
Marathi Kavita – Ek Diwas – एक दिवस
कवयित्री – आरती योगेश ढोरे
एक तरी दिवस यावा, मनाप्रमाणे जगण्याचा
तोडून सारी बंधने, बिनधास्त वागण्याचा II
एक तरी दिवस यावा, लागावी झोप शांत
प्रसन्न व्हावी सकाळ, कसलीच नसावी भ्रांत II
एक तरी दिवस यावा, उगाचच व्हावा आनंद
मनात दरवळावा, ओल्या मातीचा गंध II
एक तरी दिवस यावा, उद्याची काळजी नसावी
राग, द्वेष वैर भावना सारी संपून जावी II
एक दिवस तरी भूतकाळ विसरावा
हुरहूर लावणारा भविष्यकाळही नसावा II
एक दिवस तरी वाटावा स्वतःचाच गर्व
लख्ख उजळून निघावे, आयुष्याचे पर्व II
एक दिवस समजावा, जगण्याचा अर्थ
कधीतरी पाहवा की, स्वतःचाही स्वार्थ II
एक तरी दिवस, भयमुक्त व्हावे
एक तरी दिवस, पोट भरून हसावे II
एक दिवस कळावी, स्वतःचीही चूक
निस्वार्थीपणे व्हावी, नात्यांची जपणूक II
एक तरी दिवस यावा, मनसोक्त करावा खर्च
असावी भविष्याची तरतूद, नसावी चिंता व्यर्थ II
एक तरी दिवस, आयुष्याची चांदी व्हावी
नशीब की काय म्हणतात त्याने, एकदा तरी साथ द्यावी II
एक तरी दिवस, नसावे अपेक्षांचे ओझे
थोडे तरी क्षण असावेत, माझे आणि फक्त माझे II
मरण्याआधी तुझ्याकडे एकाच मागणे देवा
जगावंसं वाटणारा एक तरी दिवस यावा
जगावंसं वाटणारा एक तरी दिवस यावा II
Auto Amazon Links: No products found.








