नाती दोघांचीही – Marathi Katha Nati Doghanchihi

0
1341

Marathi-Katha-Nati-Doghanchihi

लेखिका – जयश्री हाडवळे-कुलकर्णी
संपर्क – jayuh10@gmail.com

नाती दोघांचीही – Marathi Katha Nati Doghanchihi

“श्रेया, आज इतकी शांत का??” आरती ने विचारलं. आज दोघी खूप दिवसांनी भेटत होत्या.कारण श्रेयाच लग्न ठरलं होत. दोघी खूप जिवाभावाच्या आणि जवळच्या मैत्रणी. रोज आनंदात असणारी श्रेया आज आरतीला काहीशी गंभीर वाटली.

तिला आठवला तो एक महिन्यापूर्वीचा दिवस! श्रेया त्या संध्याकाळी सांगत होती, तिला की दुपारी पाहायला आलेले पाहुणे, राखेश बरोबर झालेल्या तिच्या गप्पा आणि दोन्हीकडून संमती मिळून त्यांचं जमलेलं लग्न! त्या दिवसापासून श्रेया खूप आनंदात आणि उत्साहात असायची, मात्र ह्या दोघींच्या भेटी कमी होऊन त्या दोघांच्या भेटी वाढल्या होत्या.पण आज काय झालंय हिला? “आता सांगणार आहेस का? की तुझ्या राखेशला फोन करून विचारू?” आरतीने गंमतीत म्हटलं…

तशी श्रेया बोलू लागली, “अग काही नाही कालच्या रविवारी राखेश भेटायला नाही म्हणाला.” आरतीला हसूच आलं आणि तिने तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाली, “इतकंच ना! मग आता त्याने बाकीची काम करूच नये का? तुला भेटतच राहावं का, अगं बिजी असेल तो एखादा रविवार नाही भेटलात तर चालत गं.” आता श्रेया बोलायच्या तयारीने तिच्याकडे जास्त वळून बसली अन म्हणाली, “अगं नाही गं, तस नाही. मला काही वेगळंच वाटतंय, मला नाही वाटत आमचं लग्न होईल!” आता आरती उभीच राहिली! आणि आपण बागेत आहोत, आपल्याशिवाय इथे लोक आहेत हे लक्षात आल्यावर क्षणात खाली बसली. “काय बोलतीयेस तू? काही झालाय का तुमच्यात, तू काही बोललीस का? की तो काही बोललाय तुला? मला नीट सांग.” आरती म्हणाली.

“बघ ना हुंडा न मागणारा, निर्व्यसनी, मला शोभेल असा देखणा, उच्च शिक्षण, पगार सगळं सगळं चांगलं आहे गं पण…” आणि मग श्रेया पुढे बोलतच राहिली मागच्या रविवारी ते दोघे भेटले तेव्हा तो जरा गंभीर वाटला.. हिने काय झालं विचारलं तेव्हा त्याने सांगितलं की, “अग माझ्या चुलत बहिणीच लग्न मोडलं.” ह्या बहीण भावाच  लग्न एकाच हॉल वर होणार होत हे श्रेयाला आधीच माहीत होतं तिला ही धक्काच बसला. का मोडलं तर ह्याच्या बहिणीने म्हणे त्या मुलाला विचारलं होत की, मी जशी तुझ्या घरची सून होऊन तुझी नाती जपणार तस तू माझ्या घरचा जावई होऊन माझी नाती जपशील का? आणि हे आवडलं नव्हतं त्या मुलाला, त्या मुलाच्या घरच्यांना अन आश्चर्य म्हणजे तिच्या घरच्यांनाही. साधी गोष्ट आणि साधी अपेक्षा होती त्या मुलीची, त्याने तितक्याच मनापासून हो म्हणायला हवं होतं ना..मात्र राखेश आणि घरातले सगळेच त्याच्या बहिणीवर चिडले होते आणि  त्यांचं हे चिडनं श्रेयाला मान्य नव्हतं आणि ह्या मुद्यावरून ह्या दोघांमध्ये पहिला वाहिला वाद झाला होता! राखेशच म्हणणं की अग आम्ही बदलतोय ना गं आमची मानसिकता, मग तुम्हा मुलीं का तुमची वेगळीच मानसिकता निर्माण करताय? ती पटकन म्हटली, “अरे कसली वेगळी मानसिकता काय बोलतोयेस तू?” क्षणात तो बोलला “अगं हेच आम्ही हुंडा घेण नाकारतोय, तुमची आयुष्यभरासाठी जबादारी घेतोय तर हे काय आता नवीन तुम्हा मुलींचं? आणि माझ्या बहिणीचे विचार तुला पटतायेत ह्याचा राग येतोय मला तू वहिनी म्हणून आमच्या सोबत राहायला हवं तर तू तिला  सपोर्ट करतीयेस?” आता श्रेयाने बोलायचं ठरवलं “हे बघ राखेश सगळ्यात आधी मी एक मुलगी आहे अन सद्या तरी माझ्या आई वडिलांची मुलगी आहे… सॉरी! सध्या नाही सर्वात आधी अन कायमची म्हणायचं होत मला! एक मुलगीच एका मुलीच्या भावना समजू शकते. तुला नाही कळणार ते! दुसरी गोष्ट, आयुष्यभरासाठी तुम्ही मूल आमची जबाबदारी घेता? What do u mean Rakhesh?? माझ्या मते, लग्नानंतर आपण दोघे एकमेकांची जबादारी घेतो आणि आजकल तर दोघेही कमावते आहेत आणि एखादा कमावता, जरी नसला तरी एक जण पैसे कमावतो अन एक जण त्या पैशाचा वापर करून एक नवीन घर आपलंसं करून सांभाळतो. तू आजारी पडलास, की मी तुझं औषधपाणी (जेवू घालणं,वेळेवर औषध देणं,डॉक्टरकडे नेणं) करणार बायको म्हणून. मी आजारी पडले तर मला औषध आणून देणार. म्हणजेच, आपण एकमेकांची जबादारी घेतली तरच आणि तरच संसार सुखी होऊ शकतो. आणि ह्याची जाणीव दोघांना असली, की तो शेवटपर्यंत होऊ शकतो नाही का?? अन हुंडा न घेणं ही मानसिकता बद्दलण्यासोबत, एक वाईट परंपरा मोडीस काढणं आहे ह्यात कौतुक तुझंच होणार आहे! माझ्यावर उपकार केल्यासारखे का बोलतोयेस तू? आणि तिसरा मुद्दा, तुझी बहीण नाही का नवीन नाती संभाळायला तयार झाली? तर त्या मुलाने का नाही होऊ? आता राखेश जास्तच चिडला आणि म्हटला, “अग काय संबंध?? तु माझ्या घरी कायमची राहायला येणार आहेस मी तुझ्या घरी फक्त पाहुणा म्हणून जाणार आहे, मी औपचारिकता सांभाळली तरी पुरे.”

