फॉरेनची नवरी भाग २ – Marathi Katha Forenachi Navari – Part -2

0
835

Marathi-katha-forenachi-navari-2

लेखक : साईनाथ सुरेश टांककर
संपर्क: tsai143@gmail.com

भाग १ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा

फॉरेनची नवरी भाग २ – Marathi Katha Forenachi Navari – Part -2

सकाळी फोन वाजला. मी मोबाईल पाहिला तर प्रशांतचा फोन. वेळ होती सकाळी साडे-सहाची
“बोल प्रशांत.”
“काका मी प्रशांत नाही, सोहम बोलतो आहे.”
“सोहम, इतक्या सकाळी तू फोन केलास? काही प्रोब्लेम नाही ना?”
“काका प्रोब्लेम काही नाही. मी हे विचारायला फोन केला की अॅनीने रात्री तुम्हाला त्रास नाही दिला ना?”

शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काही संबंध नसतो हे पुन्हा सोहमने सिद्ध केले. अरे ती काय लहान बाळ आहे का रात्री रडून त्रास द्यायला? पण काही करू शकत नाही. सोहमसारखी असंख्य माणसे आपल्या आजू-बाजूला वावरतात.
“काका तुम्ही गप्प का?” मी विचारात असताना सोहम पुन्हा बोलला.
“नाही काही नाही. तिने काही त्रास नाही दिला.”
“ओ.के. काका मी तिच्याशी बोलू शकतो का? मला तिची आठवण येते आहे.”

आता कहर झाला. यांच्यासारख्या प्रेमीयुगालांमुळे या टेलिफोन कंपन्यांचे फावते. अरे शनिवारी रात्री तुमच्यामुळे झोपायला २ वाजले आणि रविवारी सकाळी साडेसहा वाजता मी पलंगावरून उठून मोबाईल सावनीच्या रुममध्ये जाऊन अॅनीला मोबाईल देईन असे या सोहमला का वाटते? वाटले तर वाटू दे हे असे घडणार नाही. पण मित्राच्या मुलाला असे सरळ-सरळ नाही म्हणता येत नाही.

“सोहम मी गेलो असतो पण ती आता सावनीच्या रुममध्ये झोपली असेल. उगाच तिला डिस्टर्ब कशाला. मी एक काम करतो ती उठली की लगेच तुला फोन करतो.”
“ठीक आहे काका. ठेवतो फोन.” त्याच्या आवाजात नाराजी होती पण मला इतके वाईट वाटत नव्हते.

मी पुन्हा झोपायला गेलो. काही वेळाने पुन्हा फोन वाजला. पुन्हा प्रशांत. मी घड्याळ पाहिले. सात वाजून १० मिनिटे झाली होती.
“बोल सोहम.” मी फोन उचलत म्हणालो.
“सोहम नाही रे मी प्रशांत बोलतोय.”
“अच्छा, मग बोल प्रशांत.”
“तू बोललास का अॅनीशी?”
“कशाबद्दल?” हे बाप बेटे माझ्या रविवारच्या साखर झोपेची वाट लावायच्या मागे होते.
“अरे मी तुला काल मेसेज केला होता, तू समजाव ना अॅनीला.”

मघाशी उगाच सोहमला मी बोललो. त्याचा काही दोष नव्हता. डीफेक्ट मूळ वस्तुत होता. प्रशांतला इतके समजले पाहिजे की रात्री एक-दोन वाजता मी तिच्याशी अशा विषयावर कसा बोलेन? त्यात आमच्यात भाषेचे अडसर. मी म्हटले तसे- शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काही संबंध नसतो.

“विश्वास, काय झाले?”
“प्रशांत, माझे बोलणे नाही झाले तिच्याशी. नाश्ता करताना मी विषय काढतो आणि तुला कळवतो.”
“ठीक आहे, इथे मलाही भक्तीला सांगायची हिम्मत नाही झाली. बघतो कसे जमते ते. चल बाय.” प्रशांतने फोन ठेवला. लोकांना कधी कळणार की जगातले सगळे प्रोब्लेम एकीकडे आणि सकाळी उठण्याचा प्रोब्लेम एकीकडे. त्यातही जर रविवार असेल तर उठण्याचा प्रोब्लेम दुप्पट होतो.

