पाणी पाणी रे – Marathi Kavita

5
1183
Marathi Kavita – Pani Pani Re – पाणी पाणी रे

Marathi Kavita – Pani Pani Re – पाणी पाणी रे

कवयित्री- डॉ. शुभदा गद्रे

ऐकत आला आहात तुम्ही, गोष्ट राजाराण्यांची
ध्यान देऊन ऐका आता, गोष्ट आज ही पाण्याची
जी जी रे जी

दुष्काळी पट्ट्य़ातील गाव, कोरडवाहू जमिनीचं
विहिरी, ओढे, पडती कोरडे, पाणी पळवी तोंडाचं
पाण्यावरुनी सतत बखेडे, शांती नांदे ना गावात
पाणी पाणी करीत फिरती, पाणी जोखती दुसर्‍याचं.
जी जी रे जी

माझं पाणी वेगळंच काही, तुझ्यात काही पाणी नसे
साधुसंत मी, भांडखोर तू, प्रत्‍येकाला वाटतसे
बघताबघता पाणी पेटले, झाली दुष्कीर्ती गावाची
सुना मिळेना गावाला नि लग्ने न जुळती लेकींची
जी जी रे जी

बुजुर्ग काही होते अजुनी, भांडखोर त्या गावात
पाणी काही वेगळेच त्यांचे, त्यांनी केली सुरुवात
“पाणी आटले विहिरींचे हो, हाच आपला प्रश्न असे
एकमेका पाणी पाजून, भांडून उत्तर मिळत नसे”
जी जी रे जी

“शेजार्‍याला पाण्यात पाहता, तंडत बसता घडोघडी
पूर्वकीर्तिवर पाणी फिरविता, विवेक हाकलूनी देशोधडी
पाणी कापले तलवारीने तरी, सांगा वेगळे होईल का?
पाण्यात राहून माशांशी वैर, सांगा तुम्हा शोभे का?”
जी जी रे जी

“गाव आपुले दिमाखदार, पाणीदार लोकांचं
लाथ मारीन तिथे पाणी काढीन, अशा कर्तृत्ववान वीरांचं.
प्रयोग झाले देशामध्ये, जलसंवर्धन करण्‍याचे
आव्हान आहे आता तुम्हाला, प्रतिभगीरथ होण्याचे.”
जी जी रे जी

त्या गावाने हिंमत धरली, पाणी साठवले पावसाळी
पाणी हसले, जीवन फुलले, वैर गाडले पाताळी
ऐकत आला आहात तुम्ही गोष्ट राजाराण्यांची
भगीरथांनी गंगा आणली, गोष्ट खरी ही पाण्याची”
जी जी रे जी

• डॉ. शुभदा गद्रे

5 COMMENTS

  1. आजच्या परिस्थितीतील पाण्याचे महत्व असाधारण आहे.

  2. पाण्याचे किती वेगवेगळे अर्थ सुरेख वापरले आहेत. मस्त.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here