लेखिका – भारती चंद्रकांत वंदे
संपर्क – bvande611@gmail.com
ऋणानुबंधाच्या पलकडले – Marathi Katha Runanubandhachya Palikadale
यशोदामाई, जवळपास वयाची पन्नाशी उलटलेल्या रानात म्हणजे शेतात राहायच्या. रानात यासाठी बोलले कारण त्यांचे शेत हे दोन्ही बाजूनी डोंगरांनी वेढलेले होते. असे वाटायचे जणू निसर्ग देवतेने आपल्या दोन हातांच्या ओंजळीत अलगद जपून ठेवले आहे. जोपर्यंत डोंगरावर चढून कोणी बघत नाही तोपर्यंत ते दृष्टीस पडत नसे. या डोंगरांवर खूप मोठ्ठाले दगड पसरले होते. या दगडी डोंगरांना स्थानिक लोक बरड म्हणत. या बरडावर हिवर, बोर, बाभूळ, कडुनिंब, काटबोर अशी जंगली झाडे होती. काटबोरीचे झुडपे खूप विचित्र आकारात वाढलेली होती त्यामुळे भयानक वाटायची. जमिनीवर पसरलेली असल्यामुळे त्यात कुणी, एखादे जनावर लपून सहज रहात असे. या झुडपांमधूनच सीताफळाची झाडे खूप वाढली होती. चार-पाच आंब्याची झाडेही होती. रानात रानडुक्कर, ससे, कोल्हे, लांडगे, तडस, इत्यादी जनावरे होती आणि निरनिराळे पक्षी ही होते. साप-विंचू ह्यांचे प्रमाण खूप होते.
या बरडावर सायंकाळी पाच नंतर कुणीही मनुष्य फिरकत नसे. कुणी म्हणायचे बरडावर चकवा आहे, कुणी म्हणायचे भूतं आहे. आसपासच्या गावकऱ्यांना हे रान भयानक वाटायचे. अश्या या रानात यशोदामाई राहायच्या. त्यांचे पाच-सात एकर शेत होते. शेतात मोठी विहीर होती. संत्र्याचा बगीचा होता. शेतात त्या एकट्याच राहायच्या. सोबतीला दोन कुत्रे होते. एक शेरू आणि झब्बू. चार-पाच गाय-म्हशी, बैलजोडी होती. त्यांचे करायला माणूस होता पण तो सकाळी यायचा आणि संध्याकाळी चालला जायचा. शेतात काम असेल तरच मजुर यायचे. यशोदामाई रानात राहायच्या ह्याचे आस-पासच्या गावात नवल वाटायचे. पण माईंनी हे वानप्रस्थाश्रम स्वतः स्वखुशीने निवडले होते. हे शेतही मुलाला त्यांनीच घ्याला लावले होते.
माईंना एकुलता एक मुलगा मुकुंद होता. तो त्याच्या कुटुंबाला घेऊन नागपूर राहायचा. वेळ मिळेल तसा यायचा, हवं नको ते बघायचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर सून, नातनी चांगले दोन महिने राहायच्या. यशोदामाई या पूर्वी कस्तुरबा ट्रस्ट मध्ये नोकरी करायच्या त्यामुळे त्यांच्यावर गांधीवादी विचारांचा पगडा होता. त्यांनी त्यांच्या मुलाचे शिक्षणही आश्रमशाळेत केले होते. यशोदामाई या खूप प्रेमळ आणि शांत स्वभावाच्या होत्या. तसेच त्यांची शिस्त कडक होती. माई स्वतः सर्व सोवळं-ओवळं पाळायच्या तरी पण ऊच-नीच जात-पात त्या मानीत नसत. पशु पक्ष्यांवर तर खूप प्रेम होते. त्या त्यांच्याशी बोलायच्या. त्यामुळे माई कधीही घरात जेवायला बसत नसत. अंगणातच त्या जेवायच्या आणि तेव्हा त्यांच्या भोवती सगळे पक्षी जमा व्हायचे. भाकर कुचकुरून त्या पक्षांना द्यायच्या. ताटाच्या एका बाजूला त्या जेवायच्या, आणि दुसऱ्या बाजूला चिमण्यांची पंगत बसायची. साप तर कधी झोपेत मानेवरून जायचे तर कधी चुलीत वेटोळे मारून बसलेले असायचे, तेव्हा माई दुसरी चूल पेटवायच्या त्याला म्हणायच्या, जा बाबा आला तसा, तोही फणा वर करून ऐकायचा. पण एक आश्चर्य होतं कि, जेव्हा सुट्टीत घर भरायचं तेव्हा मात्र हे पाहुणे कमीच दर्शन द्यायचे. पण हे पाहुणे कसले, या भूमीचे खरे मालकच. माई पाण्याने तुडुंब भरून मोठ्ठाली भांडी ठेवायच्या पशुपक्षांसाठी. कधी कुणी वाटसरू चुकून आला कि माई त्यांना दोन घास तरी खाऊ घातल्याशिवाय जाऊ द्यायच्या नाही.
