Pahila Paus – पहिला पाऊस…

0
41695

Pahila Paus – पहिला पाऊस…

marathi-article-pahila-paus

रखरखत्या उन्हाच्या झळांनी लाही-लाही झालेल्या जीवांना गारव्याची अनुभूती देत असते. जसं- जसे एप्रिल-मे महिन्याचे दिवस संपत येतात. तस-तसा तापमानाचा पारा वाढतच चाललेला असतो… हे तापमान शरीराला असहाय्य करून सोडत असते. कधी एकदा पावसाच्या सरी या पृथ्वीतलावर कोसळतात आणि या हवामानामध्ये थंडावा, गारव्यातील नाजूकता पसरते असंच झालेलं असतं… अशावेळी कमी दाबाचा पट्टा… मोसमी वारे… काही दिवसातच केरळमध्ये पावसाचे आगमन… अशा बातम्या वृत्तपत्र, टेलिव्हिजन वर झळकू लागतात. हवामान खात्याचा अंदाज हा चुकलेलाच अंदाज असतो… पाऊस कधीही येवो परंतु अशा बातम्यांनी मात्र जीवाला सुखद गारवा जरूर जाणवू लागतो.

आकाशाला काळ्या ढगांनी गवसणी घातलेली असते… हवेतील गारवा जाणवू लागलेला असतो… आज येईल उद्या येईल असं म्हणता – म्हणता तोही लपाछपि खेळत असतो आणि एकेदिवशी आपण बेसावध असतानाच नकळत तो भूतलावर थयथयाट करत कोसळू लागतो. मग मात्र सगळ्यांचीच पळापळ सुरु होते. बेसावध असताना नकळत कोसळणाऱ्या सरी मनांची चांगलीच तारांबळ उडवून टाकतात. कामाच्या रगाड्यात गुंग असलेल्या खुल्या डोळ्यांमधून पावसाचं अस्तित्व निरखू लागतं. कुणी वाळत घातलेले कपडे गोळा करण्यात गुंग असतात… कुणी दुकानाच्या बाहेर ठेवलेल्या चीजवस्तू आत घेण्यासाठी धावपळ करत असतात… कुणी लहान मुलांप्रमाणे पावसाशी खेळत असतात… कुणी रस्त्यावर दुथडी भरून वाहणाऱ्या प्रवाहात नाचताना बालपणातील दिवस जागवत असतात… काही ठिकाणी रस्त्यावरील गटारे, नाले तुंबल्याने वस्त्या- वस्त्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्याने संबधित व्यवस्थापनेच्या नावाने बोट मोडत स्वत:च पाण्याला वाट करून देत असतात… कोणी छत्र्या, तर कोणी रेनकोट शोधत असतो… कुणी घराच्या छपरातून घरात ठिबकणाऱ्या पाण्याला थांबवण्यात व्यस्त असतो… तर कुणी दुरूनच पहिल्या पावसाच्या आठवणी जाग्या करीत असतात… प्रत्येकजण मिळेल ती संधी साधून पावसाशी आपलं भावनिक नातं जोडत असतो आणि त्या पावसात एकरूप होवून आनंद लुटत असतो.

पावसाच्या आगमनाचा गोडवाही काही वेगळाच असतो… एक प्रेमी युवक आपल्या प्रेमिकेची आतुरतेने वाट बघत असतो… तिच्या मुलायम स्पर्शाला आतुरलेला असतो आणि नेमक्या अशावेळीच तिला यायला उशीर होतो… तेव्हा त्याची होणारी चिडचिड असाय्य करून सोडणारी असते. त्याचप्रमाणे या तीव्र उन्हाच्या वेळी पावसाच्या सरींचा स्पर्श प्रत्येकालाच हवासा असतो, प्रत्येकजण आकाशाकडे नजर लावून असतात. मग तो शेतकरी असो किंवा नोकरदार असो. एवढेच नाही तर पक्षी, प्राणी यांनाही हा पावसाळा खुणावत असतो. पहिला पाऊस कधीच एकटा येत नसतो जशी ती त्याला भेटायला येताना आपल्या एक-दोन मैत्रिणींना या भेटीची कल्पना देवून किंवा सोबत घेवून येत असते आणि नियोजित स्थळी पोहचल्यावर त्या मैत्रणी नकळत मागच्या पावलांनी परत जात असतात, अगदी तसंच सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट घेऊन पहिला पाऊस आपल्या भेटीला येत असतो. जशी ती मैत्रण आपल्या मित्रासोबत गप्पा-टप्पा मारण्यात गुंतलेली, एकरूप झालेली असते तसाच सोसाट्याचा वारा आणि विजेंच्या कडकडाट्याला सोडून आपल्यासोबत तो धो-धो कोसळत असतो. तिच्यातील लाजरेपणा हुबेहूब या पावसामध्येही जाणवत असतो.

पहिल्या पावसामध्ये ओल्या मातीला येणारा गंध वातावरणामध्ये प्रसन्नता पसरवत असतो. या हंगामात नदी, नाल्यांना पाण्याचा रंग पिवळा होतो, रस्ते चिखलात लोळून जातात, पाऊसाचे पाणी भेटेल तो मार्ग शोधत रस्त्यावरही वाहत असते. लहान मुले पेपरच्या होड्या तयार करून पाण्याच्या प्रवाहासोबत सोडत असतात, एकमेकांना भिजवत पहिल्या पावसाचा आनंद लुटत असतात. या लहांनासोबत मोठेही लहान होवून त्यांचा आनंद व्दिगुणीत करत असतात. सगळ कस क्षणात घडलेलं असत. पहिल्या पावसाची पहिली आठवण मनात अगदी अलगद जागी झाली आणि डोळ्यांसमोर पडदा होऊन हळुवारपणे तरळून आली. खरंच किती छान होते ते बालपणातील दिवस असं नकळत मनात रेंगाळत राहील… चहा किंवा कॉफीचे घोट घेताना गरमागरम कांदा भजी किंवा बटाटा वाड्याची आठवण हमखास येते. रस्त्यावरून फेरफटका मारताना भाजलेल्या मक्याचं कणीस, उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगा खात-खात पवसाच्या सरी अंगावर झेलायला काही वेगळीच मजा असते. अश्या या पावसाची प्रसन्नता, ओलावा सगळ्यांनीच अनुभवायला हवी त्याला वयाचे बंधन नसावे.

 

भरत माळकर – मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here