या बाप-लेकाने माझ्या निद्रेवर पाणी टाकले होते. आता झोपून चालणार नाही. परिस्थितीचा आढावा घेऊन पाऊल उचलण्याची वेळ होती. मी बाहेर आलो. बायको सोफ्यावर बसून चहा पीत होती.
“काय हो, आज इतक्या लवकर उठलात?”
“हो, झोप पूर्ण झाली म्हणून उठलो.” तिला खरे कारण सांगायचे नव्हते. समजा एखाद्या वेळी तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी सकाळचे फोन करून सतावले तर तिला काही बोलता आले नसते.
“चहा घेऊन येऊ का तुमच्यासाठी?”
“नको लगेच.” मी सोफ्यावर बसलो. “अॅनी उठली का?”
“हो सहा वाजताच. तिच्यामुळे कधी नव्हे तर सावनीसुद्धा रविवारच्या सकाळी एवढ्या लवकर उठली नसेल. नंतर दोघींनी थोडा वेळ योगा केला. आता आवरत आहे दोघी.”

कमाल आहे अॅनीची. रात्री उशिरा झोपूनदेखील सकाळी लवकर उठून योगा केला. तिची सवय सोहमला माहित असणार म्हणूनच त्याने सकाळी तिला फोन केला होता.
“ठीक आहे. मी पटकन आवरून घेतो. सर्वजण एकत्र नाश्ता करू. हे बघ, आज नाश्ता बनवताना काळजी घे की तो जास्त तिखट किंवा तेलकट बनणार नाही. त्यांना सवय नसते.”
“मलाही असेच वाटत होते. पण अॅनी सकाळी म्हणाली तिला तिखट आवडते. तिने भारतीय पद्धतीत नाश्ता बनवायला सांगितला आहे.”
“ठीक आहे. तू बघ काय ते. मी आवरून येतो.” मी पटकन आवरायला गेलो.