एकदा असेच तीन जण रात्री आले. म्हणाले, “आम्ही रस्ता चुकलो, दुरून दिवा दिसला म्हणून आलो, रातभर अंगणातच थोडा आसरा द्या.” माईंनी त्यांना खायला पिठलं भाकरी केली, आणि बोलत बसल्या, त्यांना वाटले म्हातारी बडबड करेन आणि झोपेल, पण असे झाले नाही. वाट बघून रात्र संपणार आणि आपल्याला चोरी करता येणार नाही या विचाराने त्यांनी माईंना खांबाला बांधून खूप मारले. माईंना योगविद्येचे चांगलेच ज्ञान होते, त्यांनी मेल्याचे सोंग घेतले. चोरांना घरात काहीही सापडले नाही, ते पळाले. मुकुंदला हे कळले तेव्हा तो घाबरला. माई म्हणाल्या, “घाबरू नको, ब्रम्हा, विष्णू, महेश होते ते, परीक्षा घ्यायला आले होते.” अशा या माई, त्यांच्यापेक्षा वयाने मोठे लोकही त्यांना माई म्हणायचे. त्यांचे वडील वैद्य होते त्यामुळे त्यांना निसर्गोपचार माहित होता. तोंडी सतत देवाचे नाम आणि हाती काम, असे त्यांचे दिवस जायचे. नातनी आल्या कि, त्यांचे संस्कार वर्ग चालायचे. कधी ओळखीचे तर कधी नातेवाईक येऊन पिकनिक करून जायचे. माईंनी स्वतः बनवलेल्या विठ्ठल-रखुमाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर इत्यादींच्या मूर्ती होत्या. आसपासच्या गावातील लोक या जागेबद्दल वाईट, चमत्कारिक बोलायचे, पण माईंना ही भूमी देवांची भूमी वाटायची. त्यांच्या मुकुंदाने पण स्वामी विवेकानंदांची मूर्त्ती बनवली होती.
बरडावर कधी दगड फोडणाऱ्या सुरुंगाचे आवाज, तर कधी पारध्यांनी पकडलेल्या रानडुकरांचे ओरडण्याचे आवाज येत असत. आसपास दगड फोडायला आलेले वडार माईंच्या शेतातल्या विहिरीवर जेवायला येत असत. मात्र, काही दिवसांपासून एक कुटुंब रोजच येऊ लागलं, माई त्यांच्याशी बोलू लागल्या, विचारपूस करू लागल्या. तेव्हा शांता आणि तिच्या मुली पण बोलायला लागल्या. माईंच्या प्रेमळ स्वभावामुळे त्याच्यात आपुलकी निर्माण झाली. त्या कुटुंबात शांता, तिचा नवरा, दोन मुली शशी आणि लिला व शशीचा नवरा. शांता, तिच्या मुली नाही म्हटले तरी माईंची कामे करू लागली. सुरवातीला माईंना हे आवडायचे नाही. पण शांती इकडे माईंना बोलण्यात गुंतवून ठेवायची आणि मुली कधी भांडीघासून ठेव, तर कधी पाणी भरून दे, अशी छोटी-मोठी मदद करू लागल्या.
शांती दिसायला सुंदर होती. उंच, धिप्पाड, अंगावर तिच्या तीन एक किलो चांदीचे दागिने होते. त्यात काही सोन्याचे होते, पण कमीच. ती जेव्हा बरडावरून उतरत येतांना दिसायची, तेव्हा माई म्हणायच्या,”आली वनराणी.” खरंच, कमरेला कमरपट्टा, दोन्ही दंडात नागमोडी बाजूबंध, हातात दोन-तीन प्रकारच्या पाटल्या, पायात दोन-दोन तोडे आणि मोठ्ठ्या अंबाड्यात खोवलेली चांदीची फुले, असा तिचा साज असायचा. चालायची पण एकदम ऐटीत.
मुकुंद आला कि, माई त्यांच्याबद्दल त्याच्याजवळ बोलू लागल्या. त्याला त्याच्या माईचा स्वभाव माहित होता. त्या कुणावरही सहज विश्वास करतात. म्हणून बोलला, ”माई तू बोलते ते ठीक आहे तरी सावध राहा.” त्यानंतर मुकुंदाशीही त्यांची भेट होऊ लागली. त्यालाही ते कुटुंब सरळसाधं वाटलं.
शांती माईंजवळ आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी करायची. कधी शशी आणि जावयात कुरबुरी झाल्या कि, म्हणायची तिला समजवा माई, तर कधी दारुड्या नवऱ्याची तक्रार करायची. भटकी जमात असल्यामुळे कुठल्याही गावात त्यांना सहजासहजी राहायला जागा देत नसत, वरून हा दारुड्या त्यामुळे त्यांना गाव सोडायला सांगितले होते. माईंनी मुकुंदाला विचारले, तो म्हणाला, “माई तुला वाटतं तर ठीक आहे पण आपण त्यांना सुरवातीला दोन महिनेच राहायला जागा देऊ, जर ते व्यवस्थित राहिले, तर पुढे बघू.” झाले माईंनी त्यांना शेताच्या दुसऱ्या कोपऱ्यात झोपड्या बांधायला जागा दिली. दोन झोपड्या बांधून ते राहू लागले.
