मुक हंबरडा – Marathi Katha Muk Hambarada

0
13511


लेखिका : डॉ. नेन्सी डीमेलो
संपर्क : nvd1602@gmail.com

मुक हंबरडा – Marathi Katha Muk Hambarada

हास्याच्या खळखळाटाने  तिची तंद्री भंग पावली . फाईल मधून नजर हटवून तिने  खिडकीबाहेर कटाक्ष टाकला. क्षणभर ती आवाक  झाली.  ऑफिस सहकारी शीला हिच्याबरोबर तो भरभरून बोलत होता आणि शीला खळखळून हसून  त्याला दाद देत होती .  दोघांच्याही चेहऱ्यावरील अविर्भाव,  बोलण्यातील लकबी  पाहून,  तिने मनात गाठ बांधली.  सावज व  शिकारी तिच्या दृष्टिक्षेपात होते.  स्वतःला आवरणे तिला अशक्य होते,  दुपारच्या  लंच ब्रेकची वाट पाहत क्षण अन क्षण ढकलत होती.  टिफिन डस्टबिन मध्ये उलटा करून ती शीलाच्या  दिशेने निघाली.  तिने शिलाला एकदाचे गाठले . शिलाला सावध करण्याचा हर प्रकारे प्रयत्न जिवाच्या आकांताने तिने केला.  स्रियांना फसवून त्यांच्याशी खेळणे हा त्याचा स्वभाव आहे हे तिने हरप्रकारे सांगितले.  परंतु शीला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.  बदनामीच्या भीतीने ती कशी फसवली गेली हे ती शिलाला सांगू शकत नव्हती.  शीलाचा  विनाश तिला  समोर दिसत होता पण ती असहाय्य  होती.  शीला पूर्णपणे त्याच्या मोहजाळात अडकली होती,  त्याच्याविषयी एकही वाईट शब्द ऐकायला ती तयार नव्हती . ‘तो तसा नाही, ‘  माझ्यावर खूप प्रेम आहे त्याचे , तू काहीही बोलू नकोस ‘  अशा प्रकारे विविध गोष्टी शीलाने तिला सुनावल्या शीला मनात विचार  करत होती की ह्या  वयात,  दोन मोठी मुले असतानाही तो माझ्यावर फिदा आहे हे पाहून ती आपल्यावर जळत आहे.

आज ती खूप खुश होती , तो तिच्याशी भरभरून बोलला . वेळ काढून , काम बाजूला सारून तिला केंद्रस्थानी ठेवून तो बोलत होता .  तिने फोन  call log  चेक केला बरोबर 2 तास 20 मिनिटे बोलणे त्यादिवशी झाले .  त्याचे ऑफीस तिच्या बँके जवळ होते . गेले वर्षभर  दोघांची नजरांचे खेळ चालू होते . पण आजकाल  ती आरश्यासमोर उभी राहून व्यवस्थित साजश्रुंगार करून तयार होऊन बँकेत जाऊ लागली होती , त्याची  नजर रोज तिला दाद देत होती .  दिवस जात होते , अनामिक हुरहुर , ओढ वाढत होती .