मी पटकन आवरून घेतले. बाहेर आलो. पाहिले तर सावनी देवासमोर उभी राहून गणपती स्त्रोत्र म्हणत होती. इतक्यात अॅनी आली. सावनीला प्रार्थना करताना पाहून गालातल्या गालात हसली. सावनीची प्रार्थना झाली आणि आम्ही नाश्ताला बसलो. मराठी माणसांच्या घरातील सुप्रसिद्ध पदार्थ- कांदे पोहे बायकोने बनवले होते. सोबत थालीपीठ. मी अॅनीसोबत संवाद साधला; अर्थार्त सावनीमार्फत. मी मराठीत बोलायचो, ते सावनी अॅनीला इंग्रजीत सांगायची, अॅनी इंग्रजीत उत्तर द्यायची, ते सावनी मला मराठीत सांगायची, असा दळभद्री प्रकार चालू होता. इतर अवांतर गप्पा झाल्यावर मी प्रशांतच्या मुद्द्याला हळवारपणे साद घातली.
“तू सावनीला पूजा आणि प्रार्थना करताना पाहून हसत का होतीस?” माझा प्रश्न सावनीने अनुवाद करून अॅनीला विचारला.
“कारण देवावर माझा विश्वास नाही. त्यामुळे अशाप्रकारच्या प्रार्थना मला हास्यस्पद वाटतात.” तिने इंग्रजीतून दिलेले उत्तर सावनीने मला भाषांतर करून सांगितले.
“तुझा देवावर का विश्वास नाही?” हा माझा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता.
“कारण मी विचार तर्काने करते. ज्या गोष्टीला मी पाहिले नाही, अनुभवले नाही, ऐकले नाही त्या गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही.” अॅनीचे इंग्रजी बोलणे मला थेट समजले नाही पण तिच्या बोलण्यातील आत्मविश्वास मला जाणवला. सावनीने ते मला अनुवादित करून सांगितले.
“हे खूपच चांगले आहे.” मी तिचे कौतुक केले. तिच्या विचारांना एकदम तडा जाईल असे बोललो की समोरची व्यक्ती दु:खावते हे मला माझ्या अनुभवातून समजले होते.
“तुझ्या घरी कोण-कोण असतं?” मी अवांतर चौकशी केली. मी कुठल्या विषयासंबंधी तिच्याशी हेतूपूर्वक बोलणार होतो हे मला लगेच कळू द्यायचे नव्हते.
“आई आणि लहान बहिण.”
“आणि बाबा?” मी विचारले खरे पण नंतर मी दचकलो. तिथे बाबा आईपासून वेगळे राहणे अगदी स्वाभाविक होते. पण जर त्यांचा मृत्यू झाला असेल तर.
“ते या जगात नाही. त्यांचा स्वर्गवास झाला आहे.” असे म्हणत तिने तिच्या पर्समधून त्यांचा फोटो काढला आणि आम्हाला दाखवला.
“तुला कसे माहित ते मेल्यावर स्वर्गातच गेले?” सावनीने अचानक हा प्रश्न तिला विचारला आणि मला मराठीत सांगितले. अनपेक्षितपणे सावनी या संभाषणात पडली होती. मी सावनीला चांगलाच ओळखून होतो. तिला आपल्या संस्कृतीबद्दल कोणीही वाईट बोललेले आवडत नाही. अॅनी तिच्यासोबत काल रात्रीपासून होती आणि एव्हाना सावनी तिला नीट ओळखू लागली होती.
“कारण माझे बाबा खूप चांगले होते. लोकांची मदत करायचे. आम्हाला खूप सुखात ठेवले त्यांनी. चांगली माणसे ही नेहमी स्वर्गात जातात म्हणून मी असे म्हटले.”
“पण स्वर्ग ही फक्त आपली कल्पना आहे. तो कोणीही पाहिला नाही किंवा अनुभवला नाही. त्याच्याबद्दल फक्त दंतकथा उपलब्ध आहेत. मग अशा गोष्टींवर तू कसा विश्वास ठेवते.” बहुतेक आता मला काही बोलायची आवश्यकता नव्हती. माझे काम सावनी अगदी चोख करत होती.
“मग मेल्यावर माणसे कुठे जातात?” अॅनी तिची शंका विचारली. सावनी तयार होती.
“मातीत. या मातीत मिसळतात आणि खत बनतात. ते खत झाडे शोषून घेतात आणि त्यांच्या वाढीसाठी वापर करतात. यालाच विज्ञानाने ‘फूड सायकल’ असे नाव दिले आहे. तू शाळेत वाचले असेलच ना?” अॅनीने मान डोलावली. काही क्षण शांत गेले.
“मी मान्य करते सावनी तू बोलली ते. पण मी नास्तिक आहे. माझा देवावर विश्वास नाही. त्या मूर्तींमध्ये अथवा फोटोंमध्ये असे काही देवांचे अस्तित्व दिसत नाही मला.” सावनी आता शांत होती. तिने माझ्याकडे पाहिले. सावनीचा अनुभव कमी होता आणि आता मला पुन्हा जबाबदरी घ्यायची होती.

