ताई – Marathi Story

0
1439
Marathi Story Tai – ताई

Marathi Story – Tai – ताई

लेखिका – सौ. अमृता श्रीरंग देशपांडे

‘आई आपण तो फ्रॉक घ्यायचा? ताईला खूप छान दिसेल…’ अमोघच्याअचानक आलेल्या प्रश्नाने मेघना दचकली. दिवाळी तोंडावर आल्यामुळे ती तिच्या आठ वर्षाच्या अमोघला घेऊन बाजारात आली होती.

‘ फ्रॉक?   तो कशाला? आणि  कोण ताई? कुठली ताई?’  मेघना

‘ आहे माझी एकताई. आई प्लीज! घेऊया ना ताईसाठी फ्रॉक, तिला खूप आवडेल…’ अमोघ हट्ट करू लागला

‘अरे असं वेड्यासारखं काय करतोस अमोघ? तुला कुठे ताई आहे? तुझ्या शाळेतली मैत्रीण आहे का?’  मेघना

‘ नाही मैत्रीण नाही, माझी ताई आहे ती. आणि मला तिला हा फ्रॉक द्यायचा आहे. प्लीज घेऊया ना आई आपण…’ अमोघचा हट्ट सुरूच होता.  मेघनाला तर काही सुचेना.  तिने अमोघला थोडे रागावून पाहिले, तरी तो ऐकत नव्हता.  शेवटी तिने  त्याच्या पाठीत एक धपाटा घातला.  तर लगेच त्यानेजोरजोरात पाय आपटत भोकांड पसरले. मेघनाने कसेबसे त्याला सावरत ऑटोत कोंबले आणि घरी आणले.  तिला खरंच कळेना, हा असा काय वेड्यासारखा करायला लागलाय.   तिने अमोघला झोपवले आणि तिच्या कामाला गेली.

संध्याकाळी दूध पिण्यासाठी म्हणून ती अमोघला उठवायला त्याच्या खोलीत गेली.  दोन-तीन वेळा आवाज देऊनही तो उठेना,  तेव्हा तिने त्याच्या दंडाला हात लावून गदागदा हलवले आणि ती  घाबरलीच. अमोघ तापाने फणफणला होता.  तिने पटकन थर्मामीटरनेअमोघचा ताप मोजला. ‘ बापरे! १०२? तिने लगेच डॉक्टरांना फोन केला. आणि सोबतच तिच्या आईला घरी बोलावून घेतले.

अमोघच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवतच मेघना विचार करू लागली.अमोघ अलीकडे विचित्रच वागू लागला होता.  एकट्यातच राहायचा,स्वतःशीच बडबडायचा.  मेघनाने बऱ्याचदा त्याला बेडरूम मध्ये दार बंद करून कुणाशीतरी बोलताना सुद्धा ऐकले होते.  एक-दोनदा  कोणा मुलीचा वाटावा असा हसण्या- खिदळण्याचाही आवाज तिने ऐकला होता.  दार उघडून आत पाहते तर तिथे अमोघ एकटाच हसत होता. आपल्याला  भास झाला असेल,  असा विचार करून त्यावेळी तिने दुर्लक्ष केले होते.  आणि हो,  परवाचा दिवस ती कसा बरं विसरणार? परवा सकाळीच अमोघ ‘ आपण केक करूया’ म्हणून मागे लागला होता.   तिने गमतीने विचारलेही, ‘काय रे अमोघ,  तुझा वाढदिवस तर गेल्या महिन्यातच झाला.  आज कोणाचा वाढदिवस आहे?  तुझ्या मित्र मैत्रिणीचा आहे का?’   तेव्हाहीत्यावर तो ‘ताईचा वाढदिवस आहे’ म्हणाला होता. तिला वाटले सहज म्हणून खायचा  असेल त्याला.  म्हणून तिने बनवूनही दिला.  तर तिचे लक्ष नसताना ह्या पठ्ठ्यानेकेक बेडरूममध्येनेला,  आणि गादीवर सांडवून ठेवला. त्यावरून किती बोललो होतो आपण त्याला…  तिच्या मनात येऊन गेले.  