एके दिवशी बँकेत तो दिसला . क्षणभर तिचे काळिंज थांबले, त्याने एक कटाक्ष टाकताच तिच्या ह्रुदयाचे ठोके वाढले .  काय होतय हे आपल्याला हे तिला समजत नव्हते . बँक मँनेजरांनी त्याची तिच्याशी ओळख करुन देऊन त्याच्या आवश्यक  कागदपत्रांची पूर्तता करून घेण्याची सूचना तिला दिली . फोन नंबर्सची अदलाबदल झाली ,सुंदर भावनिक  मेसेजेसचा बीप रोज तिच्या मोबाईल वर सकाळी सकाळी वाजू लागला . तो सकाळी पाचला उठो की नऊला , बेडवरुन पहिला मेसेज तिला जाऊ लागला . हळूहळू वार्तालाप वाढत गेला . त्याने तिला स्वतः साठी जगण्यास शिकविले . इतके वर्षे प्रेमाने काळजी घेणारा नवरा तिला कंटाळवाणा , बंधने लादणाऱ्या  जेलर प्रमाणे वाटू लागला , पतीला  ती टाळू लागली . “प्रेम “नावाचे सुंदर उदात्त वलय तिच्याभोवती त्यांने विणले  , ‘ पापपुण्याच्या ‘ कल्पना परीघाबाहेर ठेवण्यात तो यशस्वी झाला . सर्व बंधने तोडून नदी सागराला मिळाली .  कोण आपल्यालाला त्याच्यासोबत पाहिल , आपली बदनामी होईल ह्या गोष्टीची तिला पर्वा नव्हती . तो मात्र सतर्क , चाणाक्ष असायचा कारण तो ह्याबाबत अनुभवी होता,  ती नवखी होती . त्याची नजर तिच्यावर नसायची तर आजुबाजुला        आपल्याला कोण पाहत आहे का ? कोण ओळखीचे तर दिसत नाही ना?  हे बघण्यासाठी भिरभिरत असायची  . तिला वाटायचे तो आपल्या  काळजीने सतर्कता बाळगतो आहे,  पण तो तर स्वतःचा बचाव करत होता .  ती  त्याच्या सहवासात बेधुंद होऊन जायची .  आजूबाजूच्या गोष्टीचे भान ती  विसरून जायची .  या वयातही कोणीतरी आपल्याकडे आकर्षित होते आणि आपल्यावर भरभरून प्रेम करते या गोष्टीचे तिला खूप कौतुक वाटायचे . त्याच्या आवडीचे पदार्थ बनवून ती त्याच्यासाठी घेऊन जाईल आणि ते आवडीने त्याला खाताना पाहून तिचे मन तृप्त होत असे.  तो सगळं काही व्यवस्थित प्लान करत होता.  कोणत्याच ठिकाणी कोणतीच अडचण येऊ नये . आपण अडकू वा सापडू नये हे तो पाहत होता.  जगाच्या नजरेआड पूर्ण दिवस जगापासून दूर कामाचे निमित्त सांगून ते एकमेकांच्या सहवासात न्हाहून निघत   होते.  वेगळीच धुंदी तिला चढली होती . घरी , दारी , मुलं , नवरा यांच्यासोबत ती शरीराने असायची पण मनात व डोक्यात सतत तोच व त्याच्यासोबतचे बेधुंद क्षण.

थोडे दिवस सागराला भरतीच भरती होती पण निसर्गनियमाप्रमाणे भरती नंतर ओहोटी येणे क्रमप्राप्त होते .  हळूहळू प्रत्येक महिन्याला होणाऱ्या भेटी दोन , तीन , सहा महिन्यांवर आल्या . कॉलर रिंगटोन तीन तीन महिन्यांनी तिच्या कानावर पडू लागली . ‘ काय कटकट ? ‘ ‘ नाटक नको करूस ‘ ‘ अरे खूप बिज़ी असतो ‘ ‘ अरे तू समजूदार आहेस , ट्राय टूअंडरस्टँड ‘ असे संवाद सुरू झाले . तिचा मोहर ओसरला होता हे समजायाला तिला उशीर झाला. एक दिवस क्षुल्लक कारणावरून बिनसले आणि त्याने शेवटचा डाव टाकला , “ह्यापुढे मला मेसेज वा कॉल करु नकोस , everything finished . ” ह्या एका मेसेजने तो बंधमुक्त झाला . तिने त्याला खूप मेसेज केले , त्याने तिला ब्लॉक केले . हिम्मत एकवटून ती त्याच्याकडे प्रेमाची भीक मागण्यासाठी गेली . तो तिच्या चुका मोठ्या करण्यात सार्थकता मानत होता . ती अगतिक बनली होती , युद्धात सर्वस्व हरलेल्या पराक्रमी योध्यासारखी ती स्वत्व व सत्त्व हरवून बसली होती . अश्वत्थाम्याची भळभळती जखम तिच्या कपाळावर जन्मभरासाठी त्यांने कोरली होती .

