Marathi Kavita – शब्द !!!

0
4444

Marathi Kavita – शब्द !!!

शब्द !!!

शब्द कळतात मला, आणि म्हणूनच छळतात मला

म्हणजे, त्रास नाही हा देत, मनात घोटाळत राहतात

कधी एकदाचे, मनाच्या कोऱ्या  पाटीवरून, अलगद उतरून

एक अर्थपूर्ण गोफ गुंफतात , असे होवून जाते

कधी ,कधी अगदीच निरर्थक पणे

बाहेर पडायला धडपडत असतात

सांगितले तरी ऐकतच नाहीत

मग काय, वायफळ गप्पा होतात

त्यांचाशी माझ्या, अगदी शिळोप्याच्या

कधी कधी, हवे असतात न

चपखल बसणारे शब्द, तेव्हा मात्र

दडी मारून बसतात, जणू

लपाछपिचा  खेळ खेळतात

कधी कधी न असे वाटते कि रुसून बसलेत

काही काही शब्द,

काय करणार बिचारे, आपण सतत

दुसऱ्या भाषेच्या प्रेमात, आणि

ते जणू पोटमाळ्यावर अडगळीत किंवा

वृद्धाश्रमात, जर्जर आणि जुने झालेत म्हणून

काही काही शब्द मात्र खुश आहेत अगदी

कारण अजून तरी, आपण तेच वापरतो न बोलताना

उसन्या भाषेतले प्रतिशब्द नाहीयेत अजून त्यांना

म्हणून टिकले आहेत बापडे अजूनही

पण खर सांगू, अजूनही पावसाला  आपण विशेषण देताना

जो पर्यंत रिमझिम, मुसळधार म्हणतो

विजेचा कडकडाट  आणि ढगांचा गडगडाट आहे

जो पर्यंत, आभाळ आणि आकाश, मेघ आणि ढग

काळोख आणि अंधार, प्रज्ञा आणि बुद्धी

यातलि फरकाची  सूक्ष्म किनार आपल्याला

कळत आहे न , तो पर्यंत तरी

मला या शब्दांची काळजी नाही

किती छळले  न त्यांनी मला

तरी मला हवच आहे ते

ते जगले तर माझी भाषा जगेल

माझी भाषा जगेल तरच

माझा श्वास टिकेल,

कारण तरच माझे मन

माझ्याशी बोलेल

माझे शब्द जगातील तरच मी जगेन

 आई शिवाय माझे अस्तित्व नाही

मग मातृभाषे, शिवाय तरी ते कसे उरेल?

शब्द कळतात मला, आणि म्हणूनच छळतात मला

मी त्यांना जवळ केलय आणि त्यांनी मला केलय

त्यांची उपेक्षा कधी खरच थांबेल का ?

मायेची पाखर कुणीतरी आपल्यावर धरावी

म्हणून त्यांची असणारी हि प्रतीक्षा कधी तरी संपेल का ?

marathi-kavita-marathiboli

-©शीतल जोशी

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here