Marathi Kavita – Paratalyavar – परतल्यावर
कवयित्री – डॉ. शुभदा गद्रे
त्याला देतांना निरोप होती घातलेली अट
हात रिकामे घेऊन नाही यायचे परत
खूप झाला धनवंत मनी ठरवले त्याने
घरी परत जातांना, भरु पेटारे धनाने
सारे राहिले मनात, काही नाही नेता आले
गेल्यामुळे रिक्तहस्ते, दार नाही उघडले
सत्ता कमावली त्याने आल्यावर परतून
आता जातांना माघारी, नेऊ म्हणे सिंहासन
ठोठाविता दारावरी येई त्याला अवधान
होते रिकामेच हात, गेले कोठे सिंहासन ?
खुपखूप रागावुनी त्याने ठरविले मनी
जर रिकामे जायाचे, घ्यावे इथेच भोगुनी
खूप घेऊन उपभोग गेला रिकाम्याच हाती
होते ठाऊक मनाला आहे यायचे मागुती
चुकूनच केव्हातरी, कुणा काहीसेसे दिले
याचकाच्या आसुंतून त्याचे हसणे पाहिले
पुन्हापुन्हा पहावेसे वाटू लागले ते हसे
सदा देत रहाण्याचे मग लागले ते पिसे
दधिचीच्या हाडांपरी दिले सारे उधळोनी
आता माघारी जातांना वेध परतीचे मनी
यावे पुन्हा परतोनी पुन्हा पुसायाला आसू
म्लान मुखांवरी पुन्हा, फुलवाया गोड हसू
मातापित्याने स्वागत केले मिठीत घेऊन
आला परतोनी बाळ खूप काहीसे घेऊन
भांबावूनी मग त्याने सभोवती निरखिले
किती निश्वास तृप्तिचे होते सोबतीने आले
डॉ. शुभदा गद्रे
[…] http://marathiboli.in/marathi-kavita-74/ […]
कवयित्रीने दानाची महती सुंदर रंगवली आहे.
परत यावे लागेल, ही कविता वाचायला
VERY WELL SAID! खूप आवडली ही कविता.
खूपच छान! शेवटच्या दोन ओळी तर फारच सुंदर.
Brings closure to all desires dreams ambitions to reality.