माई दुरूनच त्यांच्याकडे लक्ष ठेवून होत्या. दिवसभर ते पाचही जण कामावर असायचे. सायंकाळी तर रेडिओचा सूरही ऐकायला यायचा. शांतीचा नवरा पिऊन तर यायचा पण भांडणाचे वैगरे आवाज काही जास्त कानी पडले नाही. अधूनमधून शशी आणि जावयामध्ये मात्र काहीतरी खटके उडायचे, पण माईंनी तिकडे जास्त लक्ष दिले नाही. तशीही त्या लोकांची भाषा त्यांना समजत नव्हतीच. त्यांना कुणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावणे आवडत नव्हते, मग तो स्वतःचा मुलगा का असेना. कुणालाही मदद करणे हा त्यांचा स्वभावच होता.
काही दिवसांनी दरवर्षी प्रमाणे मुकुंदाची बायको, मुली उन्हाळ्याच्या सुट्टीत आल्या. सुरवातीला सुनबाई मुलींना झोपड्यांकडे जावू द्यायची नाही. म्हणायची,” ते दारू पितात, मटण-मच्छी खातात तेव्हा दुरूनच राहा.’’पण हळू-हळू मुली आणि सुनबाई पण शशी, लिला ह्यांच्याशी बोलू लागल्या. बोलता बोलता सूनबाईने शशीला विचारले ,”तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली?”. ती म्हणाली, “सहा वर्ष’’ “मूल-बाळ झाले नाही का?” सुनबाईने विचारले. तेव्हा शशी रडायला लागली व म्हणाली,”खूप नवस-तवस केले पण, बाई माझी कूस नाही उजवली.’’ सायंकाळी ही गोष्ट सूनबाईने माईंना सांगितली तेव्हा शांतीही तिथेच होती. शांतीने जेव्हा सांगितले कि, दोघा नवराबायकोची भांडणं याच कारणाने होत असते तेव्हा, सूनबाई म्हणाली कि, तिचे वय कमी आहे, होईल सगळं बरोबर, पण तिला एकदा तरी डॉक्टरला दाखवायला हवं. तुम्ही सगळे उपाय केले तसे हा पण एक उपायच आहे, कारण, डॉक्टर सुद्धा देवच असतात. ती त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू लागली. दुसऱ्या दिवशी माईंनी सुनेला विचारले, ”तू जे करायचे ठरवले आहेस, त्याचा पूर्ण विचार कर व मुकुंदाला विश्वासात घे.” शनिवारी मुकुंद आला आणि सुनेने सरळ प्रश्नच केला, ”काहो, तुमच्या लक्षात कुणी स्त्रीरोगतज्ञ आहे का? शशीला दाखवायचे होते.” तिने व माईने शशीची केस समजावून सांगितली. मुकुंद म्हणाला,” ते सर्व ठीक आहे पण ते लोक सगळे तयार आहेत का? त्यांना व्यवस्थित समजावून सांगा. जबरदस्ती करू नका.” यांचे संभाषण सुरु असतांनाच, शांती, शशी व तिचा नवरा आले व म्हणाले ,”बाई आम्ही तयार आहोत. तुमच म्हणणं बरोबर आहे. ”
तीन दिवसांनी सूनबाई शशी आणि तिच्या नवऱ्याला घेऊन डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने शशीला तपासले व एक छोटेशे ऑपेरेशन करावे लागेल असे त्या म्हणाल्या. परत तीन-चार दिवसांनी शशीसोबत लिलाला मदत म्हणून घेतले आणि शशीचे ऑपेरेशन झाले. डॉक्टरांच्या सूचना समजून त्या परत आल्या. ऑपेरेशन सफल झालं होतं. आता फक्त वाट होती चांगल्या बातमीची. दिवसा मागून दिवस जाऊ लागले एक महिना, दोन महिने, तसतशी शशी उदास होऊ लागली. माई तिला धीर द्यायच्या. आणि म्हणायच्या, “देवावर विश्वास ठेव, चांगला विचार कर. देव नक्की ऐकेल तुझं.’’ सहा महिन्यांनी अचानक शांती नाचतच माई कडे आली व माईच्या पाया पडली. तिने सांगितले शशी गरोदर झाली. सर्वांना खूप आनंद झाला. माईने शशीला सांगितले, “डॉक्टरचे औषध वैगरे बरोबर घे आणि तपासणी साठी वेळेवर जात जा.’’
काही दिवसांनी दिवस भरल्यावर शशीने सुंदर गोंडस बाळाला जन्म दिला. त्यांच्या घरातला वातावरण बदलून गेलं. बाळाची प्रत्येक गोष्ट माईंना विचारून करू लागले. लीला तर एक मिनिटही त्याला खाली ठेवायला तयार नसायची, सारखी मांडीवर घेऊन बसायची. सगळे तिला रागवायचे. असे घेऊन घेऊन बसलं तर त्याची वाढ होणार नाही, ते मजबूत बनणार नाही, हे तिला समजावून सांगून पण ती समजायची नाही. एकदा माई पण रागावल्या, त्याचा फार काही परिणाम झाला नाही. मुख्य म्हणजे बाळ पण तिच्याच जवळ खुश राहायचं. शांती, तिचा नवरा, जावई कामाला जायचे, लीलाच शशीजवळ राहायची त्यामुळे लीलाची बाळाला पण सवय झाली होती. सहा महिन्यांचे झाल्यावर बाळाचे आईवडील त्याला घेऊन आंध्र प्रदेशात, त्यांच्या देवाच्या दर्शनासाठी घेऊन गेले होते. तेव्हा ते चार-पाच दिवस सर्वांना कठीण गेले.
