बदल – Marathi Katha Badal

0
1943

Marathi-Katha-Badal
लेखक : विनय दिलीप खंडागळे
संपर्क : vinus.marathi@gmail.com

बदल – Marathi Katha Badal

मी भाग्या उर्फ भगवान आंभोरे. ‘सावंगी’ या छोट्याशा गावच्या गरीब घराण्यातला मुलगा. स्वतःच्या कष्टानं मी एम. ए. फायनलपर्यंत पोहचलो. मदत अशी कुणाचीच नाही. तरीपण मी पुस्तकं मिळवली, मेहनत घेऊ लागलो. माझं एक स्वप्न आहे–मला अधिकारी बनायचंय…एक इमानदार अधिकारी. मग परिस्थिती बदलेल; माझी अन गावचीसुद्धा.

“अरं येS भाग्या, उठ. ढेलग्यात फवारणी करा लागती, नाहीतं सोयाबीन हाती लागत नाही.”माय चुलीतला विस्तव फुंकता फुंकता ओरडली.

“मी नाही जात. मले अभ्यास हाये”

“मग कोण जाईल, तूच कर्ताधरता हाये घरातला.”

“गण्याले सांगत जाय नं कामं. तो आता लहान नाही राह्यला.”

“दादा, इसण्याचं बुड आसतं का जागेवर? कॉलेजच्या नावाखाली हिंडत राह्यतं ते” बहीण अश्विनी गाडग्यातलं पाणी पिठाच्या परातीत ओतत म्हणाली.

“त्या वाकड्याच्या दुकानात गेलं तर त्यो उधारी चुकवा म्हणतो आधी.”

“सोयाबीनवर देतो म्हणा त्याले.”माय

“मागच्या वेळीपण हेच कारण सांगितलं होतं”

“कर राजा पुन्हा ईनंती. येत्या मालावर नक्की देतो म्हणा”

“बरंबरं. घडीकभर थांब मग. आजचं अभ्यासाचं टार्गेट आटपतो अन संध्याकाळी जातो.” मी जरा नाराजीनंच उत्तर दिलं.

तेवढ्यात माझे काका रामराव डोक्यावरची मळकी टोपी सावरत घरात आले. त्यांच्या तोंडातल्या विडीचा धूर चुलीच्या धुरात बेमालूमपणे मिसळून गेला.

“बोला भगवानराव, काय म्हणतो अभ्यास ?”

“हाये चालू”

“एमपीएससी का ?”

“हो. मार्चमध्ये मेन्स आहे”

“एवढा अभ्यास झेपंल का पण. साहेब बनणं लेच कठीण काम हाये”

“कठीण आहे पण अशक्य नाही.”

“बरोबर. पण तुही माय तुले शहरात क्लास करायले पाठवू शकती का? एकतर एमपीएससी जागा एवढ्या कमी काढती, तेच्यापेक्षा पोलीस भरती मारायची, नाहीतं तलाठी”

“मले अधिकारीच बनायचं हाये”

“तुले तलाठी कमी वाटला क्काय ! साहेबायचे नाही आशे बंगले बांधले त्याह्यनं. ती गितेबाई रोजचे हजार रुपये शिल्लक कमवती.” माय

“वहिनी तेबी बनणं सोपं नाही. पोरं शहरात जाऊन क्लास लावतात. पेशल रूम करतात. तरी एखाद्यालेच जमतं” काका बिडीवरची राख झटकत म्हणाले

“तुमच्या अशा निराशावादी गप्पा चालू झाल्या की इथं थांबाच वाटत नाही. त्यापेक्षा काम करणं पुरतं” मी हातातली पुस्तकं बाजूला आपटत म्हणालो.

माझे दोन्ही काका अन त्यांची मुलं आळशी आहेत. लहान भाऊ तालुक्यावरून कॉलेजसाठी जाणंयेणं करतो. त्यामुळे घरची सगळी जबाबदारी माझ्याच खांद्यांवर येऊन पडते.

गावात असलो की कुणीतरी टोमणे मारायचंच, म्हणून मग मी शेतात जाऊ लागलो.बखारीजवळचं लिंबाचं झाड माझी हक्काची स्टडीरूम बनली. त्याच्या गार सावलीत बसून मी अभ्यास करू लागलो. त्या वर्षानुवर्षे उभे असलेल्या झाडाखाली बसून मी इसवीसन पाठ केले, सुसाटलेल्या वाऱ्याच्या साथीने कित्येक लढाया अंगी भिनवल्या, भूगोलाचं सत्व, विज्ञानाची तत्व निसर्गाच्या सानिध्यात लवकर लक्षात येऊ लागली. शेतीकडे लक्ष देताना मी

कृषिशास्त्र अन शेतमालाचा हिशोब जुळवताना अर्थशास्त्रही शिकलो.

घरगुती चिंता अन अभ्यासाचा ताण या कैचीत मस्तक गरम झालं की मी काळ्याशार विहिरीत मासळीसारखा सूर मारायचो.

ही शेतं मला प्रेरणा देतात, गावाच्या समस्या चालना देतात. ‘उद्या मी मोठा होईन, गावकऱ्यांच्या मदतीने माझं गाव सुधारेन.’ या विचारांच्या खाद्यावर मी जगलो, अभ्यास केला, खूप अभ्यास केला. सुरुवातीला अपयश आलं तरी चिकाटी सोडली नाही. माझ्यातली जिद्द अन तळमळ मुलाखत घेणाऱ्यांना भावली.