दारावरच्या बेलने मेघनाची तंद्री भंगली. डॉक्टर आले होते.  त्यांनी अमोघला तपासले आणि काही औषधे लिहून दिली.  उद्यापर्यंत ताप उतरला नाही तर काही तपासण्या करून घेऊ असे सांगून डॉक्टर निघून गेले.आणि लगोलग तिचे आई-बाबाम्हणजेच अमोघच्या  श्यामलाआजीआणि प्रभाकरआबा आले. अमोघच्या  डोक्यावरून मायेने हात फिरवून त्या मेघनाशी बोलत बसल्या.

मेघनाने त्यांना गेल्या काही दिवसांत घडलेल्या सगळ्या विचित्र सांगितल्या.  तेव्हा श्यामलाआजींच्याही  चेहऱ्यावर चिंतेची लकेर उमटली.  तेवढ्यात अमोघच्या अस्पष्ट अस्फुटश्या बोलण्याने त्यांचे लक्ष वेधले…

‘तुम्ही खूप वाईट आहात, तुम्ही माझ्या ताईला मारलं…’ असं काहीसं तो ग्लानीतच बडबडत होता.

‘अमोघ बाळा, असं नाही बोलायचं.  आता आजी आली आहे ना?  आजी सगळं ठीक करेल हं बेटा!  तू दूध बिस्किट खा बरं, आणि डॉक्टरकाकांनी दिलेलं औषध घे,  म्हणजे तुला बरं वाटेल…’ श्यामला आजींनी समजावल्यामुळे अमोघ थोडा शांत झाला.

‘हे बघ मेघना, मला तर हे काही साधंसुधं वाटत नाही.  हे नक्कीच काहीतरी बाहेरच्या शक्तीचं काम दिसतंय.  तू आमच्या स्वामींकडे चल,  ते तुला नक्की ह्याच्यावरती काहीतरी इलाज सांगतील…’ श्यामलाआजी

खरं म्हणजे मेघनाचा बाबा-बुवांवर फारसा विश्वास नव्हता. परंतु मुलाच्या काळजीपोटी ती तयार झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळीच अमोघला प्रभाकररावांकडे सोपवून त्या दोघी श्यामलाआजींच्या स्वामींकडे गेल्या.  त्यांचा आश्रम शहरापासून थोडा दूर निसर्गरम्य वातावरणात होता. तिथलऺ हिरवऺगार शांत वातावरण पाहूनच मेघनाच्या मनावरचा अर्धा ताण उतरून गेला.

तिथल्या एका सेविकेने त्यांचे हसतमुखाने स्वागत केले. आणि दोघींना स्वामींच्या खोलीत घेऊन गेली. स्वामींच्या तेजस्वी आणि शांत मुद्रेकडे पाहून मेघनालाही प्रसन्न वाटले. स्वामींनी एकदा मेघनाकडे कटाक्ष टाकला मात्र त्यांची चर्या चिंताग्रस्त झाली. कितीतरी वेळ स्वामीजी मेघनाचा चेहरा न्याहाळतच बसले. त्यामुळे तिच्या मनातील चलबिचल वाढली. तिला अस्वस्थ झालेले पाहून स्वामीजी म्हणाले,

‘माणसाच्या अर्ध्या-अधिक समस्यांचे मूळ त्याच्या भूतकाळातच दडलेलं असतं. माणूस आपल्याच कर्माची शिक्षा भोगताना दोष मात्र ईश्वराला देतो’

स्वामीजींच्या बोलण्याने मेघना आणि श्यामलाताई बुचकळ्यात पडल्या. त्या काही बोलणार इतक्यात स्वामीजीच पुढे म्हणाले,

‘मुलाच्या तब्येतीच्या काळजीत आहेस? तो असंबद्ध बडबडतोय?’

‘हो स्वामीजी, अगदी बरोबर ओळखलंत! बघ बाळा, मी म्हटलं नव्हतं, स्वामीजींना न सांगताच…’ श्यामलाताई

‘ऐका श्यामलाताई, तुमच्या मुलीच्या आणि नातवाच्या भोवती एक अदृश्य शक्ती वावरतेय!’ स्वामीजी

‘क्काय! अहो स्वामीजी पण…’ मेघना

‘हे बघा, काळजी करू नका. जी शक्ती तुझ्या आणि तुझ्या मुलाच्या भोवती घुटमळतेय, ती वाईट नाहिये, फक्त तिला तुला काही सांगायचंय… किंवा तुला तुझ्या चुकीची जाणीव करून द्यायचीय. ती शक्ती वाईट असती तर तिने आत्तापर्यंत तुला किंवा मुलाला काही इजा केली असती. तुझ्या मुलाची तब्येत बिघडलीये ती त्या शक्तीमुळे नव्हे तर त्याच्या छोट्याशा मेंदूवर पडलेल्या अतिताणामुळे…’

