Marathi Story – Vitthal Rakhumai – शिवना तीरावरची माझी खरीखुरी विठ्ठल-रखुमाई..!
सायंकाळच्या वेळी अलीकडे काही दिवस थंडी वाजायला लागली आहे,सुर्य अस्ताला गेला की दिवे लावणीची वेळ होते अन् घरातील माझी आज्यारुपी माऊली देऊळाच्या दिशेनं देऊळात दिवा लावायला म्हणून काठी टेकीत-टेकीत निघाली होती.घरातील जुन्या आज्या अस्ताला जाणाऱ्या त्या सूर्याकडे बघत काहीतरी स्वतःशीच पुटपुटत अन सूर्य नारायणाला नमस्कार करून तुळशी वृंदावनाची पाय पडत तीन प्रदक्षिणा घालून आत घरात येत असे …
असं काहीसं माझ्या आईची आई माझी झुंबरा आजी पण करायची,जी आम्हाला दोन महिन्यांपुर्वी सोडुन देवा घरी गेली.त्या आजीला कधी नको देव की नको कधी कुणी,नको हरिपाठ तिनं तिचं उभे आयुष्य काम करण्यातच घातलं.स्वभावानेही तितकीच कडक अन् राहणंही एकदम टापटीप होतं तिचं…
असो तर सायंकाळची झालेली वेळ होती,मी खूप दिवसांच्या उपर गावाला आलो होतो अन् आता हातपाय धुवुन अंगणात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या पारावर बसलेलो होतो.
एरवी मंदिरातली,घरातली दिवाबत्ती झालेली होती,रानातुन येणारी माणसं कुणी डोक्यावर चारा,कड्यावर घेतलेलं ते तान्हुलं,काठी टेकवत टेकवत येणारं म्हातारं,बैलगाडी,बकऱ्या,दुधाची क्याटली हातात घेऊन येणारे ढवळे कपडे घातलेले संतू आण्णा हे सायंकाळचे गावातले रानातून गावात परतीच्या वाटेनं घराकडे येणारी मंडळी बघितली की गावाला गावपण आल्यासारखे वाटते गावात सायंकाळी…
आईने चुलीवर ठेवलेला तो काळा चहा,घरभर पसरलेला त्याचा सुगंध गायीचं,बकरीचं दुध काढायची चाललेली गरबड. गाई,बकर्यांच्या पिल्लाची आईच्या सडाला ढुसण्या देत दूध पिण्याची गरबड.या सर्वात पुढे असणारे घरातले प्रमुख माझे आजोबा ढोरांना चारापाणी करून त्यांची देऊळात जाण्याची चाललेली तयारी,हे मी बघत होतो अन् माझ्या बालपणीच्या आठवणीत रममाण होतो..!
मला वेळ असला की मी पण बाबांच्या समवेत जाऊन बसत असतो,मनात विचार आला अन् निघालो देऊळात येणाऱ्या आजी,बाबा यांच्यामध्ये हरिपाठ म्हणायला.सर्व म्हातारे बापमाणसं असो किंवा माझ्या आजीसारख्या असलेल्या म्हाताऱ्या सर्वच सावत्या माळ्याच्या देऊळात जमले होते.
मग हरिपाठ सुरू झाला,भजन,गवळणी,अभंग झाले,थंडी वाढल्यामुळं सर्व आजोबा अंगावर फडकी,डोक्यात फेटा,गळ्याला मफलर गुंडाळून बसलेले होते,आज्या अंगावर फडकी,डोक्याला कानपट्टी बांधून टाळ्या वाजीत बसलेल्या होत्या..!
हरिपाठ,भजन,अभंग,गवळणी झाल्या अन् मग त्यांच्या गप्पा रंगल्या.बोलण्यात दोनच विषय होते शेतातले कामं अन आषाढ कार्तिकी वारीचं त्यांना लागलेलं वेध.कारण त्यांनी उभं आयुष्य शेतात कष्ट अन् वेळ भेटला की विठु माऊलीची भक्ती यासाठीच वाहिलेले होते. मी ही त्यांच्या गप्पा ऐकत आता पारावर बसलेलो होतो,या माझ्या आजोबां,आज्जीसारख्या माणसात मला माझी विठुमाऊली अन रखुमाई दिसत होती.
त्यावेळी माझ्या मनात विचार येऊन गेला की,आपली खरी विठ्ठल-रखुमाई म्हणजे या आज्जी अन् हे आजोबा मंडळी हेच होती.मग मला काय गरज चंद्रभागेतीरावर जायची,माझ्या शिवनामायच्या तीरावर जेव्हा हे माझी माणसे मला भेटली होती,ज्यांनी उभे आयुष्य विठ्ठल-रखुमाई यांच्या प्रामाणिक भक्तीत घालवले होते…
मग हे ही खरं असावं की माझी विठ्ठल-रखुमाई माझी माऊलीच मला यांच्या रूपात शिवनातीरी रोज भेटायला येत असावी.फक्त ती मला आजवर ओळखता यायला हवी होती,जी मी आज या प्रत्येक आजोबा,आज्जीमध्ये शोधत होतो..!
माझं हे असं विचार करणं चालू होतं,सगळ्यांच्या गप्पा आवरल्या होत्या,वाहत्या पाण्याच्या गारठ्यानं आता थंडी वाढली होती अन् माझी ही माऊली आता घराच्या दिशेनं पायी काठी टेकीत-टेकीत निघाली होती..!
तीन-चार महीने झाले की येतो मी शहराच्या माझ्या नोकरीच्या गावावरून या माझ्या माउलींना भेटायला.जिथं मी जरी कीतीही उंचीवर असलो तरी माझे पाय या जमिनीशी जोडलेले असतात. अन् माझा माथा या माझ्या माऊलींच्या पायाशी मी त्यांचा चरणस्पर्श करण्यासाठी टेकविलेला असतो…
मग मला वाटते की मला हा सहवास असाच आयुष्यभर घडत राहो,कारण इथं माझ्यातला मी मला नव्यानं भेटत असतो प्रत्येकवेळी.अश्यावेळी आज देवाला एकच मागणी करेल यावेळी की,देवा अशी गावगावातील म्हातारी माणसं,माझी माऊली प्रत्येक गावात अशीच सुखात राहु दे.त्यांना सतत असच तुझं दर्शन देत रहा,तुझी छाया कायम त्यांच्यावर असु दे..!
कारण आज मी त्यांना भेटलो,त्यांच्या सोबतीने तुझे नामस्मरण केले,माहीत नाही पुढील भेट कधी होईल माझ्या या गावातल्या माऊलींची.तो नदी पलिकडचा स्मशान जो आहेना मात्र रोज त्यांची वाट पाहत असतो,कधी तो माझ्या माऊलीला घेऊन जाईल सांगता येणार नाही,तर तु मात्र त्यांची काळची घे,तो स्मशान त्याचं काम करणार तु तुझं कर देवा..!
एखाद्या माझ्या माऊलीच्या जाण्याने वाईट काही होणार नाही परंतु एकच वाईट वाटत राहील की,मी कायमचा मुकेल माझ्या देवाला त्या एका माझ्या माऊलीला बघायला जीला यावेळेला भेटलो होतो.म्हणून काळजी घे यांच्यामुळेच गावाला गावपण अन गावातील देवळाला देवपण आलंय देवा..!
नाव- भारत लक्ष्मण सोनवणे.
पत्ता- शरद पवार कॉलनी,कन्नड
पिन नंबर:४३११०३.
ता:कन्नड, जि:औरंगाबाद
संपर्क ९३०७९१८३९३,९०७५३१५९६०.(व्हॉटसअप)