अन एक दिवस…

‘गरीब घराण्यातला भगवान तहसीलदार’ अशी बातमी वर्तमानपत्राच्या मुखपृष्ठावर झळकली.

आता सगळे प्रश्न सुटणार, आता सगळं चांगलं होणार.

*         *        *

सुधारणा केवळ स्वप्न पाहून होत नसतात. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणून मी ऑफिसला रुजू झाल्या दिवसापासून काम सुरू केलं. सकाळी १० ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत पूर्णवेळ ऑफिसात थांबणं, लोकांचे प्रश्न समजावून घेणं, ते सोडवण्याचा प्रयत्न करणं हा माझा दिनक्रम बनला. आळशी, लाचखाऊ कर्मचाऱ्यांना मी आधी सरळ केलं. साहेब कडक आहे, आपल्यावर लक्ष ठेवून आहे म्हटल्यावर त्यांनाही जरब बसली.

नंतर मी खेड्यांच्या सुधारणांकडे लक्ष पुरवलं. मी दर शनिवारी एकेका खेड्याचा दौरा आखायचो. तिथे ग्रामसभा घेऊन लोकांना सरकारी योजनांची माहिती द्यायचो. अडचणी सोडवायचो.

माझं गाव सावंगीवर मी विशेष लक्ष दिलं. गावातल्या सर्व समस्या मला तोंडपाठ होत्या.

गावातील विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळायला बऱ्याच अडचणी येतात, म्हणू मी गावच्या ‘लोकसेवा’ वाचनालयाला ‘स्पर्धापरीक्षा विभाग’ मिळवून दिला. गावच्या शाळेला सरकारी अनुदानातून पाच संगणक मिळवून दिले. दोनतीन सभा घेऊन ग्रामस्थांना विविध सरकारी योजनांची माहिती दिली. चांगला प्रतिसाद मिळाला. सुरुवाततर चांगली झाली. आता हळूहळू सगळे प्रश्न सुटणार, नक्की बदल होणार.

*         *        *

“भगवान, आपल्या इसन्याच्या नोकरीचं पाह्यनं जरा.” एका संध्याकाळी मायनं विषय काढला.

“म्हणजे?” मी प्रश्नार्थक मुद्रेने विचारलं.

“इसन्या सांगत होता की ग्रामसेवक, मलेरिया डॉक्टर अन पुरवठा विभागात शिपायाच्या नोकऱ्या हायेत. तिथं ओळखी– पाळखीनं जमंत आसंल त पाह्य न बाबू.” माय माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली.

“अभ्यास कर म्हणा त्या शहाण्याला. पुस्तकं देतो, क्लास लावून देतो. पोलीसभरती अन मिल्ट्रीतपण बऱ्याच जागा आसतात. फक्त मेहनत घ्यायची तयारी पाह्यजे.”

“आता त्यो नाही घेत मेहनत तं आपण काय करणार सांगबरं. तुहाच भाऊ हाये. तसाच बसल्यापेक्षा चिटकून दे कुठंतरी”

“हे असं चिटकून-बिटकून देणं मला जमणार नाही.”

इमानदारीचा जमाना गेला बाबा आता. जसं वारं येईल तसं उपणा लागतं, बाकी जमाना चालतो तसं आपण चालायचं.”

“ह्या आशा विचारायमुळच आपला देश मागं आहे. प्रत्येकजण स्वतःचा विचार करतो.”

“देशाचा विचार करायले सरकार बसेल हाये”

“आम्ही सरकारी प्रतिनिधी. आम्हीच सरकार”

“अरं बाबा, आधी पोटोबा, मग विठोबा आसं म्हणतात. आपल्याच घराले भोकं आसतील तं लोकायचे बुजवून काय फायदा? आधी आपलं गाडं मार्गाले लाव, मग खुशाल समाजसेवा करत बैस.” माय रागानं म्हणाली.

“मले या विषयावर भांडायचं नाही. ‘

तेवढ्यात आतल्या खोलीतून इसन्या बाहेर आला. इतकावेळ तो चुपचाप आमचं संभाषण ऐकत होता.

“दादा एमपीएससी काही माझ्याच्यानं होऊ शकत नाही. गणित इंग्रजी कच्चं असल्यानं बँकिंगकडंही जाता येत नाही”

“अजूनही बऱ्याच परीक्षा असतात”

“असतात पण तिथंही स्पर्धा ले वाढली हाये. समजा, तू म्हणतो तसा मी भयाण अभ्यास केला, परीक्षा पास झालो. पण इंटरव्ह्यूतजर काही पोरांनी लग्गा लावला तं माझंच नुकसान होईल नं. आसं होतं बऱ्याच ठिकाणी. मग दुसऱ्या कोणी सेटिंग लावल्यापेक्षा आपणच लावली तं कुठं बिघडतं”

“सगळ्याच परीक्षेत घोळ होत नसतात, जसंकी पोलीसभरती अन मिल्ट्रीभरती. तिथं जोर लाव.”