शीला कामावर गैरहजर असली की त्या दिवशी तोही   गायब असायचा.  तिला दिवसभर शीला व त्याचा शृंगार दिसायचा.  डोके सून्न व्हायचे.  एके दिवशी तिने त्याला गाठले त्याला सवाल केला “का तू  असा माझ्याशी खेळलास ,  माझ्या भावनांचा चुराडा का केलास ? माझे शील का भ्रष्ट केलेस ?  तेव्हा तो म्हणाला” तू जास्त नाटक करु नकोस,  भावनाशील होऊ नकोस तुझ्या सारख्या कितीतरी बाया माझ्या जीवनात येऊन गेल्या आहेत.  थोडे दिवस आपण दोघांनी मजा केली ना ? तू ही आनंद उपभोगला ना ?आता सगळं विसरून जा .  जगाची रीत आहे त्यात काय एवढं मोठं ! सगळीकडे चालते शील ,  चरित्र वैगरे या गोष्टी   पुराणातल्या आहेत,  त्याला  कोण विचारत नाही.  आता तुझा व माझा मार्ग वेगळा आहे.  उगाच बोभाटा करशील तर बदनाम होशील , तुझा संसार उध्वस्त होईल”.

तिला स्वतःची कीव आली . स्वतःच्या असहाय्येबाबत आत्मा  हंबरडा  फोडत होता.  शरीर मलीनता ,  नष्ट झालेले चारित्र्य,  त्याचा नकार , फसवणूक,  पतीचा केलेला विश्वासघात ह्या नकारात्मक भावना घेऊन जगणे हीच फार मोठी शिक्षा आहे . आजारपण सेवा करणारा व काळजी घेणारा पती हा क्षणिक सुखासाठी हपापलेला नसून चिरंतन सुख दुःख साथ देणारा असतो हे सत्य जाणल्यावर तिची सद्सदविवेक बुध्दी तिला शांती लाभू देत नव्हती . बँकेत लाखोंचे व्यवहार न चुकता जुळवणारे आपण जीवनाच्या गणितात कसे फसलो , कसे भूललो , कसे शिकार ठरलो ? ? ? उसाच्या चिपडयाभोवती भिरभिरणार्या माशांप्रमाणे तिचे विचार तिला स्वस्थपणे राहू देत नव्हते . ‘ त्याचे आपल्यावर कधीच प्रेम नव्हते ‘ हे तिचे मन मान्यच करीत नव्हते .  तिचा अंतरात्मा तो परत येईल असे वारंवार सांगत होता . पण त्याने एकदाही ती जिवंत आहेत की जिवंतपणी मेली आहे हे मागे वळून पाहिले नाही .  त्याला फक्त तिचे सुंदर कामनीय शरीर दिसले पण त्या हाडामांसाच्या गोळयातील मांसल ह्रुदय , कोमल भावना नाही दिसल्या ह्याची खंत तिला सतावत होती . असे रोज  कुरतडत जगण्यापेक्षा एकदाचा तिने अंतिम  निर्णय घेतला , ह्या नश्वर शरीराला मुक्ती देण्याचा , पापाचे हेच एक एकमेव प्रायश्चित होते . कोणाला ही आपले गुपित न सांगता ती शाश्वत प्रवासाला एकटीच निघाली,  हातात एक चिटोर होते “माझा आत्मा हा माझा एकमेव शत्रू आहे . मी कोणासही दोष देत नाही ” एक पूर्णविराम . . . . . की एक प्रश्नचिन्ह ? ? ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here