नकटी – Marathi Katha Nakati

0
921

Marathi-Katha-Nakati

लेखिका : हर्षदा जोशी ,पुराणिक
संपर्क : harshadajoshi55@gmail.com

नकटी – Marathi Kavita Nakati

एका  नदीकाठी वसलेले आणि  गजबजलेले छोटेसे  आनंदगाव गाव होते. गावागावात अधिकतर असणाऱ्या त्या मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये जन्म घेतला या नकटीने . .
नकटीचे  खरे नाव होते सोशिका. .
तिचे वडील गावाबाहेर असणाऱ्या MIDC मध्ये मेकॅनिक म्हणून दिवस पाळी, रात्र पाळी आणि ओव्हरटाईम करू दमून भागून येणारा सामान्य कामगार होता. नकटीची आई शिवणकाम आणि शिकवणीतून घराला हातभार लावत असे . नकटीची एक मोठी बहीण  ‘स्नेहा ‘आणि लहान भाऊ  ‘सुंदर’ आणि मायेची सावली धरणारे आजी आजोबा असे सप्तसूर या घरात नांदत होते . उभे आयुष्य निळ्या कंपनीच्या कपड्यात ,जेमतेम पगारात आणि पत्र्याच्या दोन खोल्यांत निसटून चालले होते . पगारात उठायचे आणि पगारात बसायचे . चार आकडी पगार किराणा आणि घरखर्चातच निरोप घ्यायचा . डायरी मध्ये कोथिंबीरीचाही खर्च नोंदवावा लागे . शेवटी शिल्लकेचा रकाना रिकामा असे .
इंधनविरहित दोन चाकीवर चालून  या बापाच्या गुड्घ्यातले वंगण सुकले  तर आईच्या  काळजीचे वांग चेहऱ्यावर सुस्पष्ट दिसू लागे. काटकसर आणि पदरमोड करून देखील संसार रथाची चाके  कुरकुरल्याशिवाय राहत नव्हती. स्नेहा ,सुंदर नि  सोशिका यांना वर्षाकाठी एखादा ड्रेस हट्ट करून मिळत असे. त्यातही ज्येष्ठ म्हणून स्नेहाचा आणि वंशाचा दिवा ,शेंडेफळ म्हणून सुंदरचा लाड होताना पाहून  नकटी अर्थात सोशिकाच्या हृदयात कालवाकालव होत असावी …!