पुढे श्रेया एव्हडचं बोलली की, “ठीक आहे आता मी निघते. मला थोडा विचार करावा लागेल आपल्याबद्दल.” “what nonsense.! काय बोलतीयेस तू?” “हो रे मला थोडा विचार करायचाय After all, I am choosing my life partner for my whole life! येते मी बाय.”

हे त्यांचं शेवटचं संभाषण, त्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ होणारे फोन सुद्धा बंद झाले होते आणि आता आरती हे सगळं ऐकून सुन्न झाली होती. आणि आपल्या रडणाऱ्या मैत्रिणीला कुरवाळत होती.

मला वैयक्तिक अस वाटत की, श्रेयाच काहीच चुकीचं नव्हतं! क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीवरून दोन जमलेली लग्न तुटली, पण बरच नाही का झालं? पुढे आयुष्यात पगार,गाडी, बंगला ह्यापेक्षा एकमेकांच्या भावनांना दिलेलला आधार महत्वाचा वाटतो. आणि तोच नाही म्हटल्यावर स्वतःला बंदीस्त करून घ्यायच का गाडी बंगल्यात? तेव्हा एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या भावना सांभाळणं खूप महत्वाचं असतं!हा, मग ह्यात अस होत नाही बरं का की, मुलीने म्हणावं मला स्वतंत्र राहायचं आहे. मुलाच्या आईवडिलांना आपल्या घरापासून दूर करण्याचा विचारापेक्षा, आपल्या आईवडीलांना आणखी एक आपलं घर देण्याचा विचार कधी ही चांगलाच! मात्र, काही ठिकाणी पाहायला मिळत, त्यांना सून हवी असते मुलीप्रमाणे वागणारी पण, जावई मुलाप्रमाणे वागला की आमचा मुलगा दूर गेलाय किंवा आम्ही तो त्यांना दत्तक दिलाय इथपर्यंत वाक्य येतात!

असो, सारांश एव्हढाच की, लग्न झाल्यानंतर दोघांनी एकमेकांची नाती जपावीत. अगदी मुलगी किंवा मुलगा होऊन नाही जमल तरी चांगली सून अन चांगला जावई म्हणून तरी. ह्यात दोघांच्या भावनांना जपणूक मिळते, आणि एकमेकांबद्दल आदर वाढतो. हा स्वानुभव आहे!

निदान आपल्या पिढीने तरी इथून पुढे बदलावे आणि अशीच बदलेल्या मानसिकतेची पिढी घडवावी… (नाती जपणं म्हणजे समोरच्याला सांभाळून घेणं, त्याच्या न आवडलेल्या वागणुकीकडे दुर्लक्ष करण! हेच मी थोडं जरी केलं, तरी माझा नवरा मला बराच आदर न कौतुकास्पद शब्द देतो! आणि त्याचा आदर आणि कौतुक मला नेहमीच आहे आणि राहील.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here