फॉरेनची नवरी भाग १ – Marathi Katha Forenachi Navari – Part -1

0
1001

Marathi-katha-forenachi-navari

लेखक : साईनाथ सुरेश टांककर
संपर्क: tsai143@gmail.com

फॉरेनची नवरी भाग १ – Marathi Katha Forenachi Navari – Part -1

खूप दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला होता. मुंबईच्या धावपळीत कधी एकदा शनिवार येतो आणि रविवारची सुट्टी मिळते याकडे माझ्यासारखे बऱ्याच जणांचे लक्ष असते. आज शनिवार, म्हणजे उद्या शांतपणे उशिरापर्यंत झोपता येणार. मला रात्री शांतपणे पुस्तक वाचत बसायला जाम आवडते. ते सोमवार ते शुक्रवार जमत नाही. सकाळी लवकर उठून ऑफिसची तयारी करायची असते. त्यामुळे माझा हा छंद मी शनिवारी मनसोक्तपणे पुरा करत असे.

आजचा शानिवारही काही अपवाद नव्हता. मी ‘गोष्ट हातातली होती’ हे वपुंचे पुस्तक वाचायला घेतले. वपु माझे आवडते लेखक. त्यांची भाषाशैली मला प्रचंड आवडते. बायको आणि मुलगी त्यांच्या रुममध्ये जाऊन झोपल्या होत्या. बायको दमून झोपली असेल पण मुलगी मी खात्रीरीत्या सांगू शकतो की मोबाईलवर खेळत असणार. मोबाईलची बॅटरी संपली की ती झोपणार. असो, उगाच त्यांच्या जीवनशैलीत आपण नाक खुपसले तर आपण त्यांना जुन्या मतांचे वाटणार. मुलं दूर जातात त्यापेक्षा न बोलणे अगदी उत्तम.

मी वाचण्यात मग्न झालो. इतक्यात मोबाईल वाजला. एवढ्या रात्री कोणाचा फोन? मी घड्याळ पाहिले. पाऊणे बारा वाजले होते. मी फोन पाहिला. प्रशांतचा फोन होता. मी फोन उचलला.

“हॅलो.”

“हॅलो विश्वास, मी प्रशांत बोलतोय.”

“हा बोल प्रशांत. कसा आहेस? आणि एवढ्या रात्री फोन केलास? सर्व ठीक आहे ना?”

“तसे सर्व ठीक आहे रे. पण एक छोटासा प्रोब्लेम झाला आहे.”

“काय झाले? काही सिरीयस?”

“तसे म्हणावे तर सिरीयस आहे आणि म्हणावे तर नाही सुद्धा. नेमके समजत नाही आहे.”

“प्रशांत तू कोड्यात बोलू नकोस. जे काही आहे ते स्पष्ट सांग. तू आता कुठे आहेस?”

“मी आता एयरपोर्टवर आहे.”

“तू एवढ्या रात्री एयरपोर्टवर काय करतो?”

“माझा मुलगा इंग्लंडमधून आज परतला. त्याला कंपनीने ८ महिन्यासाठी तिथे पाठवला होता. त्यालाच घ्यायला मी इथे आलो आहे.”

“मग फ्लाईट लेट आहे का?”

“नाही विश्वास, फ्लाईट वेळेवर आहे. माझा सोहम माझ्यासोबत आहे.”

“अरे मग तू एयरपोर्टवर उभा राहून काय करतोस? सरळ टॅक्सी कर आणि घरी जा ना. प्रवासात तो थकला असेल. त्याला आराम करू दे.”

“विश्वास तोच तर प्रोब्लेम आहे. मी त्याला घरी घेऊन जाऊ शकत नाही.”

“पण का?”

“कारण तो एकटा नाही तर सोबत एक विलायती मुलगी घेऊन आला आहे. त्याला म्हणे तिच्याशी लग्न करायचे आहे. त्या मुलीला घेऊन मी घरी गेलो तर भक्ती मला काय सोडणार नाही. एवढ्या रात्री मी कुठे तमाशा करत बसू.”

मला त्याचे वाक्य ऐकून झटका बसला. मी प्रशांतची परिस्थिती समजू शकतो. त्याने तर थेट प्रक्षेपण पाहिले होते. सोहम तसा सहजासहजी कोणाशी मिसळत नसे. त्यामुळे त्याने असे लग्नासाठी मुलगी घेऊन येणे खूप अनपेक्षित होते.

“तुला सोहमने या गोष्टीची कल्पना दिली होती का?” मी प्रशांतला विचारले.

“नाही रे. अजिबात नाही. मला म्हणाला तुम्हाला सरप्राईज द्यायचे होते. आता त्याच्या या सरप्राईजने मला आनंद कमी आणि झटका जास्त बसलाय हे त्याला कसे समजावू?”

