Marathi Article – जीवन

0
6182

Marathi Article – जीवन

marathi-article-jeevan

जीवन म्हणजे काय ? हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. जीवन म्हणजे नक्की काय ? जीवनाची व्याख्या अशी आहे की, एखादा जीव जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंतचा जो प्रवास असतो त्याला जीवन म्हणतात. एखादा जीव जन्माला आल्यानंतर त्याच्यासमोर अनेक प्रकारची संकटे येतात. आणि जो त्याच्यावर आलेल्या संकटांना धैर्याने, धाडसाने झगडून त्या संकटाशी सामना करतो तोच त्याच्या जीवनात यशस्वी होतो. आपल्या या जीवनातल्या प्रवासात माणूस हा एकटाच येतो आणि जातानाही एकटाच जातो. या जीवनात माणसाला खूप अनुभव येतात. या अनुभवातूनच माणूस कसे जीवन जगायचे हे ठरवतो. माणूस आपले हे जीवन ध्येयासाठी जगतो. कारण प्रत्येक माणसाचे काही ना काही ध्येय असते. माणूस आपले हे जीवन आपले ध्येंय पूर्ण करण्यासाठी घालवतो.

या जीवनात आपल्याला खुप काही करण्यासारखे असते पण आपले त्याकडे लक्ष नसते. आपण आपले जीवन आपल्यासाठी जगणे असे नाही आपण दुसऱ्यासाठी जगायला हवं. जी माणसं स्वत:साठी जगतात ती आयुष्यभर सुखी होत नाही आणि जी माणसे जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंतच्या प्रवासात अर्थात या जीवनात दुसऱ्यांसाठी जगले त्यांचे दु:ख आपले समजून दु:ख वाटून घेतले. प्रत्येक संकटात मदतीचा हात दिला. असे जर जीवन जगले तर आपले जीवन खूप सुंदर बनून जाईल. प्रत्येक माणसाला या जीवनातल्या प्रवासात सुख-दु:खाचे अनुभव येतात. आपले हे जीवन ऊन-सावलीप्रमाणे असते. आपल्या जीवनात सुख-दुख येत असतात. जीवनात सुखापेक्षा दु:ख अधिक असते. आपण या दु:खाला घेऊन बसण्यापेक्षा त्या दु:खाला सामोरे जावे म्हणजे आपल्या जीवनात सुख येईल.

सुख हे क्षणभंगूर असते. आपल्या आयुष्यात आपण हसत-खेळत सुख-दु:खाची गाणी गायची असतात. प्रत्येकाला दु:ख असते. गरिबांना दु:ख असते आणि श्रीमंतांनाही दु:ख असते. जरी तो खूप श्रीमंत जरी असला जरी अमाप संपत्ती त्याच्याकडे असली तर त्याला सर्व सुख मिळाले असे होत नाही. पैशाने सर्व सुख विकत घेता येत नाही. श्रीमंत माणूस कोणत्या ना कोणत्यातरी कारणाने दु:खी असतो. पण गरिबांना अनेक प्रकारची दु:ख असतात. दु:ख कसे झेलावे हे त्यांना माहित असते. गरिब माणसे समाधानवृत्तीचे असतात. जे आहे त्यातच समाधानी आहे असे ते मानतात. त्यामुळे ते श्रीमंतांपेक्षा जास्त सुखी असतात. आपले हे जीवन एका फुलाप्रमाणे असते. ते फुल मिळविण्यासाठी आपल्याला त्या काट्यांचा सामना करावा लागतो. त्यानंतर ते फुल आपल्याला मिळते. अशाचप्रकारे जीवनात आपल्याला सुख मिळविण्यासाठी आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यातच आपल्याला जीवन म्हणजे काय असते हे कळते.