“ते तर मी करतोच, पण तरी तू थोडासा प्रयत्न…”

“हे पाह्य इसन्या, तुले दोन पर्याय देतो. एकतर अभ्यास कर, सगळ्या सुविधा पुरवतो, वेळ देतो. दुसरा पर्याय शेती कर. ट्रॅक्टर घेऊन देतो, सबसिडीवर स्प्रिंकलर बसवतो. वाटल्यास एखादा एक्कर शेती घेऊन देतो. प्रगतिशील शेतकरी बन.”

“अरे पण…”

“माझा विचार पक्का आहे. हा विषय पुन्हा घरात निघणार नाही”

माझा भाऊ विष्णूच्या बरोबरच चुलतभाऊ नागेश अन गजाननसुद्धा बेरोजगार होते, कॉप्या करून बारावी झालेले अन आळशी होते. आमचे चुलतेसुद्धा विड्या फुंकणे अन टवाळखोरपणा करणे यातच पटाईत असल्याने नागेश अन गजाननचं भविष्य अधांतरी होतं. दोन एक्कर शेतीवर काय भागणार. नाग्याला एका जागी बसून गप्पा हाणण्याची सवय असल्यानं मी त्याला दुकान टाकून दिलं, गजा थोडा खटपटी असल्यानं त्याला विहीर बांधायला सबसिडी मिळवून दिली. लवकरच विहरीवर मोटर आली.

मी अधिकारी झाल्यापासून माझे नातेवाईक दुपटी-तिपटीने वाढले होते. दूरदूरच्या ओळखी निघायला लागल्या. लोक जातीचे बनावट सर्टिफिकेट्स, चुकीचे सातबारे, कर्जमाफी, बेरोजगार प्रमाणपत्र, अपात्र असूनही सरकारी योजना मिळवू बघणे अशा एक ना अनेक कामांसाठी त्यांचा जन्मसिद्ध हक्क असल्यासारखी मागणी करायचे. पण मी स्वतःला असल्या वाईट सवयी लावून घेत नसतो.  मी असल्या लोकांना, मग तो कुणीही असो, धुडकावून लावायला लागलो. माझ्या तत्वांसमोर अशा तकलादू नात्यांना काही किंमत नाही.

*         *        *

“नमस्कार साहेब” मी ऑफिसमधून निघण्याच्या तयारीत असतांना देशमुख बिल्डर आल्यामुळे जरा आश्चर्य वाटलं.

“बोला” मी जरा नाखुशीनेच म्हणालो

“आपल्या प्रपोजलचा विचार केला का साहेब? गट क्रमांक १८/१ ची फाईल”त्याने चेहऱ्यावर लाचार हास्य पसरवत विचारलं

“ती महामार्गालगतची जमीन का, जिथे शॉपिंग कॉम्प्लेक्स अन फॅक्टरी टाकायचा प्लॅन आहे”

“हो हो तेच”

“तुमचं प्रपोजल मी बघितलं. भूमी अभिलेख कार्यालयातून कागदपत्र मागवले, वनखात्याशीपण संपर्क साधला. तुमची जमीन Permanent Agriculture Zone मध्ये येते. त्यामुळे NA करायला जमणार नाही.”

“ते माहीत आहे साहेब. पण तुमची इच्छा असेल तर सगळं होऊ शकतं”

“इथे इच्छेचा प्रश्न येतोच कुठे. आम्ही कायद्याचे बांधील. तुमच्या प्रस्तावात ज्या कायदेशीर अडचणी उद्भवल्यात त्या फाईलला जोडल्या आहेत. निमसे बाबूंकडून फाईल कलेक्ट करा.”

“साहेब, सरकारने तुमच्या हातात जादूची कांडी दिलेली आहे. तुम्ही मनात आणलं तर काहीही होऊ शकतं. यात तुमचाही फायदा आहेच.” तो समोर येऊन कुजबुजत म्हणाला

“मला जरा बाहेर जायचंय, तुम्हीपण निघा”

“आमचं काही चुकलं का साहेब?”

“याचा तुम्हीच विचार करा.”

“अच्छा अच्छा, आलं लक्षात.” तो स्वतःशीच हसत म्हणाला. आता तो अगदी हळू आवाजात बोलत होता

“असले व्यवहार तुम्ही ऑफिसमध्ये बोलत नाही का. नो प्रॉब्लेम, आपण बाहेर भेटू. जागा तुम्ही ठरवा.”

“देशमुख, मी कुठलंही बेकायदेशीर काम करत नसतो.”

“अहो साहेब, तुम्ही नवीन आहात. मान्य, नवीन जोश आहे. पण कायदा हा पैसा सांगेल तिकडे वळतो. आपण आपला फायदा पाहायचा. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ”

“तुम्ही मला लाच देताय?!!”

“शिवशिव. लाच नाही, प्रेमाची भेट समजा.  आता तुमच्या आधीचे ते निकम साहेब, तुमचे सिनियर आहेत. ते माझे चांगले मित्र. दोघांचाही एकमेकांना चांगला फायदा झाला. हवं तर त्यांच्याशी…”

“दरवाजा त्या दिशेला आहे” मी दरवाजाकडे बोट दाखवत म्हणालो

“दरवाजा माहीत आहे पण रस्ता तुम्ही अडवलाय नं. आपण बसून सविस्तर चर्चा करू. काही कमीजास्त असेल तर पाहून घेऊ”

“आतापर्यंत मी तुम्हाला प्रशासकीय भाषेत समजावून सांगितलं, आता रांगड्या भाषेवर उतरावं लागेल.”

