Marathi Story – दैवानं दिलं , पण कर्मानं नेलं

2
2278

Marathi Story – दैवानं  दिलं , पण  कर्मानं नेलं

Marathi Story

संसाराच्या जोखडाखाली जो  जखडला जातो त्याला उसना आव आणता  येत नाही ; तसं दिन्याचं  झालं होतं . यंदा  एस.टी . मध्ये कंडक्टर म्हणून तो नोकरीला लागला होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर   डेपोत त्याला नोकरी मिळाली होती.  किमान दोन वर्ष तरी परजिल्ह्यात काढायचे होते नंतर “यथावकाश बदली होणार” असं आश्वासन  नोकरी लावणाऱ्या एजंट ने त्याला दिलं होतं. त्याच्या नोकरीसाठी  परिवहन मंत्र्याचा वशिला असल्याची चर्चा गावभर झाली होती. भावकीतल्या लोकांच्या नाकावर टिच्चून दिन्याला  त्याची पत जाऊ द्यायची नव्हती ; म्हणून  सावकाराकडून कर्ज घेऊन पाण्यासारखा पैसा खर्च करून  त्याने  ही नोकरी मिळवली  होती. त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.

शिक्षण- १२ वी (काठावर पास) , वय वर्षे २९ , ३ बिघा कोरडवाहू जमीन , ही  दिन्याची जमेची बाजू. तर  बहिणीच्या लग्नाचे लाखभर कर्ज , बापाचे आजारपण , सतत दोन वर्षाचा दुष्काळ , शिवाय दिन्या   घरात एकुलता एक; म्हणून त्याच्या आईला तिचे डोळे मिटायच्या आधी   सूनेचं तोंड बघायची घाई झाल्याने   ६  वर्षापूर्वीच दिन्याच  लगीन झालं होतं. त्यानेही वर्षाला १ या दराने घराचं गोकुळ कधीच पूर्ण करून  आईचे पांग फेडले होते . घरात खाणारी तोंडे ७ ,..कमावता एकटा दिन्या त्यामुळे ………. वाढत जाणारी खर्चाची बाजू दिन्याचा ताळेबंद कधी जुळू देत  नव्हती  . अशा कठीण प्रसंगी  कंडक्टर म्हणून नोकरी मिळते आहे हे नशीब!  असा   हा बलवत्तर  नशिबाचा  दिन्या !

आज  तांब्यात कोळसा टाकून  कपडे इस्त्री  करायच्या तयारीला लागला होता. त्याच्या हाताला कमालीचा  वेग आला होता .कारण  उद्या त्याला संगमेश्वरला नोकरीला हजर होण्यासाठी जायचे होते , काही दिवसातच घरातील दारिद्र्याचा अंधार मिटवून उजेडाचे स्वप्न प्रत्यक्ष साकार होणार होते . म्हणून त्याची आज लगबग सुरु होती.

त्याच्या आईला  ३  नातवांचं  आवरता आवरता जगण्याचं बळ  आलं  आहे ; तिला डोळे मिटायला अजूनही  फुरसत  मिळाली नाही . तीही दिन्याला  काय हवं  काय नको ते पाहत होती. दिन्याची बायको – सुमन कडेवर तान्ह लेकरू घेऊन  दिन्याच्या हालचालींवर  बारकाईने लक्ष ठेवत  सासूला मदत करायला धावते आहे किंवा तसं भासवते आहे . आढ्याला बांधलेल्या  झोळीत एक पोर निपचित झोपलं आहे, दुसरं ओट्यावर रांगता रांगता शेजारच्या शोभाक्काच्या  मांडीवर जाऊन बसलं आहे. ओसरीत दिन्याचा  बाप  ( नाना  ) खोकत खोकत  घरातला सुखसोहळा निश्चल डोळ्यांनी पाहतो आहे . “पोराचं भलं  होवो”- असा मूक आशीर्वाद बापाच्या डोळ्यातून ओसंडतो आहे : तर घरात –   “संमेश्वारा, माझ्या लेकाला सांभाळ रे बाबा , कधी घर सोडून कुठं  गेला नाय…   आता कुठे राहणार ,  काय खाणार , कंडक्टर होतुया  खरा; पण   पर्वासी कसं असतील , देव जाणो ?  …. गाडीत कोणाशी हुज्जत घालू नको  बर सोन्याsss  , तब्येतीची काळजी घे ……….” असं बरचसं  दिन्याच्या आईचं काळीज पिळवटून बोलणं सुरु आहे  .

तेवढ्यात दिन्याचा  मित्र संभाने अंगणातून हाक दिली , – “ये     दिन्या, आरं  झालं की नाय ? चल, ये की लवकर  बाहीर !….” “ आलो ! आलो !!” म्हणत दिन्या बाहेर आला . दोघांचे काहीतरी बोलणे झाल्यावर दिन्या घरात येऊन सुमनला लाडाने  म्हटला – “ अये सुमे , मी   काय  म्हणतो ,  कापडाला इस्तरी करायची राह्यलीहे ,तेवढी करती का ?”            “ आवं  …. आत्ता … तुम्ही कुठं  निघला, आन कशाला ? ” सुमन लटक्या रागात बोलली.                         “ अग ,उद्याच्याला मी पहाटेच्या गाडीनं संमेश्वरला  जाणार! मग , समद्या मित्रास्नी भेटायला नग  का ? … म्हून    जरा मित्रांसोबत जाऊन येतो ,…..अन तू सर्व  आवरून ठिव बरका !”                         सुमन –     “ आत्ताच कशाले    मित्र  नि कुत्र करतायसा  ?…. तुमचं बी ना भलतच काहीतरी असतं  !….. म्हणे, मित्रास्नी भेटून यितो!…… माह्या मनाचा काही इचार हाये की नाय …. मी मरमर मारायचं नि तुम्ही मित्रास्नी घेऊन गावभर  फिरायचं ….. सुखाचं जगणं कव्हा येईल ते येवो माझ्या वाट्याला .. …माझं नशीबच फुटकं मेलं ..उद्याच्याला तुमी जाणार म्हून मले काळजी वाटू राह्यली ……….. रडू येईल की काय असं होतंय………..   आन चालले मित्रास्नी भेटायला ………….ते म्हणतात ना ………………. “घरनास्न  दूख लागे नि परक्यास्न सुख लागे ……..” असं बरच काही  तार सुरात  सुमन बोलत होती  .

