Marathi Kavita – Kadhi Kadhi – कधी कधी
कवयित्री – आरती योगेश ढोरे
कधी कधी असह्य होतो एकटेपणा
भरल्या घरात जाणवतो परकेपणा
भरभरून दिलं तरी, तुझ्या ओंजळीत कायम रितेपणा II
कधी उठतो भावनांचा कल्लोळ, संतापाची लाट
विचारांचे काहूर आणि अश्रुंचे पाट
कधी घुसमट, कधी दुविधा, कधी जाड होतो श्वास सुद्धा II
कधी विरून जातात स्वप्नं, उरते निरस वास्तव
कधी कशी येऊ लागते स्वतःला स्वतःचीच कीव
विस्कटलेलं सावरताना अगदी थकून जातो जीव II
कधी वाटतं झोकून द्यावं स्वतःला खोल दरीत
स्वाधीन व्हावं लाटांच्या जंजाळात
झुगारून पाश सारे मुक्त व्हावं क्षणात II
कधी कधी प्रश्ण पडतो, किती आणि कसं सहन करू
पण पुन्हा प्रश्ण उरतो,
तुझ्याशिवाय कसं जगेल तुझं लेकरू? II
ते पण तर दिवसभर एकटच खेळतं,
रडतं, रुसत आणि स्वतःला रमवतं
पण झोपताना मात्र तुझ्याच कुशीत शिरतं II
वीट आला तरी प्रश्ण काही सुटत नाही
जगावं की मरावं? वाद काही मिटत नाही
जगावं की मरावं? वाद काही मिटत नाही II