“प्रशांत एक काम कर. तू त्या मुलीला एयरपोर्ट जवळच्या कुठल्यातरी हॉटेलमध्ये घेऊन जा. घरी सर्व शांत झाले की तिला बोलावून घे.”

“अरे विश्वास, मी सोहमला हेच म्हणालो. पण ऐकेल तर शपथ. तो म्हणतो जर ती हॉटेलमध्ये राहणार असेल तर तो सुद्धा तिथेच राहणार. आता इथे काय करू मला काहीच समजत नाही. जर हा माझ्यासोबत घरी नाही आला तर मी बायकोला काय उत्तर देऊ?”

प्रश्न तसा गंभीर होता. या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रशांतने फोन केला होता. माझ्याकडे अशी केस पहिल्यांदा आली होती. जाऊ दे, बऱ्याच गोष्टी आयुष्यात पहिल्यांदा घडतात. आपण त्यावर मात करायची असते.

“अरे विश्वास, बोल ना काहीतरी.” प्रशांत अगतिक झाला होता.

“प्रशांत एक काम कर. तू तिला घेऊन माझ्याकडे ये. इथे ती माझ्या मुलीसोबत राहील. एक-दोन दिवसात आपण ठरवू काय करता येईल ते. मला नाही वाटत सोहमला तिला इथे राहण्यात काहीच अडचण असेल.”

“थांब मी विचारतो त्याला. तू फोन होल्ड कर.” मी थांबलो. इतक्यात बायको आतून बाहेर आली.

“काय हो, एवढ्या रात्री कोणाचा फोन आहे?” तिने बाहेर येताच प्रश्न विचारला आणि मी तिला हाताने थांब अशी खुण केली. ती माझ्या शेजरी येऊन उभी राहिली.

“विश्वास, मी बोललो सोहमशी. तो हो म्हणाला. मी थोड्या वेळात पोचतो.”

“ठीक आहे. ये तू. मी वाट बघतो.”

“थॅक्स मित्रा.”

“प्रशांत तुझे आभार प्रदर्शन इथे आल्यावर कर. चल ये लवकर.” असे म्हणत मी फोन ठेवला.

“काय हो, प्रशांत भावोजींचा फोन होता? ते काय म्हणत होते? ते आता इकडे येणार आहेत का? काही प्रोब्लेम तर नाही ना? अहो तुम्ही बोलत का नाही?”

“तू जर मला बोलायला जागा दिलीस तर मी बोलणार ना? थांब तुला सगळ सांगतो. पण आपल्याला जरा घर आवरायला हवे. काम करता-करता मी तुला सांगतो.” मी तिला सांगायला सुरवात केली. मी वाचत असलेले पुस्तक उचलून कपाटात ठेवले. बायकोने कचरा काढून घेतला. मी कुठे धूळ आहे का ते पाहिले आणि साफ केली. रात्री १२ ते १२.३० आम्ही घराची सफाई केली. का तर त्या इंग्रजी बाहुलीला आम्हाला आणि आमच्या देशाला नाव ठेवण्याची संधी मिळू नये म्हणून. आम्ही दोघे त्यांची वाट बघत बसलो.

दरवाजावरची बेल वाजली. मी घड्याळ पाहिले. एकला दहा मिनिटे कमी होती. बायको दरवाजा उघडणार इतक्यात मी तिला थांबवले. मी स्वतः दार उघडले. समोर प्रशांत होता. मी त्या तिघांना आत घेतले. प्रशांतच्या मागून सोहम आणि त्याच्या मागे त्याची प्रेयसी होती. इंग्रजी बाहुली हा मघाशी वापरलेला शब्द तंतोतंत योग्य होता.

“विश्वास तू सोहमला ओळखतो. ही त्याची मैत्रीण अॅनी.” प्रशांतने औपचारिक ओळख करून दिली. अॅनीने हस्तादोलन करण्यासाठी हात पुढे केला. मी हात मिळवला. इतक्यात बायको आतून पाणी घेऊन आली. तिने ते पाहिले आणि माझ्याकडे रागाने एक कटाक्ष टाकला जो फक्त मलाच कळला. तिने त्यांना पाण्याचे ग्लास दिले.

“प्रशांत भावोजी तुम्ही चहा घेणार की कॉफी? की लगेच जेवण बनवू? सोहमला भूक लागली असेल. वरण-भात होईल लगेच.” बायकोने आमच्या स्वयंपाक गृहतील मर्यादित मेनू वाचून दाखवला.