“ठिकेठिके, जातो मी. आमचीपण इज्जत आहे म्हटलं. येतो.  नमस्कार” असं बोलून देशमुख बिल्डर निघून गेला. बराचवेळ मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे रागाने पाहत होतो.

सकाळी साडेदहाला माझी गाडी सावंगीत पोहचली. बसमधून उतरताच मी मोर्चा लोकसेवा सार्वजनिक वाचनालायकडे वळवला. तीन महिन्यांनंतर मी गावाकडे अन वाचनालायकडे फिरकलो होतो. मी सुरू केलेल्या योजनांचा काय फायदा झाला हे पाहायला मी उत्सुक होतो.

जवळपास पाऊण तासाने लोकांनी मला अत्यंत क्रोधीत अवस्थेत वाचनालयातून बाहेर पडताना

पाहिलं. वाचनालयात स्पर्धा परिक्षेसंबंधी काहीच नव्हतं. नाही म्हणायला ‘स्पर्धा परीक्षा विभाग’

असा बोर्ड तेवढा टांगलेला होता.

मी याचा जाब विचारला तेव्हा वाचनालयाचा ग्रंथपाल व माझा मित्र राजा पेनाच्या कांडीने

कान कोरत म्हणाला, “भगवान. उघडला त्वा स्पर्धापरीक्षा विभाग. पण पोरं तं यायले पाह्यजे नं. त्या व्हाट्सअप अन फेसबुकमधून फुरसत भेटत नाही पोरायले.  काहीजण मंगरूळात नवीन पिक्चरची टाकी उघडली तिकडं पळतात. कोणी पत्ते कुटतं. संध्याकाळी रिकामटेकडे क्रिकेट खेळत बसतात. चारदोन पोरांना करायचा आसतो अभ्यास पण त्यह्यले वावरात जाणं पडतं. तुह्यासारखी तारेवरची कसरत करणारं कोण हाये बाबा गावात?!”

“अरे पण पुस्तकं कुठं गेले??” मी टेबलावर मूठ आदळत विचारलं.

“तू कशाले टेन्शन घेतो, मी सरकवले ते बरोबर”

“सरकवले !! कुठं सरकवले? ”मी रागात विचारलं

“तू हायेनं आता चारदोन दिवस गावात?”

“नाही”

“आज रात्री तं थांबशील नं? आपल्या शेतात पार्टी करू. तुही वहिनी म्हसाला ले भारी बनवती”

“मी संध्याकाळी जाणार आहे परत. काय जो जवाब द्यायचा तो इथंच दे”

“बरंबरं. आलोच दोन मिनटात. इठ्याS काय लागतं ते पाह्य बरं साहेबांना.”एवढं बोलून तो पसार झाला. नंतर अर्धा तास वाट पाहत बसलो, पण राजा परतला नाही.

त्यानंतर मी शाळेत पाहणी करायला गेलो. शाळेला मिळालेल्या संगणकांचं काय झालं हे बघायचं होतं. मी ऑफिसात गेल्यागेल्या लगीनघाई उडाली. नाश्ता बोलावण्यात आला.

“माझ्याकडे जास्त वेळ नाही, संगणक कक्ष बघतो,  मुलांना त्याचा काय फायदा होतोय, काय अडचणी आहेत त्या समजावून घेतो अन लगेच जातो.” मी मुख्याध्यापकांना म्हणालो

“खोली उघडून दाखवली असती पण आमचा एक चपराशी सुट्टीवर आहे. त्याच्याकडंच आहे बघा ती चाबी.”

“मग आता ?”

“मी मागवून घेतो नं. तोपर्यंत तुम्ही चहा-नाश्ता करा, पोरांसमोर तुमचा सत्कार करायचा आहे”

“नको. सत्कार कशाला”

“नाही कसं,  तुम्ही आपल्या गावची शान.”

त्यांनी टेबलावरची घंटी वाजवली, एक शिपाई आत आला.

“टोल वाजव, पोरांना ग्राउंडवर जमा कर”

बाहेर टोल वाजला,  मुलं, मुली, शिक्षक प्रार्थना मैदानावर गोळा झाले. तिथे माझा सत्कार करण्यात आला. नंतर विद्यार्थ्यांसमोर मी प्रेरणादायी भाषण दिलं. भाषणाच्या शेवटी मी विचारलं,

“शाळेत नवीन कॉम्प्युटर आले, त्याचा तुम्हाला फायदा होत आहे का?”

मुलं स्तब्ध होते, प्रश्न कळाला नसेल म्हणून मी परत विचारला. मुलं कुजबुज करू लागली. मग मी एका मुलाला उभं केलं,

“मित्रा, तुझं नाव काय ?”

“वेदांत”

“वर्ग ?”

“सहावा”

“शाळेतले कॉम्प्युटर वापरले का ?”

तो गोंधळून इकडंतिकडं बघू लागला. मी प्रश्न बदलला,

“शाळेतले कॉम्प्युटर पाहिले का कधी तू ?”

त्याने नकारार्थी मान हलवली.