‘पण स्वामीजी, मग ती शक्ती मला का दिसली नाही? चूक तर माझ्याकडून घडलीये ना? मग तिने मला काय त्रास द्यायचा तो द्यावा! त्या एवढुश्या लेकराला कशाला ?…’ मेघना

‘मेघना, लहान मूल म्हणजे आईवडिलांच्या व्यक्तीमत्वाचा आरसा! त्यामुळे आईवडिलांच्या कर्माची फळं कधीकधी मुलांनाही भोगावी लागतात बेटा…’ स्वामीजींनी समजावले.

‘पण स्वामीजी आता काय करायचे?त्या अदृश्य शक्तीला  माझ्या मुलीपासून आणि नातवापासून दूर कसे करायचे? मला तर काहीच सुचत नाही,आता तुम्हीच मार्ग दाखवा…’ श्यामलाताई काकुळतीला येऊन बोलल्या.

‘शांत व्हा श्यामलाताई! काही काळजी करू नका. भूतकाळापासून दूर पळून कोणाच्या समस्या सुटत नसतात; तर त्याचा खंबीरपणे सामना करावा लागतो, तेव्हाच मनःशांती मिळते…’ स्वामीजी

‘म्हणजे नेमकं काय करायचं स्वामीजी?’ मेघना

‘कळेल! परंतु त्यासाठी मला एकदा तुमच्या घरी येऊन परिस्थिती नीट बघावी लागेल. शिवाय अमोघच्या वडिलांशीही बोलावे लागेल…’ स्वामीजी

‘हो, नक्कीच! स्वामीजी तुम्ही कधीही आमच्या घरी येऊ शकता. पण स्वामीजी त्याची तब्येत…’

‘तब्येतीची फारशी काळजी करू नका’ स्वामीजी म्हणाले. ‘तुम्ही त्याला डॉक्टरांनी सांगितलेली औषधे दिलीच आहेत. त्याचे मन शांत होण्यासाठी आणि शांत झोप लागण्यासाठी आता घरी जाऊन एक काम करा, तुमच्या घरातील देवघरात दिवा लावा, अमोघच्या जवळबसूनअकरा वेळा रामरक्षेचे पठण करा, तो नक्की शांत होईल.’ स्वामीजी.दोघी स्वामीजींना नमस्कार करून आश्रमाबाहेर पडल्या.

‘बाबा, माझा तरी या भूता-प्रेतांच्या गोष्टीवर बिल्कुल विश्वास नाही…’ मेघनाघरी आल्यावर बाबांजवळ बोलली

‘बरं! देवावर तरी विश्वास आहे नं बाळा तुझा? त्या मुलाला शांत झोप लागावी म्हणून रामरक्षा पठण तरी करूया, उद्या एकदा स्वामीजी घरी आल्यावर काय बोलतात ते बघूया, मग तुला काय योग्य वाटेल ते करूया. हे तरी पटतंय का?’प्रभाकरराव समजावणीच्या सुरात म्हणाले. मेघनाने होकारार्थी मान डोलावली आणि देवघरात दिवा लावायला निघून गेली.

दुसऱ्या दिवशीसकळी लवकरचस्वामीजी घरीआलेत. आज अमोघचे बाबा शेखरही घरीच होते. संपूर्ण घराची बारकाईने पाहणी केल्यानंतर ते अमोघच्या खोलीत गेले. मेघना आणि घरातल्या बाकी मंडळींना मुद्दाम खोलीच्या बाहेर थांबवले.

‘नाव काय बाळा तुझे?’ स्वामीजी

‘अमोघ’

‘कितवीला आहेस? शाळेचं नाव काय?’ स्वामीजींनी मायेने चौकशी केली. अमोघनेही विचारलेल्या प्रश्नांची शांतपणे उत्तरे दिली.

‘बाळ, तुला चित्र काढायला आवडते?’

‘हो खूप!’ अमोघ अतिशय निरागसपणे उत्तर देत होता.

