अर्ध्यावरती डाव मोडला..? | Marathi Katha

0
192
Marathi Story ArdhyaVarati Dav Modala, Marathi Katha

Marathi Story – Ardhyavarati Dav Modala-अर्ध्यावरती डाव मोडला..?

लेखिका – स्मृतिका चव्हाण

तन्वी ऑफिस मधून लवकर निघाली खरी पण बाहेर लक्ष जाताच तिच्या लक्षात आलं, आभाळ भरून आलंय आणि आपण नेहमी प्रमाणे रोजच्या गडबडीत छत्री विसरलोय. आता कसेही करून लवकर कॅफे ला पोहोचावे लागणार नाहीतर आज तो निघून गेला तर.. खूप दिवसांनी त्यांनी भेटायचं ठरवलं होता आणि आज ही संधी तिला गमवायची नव्हती. पटकन एक ऑटो पकडून तिने थेट  कॅफे चा रस्ता धरला. काय बोलू त्याच्याशी, कसा वागेल तो, आणि परत सर्व तसंच अगदी पहिल्यासारखा होता तसं असेल का? “तन्वी, शांत हो” ती स्वतःशीच पुटपुटली. इतक्यात ऑटो कॅफे समोर येऊन थांबली आणि एव्हाना बाहेर धो धो पावसाला सुरुवात झाली होती. “अरे यार, हा पाऊस पण ना, आता इतकी तयारी करून आली आहे मी आणि सगळ्याची भिजून वाट लागणार. मी पण अशी कशी वेंधळी, नेमकी छत्री विसरते”, ऑटो चे पैसे देता देता आता रस्ता आणि कॅफे चा हे छोटासा अंतर, जे पाऊसामुळे आता खूप मोठे वाटतंय ते कसा कमीत कमी भिजत पार करायचा याचा विचार ती करू लागली. आणि इतक्यात ऑटो च्या समोर तो छत्रीतून डोकावला. “अनी तू, तुलाही उशीर झाला ना, मला वाटलं कॅफे वाट पाहत नेहमीसारखा माझ्या नावाने चरफडत बसला असशील”. त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य फुलले.

“ आता उतरणार आहेस कि इथेच गप्पा मारू या?” अनुराग ने चिडतच विचारले. तशी ती गडबडीत खाली उतरली आणि त्याच्या सोबत छत्रीतून चालू लागली. नकळत त्याच्या हाताचा हलका स्पर्श झाला आणि त्या स्पर्शाने ते दोघेही थोडे बावरले.

अनुराग म्हणाला, “आणि मी नेहमी सारखा वेळेवरच आलो बरं का , पण वाटलंच मला तू वेंधळ्यासारखी छत्री विसरली असशील म्हणून तुला रिसिव्ह करायला बाहेर आलो. जुनी सवय आहे ना तुझी?”

“याला अजूनही सर्व छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आहेत”, तन्वी काहीशी लाजून आपल्याच मनाशी पुटपुटली.

बोलता बोलता ते दोघं कॅफे मध्ये एका जागी सेटल झाले.

अनुराग : “बोल काय घेणार आहेस? आणि प्लिज आता काहीही असा उत्तर नको देउस.”

तन्वी (हसून ): “एक कॅफे फ्रॅपे अँड चिली चीस टोस्ट”

अनुराग : “अरे वाह! इतका क्विक डिसिजन. बदलली आहेस तू”

अनुराग ने ऑर्डर दिली. काही क्षण उगाचच आजूबाजूला नजर फिरवत दोघेही एकमेकांची नजर टाळत होते. खरतर त्यांना सुरुवात कशी आणि कुठून करावी तेच सुचत नव्हते. शेवटी ना राहवून अनुरागने बोलायला सुरुवात केली, “ सो तन्वी मॅडम, काय म्हणतेय लाईफ़? दोन वर्षात फारच बदलली ग तू. फोन नाही, मेसेज नाही. आपला ग्रुप नेहमी काहीतरी प्लॅन करतो तिथे ही येत नाहीस. एवढी बिझी झालीस का कि टाळतेयस आम्हाला? खरतर लग्नानंतरच तू हळूहळू बदलायला लागलीस. ”

तन्वी : “ ए गप रे.. जसा काही तू बराच प्रयत्न करतोस ना बोलायचा.”