कवी पु. ल. देशपांडे यांनी आपल्या काव्यरचनेत म्हटले आहे की, ‘जीवन हे खूप सुंदर आहे, ते थोडं जगून तर बघ.’ जीवनात सुख-दु:ख ही येतंच असतात. म्हणजेच आपण चिमुटभर दु:खाने न कोसळता, दु:खाचे पहाड चढून बघावे. दु:खाचे पहाड चढल्यावर आपल्याला यश हे मिळतेच. आपल्या जीवनात अपयश हे येतंच राहते. पण त्या अपयशाकडे आपण निरखून पहिले पाहिजे. तेंव्हा आपल्याला जीवनात यशस्वी होता येते. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आपल्याला घरटं बांधणं सोपं वाटतं. पण ते घरटं बांधण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते ती कष्टदायक असते. आणि कष्ट केल्याशिवाय जीवनात आपल्याला कधीच सुख-समाधान मिळत नाही. माणसाला कोणतेही दु:ख आले की, माणूस लगेच मरणाचा विचार करायला लागतो. त्याला ते दु:ख सहनच होत नाही. जगण्यात ज्या वेदना असतात त्या कमी असतात आणि मरण्यात ज्या वेदना असतात त्या असह्य असतात हे माणूस विसरतो. जगण्यात ज्या वेदना असतात त्यावर उपाय निघू शकतो पण मरण्यात ज्या वेदना असतात त्यावर कधीच उपाय निघू शकत नाही.

माणसाला जीवन हे एकदाच मिळालेलं असतं. त्या जीवनाचं सोनं कसं करता येईल हे ज्याचे त्यानेच ठरवावे. कारण आपल्याला जीवन हे एकदाच मिळालेलं असतं. जीवनात आपल्याला खूप काही करण्याजोगं असतं पण आपलं तिकडे लक्ष नसतं. कोणी नावं ठेवलं म्हणून जीवन जगणं सोडायचं नसतं. आपले चांगले काम आपण करत जायचे असते. लोकं नावे ठेवून दुसऱ्यांचे जीवन खराब करत असतात. पण कोणी पाय ओढले म्हणून आपण परतायचं नसते त्यावेळी आपले सामर्थ्य दाखवायचं असतं. या जीवनात आपल्याला अपयश आले म्हणून खचून न जाता आपल्या जिद्दीच्या बळावर आपलं जीवन सार्थक करायचं असतं. आपल्या जीवनात अनेक संकटे येत असतात. आपण त्या संकटांना ना घाबरता त्या संकटांना सामोरे गेलो तर जीवन खूप सुंदर बनून जाईल आणि आपले जीवन सार्थक होईल. कष्ट केल्याशिवाय जसे आपल्याला पैसा मिळत नाही. तसे जीवनात अनेक संकटे झेलाल्याशिवाय आपल्याला खऱ्या सुखाची किंमत कळत नाही. ज्यांना सुखाची किंमत कळते ते या जीवनात यशस्वी होतात. आणि त्यांचेच जीवन सार्थक बनते. आणि ज्यांना सुखाची किंमत कळत नाही ते जीवनात कधीच यशस्वी होत नाही. दुसऱ्यांसाठी जीवन जगणे यातच मोठे सुख असते.

महात्मा गांधीजींनी आपले संपूर्ण जीवन भारतीय लोकांना स्वातंत्र्य मिळविण्यासाठी घालवलं. त्यांना इतरांच्या सुखात आपले सुख दिसत होते. त्यामुळे त्यांचे जीवन खूप सुंदर बनून गेले. आपले जीवन आपण कसे जगावे हे आपणच ठरवावे. जीवन हे खूप सुंदर आहे. जीवन जगले तर खूप सुंदर बनून जाईल. जीवन हे एक स्वर्ग आहे. जीवन हे चांगल्यापरीनं जगता येते आणि जर जीवन चांगल्यापरीनं जगता आले नाही तर ते जीवन नारकापेक्षाही वाईट असते. जीवन हा एक रस्ता आहे. त्या रस्त्यावर चालत असताना आपल्याला अनेक व्यक्ति भेटतात. या जीवनाच्या वाटेवर फारच थोडी लोक साथ देणारी असतात पण मात करणारी लोक अनेक असतात. जीवन म्हणजे एक रस्ता. या रस्त्यावरून आपल्याला एकटेच चालावं लागतं कारण जी लोकं आपल्या स्वत:चाच विचार करत असतात, आपल्या

सुखाचा विचार करत असतात ती दुसऱ्यांच्या दु:खाचा विचार कधीच करत नाहीत. त्यामुळे आपले दु:ख आपल्यालाच दूर करावे लागते. आणि आपले जीवन आपल्याला एकटच जगावं लागतं. ज्याप्रमाणे आपण जगात येताना एकटेच असतो आणि जगातून जातानाही एकटेच असतो. त्याप्रमाणे आपले जीवन जगण्याचा अधिकार हा आपल्या एकट्याचा असतो.

 

 

समीर यरोळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here