‘मला दाखवशील तुझी चित्रकलेची वही?’ स्वामीजी

‘हो दाखवतो’ असं म्हणत अमोघने पलंगावरून टुणकन उडी मारली. आणि टेबलावरची चित्रकलेची वही स्वामीजींना दिली.

स्वामीजी बराचवेळ ती वही न्याहाळत बसले. अमोघने वयाच्या मानाने खूप सुंदर चित्रे काढली होती. परंतु ती वही पाहिल्यानंतर स्वामीजीविचारात पडले, काही वेळानंतरअमोघला म्हणाले,

‘खूप छान चित्र काढतोस रे तू!’ त्यानंतर स्वामीजी अमोघशी बराचवेळ बोलत बसले…

‘बरं तू आता आराम कर, मी बाहेर आईबाबांशी बोलतो’ स्वामीजी

‘बरं’ म्हणून अमोघ परत पलंगावर झोपला. मग स्वामीजीअमोघची चित्रकलेची वही घेऊन  बाहेर आलेत.

‘मेघना बेटा, शेखरराव, तुम्ही कधी ही वही चाळलीत का?’ स्वामीजी

‘अं… हो, म्हणजे अमोघ नेहमीच त्याचं चित्र काढून झालं की मला दाखवतो. पण असं का विचारताय स्वामीजी…?’ मेघना

‘नाहीबेटा, तू नीट बघितलं नसशील, किंवा तुझ्या लक्षात आलं नसेल… या वहीतील चित्रांमध्ये एक क्रम आहे…’ स्वामीजी

‘क्रम! म्हणजे ?’ मेघनाला तर काहीच कळेना…

‘जरा शांतपणे बघा, पहिल्या चित्रात आई-बाबा, मुलगा-मुलगी असं चौकोनी कुटुंब आहे. ज्यातील मुलगी जरा मोठी आणि मुलगा लहान दिसत आहे. दुसऱ्या चित्रात मुलगी थोडी दूर, तिसऱ्यात अजून दूर असं करत-करत पुढे मुलगी दिसेनाशी होते. पुढच्या एका चित्रात तोच मुलगा मुलीला पहाडाच्या उंच टोकावरून खाली पाडताना दिसत आहे. यासगळ्या चित्रांमधून अमोघला काहीतरी सांगायचंय असं वाटतं’

हे सगळं ऐकून मेघना आणि शेखर अस्वस्थ झालेत.

‘हे बघ मेघना, मी तुला कालच सांगितलं होतं, की आईवडिलांच्या चुकांची शिक्षा कधीकधी मुलांना भोगावी लागते. तुमच्या पूर्वायुष्यात अशी काही चूक घडली असेल तर निःसंकोचपणे मला सांगा’ स्वामीजी

मेघना काही बोलणार तेवढ्यात शेखरने खुणेनेच तिला गप्प राहण्यास सांगितले. स्वामीजींनी हे बरोबर हेरले.

‘हे बघा शेखरराव, डॉक्टर आणि वकीलांपासून कधीच कुठली गोष्ट लपवायची नसते, तरच ते तुमच्या समस्येचं योग्य समाधान करू शकतात. याठिकाणी तुम्ही मला अमोघचा डॉक्टर समजून माझ्यापाशी मोकळेपणाने सगळं बोलू शकता. ती गोष्ट या चार भिंतींच्या पलिकडे जाणार नाही याची हमी मी देतो’

‘अहो, बोलाना आतातरी… तुमच्या आईपुढे तर तुमचं तोंड कधी उघडलं नाही. त्यांच्या धाकानंच तुम्ही एवढं मोठं पाप केलंत. ज्याची शिक्षा आज आपला मुलगा भोगतोय…’ मेघना

‘हो… म्हणजे स्वामीजी, एक चूक आमच्याकडून झाली आहे. मेघनाला पहिल्यांदा दिवस गेलेत, तेव्हा तिच्या पोटी एक मुलगी होती. म्हणजे खरंतर माझी काही हरकत नव्हती… पण आईचं म्हणणं होतं की… घराण्याला वंशाचा दिवाच पाहिजे! मुलगी होता कामा नये…’ शेखर अडखळत सांगू लागला.