बाळाच्या कोडकौतुकात दिवस पंख असल्यासारखे उडू लागले. एक वर्ष कसं गेलं ,कळलंच नाही. आणि शांतीचे इथले बिऱ्हाड हलवण्याची वेळ आली. शेवटी भटकी जमात, जिकडे पोट नेईल, काम मिळेल, तिकडे फिरणारी. त्यांचे शेता जवळच्या बरडावरचे काम संपले होते व दुसऱ्या बरडावर त्यांना काम मिळाले होते. माईंच्या शेतापासून ती जागा खूप दूर होते त्यामुळे त्यांना आपली राहण्याची सोय दुसऱ्या गावी करणे भाग होते. ही जागा व माईंना सोडून जाणे त्यांना कठीण जात होते. दोन दिवसात त्यांनी आपले सगळे सामान बांधले. जातांना सगळेच माईंना नमस्कार करायला आले. सगळे भावुक झाले होते. शशी, लिला रडत होत्या. शशीने तर बाळाला माईंच्या पायावरच ठेवले. माई तिच्यावर ओरडल्या व बाळाला पटकन उचलून त्यांनी छातीशी धरले व सगळेजण माईंचा निरोप घेऊन निघाले. “माई आम्ही तुम्हाला भेटायला येत जाऊ” असे जातांना ते म्हणाले. नजरेआड होई पर्यंत सगळे मागे वळून-वळून बघत होते. माई त्यांना हात हलवत निरोप देत होत्या.
काही दिवस माईंना करमेनासे झाले. शेताचा तो कोपरा त्यांना सुना सुना वाटू लागला. त्यांच्या झोपड्यांतून येणारे आवाज, रेडिओचा आवाज, सगळं शांत झालं होतं. शांताबाई मधे मधे तरीही माईंना भेटायला यायची एवढ्या लांबून यायची. कधी चार दिवसांनी, तर कधी आठवड्यात एकदातरी भेटून जायची, ती आली कि, मग घरचे सर्व सांगत बसायची. बाळाच्या बाललीला हसूनहसून सांगायची. कसा चालतो, कसा बोलतो, वैगरे वैगरे. माई पण आपले हातातले काम टाकून तिच्या गोष्टी ऐकत बसायच्या. एक दिवस दोन्ही कुत्रे भुंकत बरडाकडे धावत गेले. माई घरातून बाहेर येऊन बघतात तर काय, शशी आणि लीला बाळाला घेऊन येत होत्या. खूप वेळ थांबल्या. बोलताबोलता सांगू लागल्या कि, अम्मा अप्पा यांचे आजकाल खूप भांडणं व्हायला लागलीत. लिला म्हणाली, ”माई आम्ही इथं राहत होतो ना, तेव्हाबी आमचा बाप दारू प्यायचा, पण तुमच्या अन दादाच्या भीतीनं गप गुमान पडून राहायचा. आता रोजच्या रोज तमाशे करतो.” शशी मधेच बोलली, ”त्याला तर माझ्या पोराची पण चिंता नाही. आता पोरगंही त्याच्याजवळ जात नाही भीतीनं, तो ह्याला घ्या साठी आला का, हे घाबरून दूर पळते. ” माई सर्व ऐकत बसल्या. करणार काय म्हणा. त्या गेल्या तेव्हा माईंनी मुलाच्या हातात थोडे पैसे दिले व म्हणाल्या ,” याला चांगले संस्कार दे शशी, जमलंतर शाळा पण शिकव.” शशी फक्त हो माई, एवढेच बोलली आणि त्या गेल्या.
माईंनी स्वतःला कामात झोकून दिले, मात्र डोक्यात शशीच्या मुलाबद्दल विचार सुरु होता. या लोकांचं कसलं हे जिणं ,ना घरदार,ना पोरांना शिक्षण, मुशाफिरीसारखं गावोगाव पोट भरत हिंडणं. डोकं भारी वाटायला लागलं तसं माईंनी डोक्यातले विचार झटकले आणि देवाचे नामःस्मरण चालू केले.
सुगीचे दिवस आले, शेतात काम करायला मजूर बाया येऊ लागल्या. त्याही मग शेताचा तो रिकामा कोपरा बघून म्हणाल्या, माई तुम्हाले आता करमत नसणं बिलकुल ते लोक होते त, चहलपहल रहात होती. आन आता सामसूम वाटत असंन ना रात्रीच, माई म्हणाल्या,” येणारे येतात, जाणारे जातात. चला कामात लक्ष घाला. आभाळ आलं आहे, पावसाच्या अगोदर काम संपले पाहिजे ना आपले.” हो माई म्हणत बाया कामाला लागल्या.
कामाच्या दिवसात दिवस कसे जातात, हे कळतंच नाही. त्या दरम्यान शांतीच्या काही फेऱ्या झाल्या होत्या, पण जास्त बोलायला कुणालाच वेळ नव्हता. ती थोडा वेळ बसून ,निघून जायची. कारण तिलाही माहित होती या दिवसातली माईंची धावपळ.