मी मुख्याध्यापकांकडे वळालो

“संगणक कक्षाची चाबी द्या”

“तो…आपला तो शिपाई…”

मी एक धष्टपुष्ट विद्यार्थी निवडला

“इकडे ये.”

तो समोर आला

“काय सर?”

“एक मोठा दगड उचल अन संगणक कक्षाचं कुलूप तोड” मी आज्ञा दिली

तो घाबरून शिक्षकांकडे पाहू लागला

“ते काही म्हणणार नाहीत तुला, फोड”

मुलगा दगड शोधतोय हे पाहून मुख्याध्यापक माझ्याजवळ आले अन चाचरत म्हणाले,

“साहेब आत्ता आठवलं की एक एक्स्ट्रा चाबी माझ्याकडं आहे.” मग शिपायाकडे वळून म्हणाले, “पोरांना वर्गात पिटाळ”

कुलूप उघडलं तेव्हा दिसलं की सगळे संगणक गायब आहेत.

“खूप झालं, मी कारवाई करणार…हेडमास्तर अन राजावर” संध्याकाळी सरपंचांसमोर बोलताना मी हा विषय काढला

“कसंय भगवान, आपलेच दात अन आपलेच ओठ. जर त्वा कारवाई केली तर आपल्याच गावाची बदनामी होईल.”

“हा विचार मी नाही, त्यांनी करायला पाहिजे होता”

“बरोबर हाये तुझं. पण कसंय की आपण आदर्श गावासाठी अर्ज टाकलेला हाये. आशा भानगडी समोर आल्या तं मिळणार नाही बक्षीस.”

“जे खरोखर आदर्श गाव असेल त्याला मिळेल”

सरपंच गालातल्या गालात हसले. त्यांनी पानपुडा उघडून सुपारीचं खांड तोंडात टाकलं.

“घरोघरी मातीच्या चुली”

“पण माझं गाव आसलं म्हणजे का मी चोरांना पाठीशी घालायचं का?”

“नको घालू. तो हेडमास्तर दोनचार महिन्यात रिटायर होतो अन राजाले काढून टाकतो मी नोकरीवरून. मग तं झालं”

“पण नुकसानभरपाई…”

मी काही बोलणार तेवढ्यात सरपंचांनी चहाचा कप पुढं केला

“चहा थंडा व्हायच्या आत पिऊन घेऊ. मग काय म्हणतं ऑफिस?”

अशाप्रकारे गावचा प्रश्न गावातच गुंडाळावा लागला.

*         *        *

“नमस्कार साहेब” एका टळटळीत दुपारी देशमुख बिल्डर हातात कसलातरी डबा घेऊन अन चेहऱ्यावर छद्मी हास्य घेऊन उभा होता.

“काय काम आहे?” मी बघून न बघितल्यासारखं करत म्हणालो

“काम तर झालं. त्याचेच पेढे द्यायला आलो.” तो पेढ्यांचा बॉक्स समोर करत म्हणाला.

“कुठलं काम झालं?”

“तुम्ही धुडकावलेलं काम वरच्या साहेबांनी पूर्ण केलं. पाचपन्नास शिल्लक गेले, पण चालायचंच”

त्याने पेंढ्याचा डबा माझ्यासमोर ठेवला अन जाऊ लागला. थोडं पुढं गेल्यावर तो परत फिरला.

“सॉरी, एकच पेढा ठेवतो, नाहीतर तुम्ही म्हणाल लाच दिली” असं कुत्सितपणे बोलून त्याने एक पेढा टेबलावर ठेवला अन डबा घेऊन निघून गेला.

मी बराचवेळ हतबुद्ध होऊन बसलो होतो.

मला हे बिलकुल सहन होणार नव्हतं, म्हणून मी या प्रकरणाविरुद्ध कोर्टात केस टाकली

*         *        *

अशाच एका संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी, म्हणजे सरकारी क्वार्टर्सवर आलो.  दार उघडताच समोर भाऊ उभा असलेला दिसला. तो शेती करत असल्यामुळे गावातील घरी राहायचा, अधूनमधून यायचा माझ्याकडे. पण आज त्याला असं अचानक आलेलं पाहून जरा आश्चर्यच वाटलं.

“अरे वा, विष्णू. कधी आला?”

“दुपारीच आलो” तो माझ्या हातातली बॅग घेत म्हणाला. मी फॅन लावला अन सोफ्यावर बसलो. तोपर्यंत त्याने पाण्याचा ग्लास भरून आणला होता. त्याची आजची वागणूक जरा वेगळीच वाटत होती.

“आशु कुठे?”

“ती मैत्रिणीकडं गेली. माय देवघरात हाये”

“बैस नं” मी सोफ्याकडे निर्देश करत म्हणालो, तो चेहऱ्यावर उसनं हसू आणत बसला.

“काय म्हणती तूर?”

“तूर मजेत डोलून राह्यली, चांगली तरारली, खांद्याच्या वर आली.”

“धरणातलं पाणी किती टक्के राह्यलं? मी आलो होतो तेव्हा बरं पाणी होतं.”

“आता बरंच कमी झालं. उपसा वाढला नं तेच्यामुळं”

“हंगाम निघल नं?”

“आरामात निघंल”

शेतीबद्दल अजून काही गप्पा झाल्या, पण मला राहूनराहून वाटत होतं की इसन्या मूळ मुद्द्यावर येत नाहीये. शेवटी मीच विचारलं,

“काही सांगायचं होतं का, विशेष?”

