलता एक मुलगा. दोघांनाही त्यांच्या गडबडीत सोहेलसाठी वेळ देणे कठीण जाते. ही कसर भरून काढण्यासाठी ते त्याचे लाड करतात त्याचे सर्व हट्ट पुरवतात. याचा परिणाम सोहेलवर होतो आणि आपल्याला हवे ते मिळेल किंवा मिळवता येईल असा विचार त्याच्या मनामध्ये घर करू लागतो. याच हट्टापायी सोहेलच्या हातून एक गंभीर गुन्हा होतो.
या घटने नंतर प्राची आणि आशीष, सोहेलला वाचवण्यासाठी काय काय करतात? त्यामागे त्यांची भावना काय असते? असे काय होते की सोहेल असा गंभीर गुन्हा करतो ?
असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न चित्रपट प्रेक्षकांसमोर उभे करतो.
यातूनच सर्वात मोठा प्रश्न प्रेक्षकांच्या समोर उभा राहतो. तो म्हणजे हे आपल्याही घरात होऊ शकते ?
दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे दिग्दर्शन उत्तम, चित्रपटातील संवाद, सर्व कलाकरांचा उत्तम अभिनय आणि मुख्य म्हणजे पार्श्वसंगीताचा कमी वापर यामुळे चित्रपट वास्तव वाटतो.
पुढच्या पिढीत इन्वेस्टमेंट करताना कोणती काळजी घ्यावी, आणि ती जर नाही घेतली तर काय परिणाम होतील हे अनुभवण्यासाठी इन्वेस्टमेंट एकदातरी पाहावाच.
चित्रपटाचा ट्रेलर…
[tube]JtRE0H9CpZM[/tube]
[tube]stHwYaj33ZI[/tube]
इन्वेस्टमेंट चित्रपटा विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी भेट द्या .
फेसबुकवर इन्वेस्टमेंट चित्रपटाला लाइक करायला भेट द्या.
*मराठी चित्रपट, चित्रपटगृहातच जाऊन पहा, डाऊनलोड करणे किंवा डाऊनलोड केलेले चित्रपट पसरवणे बंद करा. मराठी चित्रपटसृष्टी आपल्या मनोरंजांनासाठी आहे ती टिकवण्यासाठी एवढेतरी करा. निर्माते, कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार, गायक तसेच चित्रपटसृष्टीवर अवलंबून असणार्या प्रत्येकाला त्यांच्या मेहनतीची दाद द्या.
मराठी असण्याचा नुसता अभिमानच बाळगु नका .. तर मराठी बाणा जगाला दाखवा.
शपथ घ्या मराठी चित्रपट, चित्रपटगृहातच पाहण्याची.