“अॅनी तू तुझ्या बाबांच्या फोटोवर थुंक ना.” मी असे बोलल्यावर बायको आणि मुलगी अवाक् झाले. तिने मी काय सांगितले ते अॅनीला सांगितले नाही. मी तिला सांगण्यासाठी खुणावले. तिने मानेने नाही म्हटले. मी डोळ्यांनी तिला खुणावले. घाबरत सावनीने ते भाषांतर करून अॅनीला सांगितले.
“काय!!!! तुम्ही वेडे आहात काय?” हेसुद्धा सावनीने मला घाबरत सांगितले. आपल्या बापाला कोणी वेडे म्हटलेले तिला आवडत नव्हते. पण तिच्या बाबांनी अॅनीला सांगितले तसे होते. अॅनी काय कोणीही तिच्या बापाला वेड्यात काढले असते. तरीही तिला मला सांगणे भाग होते.
“त्यात काय आहे. तो फोटो तर आहे. खरोखर तुझे बाबा थोडीच आहेत. त्याने काय फरक पडणार.”
“तो माझा विश्वास आहे की हे माझे बाबा आहेत. मी या फोटोमध्ये त्यांना पाहते.”
“अगदी बरोबर, जसे त्या फोटोमध्ये तू बाबांना पाहतेस आम्ही या मूर्तीमध्ये देवाला पाहतो. आमचा देव ही आमची उर्जा आहे. भारतीय संस्कृती परोपकारी आहे. आम्ही मानतो की या ऊर्जेमुळे आपल्याला हे जग अनुभवता येते. त्या उर्जेला धन्यवाद द्यायला नको. आम्ही आमचे प्रोब्लेम सोडवतो, ते सोडवण्यासाठी अगदी तुमच्या भाषेत सांगायचे तर त्यावेळी सकारात्मक राहण्यासाठी आम्ही देवाकडे साकडं घालतो. आमच्या वेदांमध्ये देवाला निराकार म्हटले आहे पण एखाद्या निराकार गोष्टीकडे पाहून तुम्ही एकाग्र होऊ शकत नाही म्हणून आम्ही मूर्ती पूजा करतो. मान्य आहे आम्हाला की आमच्या काही रूढी-परंपरा चुकीच्या आहेत पण म्हणून सर्व चुकीचे आहे असे समजूत करून घेणे जास्त वाईट नाही का? पुरातन काळात जे हवन-यज्ञ व्हायचे, त्यात आहुतीसाठी वापरलेली सामुग्री ही हवा शुद्ध करायची. उत्सवात आम्ही एकत्र यायचो. सकाळी जो योगा तू करत होतीस तो आमच्या भारतीय संस्कृतीची देण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्या भारतीय संस्कृतीने सहनशीलता आणि दुसऱ्यांच्या मताचे आदर करायला शिकवले. त्यामुळे इथे तडजोड करून कित्येक संसार टिकतात जे पाश्च्यात्य देशात नाही होत. आमची पिढी तुमच्याकडून याच सवयी दुर्दैवाने घेते आहे.”
“मी मान्य करते माझ्या भूमिका बऱ्याचदा टोकाच्या असतात. पण हे सगळे तुम्ही मला का सांगता?” आय मीन पहिल्याच औपचारिक भेटीत हे असे विषय तुम्ही हेतुपूर्वक काढले असे मला आता जाणवते आहे.” अॅनी खरंच हुशार होती. मी मनोमनी सोहमच्या निवडीची प्रशंसा केली.
“अॅनी, मी तुझ्या मतांचा आदर करतो. तू आता जे बोललीस ते अगदी योग्य आहे. पण अॅनी भारतात फक्त मुलगा आवडला म्हणून लग्न होत नाही. इथे लग्न दोन जीवांची नाही तर दोन परिवारांची असतात. इंग्लंडमध्ये सोहम जितक्या मोकळेपणी तुझ्यासोबत वागत होता तितकाच तो आता त्याच्या घरच्यांसमोर वागणार नाही. तुमच्याकडे आई-बाबांसमोर चुंबन घेणे सर्रास असेल इथे आई-बाबांसमोर मुलगा बायकोचा हात धरतानाही बिचकतो. पण परिस्थिती आता बदलली आहे पण इतकीही नाही. सोहम तुला बोलला की नाही माहित नाही पण त्याची आई खूप देवभोळी आहे. तू आणि ती दोन विरुद्ध टोकं आहात. मी स्पष्ट सांगतो की तुला सर्वांच्या मताने सोहमसोबत लग्न करायचे असेल तर तुझा नास्तिक स्वभाव बदलावा लागेल. हे सांगण्याची जबाबदारी सोहमच्या बाबांनी माझ्यावर सोपवली आहे. सोहमचे बाबा त्याच्या आईला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. तू तुझ्या बाजूने विचार कर.”