या प्रश्नाने तो जरा गडबडला

“नाही तसं काही नाही.” मग स्वतःच थांबून पुन्हा बोलू लागला,

“दादा, हनम्याचं लग्न होतं पिंपळगावले.”

“मले यायचं होतं गड्या त्याच्या लग्नाला पण मंत्रालयात काम निघलं. हनाम्याला फोन करून सांगितलं होतं मी”

“आसं आसं. आपला ट्रॅक्टर लावला होता वऱ्हाडी न्यायले. तसे मित्रमित्रच होतो आम्ही तेच्यात”

“अच्छा” मी विशेष उत्सुकता दाखवली नाही

“वापस येताच मी मागं थांबलो अन ट्रॅक्टर पुढं पाठवून देला. मी नवरदेवासोबत येणार होतो पण काय झालं की…” तो पुढं बोलायचं थांबला. तो खाली बघत होता, चेहऱ्यावर चिंतेच्या ढगांनी गर्दी केली होती.

“तुले नेमकं काय सांगायचं आहे ?”

“ते आपलं… तू आधी हातपाय धून घे, नंतर बोलू”

“नंतर नाही, जे असंल ते आताच सांग… स्पष्टपणे, आढेवेढे न घेता.”

“दादा, ते ट्रॅक्टर…”

“ट्रॅक्टर काय?”

“ट्रॅक्टर पेठच्या घाटात उलटलं”

ते वाक्य शिसं ओतल्यासारखं माझ्या कानांत शिरलं. घशाला कोरड पडली. विचार थिजले.

“सॉरी दादा, मी ट्रॅक्टर दुसऱ्याच्या हातात द्यायले नव्हता पाहिजे.”

मी स्वतःवर कसाबसा ताबा मिळवला.

“कोणाला किती लागलं? कुणी…”

“नाही नाही कोणी मेलं नाही. नशीबच म्हणायचं. पण जखमी झाले पाचसहा जणं. फॅक्चरफिक्चर हायेत. एवढं काही टेन्शन घ्यायचं काम नाही.”

मी काहीच बोललो नाही, फक्त त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव न्याहाळले. अजून काहीतरी होतं जे त्याला सांगायचं होतं. त्याच्या मनातली उलघाल चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटली होती. जणूकाही मी त्याच्या मनातले विचार ओळखले

“फौजदारी तर नाही लागली नं?”

“अं… लागली. एकाच्या नातेवाईकानं कंम्पलेंट केली”

“कशी? आपली चुकी होती का?”

“नाही, पण म्हणजे. रिपोर्टात असं टाकलं की ड्राइवर दारू पेलेला होता”

“खरंय का हे?” मी त्याच्यावर नजर रोखत विचारलं

“हाव, म्हणजे सगळेचजण पेलेले होते. पण चुकी त्याह्यची नव्हती. समोरून अचानक ट्रक आला…”

“मी म्हणतो तुले काय गरज होती,  दुसऱ्याच्या हाती ट्रॅक्टर द्यायची? पोरं दारू पेलेले आहेत माहीत नव्हतं का तुले ? आता उरावर येईल नं हे सगळं” मी कडाडलो

इसन्या समोर येऊन हळू आवाजात बोलला,

“अमडापुरच्या जमदाडे पिएसआयची ओळख निघंल का?”

“मी नाही ओळखत”

“अक्सिडंट झाला तो भाग त्याच्या पोलीस स्टेशनात येतो. मी आयकलं की त्याचा साला तुह्याच ऑफिसात बाबू हाये. भोपळे आडनाव आहे. नाव दिनकर की दिगांबर असं काहीतरी”

इसन्याला काय सांगायचंय माझ्या लक्षात आलं होतं. पण मी चूप बसलो.

“जमदाडे केस दाबायचे एक लाख मागून राह्यला, पण तू ऑफिसातून ओळख काढ, कमीत जमवून टाकू. जे जखमी झाले त्याह्यले जराजरा देऊन टाकू. मी बोललो तसं. आपलेच मित्र सगळे. एक हाये जरा सिरीयस, त्याचं पाह्यता येईल काय होतं ते”

इसन्या भराभर हिशोब मांडत होता, माझ्या मनावरमात्र घणामागून घण आदळत होते,  डोकं काम करेनासं झालं होतं. मी डोकं दोन्ही हातांच्या ओंजळीत गच्च धरून बसलो

“दादा होईल सगळं नीट. पैसा फेक तमाशा देख.” तो माझ्या खांद्यावर हात टेकवत म्हणाला

मी तो हात झिडकारला अन ‘खानकनS’ त्याच्या कानाखाली वाजवली.

“हरामखोरा, पैसे झाडाला लागतात का?”

“झाडावरून तोडून आणा लागंल एवढेकाही जास्त लागणार नाहीत. दोन चार लाखाचा सवाल हाये”

“कुठून येणार माझ्याकडं एवढे पैसे?”

“पैसे तं बम मिळत असतील नं तुले?”