“नकटं व्हावं पण धाकट नाही” .
धाकटी तर होतीच पण नकटेपणाची भर देखील रूपाने घातली होती. नकटीचा स्वभाव हि अबोल ,अव्यक्त भित्रा होता .
आजीने “खाली मुंडी पाताळ धुंडी”. म्हणून हिणवावं आणि वडिलांनी खायला कहार भुईला भार म्हणून पिडावं. त्यातूनच अपुऱ्या पोषणाने झालेला मुडदूस तिच्या वरच्या  अन्यायावर वरचेवर भर पाडी.
दुसरी मुलगी व्हावी आणि जन्मताच तिचा तुटावा आणि वेदना असह्य होऊन रडू फुटणाऱ्या त्या  नकटीला वडिलांनी चिमटे काढावेत. यातूनच बाप आणि मुलीच्या नात्यात भीतीच्या भिंती उभारण्यात आल्या .
पेन ,वही ,शाळा,शिकवणीची फी वडिलांना मागायची वेळ आल्यास या नकटीचा  थरकाप  उडत असे . याबाबतीत तिच्या भावंडांचे वडिलांशी भावनिक नाते बरे होते. ते दोघे हट्ट करून आपल्या इच्छांची पूर्तता स्वतः करून घेण्यात यशस्वी होत . धाकटी मात्र अंतर्मुख असल्याने स्वतःचीच कुचंबणा करून घेत असे .
आई या धाकटीची बाजू उचलून धरण्याचा  पुरेपूर प्रयत्न करीत असे . आपल्या हट्टाला कोणी जुमानणार नाही हे ओळखून असा प्रयत्न तिने कधी केलाच नाही. तिचा  वाढदिवस आईला माहित असायचा पण आर्थिक दृष्ट्या हतबल होऊन नवऱ्यापुढे नतमस्तक होण्याखेरीज काही पर्याय नव्हता .
नकटीच्या तेराव्या वाढदिवसाचा तो प्रकार डायरीत वाचला .
नशिबाने वाढदिवसाची तारीख पण महिना अखेर घेऊन यायची . आई वडिलांचे आतल्या घरातले संभाषण ऐकून सोशिका वडिलांना म्हणाली ,”पप्पा.. मला काही नको. फक्त एक पेन मला नवीन आणून द्या ना . . ”
तो जपून ठेवलेला डायरीतील पेन तिच्या आयुष्यातील भावभावनांची ओली साक्ष देतो .
तडजोड म्हणून वडिलांनी व्यसनाचा आधार घेतला तर आई आज ADHD या मानसिक आजाराने ग्रस्त आहे . हा लघुलेख म्हणजे गरिबीचे चटके वर्तवणारा आलेख नसून भावभावना ,हक्क ,अधिकार यांची स्वतःशीच चाललेली झुंझ आहे . . स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी  तिने ‘ पेन ‘हे माध्यम बनवले . अनुभवाचे खाद्य तिच्या लेखनास पूरक ठरले. प्रतिकूल परिस्थितीतून उत्तम आरोग्याचे संतुलन आणि ज्ञानाने आंतरिक शक्तींचा विकास घडवून स्वतःस सिद्ध केले .

लेखन क्षेत्रातला उच्च सन्मान घेण्याचा सुवर्ण दिवस उजाडला. नकटीच्या डोळ्यात आज आनंदाचे डोह उचंबळत होते . घरातले सगळे जण कार्यक्रम स्थळी पोहोचले . नकटी तिच्या मैत्रिणीं समवेत रिक्षाने निघाली .
इकडे कार्यक्रम चालू झाला . सोशिकाचे नाव इकडे पुकारले… तरी पण हि तिकडे कशी अजून पोहोचली नाही याची घरातल्यांना चिंता वाटू लागली . वडिलांनी शेवटी हॉल बाहेर जाऊन पाहिले  तर तिकडे काही लोकांची गर्दी झाली होती . पण  वडिलांची नजर धावणाऱ्या रिक्षांवर पडत होती . आता येईल नंतर येईल . तोवर आईनेच तिचे बक्षीस स्वीकारले .
वडील पुन्हा नाराज होऊन खुर्चीत जाऊन बसले . आभार प्रदर्शनांती कार्यक्रमाचा आई वडिलांनी खिन्न मनाने  निरोप घेतला .
बाहेर  पडेपर्यन्त  सोशिका का पोहोचली नसेल याचा  थांग पत्ता लागत नव्हता .

हॉल बाहेर पडल्यानंतर गर्दी का ओसरली नाही या उद्देशाने आई, वडील ,भावंडे ,मैत्रिणी  त्या घोळक्यात पुढे सरसावू लागल्या . तिथे एका भीषण अपघाताचे दर्शन त्यांना घडले .
डोळे  मान्य करत नव्हते पण रक्तात न्हाऊन निघालेल्या   सोशिका च्या शरीराची  लक्तरं
जमिनीवर अस्थव्यस्थ पडली होती . . .

पूर्वसंचित प्रारब्ध  सोशिकाच्या नावाचा अर्थ नव्याने सांगून गेले . . .
ज्या कवितेवर तिला बक्षीस मिळाले  होते त्या कवितेच्या  काही ओळी. . .

कौतुकाचे नि माझे
कैसे वाकडे वाकडे
धर्मसंकटे नि त्यागाचे
मजपुढे साकडे साकडे . . .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here