आमचे संभाषण तापले होते आणि चहा थंड झाला होता. काही क्षण शांत गेल्यावर अॅनीने मला एक प्रश्न विचारला आणि मी निरुत्तर झालो. डोके बधीर झाले. मी उत्तर देणे टाळले कारण माझ्याकडे त्या प्रश्नाचे उत्तर नव्हते.

मी काही कामासाठी जातो म्हणून सांगून बाहेर पडलो. जाण्याआधी प्रशांतला सोहमला घेऊन लगेच घरी ये असे सांगून टाकले. बायकोला त्यासर्वांचे जेवण बनव सांगून मी निघालो. ४-५ तासांनी मी घरी परतलो. मी फोन बंद केला होता त्यामुळे माझ्याशी कोणी संपर्क साधू शकत नव्हते. मी घरात शिरताच प्रशांत आणि सोहम उठून उभे राहिले.
“विश्वास आहेस तरी कुठे? आम्हाला इथे बोलावून तू कुठे गेलास? तुझा फोन बंद होता.”
“हा मीच तो बंद ठेवला होता. मला एक सांग, तुम्ही जेवलात का?
“हो आमचे जेवण झाले, तू कुठे होतास?”
“सगळं सांगतो. आधी मला अॅनीला कोणाशीतरी ओळख करून द्यायची आहे.”
“कोणाशी ओळख?” सोहम म्हणाला. मी अॅनीला हातांनी पुढे यायला खुणावले. ती पुढे आली. “या आत या वाहिनी.” मी असे म्हणताच सगळेजण दाराकडे बघू लागले. दारातून भक्ती आत आली. भक्तीला पाहून प्रशांत आणि सोहमच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव प्रकटले.
“ही तुझी Mother in law.” इतके इंग्रजी मला येत होते आणि भक्तीला म्हणालो, “ह्या तुमच्या सुनबाई. आहे की नाही एकदम बाहुलीसारखी सुंदर?” एव्हाना काही चालीरीत्या अॅनीला समजल्या होत्या. तिने लगेच भक्तीच्या पायाला मनोभावे स्पर्श केला. भक्तीनेदेखील डोळ्यातील काजळ बोटांवर घेऊन तिच्या कानाच्या मागे लावले. प्रशांत आणि सोहम हे सर्व पाहून भारावून गेले होते.
“भक्ती तू इथे?” प्रशांतने घाबरत विचारले. भक्ती गालात हसली आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, “हो माझ्या घरच्या लक्ष्मीला मी इथून घेऊन जायला आले आहे.”

प्रशांत आणि सोहम माझ्याकडे पाहू लागले. त्यांच्या मनातला गोंधळ मला लक्षात आला. मी सर्वाना बसायला खुणावले.
“सावनी, भक्ती काकी आणि मला पाणी घेऊन ये.” सावनी आत गेली.
“विश्वास, हे सर्व काय आहे. जरा नीट सांगशील का?”
“हो सांगतो. जरा दोन घोट पाणी तर पिऊ दे. बाहेर कसले ऊन आहे. दररोज ऑफिसमध्ये ए.सी.मुळे जाणवत नाही रे.” सावनी पाणी घेऊन आली. मी पाणी प्यायलो आणि बोलू लागलो.