अनुराग : “हाहा, सॉरी ग, पण कामाची गडबड, घर यात वेळच मिळत नाही. पण मी प्रयत्न तरी करतो.” 

तन्वी : “हम्म, मी समझू शकते.. माझही तसेच झालंय”

अनुराग : अजूनही पेंटिंग्स करतेस?

तन्वी( एक मोठा उसासा सोडून) : २ वर्ष झाली, ब्रश हातात घेतला नाही

अनुराग : काय?? अग का पण, तुला तर खूप वेड होता ना पेंटिंग्स चा.

तन्वी : हम्म! वेळच नाही आता. ते सोड, तू बोल, तुझं  गिटार काय म्हणतंय? आणि तुझी ती ढीगभर पुस्तक?

अनुराग : तितकासा नाही वेळ मिळत. पण काढतो वेळ अधून मधून. पण तन्वी मला वाटत तू परत तुझा पेंटिंग्स सुरु करावं, अगदी नियमित. ते तुझा पॅशन आहे ग आणि मला फार आवडायचे, तुला पाहत बसायला तासनतास. तू सुंदर आहेसच पण तू तुझ्या छंदांमध्ये इतकी गर्क होऊन जायचीस ना की आजूबाजूच्या जगाचा विसर पडायचा तुला आणि त्या वेळेस तुझा चेहरा अजूनच खुलून यायचा. चित्राची सुरुवात झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत, त्या चित्राचं साकारत जाणार रूप आणि तुझ्या चेहऱ्यावरचे बदलत जाणारे भाव अगदी पाहत राहावेसे वाटायचे. तुला आठवत ना आपण कॉलेज ट्रिप ला महाबळेश्वर ला गेलेलो आणि इतर सगळे मजा मस्ती करत असताना, तू कुठेच दिसत नाहीस म्हणून मी शोधत आलो. पहिला तर काय मॅडम एकट्याच बसल्या आहेत तंद्री लागल्यासारख्या. तो मावळणारा सूर्यास्त, आणि त्या पुढे त्या सुंदर देखाव्याचा हुबेहूब प्रतिबिंब रेखाटणारी तू. अग मी खरतर तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो. जिथे इतर सर्व एका सेकंदात मोबाइल कॅमेरा वर फोटो काढून तो क्षण टिपण्याचा प्रयत्न करत होते, तिथे जगाचं भान हरपून आणि आपल्या कल्पनेने त्या क्षणाला अजून सुंदर रेखाटणारी ही वेडी मुलगी मला खूप भावली होती.”

अचानक अनुराग थांबला. तन्वी चे डोळे भरून आले होते. त्याने अलगद तिचा हात हातात घेतला आणि तिचे डोळे पुसले. तन्वी पटकन भानावर आली आणि मागे सरकली. ”अनुराग कोणी पहिले तर काय म्हणेल.”

अनुरागनेही स्वतःला सावरले.

तन्वी : आता जसा बोललास तस कधी या आधी बोलालासच नाहीस ना.

अनुराग : नाहीच जमल ग कधी. कदाचित गृहीत धरलं मी फार तुला. वाटलं तू आहेस आणि नेहमीच असणार आहेस सर्व सावरायला.

तन्वी : असू दे, कदाचित माझंही चुकलंच थोडं. काही गोष्टींकडे खूप दुर्लक्ष झाले. घर, संसार, नातं या मध्ये इतकी गुरफटली की स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे तेच विसरून गेली. यामुळेच नकळत इतरांवर  थोडा जास्त हक्क गाजवायला लागली. पण आता कळतंय मला आपले छंद, मित्र मैत्रिणी आणि मुळात आपले अस्तित्व जपणे किती महत्वाचे आहे.

दोघामंध्ये काही सेकंद शांतता पसरली.

तन्वी ने डोळ्यांच्या कडा पुसत म्हटले “चल फार उशीर झाला. निघायला हवं मला, घरी वाट पाहत असतील माझी.”

अनुराग म्हणाला “थांब ना अजून थोडा वेळ”.