“सुशीला काहीही नको. अग भक्तीने सर्व जेवण बनवून ठेवले आहे. तू अजून त्रास करून घेऊ नको. आधीच आमच्या चिरंजीवांच्या करामतीमुळे तुमच्या झोपेचा खोळंबा झाला आहे.”

“बाबा मला तुम्हाला सरप्राईज द्यायचे होते. म्हणून आधी नाही सांगितले.”

“पण तुझ्या सरप्राईजचा मला झटका आणि विश्वास काकांना त्रास झाला त्याचे काय?” प्रशांत चिडला होता. आता सोहमचा चेहरा पडला. इतक्यात आतून माझी मुलगी सावनी बाहेर आली.

“काही त्रास नाही किंवा झोपेचा खोळंबा झाला नाही. तसाही उद्या रविवार आहे. उशिरा उठणार आहोत.” मी सावरासावर केली. “प्रशांत पण तू भक्तीला काय सांगितले? ती वाट पाहत असेल ना?” मी माझी शंका बोलून दाखवली.

“तिला सांगितले की विमान उशिरा आहे. नशीब तिला पटले.”

“ठीक आहे प्रशांत. तुम्ही दोघे निघा आता. भक्ती उगाच काळजी करेल. अॅनी सावनीसोबत राहील. तिची काळजी नको. या प्रश्नावर आपण उद्या तोडगा काढू.” प्रशांतने मान डोलावली. प्रशांत आणि सोहम जायला निघाले. अॅनीदेखील उठली.

“विश्वास, मी टॅक्सीमधून येताना तुझ्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला आहे. तो वाचून घे.” येतो आम्ही. ते दोघे निघाले. अॅनीसोबत मला थेट संवाद साधता येत नव्हता. मी सावनीमार्फत तिला सावनीच्या रुममध्ये जाऊन झोपायला सांगितले. मी सुद्धा झोपण्याची तयारी केली. मोबाईलमध्ये गजर लावला आणि प्रशांतने पाठवलेला मेसेज वाचायला घेतला.

‘विश्वास, सोहम जी मुलगी घेऊन आला त्यामुळे माझ्या आयुष्यात एक वादळ निर्माण झाले. त्याने प्रेम केले याचे वाईट नाही वाटत पण ज्या मुलीशी केले त्याचे टेन्शन आहे. अॅनी कशी मुलगी आहे हे आताच सांगता नाही येणार. त्यावर मी भाष्य करणार नाही. तुला सांगतो मी कॉलेजमध्ये असताना मलाही एक मुलगी आवडायची. पण घरच्यांच्या भीतीमुळे मी या फंदात कधी पडलोच नाही. जी हिम्मत मी करू शकलो नाही ती माझ्या मुलाने केली. त्यामुळे त्याला मी साथ दिली पाहिजे असे सतत वाटते. पण मी भक्तीला दुखवू शकत नाही. अॅनी आणि भक्तीमध्ये एक खूप मोठी विचारांची तफावत आहे- भक्ती देवभोळी आणि अॅनी नास्तिक आहे. भक्ती नास्तिक होणे अशक्य आणि अॅनी तिच्या तत्त्वांशी तडजोड करायला तयार नाही. आता ही घडी मी कशी घालू? यात तू माझी मदत करशील अशी मी आशा करतो. विश्वास मला या धर्मसंकटातून बाहेर काढ. मी आयुष्यभर तुझा ऋणी राहीन.’

प्रशांत मला संकटात टाकून निघून गेला. मित्रांचे बरं असते, ते हक्काने समस्या आपल्याला सांगतात, त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी आपल्यावर टाकतात आणि निर्धास्त होतात. मी अॅनीला समजवायचे? मला तिच्याशी नीट संवाद साधता येत नव्हता. तिचे इंग्रजी मला समजत होते पण मला नीट सांगता येत नव्हते. नशीब सावनी होती. सावनी किंवा अॅनी या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुणी होत्या. आमचे विचार सावनीला पटवून सांगताना नाकीनऊ येतात तर या पाश्चात्य बाहुलीला कसे पटवून देणार? पण सावनीकडून एक गोष्ट मी शिकलो होतो. बहुधा त्या गोष्टीचा ही केस हाताळताना मला उपयोग होईल असे वाटले. सध्या एकंच गोष्ट करणे शक्य होते- झोपणे. मी रुममध्ये आलो. पाहतो तर सुशीला गाढ झोपलेली. या बाईचे कोडं मला उमगत नाही, नवरा इतका तणावाखाली असताना ही इतक्या शांतपणे कशी झोपू शकते? मी विचार करत तिच्या बाजूला पडलो आणि विचारात कधी झोप लागली मला कळलेच नाही.

भाग २ वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here