कामाचे दिवस सरत आले, तसे माईंच्या लक्षात आले, बरेच दिवस झाले शांती आली नाही. मुकुंद आला तेव्हा माई त्याला बोलल्या, ‘’अरे ती दोन तीनदा येऊन गेली, पण कामाच्या रगाड्यात तिच्याशी निवांत बसून बोलायलाच मिळाले नाही बघ,”मला कामात बघून तिही जास्त काही बसायची नाही. मुकुंद ने समजावले,” माई तू जास्त त्यांचा विचार करू नको. तिला वेळ मिळाला कि, ती येईलच, फार कुणाला जास्त जीव लावणे बरे नाही. ”नाही रे, सगळं कळतं मला तू नको काळजी करू, या माझ्या आयुष्यात किती असे अनुभव पहिले मी. ”त्या दिवशी खूप दिवसांनी दोघं मायलेक रात्री उशिरापर्यंत बोलत बसले. सकाळी मुकुंद शेतात कामाला असलेल्या माणसांना काही सूचना देऊन, त्याची विचारपूस करून नागपूरला निघून गेला.
असेच काही दिवस गेले. नेहमीप्रमाणे माई दिनचर्येला लागल्या. सकाळीच सडा रांगोळी, स्नान करूनच त्या चूल पेटवायच्या स्नान झाल्याशिवाय स्वयंपाक घरात जाण्यास सक्त मनाई होती. त्यांच्या या कडक नियमांमुळे कुणी बाई कामाला माईंजवळ टिकायची नाही. माईंनी कुत्र्यांना जेवण दिले, व त्या नेहमी प्रमाणे अंगणात जेवणाचे ताट, पाणी घेऊन बसल्या तितक्यात झब्बू जोरात भुंकत, शेपटी हलवतच पळाला. माईंनी उठून बघितले तर शांती येत होती. माई जेवायच्या थांबल्या. ती आली तिने विहिरीवर हातपाय धुतले व माईंजवळ येऊन बसली. तिला येतांना पाहून माईंना जेवढा आनंद झाला होता, तो तिच्या चेहऱ्याकडे बघून चिंतेत परावर्तित झाला. शांतीचा अवतार ठीक नव्हता .नेहमी सारखे तिच्या चेहऱ्यावर तेज दिसत नव्हते. असे वाटत होते कि ती खूप बिमार आहे.
माईंनी तिला जेवायला दिले. ती म्हणाली, ”मी जेवूनच आली माई ,तुम्ही जेवा मी थांबते. माईंनी तरी जबरदस्तीने तिला जेवायला दिले ,त्यांना माहित होते हि खोटे बोलत आहे. जेवण झाल्यावर ती इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगू लागली. जे तिला बोलायचे ते ती बोलतच नव्हती. मग माईंनीच सरळ तिला विचारले, ”शांता, तुला काही बोलायचे ते बोलून टाक ना ,हवापाण्याच्या गोष्टी करायसाठी तर तू नाही आली हे पक्क. काय झालं ? माईंनी असे बोलताच ती रडू लागली. ”काय सांगू बाई, ह्या नवऱ्यानं जिणं खराब केल, रोजच्या झगड्यानं आता गाव सोडाची वेळ आली, सरपंच आलता हाकलून देईन म्हणला, ”लिलासाठी त्यानं एक पोरगा पक्का केला, तो बी त्याच्यासारखाच दारुड्या, त्या दिवशी त्या पोराले सरळ घरी घेऊन आला, अन म्हणाला, याच्याशीच लगीन होईन लीलाच समजून जा, ”तेव्हापासून लीलानही रडून रडून गोंधळ सुरु केला. वाटलं होत चांगला नातू झाला, त्याच तोंड पाहून याची दारू कमी होईन, पण तेही चार दिवसाचं नाटक झालं बाई, कधी कधी मनात येते, एक त आपण जीव द्याव नाही त त्याचा तरी घ्यावं.” खूप वेळ ती रडून चिडून बोलत होती. माई शांतपणे ऐकत बसल्या मधेमधे तिला समजावून हिम्मत देत होत्या. मनात कोणतेही वाईट विचार आणू नको असे सांगत होत्या. त्यांच्या हातात तरी दुसरे काय होते.
त्या म्हणाल्या, “शांती तुझ्या सारखी मजबूत बाई, अशी हिम्मत सोडेल, तर तुझे कुटुंब कोण सांभाळणार? नाही त्या म्हणाल्या जावई चांगला आहे तुझा, तुम्ही सर्व मिळून आलेल्या संकटाला दूर करा.” त्या दिवशी शांती दिवसभर होती. सायंकाळी जावई आला तीला घ्यायला तेव्हा ती गेली. “येत जा अशीच अधून मधून” असे म्हणून माईंनी तिला निरोप दिला.
दिवसा मागून दिवस जाऊ लागले माईने स्वतःला आपल्या कामात व हरी नामात गुंतवून घेतले. या दरम्यान शांतीची ना ही खबर आली व ना ती स्वतः आली. असे करत खूप महिने निघून गेले. उन्हाळ्याच्या सुट्टीत नेहमी प्रमाणे माईंच्या नातनी आल्या. बाकीचे एक महिन्यातच गेले पण मोठी नात माईं जवळच राहिली. ती नेहमीच त्यांच्या जवळ राहायची. दोघींचा एकमेकींवर खूप जीव होता. लोक म्हणायचे पण माई मेल्या तरी बालीने आवाज दिला तर उठून बसतील. माई सर्वांसाठी कडक होत्या पण या नातीच्या प्रेमात मात्र त्या नेहमीच कमजोर पडायच्या. दहा-बारा वर्षाची बाली आजीकडे बिंधास्त राहायची.
