Marathi Kavita -Vithuraya – विठुराया रं
कवी – अजय गोविंद धुरी
पळ दिस गेलं भीतरात ना सरली रं
मासामांग वर्षं आनं दशकशतकं खपली रं
मानसाच्या मनातला घोळ काय सरनां
इटेवरून विठुराया पाय तुजा ढळनां
ज्ञानीयाची ज्ञानेशरी तुकोबाचं अभंग रं
ओव्या पोथ्या भजन श्लोक झालं लई पंथ रं
कामक्रोध लोभमत्सर वेढा त्यो सुटनां
जगण्याला त्वांड देता मरावं कसं कळनां
सांग तुज्या दुनियेचा आदी कुटं अंत रं
कोनीबी काय सांगतं जितकं खोटंं मन रं
कुटच्या दिशेला डोळ न्यावं त्येचं कळनां
धाव आतां दिल्या देहात जीव तो थोपनां
तूच दिली सूर्याचंद्रा दिनरातीची शिस्त ना रं
मंग का हवी तुला आषाढी एकादशी खास रं
सकाळच्या पारी तुजं नाव कुनी घेईनां
चंद्रभागेतीरी वारीचा लोट तो उमजनां
जिमीन पानी निळं आभाळ सार जग तुजचं रं
प्रानी पक्षी फुलं झाड सारं तुझी लेकरंं ना रं
सनावारी तुज्या दारी तेंचि आरास बगवनां
बळीचं रक्तं पाहुन देवा डोळं तुज भरनां
इंद्रदेवाची लहर आनं थकली धरतीमाय रं
बियाण्याची सुकली वाणं हरवली गोफण रं
सणासुदी बायका पोरबाळ माजी खुलनां
भैरुची बाशिंगझूल पोळ्याला पुरी सजनां
असा कसा राया तुजा उफराटा न्याय रं
पिकईतो त्याच्या टाळी दरिद्र्याचा टिळा रं
फाटक्या खिशाची शिवण काय टिकनां
बळीराजाची उपादी आता मला सोसनां
पैकाअडका नुको शांत जगन्याची आसं रं
पेरत्या मातीतून दे तुजा निस्ता हिरवा भास रं
पंढरीचा पत्त्या असा कसा तुला सोडवनां
वाट पाहतुया तुजी आता नांगर पन धरवनां
पूर्वापार चालत आलेली शेतकऱ्याची गाथा आणि माझ्या मनीच्या काही व्यथा सांगणाऱ्या ह्या ओळी आपल्या ग्रुप
वाचकांपर्यंत समर्पित 🙏🙏🙏
अजय गोविंद धुरी
वय 48
बोरीवली, मुंबई