“प्रशांत तू माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी पार पडली. अॅनी आणि भक्तीच्या विचारांची तफावत आता दूर झाली आहे. मी आपल्या परीने अॅनीला देवाच्या अस्तित्वाची जाण करून दिली. तिला ती पटली. सोहम, अॅनी समजूतदार आहे. त्यामुळे ती संसार उत्तम करेल. खरं तर ही आजची पिढीच खूप समजूतदार आहे. आपण त्यांना गोष्ट नीट समजून सांगितली पाहिजे. मी खूष होतो की मी तू दिलेली जबाबदारी पार पडली. पण शेवटी अॅनीने विचारलेला एक प्रश्न मला अस्वस्त करत होता.”
“कुठला प्रश्न?” सोहम मधेच म्हणाला.
“एक साधा प्रश्न. ती म्हणाली की मी माझ्या प्रेमासाठी माझा देश सोडून आले. तुमच्याशी संवाद साधण्यासाठी मी मराठी आणि हिंदी शिकण्याचा निर्णय घेतला. रात्री आल्यावर झोपण्यापूर्वी तिने या संदर्भात सावनीला विचारले होते. डोळसपणे देवाची पूजा करायला ती तयार झाली. तिने फक्त इतकेच विचारले की ती एवढे सर्व करणार आहे तर ती ज्या परिवारात जाणार त्या परिवाराने काय केले? आईच्या भीतीने मुलाने तिला एका परक्या घरात ठेवले. लग्नानंतर एखादे संकट आले तर तिचा नवरा तिला असेच सोडून देईल का? तिने सोहमशी लग्न करायचे ठरवले कारण भारतीय मुलं एकनिष्ठ किंवा Committed असतात. परिस्थितीला घाबरून ते बायकोला सोडून नाही देत. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असतात. पण सोहमने असे धाडस नाही केले आणि दुर्दैवाने प्रशांत तू सुद्धा. १२ तास होऊन गेले तरी तू भक्तीला याबद्दल काहीच सांगितले नाही. तू योग्य वेळेची वाट पाहत होता. पण मित्रा, वेळ कधीच सांगत नाही की ती योग्य आहे. आपण ठरवू ती वेळ योग्य असते. म्हणून तुला इथे बोलावून मी तुझ्याघरी भक्तीशी बोलायला गेलो.”

“तू सांगितले असते तर आम्ही थांबलो असतो घरी.” प्रशांत मध्येच म्हणाला.
“मला तुमच्यासमोर बोलायचे नव्हते. तू भक्तीला सांगायला घाबरलास वाद होतील या भीतीने. पण योग्य संवाद हा वादाला रोखू शकतो हे तू विसरलास. कुठलाही प्रश्न बोलून सोडवता येतो. फक्त तो योग्य शब्दात आणि योग्य पट्टीत मांडता आला पाहिजे. भक्तीला मी अॅनीची बाजू समजावली. सोहमची निवड योग्य कशी आहे हे पटवून दिले. आधी तिला पटले नाही पण नंतर तिने तुम्हा दोघांच्या सुखासाठी मान्य केले. मुख्य म्हणजे तिला अॅनीबद्दल मनात कसलीही अडी नाही.”

भक्तीने मान डोलावली. सावनीने अॅनीला अनुवाद करून सांगितले आणि त्या विदेशी बाहुलीच्या डोळ्यात चक्क पाणी आले. इंग्रजांनी भारतीयांना रडवले हे मी ऐकून होतो पण भारतीय माणसाच्या चांगुलपणामुळे एका ब्रिटीश तरुणीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले हे इतिहासात नोंद करण्यासारखे होते. अॅनी उठली आणि माझ्याजवळ आली. तिने माझ्या पायाला भावनापूर्वक स्पर्श केला. मी तिला उठवले.