काही दिवसांपासून माईंचे मन बेचैन वाटत होते. त्यांना शांतीबाईंची खूपच आठवण येत होती. कारण रात्री स्वप्नात त्यांना शांती दिसली. तसे सकाळी उठला-उठल्याच त्यांनी त्यांचे कामे फटाफट उरकले. दोन घास कसेबसे खाले नातीला जेवू घातले व म्हणाल्या, “बाली चलते का बेटा? आपण शांती आजीला भेटायला जाऊ. “बाली म्हणाली, “कुठे आजी? त्या कुठे राहतात?” माईंच्या डोक्यात एकदम विचार आला, अरे हो! इथून गेले तेव्हा ते बोरगावला राहत होते. आता कुठे असतील? तिथेच असतील का, कि दुसऱ्या गावी गेले असतील? काही असो, पहिले बोरगावला जाऊन बघायचं. नंतर पुढच पुढे बघू. “चल बेटा, लवकर.” उन्हाळा असल्यामुळे सकाळपासूनच ऊन खूप तापत होते. त्यांनी नातीच्या डोक्याला रुमाल बांधला. कामावर आलेल्या माणसाला सांगून त्या बोरगावला निघाल्या, जे चार किलोमीटर अंतरावर होते. तिथे फक्त पायी जाता येत होते. ऊन झोंबत असल्यामुळे त्यांनी आपल्या पाताळाचा पदर ही नातीच्या डोक्यावर झाकला. तासाभऱ्यात त्या बोरगावला पोहोचल्या. तिथे पत्ता विचारत-विचारत गावाबाहेरच्या एका झोपडी जवळ पोहोचले\. तिथे कुणीच नव्हते. झोपडी बंद होती.
त्यांनी आजूबाजूला विचारले. बाजूच्या बाईने जे सांगितले, ते धक्कादायक होते. ती बाई म्हणाली, ”बाई, त्या शांतीनं त पेटवून घेतलं न स्वताले. ”हे ऐकताच, बालीने ऐकू नये म्हणून माईंनी तिला बाजूच्या झाडाच्या सावलीत बसवले व म्हणाल्या, बाळा, तू इथेच बैस जोपर्यंत मी, तुला आवाज देत नाही.” तोवर ती बाई प्यायला पाणी घेऊन आली व म्हणाली,”बाई तुम्ही त चांगल्या घरच्या दिसता, या वडरायले कसे ओळखता? माई म्हणाल्या, ”हे लोक पहिले माझ्या शेतात राहत होते.” ”असं असं तुमीच काय त्या बरडाच्या मागं रायता. ”माई मधेच बोलल्या, ”ते जाऊ द्या, काय झालं तिला कुठे नेल, काही माहित आहे का?” “अरे बापा काय झगडे होत होते बाई त्यायचे, तो माणूस होता न दारुड्या, त्यानं त्या दिवशी त रातपासूनच तमाशा सुरु केला. सकाळ झाली तरी तेच, गावकरी पोलिसातच जाऊ म्हणले, मग थोडे शांत झाले, अन एकाएकी शांतीन राकेल ओतून, घेतली स्वतालेच आग लावून, मारुती वानी लाल दिसत होती बाई, तुमाले काय सांगू तशीच चालत बस स्टॅण्डवर गेली, पर कोनी मदत नाही केली. कालच तिचा जावई आला होता सामान घ्याले.” बरं,असे म्हणून माई नातीला घेऊन झपाझप पावले टाकीत चालू लागल्या. ऊन असल्यामुळे त्यांना नातीची चिंता वाटत होती. तिच्याशी पाहिजे तेवढ गोड गोड बोलत होत्या. तरीही तिने प्रश्न केलाच, ”माई ,शांती आजीचे काय झाले?” ”काही नाही ग बेटा, ती नागपूरला गेली आहे. आपण जायचं का नागपूरला. ती म्हणाली, ”माई पण मला तुमच्या जवळ राहायचंय, ”माई म्हणाल्या, बरं बाबा ”पण आता आपण जाऊन परत येऊ हं.” शेतात येऊन त्यांनी तिला जेवायला दिले, माणसाला समजावून सांगितले, ”मी आल्याशिवाय तुम्ही जाऊ नका ,तुमच्या साठी भाकरी करून ठेवल्या, मला उशीर झाला तर जेवून घ्या,” तोही म्हणाला, तुम्ही काही चिंता करू नका, मी सांभाळतो सगळं.”
माईंनी नातीचे कपडे, एक पातळ एका पिशवीत भरले व नागपूरची बस घेतली. दोन तासात त्या मुलाच्या घरी पोहोचल्या.