‘याच बुरसटलेल्या विचारांपायी माझ्या पोटातल्या पाच महिन्याच्या जीवाला ह्यांनी नख लावलं. आमचं लग्न झाल्याच्या दुसऱ्या महिन्यातच मला दिवस गेल्याचं ह्यांच्या आईंना समजलं, तेव्हा  सुरवातीला तर त्यांना खूप आनंद झाला. मी देखील खूप खूश होते. मी रोज माझ्या पोटातल्या बाळाशी बोलायचे, पोटावरून हात फिरवून त्याला कुरवाळायचे. सासूबाईसुद्धा  माझे सगळे डोहाळे पुरवायच्या. पण एक दिवस, आमच्या घरी सासूबाईंच्या खूपच विश्वासातला एक ज्योतिषी आला .त्याने माझ्याकडे बघताक्षणी सांगितले, ‘हिच्या पोटी मुलगी आहे, ताबडतोब पाडून टाका’ बस्स! झालं, सासूबाईंचं डोकंच फिरलं… मी खूप विरोध केला, पण शेवटी नाही वाचवू  शकले माझ्या कोवळ्या कळीला…’ मेघना रडत-रडत सांगू लागली. ‘त्यानंतर दोन वर्षांनी अमोघ झाला…’

‘हो खरंच चुकलं आमचं… पण स्वामीजी, ह्या गोष्टीचा अमोघशी काय संबंध?’ शेखर

‘असं कसं बोलता शेखरराव? अमोघची मोठी बहिण होती ती… आयुष्यात येणा-या प्रत्येक जीवाशी आपले जुने ऋणानुबंध असतात. ते नाकारून चालत नाहीत.’ स्वामीजी अधिकारवाणीनी बोलत होते.

‘पण हे सगळं अमोघला समजलं कसं?’ श्यामलाताई

‘मेघनाच्या डायरीतून…’ स्वामीजी

‘क्काय? मेघना, तू हे सगळं डायरीत लिहून ठेवलंस?’ शेखर

‘मग काय करणार शेखर? ती घटना आजपासून दहा वर्षं आधी घडली, पण आजपर्यंत त्यासाठी मी स्वतःला माफ करू शकले नाही. माझ्या मनातील अपराधी भाव मला सतत टोचणी द्यायचा… बरं कुठेबोलायला जागा नाही…म्हणून मी सगळं डायरीत लिहून ठेवण्याचा मार्ग निवडला, आणि मनातलं सगळं त्या डायरीत लिहून मोकळी होऊ लागले…’ मेघना

‘तीच डायरी अमोघच्या हाताला लागली. मेघना बेटा, तू तर तुझ्या मनातील भावना कागदावर मांडून मन मोकळं करण्याचा मार्ग निवडला, पण अमोघचा छोटासा मेंदू हा अपराधीपणाचा भाव सहन करू शकला नाही. आपल्या जन्मासाठी एका निरपराध जीवाची हत्या झाली, या धक्क्यातून तो सावरू शकला नाही. आणि मग त्याच्या मनानी मनातच घडवली एक आकृती, ‘ताई’…’ स्वामीजी

‘पण स्वामीजी, तुम्ही तर काल कुठल्यातरी अदृश्य शक्तीविषयी बोलत होतात?’ श्यामलाताई

‘हो, बरोबर आहे. ती अदृश्य शक्ती आहे ‘मन’!’ स्वामीजी

‘काय मन!म्हणजे? स्वामीजी आम्ही नीट समजलो नाही, आम्हांला जरा व्यवस्थित समजावून सांगा…’ शेखर

‘शेखरराव, श्यामलाताई, माणासाचं ‘मन’ ही पहायला गेलं तर अदृश्य परंतु अतिशय ताकदवान अशी एक शक्ती आहे. माणसाचं मन अस्तित्वात नसलेल्या गोष्टी सत्यात आल्याचा आभास सहज निर्माण करू शकतं.’

‘म्हणजे अमोघने मनातल्या मनातच एका मुलीची आकृती निर्माण केली, आणि ती जिवंत व्यक्ती असल्याप्रमाणे तो तिच्यासोबत बोलत-खेळत होता…?’ शेखर

‘हो! परंतु हे सगळं त्याच्या मनाने त्याच्याही नकळत घडवून आणलं…’ स्वामीजी

‘पण स्वामीजी, तरीही काही शंका राहतातच… अमोघच्या मनाने ‘ताईची’ म्हणजे त्या गेलेल्या जीवाची प्रतिमा किंवा आकृती मनातल्या मनात तयार केली, म्हणजे हे सगळं मानसिक आहे असं आपण म्हणू शकतो. परंतु तसं जर असेल, तर काल तुम्ही रामरक्षेचे अकरावेळा पठण  का करायला लावले?’मेघना

‘ते केवळ अमोघची तब्येत आणि मानसिक शांतीसाठी…’ स्वामीजी मंद स्मित करत म्हणाले.