आपल्या बापाच्या नजरेतला सोशिक भाव वाढू  नये ,त्याची   आजारपणात आबाळ होऊ नये, आपल्याशिवाय म्हाताऱ्या आईबाबांना सांभाळणारे कोणी नाही याची जाणीव दिन्याला आहे , आईची ममता दिन्याला दुर्लक्षित  करायची नव्हती म्हणून सुमनला सोबत न नेता दोन वर्षासाठी दिन्याला संगमेश्वरला  जायचे आहे , पण दिन्याचा हा निर्णय सुमनला मान्य नाही .    सुमनचा बोलण्याचा अंदाज दिन्याला आला तसा तो तिला समजावत   म्हटला – “ अग सुमा , तुला जसं वाटतय तसं  मलेबी वाटतया  , पण सांगायचं    कुणाला  ? माझी  लाडाची बाय ना  तू , अग   ही नौकरी आसल तर आपली आब हाय नायतर कुत्र्याच्यावानी हालत हुईल आपली,….काही दिसाची तर बात हाये ,  दोन वर्षांनी घेऊ  आपल्या तालुक्याला बदली करून, मग तू राणी नि मी राजा ….हाय की नाय  ………” सुमनने नाक मुरडत नाराजी व्यक्त केली . हातातलं भांडं आदळत चुलीजवळ  कुरकुरत बसली . दिन्याने सुमनचा नूर ओळखून अधिक काही न बोलता  घरातून काढता पाय घेतला.

मारुतीच्या देवळाजवळ संभ्या ,राज्या , नाम्या  आणि  निम्ब्या  दिन्याची  वाट पाहत  उभे  होते  .  दिन्याला पाहताच संभ्या म्हणला – “ आरं  , किती उशीर लेका.?   मर्दासारखा मर्द गडी नि बायकोला  भितू ?  गड्या दिन्या,  तुजं काही खरं नाय बघ……. !  तू शेणाचा गोळा झालायं शेणाचा …….”  संभ्याचा बोलण्याचा धागा पकडत नाम्याही बोलला – “ दिन्याला ना  रगच उरली  नाय रे , तो नुस्ता होयबा बनला हाय …………तेवढ्यात राज्यानेही तोंड खुपसत टुमण लावलं – आरं, पण त्यासाठी  बायकू कशी ताब्यात असली पाहिजे  , आपला दिन्याचं उलट आहे तो – बायकोच्या ताब्यात हाय………” मित्रांच्या अशा टपल्या दिन्याला नवीन नव्हत्या .त्याने नेहमीप्रमाणे सणसणीत शिवी हासडली –“ अरे,  रांडीच्याहो , तुम्ही   दगड बनता , मला नाही ना जमत !”

आणि बोलता बोलता सर्व जण   नेहमीच्या ढाब्यावर येऊन बसले. दोन बाईकवर पाचजण आले होते . दिन्या उद्या संगमेश्वरला जाणार . दोन वर्ष  आपल्याला भेटता येणार नाही म्हणून सगळ्या मित्रांनी आज दिन्याला निरोप देण्यासाठी पार्टीचे आयोजन केले होते .  गावापासून ५ की.मी. अंतरावर सोनगीर फाट्यावर नेहमीच्या बाकावर सर्व  जाऊन बसले.   फुल  एन्जॉय  करायचा असं  सर्वांचं एकमत झालेलं  होतं.  रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरु राहिली. प्रत्येकाने आपापली हद्द ओलांडत  रात्रीचे दोन वाजवले  .  एकमेकांना सावरत कसेबसे बाईक जवळ येऊन थांबले . प्रत्येकाच्या डोळ्यांवर नशेचा तगर तरंगत होता तशा अवस्थेत बाईक सुरु झाल्या . गावाच्या दिशेने सुसाट धावत निघाल्या. आणि ………… तेवढ्याच वायुवेगात एका अवाढव्य कंटेनरच्या चौदा चाकांखाली पाचही मित्रांनी एकमेकांचा अखेरचा निरोप घेतला.

          आजही दिन्याच्या बापाच्या अधू डोळ्यांना दिन्या कंडक्टरच्या वेशात गावातल्या एसटीत तिकिटे देतांनाचे स्वप्न पाहण्याचं भाग्य वाट्याला आलं  नाही, दिन्याच्या आईला संगमेश्वरचे दर्शन घेता आले नाही .दिन्याची  बायको मनाला सावरत  तीन अजाण  लेकरांना  घेऊन उन वार्यात राजा राणीचा खेळ माडु पाहते आहे पण राजाच हरवला आहे , त्याला तिने कुठे शोधावं ??????

————————————————————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here