त्यांना असे अचानक दारात बघताच मुलगा सून घाबरले. माईंनी हातपाय धुतले पाणी पिल्या व थोडक्यात काय ते सांगितले आणि म्हणाल्या,”दादा, चल बेटा लवकर, शोधावे लागणार तिला आपल्याला.” “दोन घास खाऊन घ्या” सून म्हणाली पण माईंनी ऐकले नाही. मुकूंद आणि माई मेडिकल हॉस्पिटल ला पोहोचले. अश्या पेशंट ला जिथे भर्ती करतात त्या वॉर्ड च्या समोर पोचताच, त्यांना शांतीचा जावई व नवरा दिसले. नवरा गुडघ्यात डोके खुपसून बसला होता. जावई या दोघांना पाहून जवळ आला व माई, मुकुंदाला घेऊन शांतीच्या बेड जवळ घेऊन गेला. तिला तंबू सारख्या जाळीने झाकले होते. माई आणि मुकुंदाला बघताच शशी, लीला यांनी रडतच माईंचे पाय धरले, ”माई अम्माला वाचवा, काहीही करा. पण अम्माला वाचवा. आमचे कसे होईन.” त्यांचा आक्रोश बघून माईंना अश्रू आवरले नाहीत. मुकुंदाने मग त्यांना समजावले. ”असे दवाखान्यात आवाज करू नका, डॉक्टर रागावतील बाहेर पाठवतील. शांत राहा, लवकरच ठीक होईल तुमची अम्मा.” असे बोलून तो डॉक्टरला भेटायला गेला. माई शांतीच्या चेहऱ्याजवळ स्टूल ओढून बसल्या. एवढ्या त्रासातही तिचा आवाज मात्र कडक होता पण डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते. तिला मुलींची काळजी वाटत होती. बरेच काही बोलत होती. माईंनी शशीला विचारले, ”शशी तुझ्या मुलाला कुठे ठेवले?” तिने सांगितले कि येतांना आमचे ओळखीचे एक बिऱ्हाड आहे. बाजूच्या गावात त्यायचाकडं ठेवलं.”
मुकुंद डॉक्टरला भेटला तेव्हा डॉक्टर म्हणाले, ”बाई फार हिम्मतीची आहे. कारण ती तिच्या इच्छाशक्ती मुळेच आतापर्यंत जिवंत आहे. सत्तर टक्के जळलेली, वरून एवढा प्रवास करून आलेली.”
मुकुंद डॉक्टरकडून आल्यावर लीलाने विचारले, ”दादा, आमची अम्मा बरी होईन न?” ”हो सगळं ठीक होईन.” असे बोलून तो माईंना म्हणाला, ”माई चल आपल्याला निघायला हवं.” माई उठल्या, तितक्यात शांतीने लीलाला बोलावून तिच्या कानात काही सांगितले, तसे लीलाने, थांबा दादा, म्हणत एक थैली मुकुंदाच्या हाती दिली. ”अरे काय आहे हे?” माई आणि मुकुंदाला कळलेच नाही काय प्रकार चाललाय, एवढ्यात शांती म्हणाली,”दादा, ही माह्या मायबापापासूनची कमाई आहे, आता तुम्हीच याची सांभाळून वाटणी करून द्या, आमचा फक्त तुम्हा मायलेकावरच भरोसा आहे. ”अरे, पण काय आहे हे? मुकुंद घाबरला, माईंना पण आश्चर्य वाटलं. त्या शांतीला म्हणाल्या, ”तू बरी होऊन ये, मग बघू काय करायचे, आणि हे इथेच राहू दे.” पण त्या कोणीच मानायला तयार नव्हत्या. मुकुंदाने शशी व तिच्या नवऱ्याला जवळ बोलावले व म्हणाला, ”तुम्ही दोघे मोठे आहात, समजदार आहात, सध्या तरी मी हे घेऊ शकत नाही, तेव्हा हि थैली मी तुमच्या हातात देतो. तुम्ही ही जबाबदारी सर्वांचा विचार करून सांभाळा. काही अडचण आली तर आम्ही आहोतच.” असे म्हणून त्याने ती थैली न उघडताच, त्यांच्या हाती दिली. माई समाधानाने मुलाकडे बघत होत्या. परत शांतीला धीर देऊन ते दोघं मायलेक दवाखान्या बाहेर पडले. तेव्हा माई म्हणाल्या, ”बेटा तू मला इथूनच बस स्टॅण्डवर सोड, मी आता काही घरी येत नाही, घरी बाली परत सोबत यायचा हट्ट करेन, आणि त्या माणसाला ही मी थांबवून ठेवले आहे, तेव्हा मला लवकर पोहचायला हवं.”
त्यालाही ते पटलं त्याने माईंना बसमध्ये बसवून दिले. घरी आल्यावर बायकोला त्याने सर्व सांगितले. सून म्हणाली, ”माईंच्या मनाला खूप त्रास झाला असेल हे नक्की, वाटले नाही शांती सारखी कणखर बाई रागात असे भयानक पाऊल उचलेल.” तो म्हणाला, ”रागाच्या भरात झाले, नशीब दुसरे काय.”
माई शेतात पोचल्या तेव्हा अंधार झाला होता. त्यांनी माणसाला घरी पाठवले. शारीरिक व मानसिक त्रासामुळे त्या खूप थकल्या होत्या, सर्वप्रथम त्यांनी गार पाण्याने आंघोळ केली, देवाजवळ दिवा लावला व शांतीसाठी प्रार्थना केली. माणसासाठी ठेवलेल्या भाकरी तश्याच होत्या, तो सायंकाळी जेवला नाही वाटतं, माई स्वतःशीच बोलल्या. त्याच भाकरी त्यांनी कुत्र्यांना टाकल्या व स्वतः पाणी पिऊन तश्याच झोपल्या. कारण जेवण बनवण्याची त्यांच्यात ना शक्ती उरली होती ना जेवायची इच्छा.