“विश्वास तू अॅनीला समजावले हे मी समजू शकतो. तू भक्तीला समजावण्यात कसा यशस्वी झालास?” प्रशांतने प्रश्न विचारला. तो ती कामगिरी पार पाडण्यात कमी पडला होता म्हणून त्याला ते रहस्य जाणून घ्यायचे होते.
“ते तू भक्तीला विचार.” आता सगळे भक्तीकडे पाहू लागले.
“सगळे असे का पाहताय? मघाशी विश्वास म्हणाला ना की गोष्ट नीट सांगितली तर ती कळते. माझ्या मनातली भक्ती किंबहुना आपल्या सगळ्यांच्या मनातली भक्ती किती कमकुवत आहे ते मला विश्वासच्या प्रश्नावरून कळले.”
“कुठला प्रश्न?” सोहमने विचारले.
“एक अत्यंत साधी गोष्ट आणि त्यानंतरचा प्रश्न. सोहम मी तुला ती गोष्ट सांगते आणि तो प्रश्न विचारते. तू तरुण पिढीचा आहेस बघूया तुझे उत्तर काय आहे. तू एका रामायणावरील अध्यायाला गेलास. त्यात त्यांनी तुला संपूर्ण रामायणाचे सार सांगितले. नंतर त्यांनी तुला एक संधी दिली की प्रवेश शुल्कात तुला एक मूर्ती मिळेल, तुझ्या निवडीवर. एक मूर्ती आहे रामाची आणि दुसरी रावणाची. तू कुठली घेणार.”
“आई सोपं आहे. मी रामाची मूर्ती घेणार.”
“ठीक आहे. मूर्ती घेण्याच्या आधी जर तुला सांगण्यात आले की रामाची मूर्ती लाकडाची आहे आणि रावणाची मूर्ती शुद्ध सोन्याची तेव्हा तू कुठली निवडशील?”

सोहम शांत झाला.
“मला माहित आहे सोहम तू निर्णय नाही घेऊ शकत. जेव्हा हाच प्रश्न मला विश्वासने विचारला तेव्हा मी पण निरुत्तर झाले. तेव्हा कळले आपल्या भक्तीची व्याख्या किती भंपक आहे. म्हणून धर्माचा, गोऱ्या-काळाचा हा भेद विसरून मी अॅनीला स्कीकारले. जे प्रशांत तुला नाही जमले ते विश्वासने करून दाखवले, अगदी एका वधूपित्याप्रमाणे.”
“योग्य बोललीस भक्ती. प्रशांत अॅनी आता माझी मुलगी आहे. तू नीट काळजी घे तिची. सोहम तिच्यावर भरपूर प्रेम कर. लग्नानंतर माहेरवाशीण म्हणून तिला इथे पाठवत जा. काळजी घ्या. एकमेकांना समजून घ्या. All the Best.”

प्रशांतचे कुटुंब आज पूर्ण झाले. ते चौघे आनंदाने माझे आभार मानून निघून गेले. सावनी आपल्या रुममध्ये निघून गेली. मी आणि सुशीला सोफ्यावर बसलो.
“काहीतरी खायला बनव मला. भूक लागली आहे.”
“हो बनवते. पण आज तुम्हाला समाधान लाभले असेल ना. तुम्ही एक घर जोडले.”
“हा, अचानक अॅनीने तो प्रश्न विचारला आणि मला तिच्याजागी सावनी दिसली. जर सावनीवर ही वेळ आली असती तर मी जे केले असते तेच मी अॅनीच्या बाबतीत केले. आणि पाहिलंस, आपल्या चांगल्या कृत्यामुळे भाषेचे अडसर असून, शिक्षणाची तफावत असून, संस्कृती भिन्न असून आणि देश वेगळा असूनदेखील ती व्यक्ती नतमस्तक झाली. हीच आपली श्रीमंती आणि वैभव. पैसा सर्वच कमावतात पण ज्या व्यक्तीला हा मान आणि मनाचे समाधान कामवता आले तोच खरा श्रीमंत.”

सुशीला कौतुकाने बघत होती. मी तिची तंद्री मोडली. हाताने खायला दे असा इशारा केला. तिने मान डोलावली.
ती किचनमध्ये जाण्यासाठी उठली. दोन पावलं पुढे गेली आणि परत मागे फिरून माझ्याजवळ आली. मला कळण्याच्या आत माझ्या गालावर चुंबन दिले.
“हे काय मध्येच. सावनी बघेल तर काय म्हणेल?” मी मध्यमवर्गीय भारतीय शंका विचारली.
“I am proud of you.” असे म्हणत पुन्हा चुंबन घेऊन ती किचनमध्ये निघून गेली. मी फक्त तिच्या पाठमोऱ्या देहाकडे पाहत राहिलो.

-साईनाथ सुरेश टांककर
tsai143@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here