“अरे बाबा, पगारातले पैसे घरखर्च, सेव्हिंगमधे जातात. तुले ट्रॅक्टर, स्प्रिंकलर घेऊन देलं,  दोन एकरावर भागणार नाही म्हणून एक एक्कर शेत घेऊन देलं. त्यासाठी कर्ज काढलं. त्याचे हप्ते याच बम पगारातून कटतात. आता तू ही आफत आणली ती निस्तरायले कुठून आणू पैसे ? चोरी करू का डाका टाकू?” मी ओरडत म्हणालो.  माझे डोळे संतापाने लाल झाले होते. तो आवाज ऐकून माय बाहेर धावत आली.

“चोरी कशाले करा लागती. मी पगाराच्या पैशायबद्दल बोलूनच नाही राह्यलो.”

“मग?”

“वरच्या कमाईबद्दल बोललो” तो एक डोळा मिचकावत म्हणाला “तीच तर मेन कमाई हाये”

“इसन्याS S तुह्या बथ्थड डोक्यातले विचार सडले. या भगवान आंभोरेनं हरामाचा एकही पैसा खाल्लेला नाही”

“दादा, चिखलात उतरल्यावर पाय भरल्याशिवाय राहणार हायेत का?”

“इसन्या, तोंड सांभाळून बोल” माझ्या आधी माय कडाडली.

“माय, या शाह्यन्याले सांगून दे की मी पैसे भरणार नाही. तू आफत आणली, तूच निस्तर”

“मी कुठून आणणार एवढा पैसा? शेतकरी माणूस मी.  नोकरी लावून दे म्हटलं तर ते जमलं नाही. नोकरी असती तं ही आफत आलीच कशाले आसती.”

मी काहीच न बोलता सुन्न होऊन बसून होतो.

“दादा, मले माहीत हाये की तुले लोकांसाठी काम करायचं हाये. जरूर कर. गरीबायकडून छदाम घेऊ नको. पण या धनदांडग्याना कशाले सोडायचं. ज्यानं बेईमानीनं पैसा कमवला त्याच्याकडून पैसे घेतले तं काय बिघडतं”

“वरवर पाहता तुझा युक्तिवाद सडेतोड वाटतो. चुकीच्या गोष्टींना समर्थन मिळवण्यासाठी माणूस तर्काचा आधार शोधतो. पण तू हे विसरलासं की जो मला पैसे देणार तो त्याचं बेकायदेशीर काम करून घेईल. आज एकजण आला, उद्या दहा येतील, पैशांच्या बाजारात मांडून माझी किंमत करतील. अन एकदा का माणूस विकला गेला की तो गुलाम बनतो, लाचार बनतो.

तो अधिकारी उरत नाही तर दुसऱ्यांच्या हातातील बाहुलं बनतो.”

“हे पाह्य भाऊ, मी तुझी माय हाये. अडाणी असले तरी तुह्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाह्यलेत. इमानदारी हा शब्द फक्त पुस्तक, सिनमा अन मोठमोठ्या भाषणातच चांगला वाटतो. हा जमाना इमानदारीचा नाही. पैसे खाणाऱ्याचं काहीच वाकडं होत नाही”

“माय बेईमानी केली तर डोळ्यांवर झापड ओढावं लागतं. शिपायापासून बाबूपर्यंत चिरीमिरी घेणाऱ्यांकडे काणाडोळा करावा लागतो. कारण आपणही त्यांच्याच गोटात सामील झालेलो असतो”

“ते काही मले माहीत नाही. पण हे जे काही झालं ते निस्तरणं तुही जबाबदारी हाये.  त्या गजानं कर्ज भरलं नाही, त्याचा जामीनदार तूच हायेस नं ”

माझा चुलतभाऊ गजूच्या कर्जाचे हप्ते थकले होते. तो कर्ज भरत नव्हता. बोलून, समजावून, मारून, भांडून सर्व उपाय करून बघितले. पण काहीच फायदा झाला नाही. नाही भरले तरी जामीन मी घेतला होता नं. अन त्यांच्या मते, साहेब म्हटल्यावर मला पैशांची काय कमी.

कर्जतर सोडाच, थकलेलं वीजबिल माफ करवून घ्यायला दोन्ही चुलते माझ्यामागे हात धुवून लागले होते.

प्रश्न वाढतंच चाललेत.

पण मी डगमगणाऱ्यातला नव्हतो. या जगानंच मला शहाणं बनवलं. मी स्वतःला काही नियम घालून दिले, एक चौकट आखली.

गावाकडच्या प्रकरणानंतर सरकारी मदत मिळवून देण्याआधी मी विचार करू लागलो. माझ्याकडून विशेष फायदा होणार नाही हे लक्षात आल्यामुळे असेल कदाचित, पण सावंगीचे सरपंच गावच्या विकासकामांमध्ये मदत करायला हात आखडता घेऊ लागले. माझाही उत्साह मग पहिल्यासारखा राहिला नाही.

*         *        *

“ही केस हरली म्हणून काय झालं, मी वरच्या कोर्टात जाईन.” मी स्वतःलाच बजावलं. देशमुख

बिल्डरविरुद्ध टाकलेली केस मी हरलो होतो. महागडा वकील अन खोटे पुरावे यांच्यासमोर सत्याला झुकावं लागलं होतं. ऑफिसच्या खुर्चीवर बसल्याबसल्या माझं स्वतःच्याच मनाबरोबर युद्ध सुरू होतं. सगळं सुरळीत होईल ही आशा वास्तवात रूपांतरित होण्याऐवजी कल्पनेत विरून गेली होती. केस हरल्यावर सगळेजण मला हसत आहेत, माझ्याबद्दल बोलत आहेत असं वाटत होतं.  ज्यांचा आधार मिळावा त्यांनीच पाठ फिरवली होती.