इतक्यात तन्वी ने पर्स मधून एक पार्सल काढले आणि अनुराग कडे सरकवत तन्वी बोलली “ही एक छोटीशी भेट तुझ्यासाठी आणली होती.” अनुराग ने पार्सल ओपन केले आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप वेळाने हसू आले. “रिअल मॅड्रिड जर्सी..! तू तर नेहमी काय ठेवलाय त्या मॅच मध्ये असा म्हणून नाक मुरडयाचीस ना.. आणि माझ्या फेव्हरेट टीम चा नाव बरं लक्षात राहील तुला.” तन्वी ची थोडी मस्करी करत अनुराग बोलला.

“लक्षात होते रे सर्व, फक्त फार लक्ष दिले नाही काही गोष्टींकडे” तन्वी ने उसने हसू चेहऱ्यावर आणत सांगितले.

“आणि हे काय” दुसरी वस्तू बाहेर काढत अनुराग ने विचारले.

“पहिले प्रेम”.. अनुराग चे वाक्य पूर्ण होण्याच्या आत तन्वी चे उत्तर आले. “मी फारशी पुस्तक वाचत नाही पण एकदा वि स खांडेकरांचे हे पुस्तक पाहिले आणि वाचावेसे वाटले. मला आवडले, वाटलं तुला वाचनाची आवड आहे तर तुलाही आवडेल.” वाक्य पूर्ण करत तन्वी उठली “चल, निघायचे का?”

अनुराग : “मी सोडतो तुला घरी”

तन्वी : “ नाही नको. मी जाईन ऑटो ने ”

अनुराग : “ तनु, पाऊस खूप आहे आणि उशीर पण झालाय. मी सोडतो”

अनुराग ने मारलेल्या तनु या हाकेने तन्वी ची पावले थबकली. क्षणभर तिला वाटले असेच आता अनि ला मिठी मारावी. पण स्वतःला सावरत ती म्हणाली “नको, कुणी पहिला तर.. ”

तिचा हात हातात घेत अनुराग बोलला “पहिला तर पाहू दे, मी नाही घाबरत. तनू हा आपल्या दोघांचा प्रश्न आहे, यामध्ये इतर विनाकारण इन्व्हॉल्व झाले कारण आपण दोघांनी तसे होऊ दिले. पण आता २ वर्ष होत आली तनु. मला कळून चुकलंय कि मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आपल्या दोघांनाही आपल्या चुका कळल्या आहेत आणि आपल्या परीने आपण त्या सुधारायचा प्रयत्न करतोय. मग झालं गेलं विसरून एक नवी सुरवात नाही करता येणार का?” 

“अरे पण.. ” तन्वी पुढे बोलणार पण परत तिला थांबवत अनुराग बोलला “नाही तन्वी, २ वर्ष झाली, आपल्यातील मतभेदांमुळे आपण वेगळे राहिलो आणि आपल्याला कळतेय ती चूक होती तर आपण आता कसली वाट बघतोय? अजून एक चुकी करायची. आणि म्हणूनच आपण आज हेच पडताळून बघायला भेटलो ना, अगदी पहिल्यासारखे. तनु आपलं घर , मी सर्व अधुरे आहे तुझ्याशिवाय.. मी बाकी सर्व सांभाळून घेईन. त्या वेळेस जी चुक मी केली, तुला मनवुन परत घेऊन ना जायची, ती मात्र आज मला सुधारायची संधी दे. फक्त आज आपलं घर तुझी वाट पाहतय. घरी परत चल.”

तन्वी च्या डोळ्यातून अश्रू ओघळून आता तिचे तिलाच कळेनासे झालेले. ती उठली आणि पाहीले तर अनि चे डोळे ही लाल झालेले. तिने अनि ला मिठी मारली आणि दोघेही काहीही ना बोलता काही क्षण एकमेकांच्या मिठीत विसावले.

घरी परत आल्यावर दरवाजा उघडताच समोर तन्वी ची आवडती चाफ्याची फुले तिच्या स्वागतासाठी सज्ज होती आणि त्या सोबत होते एक मोठी फ्रेम. त्या फोटो मध्ये तन्वी मंत्रमुग्ध होऊन तिचे चित्र रेखाटण्यात रमली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here