आठवड्याच्या शेवटी मुकुंद आला म्हणाला, ”माई मी काल परत दवाखान्यात गेलो, तेव्हा कळले कि, आपण तिला भेटायला गेलो ना, त्याच्या दुसऱ्याच दिवशी रात्री गेली.” माई म्हणाल्या, ”मलाही कालच कळले, बोरगावला जाऊन आली मी, त्यांनी गाव पण सोडले, लोकांनी सांगितले कि, ते त्यांच्या मुलुखात गेले म्हणून.” सोडून दे बेटा, जे झाले ते, विसर सगळं, मीही विसरते, कारण कोणीही कुणाच्या नशिबाला पुरत नाही.” हे माई बोलल्या खऱ्या पण शांतीला विसरणं खरंच त्यांना सहज शक्य होईल का? मुकुंद मनात म्हणाला.
जस जसे वर्ष जाऊ लागले, तस तशी मनावर, झालेल्या घटनेवर खपली चढत गेली आणि मुकुंद, माई यांच्याही मनातील त्या लोकांच्या आठवणी हळूहळू कमी होऊ लागल्या. माई मात्र शेताच्या त्या कोपऱ्यात एखादा चक्कर मारत होत्या.
वर्षा मागून वर्ष जाऊ लागले. सगळे पहिले सारखे सुरु झाले, दर उन्ह्याळ्यात नातनी यायच्या धमाल करायच्या. एकट्या असल्या की ,माई परत स्वतःला हरिनामाच्या चिंतनात व कामात गुंतवून ठेऊ लागल्या.
तीन वर्षांपासून संत्र्याचा बगिचाही चांगलाच बहरू लागला होता. या वर्षीही सालाभाता प्रमाणे बगीचा संत्र्यांनी लगडला होता. त्यासाठी मुकुंद कमीत कमी दोनेक आठवडे तरी राहायचा तसा तो यावर्षीही राहिला होता. संत्रा तोडून बाजारात पोचला सुद्धा होता. मायलेक समाधानानं दुपारी आराम करीत होते, अचानक झब्बू ,शेरू भुंकायला लागले. कोणी हि लक्ष दिले नाही पण, भुंकण्याचा आवाज वाढू लागला, त्यात कोणीतरी ओरडून माई,माई म्हणून आवाज पण देत होतं. मुकूंद बाहेर आला त्याला काही कळले नाही, तेव्हा त्याने माईंना आवाज दिला. तोपर्यंत एक माणूस, एक बाई आणि माणसाच्या कडेवर मूल, असे हे घराकडे येत होते. ”माई कोण असेल?” माई डोळ्यावर तिरपा हात ठेवून ओळखायचा प्रयत्न करीत होत्या. माई माई म्हणत ती बाई रडत होती. ते जवळ येताच माईंनी ओळखले. ती शशी व तिचा नवरा होता आपल्या पाच वर्षाच्या मुलाला घेऊन. तिने नवऱ्याजवळच्या मुलाला आडवे केले अन माईंच्या मांडीवर टाकले व छाती बडवू बडवू रडू लागली, तिचा नवरा रडतच सांगू लागला, ”वर्षभरापासून पोरगं बिमार आहे, लई इलाज केला, दवाखाने पालथे घातले, अंगारे- धुपारे झाले माई, काहीच समजलं नाही, ”तुमची अमानत तुमच्या ओटीत घातली माई, ”आता काहीतरी करा माई वाचवा लेकराले,” म्हणत शशीने आकांत केला. या अचानक आलेल्या वादळाला कस सावरावं काहीच काळात नव्हतं. माईंनी स्वतःच्या मांडीवर बेशुद्ध पडलेल्या मुलाची नाडी बघितली, मुलात थोडी धुगधुगी होती, श्वास घेता येत नव्हता त्याला, माईंनी मुकुंदाला आतून देवाजवळचे पाणी आणायला सांगितले. त्यांनी मुलाला पाणी पाजले तसे त्याच्या डोळ्यांच्या इवल्याश्या पापण्या हल्ल्या व त्या जीवाने शेवटचा श्वास घेतला. जशी काही या मातीची च त्याला ओढ होती म्हणावी. दोघांनाही सावरणे खूप मुश्किल गेले. थोड्या वेळाने मामा म्हणून मुकुंदानेच एका संत्र्याच्या झाडाखाली त्याला माती दिली. नवराबायकोला जबरदस्तीनेच थांबून घेतले, दुसऱ्या दिवशी माईंनी त्यांचा जवळ नवीन पातळ होते ते दिले आणि सकाळीच ते परत गेले. कुठे काय ? काहीच सांगितले नाही, माईंना ही विचारायचे खूप होते पण काहीच विचारू शकल्या नाही. जाताना फक्त शशी म्हणाली, ज्या मातीतला हिरा होता, त्याच मातीत मिसळला.
एक वादळ आलं होतं घोंघावत आणि शांतही झालं.
असा हा कोणता ऋणानुबंध होता कि, त्याच्याही पलीकडे जाऊन काहीतरी वेगळेच होते, हे मात्र नक्की. नाहीतर कोण कुठले वडार, असे बिऱ्हाड खूप यायचे, मग शांतीशीच कां? माई एवढ्या कडक ओवळेंसोवळे पाळणाऱ्या, मग दोघींची मैत्री कशी? एवढा जिव्हाळा कसा? वाटतं ना काहीतरी वेगळंच. नक्कीच.