‘नीट समजलं नाही स्वामीजी, जरा विस्ताराने समजवून सांगाल का प्लीज…’ शेखर

‘आपलं मन हे आपल्या शरीरातील एक अदृश्य शक्तीस्रोत आहे हे तर आता तुम्हांला कळलं? परंतु हीच शक्ती आपलं मन कधीकधी चुकीच्या कामांसाठीही वापरायला लागतं. आता या अदृश्य शक्तीने अमोघच्या मनात ‘ताई’ च्या रूपात एक नकारात्मक उर्जा भरून दिली. जिचा परिणामस्वरूप अमोघची तब्येत बिघडली, आणि तो ‘तुम्ही माझ्या ताईला मारलं, तुम्ही माझ्या ताईला मारलं’ असं बडबडायला लागला, बरोबर आहे?’ सगळ्यांनी होकारार्थी माना डोलावल्या. स्वामीजी पुढे बोलू लागले.

‘आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी निर्माण केलेली स्तोत्रे, श्लोक, हे सगळे वातावरणातील नकारात्मक उर्जा शोषून घेऊन शुद्ध, सात्त्विक आणि सकारात्मक उर्जा पसरवण्याचे काम करतात. ज्याचे पठण, मनन, श्रवण केल्याने मानसिक ताण हलका होऊन चित्तवृत्ती शांत होते. मीसुद्धा तेच केले. अमोघजवळ बसून अकरावेळा  रामरक्षा पठण केल्यामुळे अमोघच्या मनावरचा ताण हलका झाला, आणि त्याच्या शरीरातली नकारात्मक उर्जा कमी झाली…’

‘स्वामीजी, तुमच्या बोलण्याने अमोघच्या विचित्र वागण्याचे तर कोडे उलगडले, आमच्या सगळ्या शंकांचेही निरसन झाले… परंतु एक महत्त्वाचा प्रश्न अजून तसाच आहे, आमच्या हातून जे स्त्रीभृण हत्येचे पाप घडले, त्याचे प्रायश्चित्त कसे घडणार? माझ्या आणि अमोघच्या मनातील अपराधीपणाची भावना कशी जाणार…’ ‘मेघना

‘सगळ्यात पहिले तर हे समजणं आवश्यक आहे, की जन्म आणि मरण ह्या माणसाच्या हातातल्या गोष्टी नाहीत. आपण केवळ निमित्तमात्र आहोत. आधी मनातील कर्तेपणाची भावना निघून गेली की अपराधीभाव आपोआप निघून जाईल…’ स्वामीजी समजावून सांगू लागले.

‘हे खरं असलं तरी आपल्या हातून घडलेल्या पातकाचं प्रायशित्त घेणं, हे तर आमचं कर्तव्य आहे नं स्वामीजी?’ शेखर तळमळून म्हणाला

‘हे अगदी बरोबर बोललात शेखर तुम्ही… जन्म-मरण जरी माणसाच्या हातात नसलं तरी त्या जीवाच्या मृत्यूला निमित्त तुम्हीच झालात… या भयंकरपापाचे प्रायश्चित्तकरण्यासाठी माझ्या मनात एक उत्तम योजना आहे. एखाद्या अनाथ मुलीला दत्तक घ्या, तिचं लालन-पालन करा. ज्यामुळे तुमच्या मनातला अपराधीभाव निघून जाईल, एक अनाथ जीव सनाथ होईल आणि अमोघला खरोखरीच त्याची ‘ताई’ मिळेल…’ स्वामीजी

‘खरोखरच उत्तम योजना!’ अमोघचे आजी-आजोबा

‘अमोघची ताई?आम्ही नक्की आणू… ‘ शेखर-मेघना एकदमच म्हणाले आणि घरातले सगळे प्रसन्नपणे हसले…

सौ. अमृता श्रीरंग देशपांडे, नागपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here