भावाचं थकलेलं कर्ज, अक्सिडंटमधल्या जखमींना द्यावी लागणारी नुकसानभरपाई वगैरे गोष्टींसाठी दोनतीन कर्ज काढून मी हैराण झालो होतो. माझ्या मनात मी प्रामाणिक समाजव्यवस्थेचा एक महाल बनवला होता. तो आता कोसळतोय, त्याच महालाखाली मी गाडला जातोय. माझा प्रामाणिकपणा गाडला गेल्यावरच जर लोकांचं भलं होणार असेल तर ठीक आहे. पण नाही. ही माझ्या तत्वांशी बेईमानी होईल. प्राणपणानं जपलंय मी माझ्या तत्वांना. मेल्याशिवाय काही ती सुटणार नाहीत. “देवा…पांडुरंगा…”माझ्याच नकळत मी पुटपुटायला लागलो.

“सारे जहाँसे अच्छा…”रिंगटोन वाजली तसा मी भानावर आलो.

“हॅलो. बोल माय. हं…असंका अरेवा ! छान…काय ? पण…”निराशेचा सुस्कारा टाकत मी कॉल कट केला.

मागच्या आठवड्यात माझ्या बहिणीला बघायला पाहुणे आले होते. फक्त मी अधिकारी आहे म्हणून हे स्थळ जुळून आलं होतं. मुलगा नायब तहसीलदार, एकुलता एक, पाच एक्कर ओलीती शेती. त्यांनी आज होकार कळवला होता. अरे वा ! छान. पण यापुढचं माय जे बोलली ते–“भावजीले फोन आला होता पोराच्या काकाचा. दहाबारा लाख हुंड्याची अपेक्षा हाये.”

“काय ??”

“बैठक बसल्यावर एखादा लाख कमी होऊ शकतात म्हणा. मी काय सांगते ते आईक. आसा पोरगा शोधून सापडणार नाही. तुह्या बहिणीच्या आयुष्याचं कल्याण व्हावं वाटत आसंल त तुही इमानदारी चुलीत घाल.”

“पण बिना…”

“पणबिन काही नाही. हा नाही तरी दुसरा पोरगा हुंडा घेणारच हाये. म्या सगळी जिंदगी

गरिबीच्या चटक्यात काढली, मातीचा फुफाटा अन चुलीच्या धुरात बरबाद झाली. कोरडा तुकडा खाऊन अन फाटके लुगडे घालून जिंदगी काढली. पोरगीतरी लंकेची सीता बनू नाही आसं वाटतं. जनमदाती म्हणून महा काही अधिकार आसंल तं या गरीब मायचं एवढंतरी आईक रे राजा…”अन माय

ढसाढसा रडू लागली

मी फोन बंद केला. मनामध्ये कुठलीतरी अनोळखी संवेदना भरून राहिली होती, कानांत सुन्न होत होतं.

“साहेब, ओ साहेब” माझ्या समोरच्या खुर्चीवरून आवाज ऐकू आला.

“आ…हा नमस्कार. बोला” मी कसंबसं सावरत बोललो

“आपलं एन. ए. चं काम…काल कल्पना दिली होती तुम्हाला साहेब.”समोरचा आवाज

“हू…नाही जमणार. ते इल्लीगल” माझ्या तोंडातून नकळत बाहेर पडलं. पण यावेळी आवाज थोडा क्षीण होता.

समोरचा इसम माझ्याजवळ आला अन हळू आवाजात म्हणाला,

“चार देतो नं साहेब. म्हणाल तर पाचपंचवीस इकडं का तिकडं. पुढच्या आठ दिवसांत ब्लॅक पैसा व्हाइट होऊन बरोब्बर तुमच्यापर्यंत पोहचेल.”

“….”

“कागदपत्र आणले मी. वाटल्यास एक सही आता करा अन एक पैसे मिळाल्यावर”तो कागदपत्रांची फाईल माझ्या पुढ्यात ठेवत म्हणाला.

त्या एका क्षणात सगळा भूतकाळ चलचित्रासारखा माझ्या नजरेसमोरून सरकला. विचार सैरभैर धावू लागले. एका बाजूला माझी तत्व डोळ्यांसमोर नाचायला लागली. दुसऱ्या बाजूला बहिणीचं लग्न, कर्ज, हरलेली केस अशा अनेक अनेक गोष्टींनी फेर धरला. मी मेल्याशिवाय काही ही तत्व सुटणार नाहीत.

मी दुःखावेगाने आवंढा गिळला.

ठीक आहे. आजपासून, या क्षणापासून भगवान आंभोरे मेला…कायमचा…

मी खसकन खिशाचा पेन उपसला. पुढच्या दोनच क्षणांत समोरच्या कागदावर भराभर स्वाक्षरी उमटली.

आता खरोखरच सगळं व्यवस्थित होणार, सगळे प्रश्न सुटणार.

मी पांढरास्वच्छ रुमाल काढून अलगद डोळे टिपून घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here