आई – Marathi Kavita

0
91
Marathi Kavita – Aai – आई

Marathi Kavita Aai – आई

कवि – सुरज दळवी

आई एकटी जात नसते.

सोबत जात असते घराची शोभा.

शांत होतात घराच्या भिंती,दारं आणि खिडक्या.

सुन्न पडतात भांडे आणि भांड्यांचा आवाज.

कोप-यात पडून असते केरसुनी रूसून एकटीच.

पडून असते निपचीत टोपली कच-याची कच-याशिवाय.

गायब होतो आवाज पाण्याचा,बादल्यांचा,धुण्याचा.

आंगण आंगण रहात नाही,

रिक्त असते जागा रांगोळीची.

तुळस दिसत नाही तजेलदार पहिल्यासारखी पाण्यासोबत.

हळू हळू गायब होते आईसारखीच

कुणालाही न सांगता.

बंद पडून असते चूल व चूलीचं घर

मरून पडून असतो गॅस.

मेलेली असते चूल विधवा झाल्यासारखी.

पहिल्या सारखी अगरबत्ती जळत नाही देव्हा-यात

तसा सुगंध देखील येत नाही.

तेल-वात सुद्धा रहात नाही समईत.

दिवा जळत नाही आई नाही तर.

मिक्सरचा आवाज गायब असतो आईसारखाच.

तेला-तुपाचा खमंग वास घरभर पसरत नाही हल्ली,

आई गेली तर.

तळण्या-फोडणीचा आवाज येत नाही

किचनमधून चूलीच्या घरातून आई नाही तर.

पोळ्या-भाकरी थापण्याचा आवाज कानात गुणगुणत राहतो अजूनही आई तिथेच असल्यासारखा.

रिक्त होते आईची जागा.

रिकामं होतं घर,पोकळ होतो वासा आईशिवाय.

खिन्न होऊन जातं सर्वच आईचा वावर असलेलं.

बांगड्यांची किणकिण ऐकू येत नाही आई गेली की.

आरसा रिकामाच दिसतो,

टिकल्या कंगव्यांशिवाय.

एवढ्यात आता भास होत राहतात हल्ली.

घराच्या शेजारून एखादी बाई गेली की,

एखादी ताई-बाई सुद्धा भटकत नाही आता घराकडे,

सणावाराला आमंत्रण घेऊन.

ढिम्म पडून असतात हळदी-कुंकवाचे करंडे

जागच्या जागी.

हलतसुद्धा नाही जागेवरून कुणी ताई-बाई नाही आली की.

खरं तर,

आयुष्य आयुष्यच रहात नाही एखाद्याची आई गेली की.

आई.

आई एकटी जात नाही.

सोबत जात असतं घराचं घरपण.

कायमचंच.

आजपण,उद्यापण,परवापण.

सुरज दळवी
अहमदनगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here