Marathi Article – एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

0
1623

Marathi Article – एखाद्याचं आपल्यातून अवेळी जाणं ……!

marathiboli-alone

किती किती अवघड असते समजून घेणे एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं ….!! अगदी अनपेक्षित असते आपल्या साठी …! काळाने गनिमिकाव्याने हल्ला करावा आणि जीत्या जागत्याला आपल्यापासून दूर दूर न्यावे …! जिथे त्याला आपली हाक ऐकू येत नाही … आपला आक्रोश … आपले आक्रंदन दिसत नाही ! या सा-याच्या पलीकडे तो निघून जातो …! मागे उरतात आपले कोंडलेले श्वास आणि अधीर मन आणि मनाचा न दिसणारा कोंडमारा ! गेलेल्याचे दुःख असते की त्या सोबत उरलेल्या आनंदाच्या ठेव्याचे आता काय करायचे याचा शोक असतो …!! असा “तो” आपला मित्र असतो आप्त असतो आणि कधी कधी कुणीच नसतो … पण काही क्षण जरी आपण “त्या” व्यक्ति सोबत घालवले असतील तरी पुढच्याच काही काळात तो आपल्यातून गेला तरी हृदयात खोल खोल खड्डा पडतो ….! अदॄश्य दुःखाची कळ छातीत येतेच येते ….!!

अगदी अलीकडेच आमच्या कॉलनीत एक ड्रेस मटेरियल चे दुकान उघडलेले होते ! गेला आठवडा मी ते पाहत होते ! दुकानाबाहेर लावलेले ड्रेसेस रोज पाहत होते, आणि एकदिवस शेवटी त्या दुकानात प्रवेश केलाच …. तिथे एक २४/२५ वर्षाची लग्न झालेली मुलगी होती , तीचेच ते कलेक्शन होते! मोठ्या आवडीने तिने मला खुप सारे ड्रेसेस दाखविले, एक दोन मी घेतलेही पण घरी येऊन पाहिले तर एक छोटा तर एक मोठा होत होता . पुन्हा मी तिच्या दुकानात गेले , तीनेही न वैतागता न रागवता अगदी हसत मला पुन्हा ड्रेसेस हसतमुखाने आणि तेव्हढ्याच उत्साहाने दाखवले … पुन्हा घरी येऊन तेच छोटा मोठा ! आता जर मी तिच्या कड़े पुन्हा ड्रेसेस बदलायला गेले तर ती नक्कीच वैतागणार म्हणून मी जरा कचरतच तिच्या दुकानात गेले पण तिच्या चेह-यावरचे तेच हसमुख भाव ! मग मात्र मला तिच्या बद्दल अतीव प्रेमच वाटले !

थोड्या आस्थेनेच तिच्या दुकानाची तिची माहिती विचारली, आज तिच्या दुकानात तिचा नवरा आणि तिची दीड वर्षाची छोटुली मुलगी पण होती . तिने सांगितले तिचे वडील लहानपणीच वारल्याने आईसोबत लहानपणापासूनच काहिनाकाही कष्ट करायची आवड होती ! लग्न झाल्यावरही हा उत्साह कमी नाही झाला। दुकानात तिने ड्रेसेस सोबत इमिटेशन ज्वेलरी पण विकायला ठेवली होती. घर मुलगी संसार सारे सारे सांभाळून ती स्वतः सर्व खरेदी करण्यासाठी दादर मुंबई ठाणे इथे प्रवास करायची …! ताई मला अजुन खुप वाढवायचे आहे माझे दूकान । ही तर अजुन सुरवात आहे ! मीहि तिच्या मेहनीति स्वभावावर खुश झाले , तिचा तो उत्साह पाहुन तिचे कौतुक वाटले। . आणि नको असताना अजुन दोन अधिकचे ड्रेसेस तिच्याकडून खरेदी केले ! आणि माझ्या मैत्रीनींनाही तिच्या दुकानाची माहिती देईन हाँ असं तिला सांगितले तर तीला आनंदही झाला ! हसत हसत मी तिचा निरोप घेतला !

नंतर मी एकदोन दिवस येता जाता तिला कधी लहानग्या मूली सोबत गि-हांइकाना हसतमुखाने ड्रेसेस दाखवताना पाहत होते …! पण एक दिवस दूकान बंद दिसले मला वाटले आज सोमवार म्हणून दूकान बंद असेल , पण नंतर दोन दिवस दूकान बंदच होते ! माझे मलाच वाटले गेली असेल गावी, किंवा नव-या बरोबर मुलीसोबत फिरायला ! पण सलग एक आठवडा दूकान बंदच होते , खरंतर मला असंच दुकानातून ज्वेलरी पहायची होती. पण दूकान बंदच ! तिला भेटून एक आठवडा उलटला होता .

त्या दिवशी रोजच्या प्रमाणे सकाळी लेकिला शाळेच्या बसवर सोडायला मी घराच्या गेटपाशी उभी होते माझ्या सोबत अजुन एक दोन जणी आपल्या मुलांना घेऊन उभ्या असतात. बस आली मुले गेली की आम्ही काही मिनिटे बोलत असू … आणि बोलता बोलता माझी मैत्रीण दीपिका बोलली अगं आमच्या बिल्डिंग मधली एकजण गेली ना अचानक ! मी विचारलं कोण गं ? अगं तीच जिचे ते नवीनच कोप-यावरचे ड्रेसचे
दूकान होते ! ती अशी बोलली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली ! डोळ्यापुढे अक्षरशा अंधेरी आली ! कसेतरी तोंडातून शब्द आले , अगं काय सांगतेस काय ? गेल्या आठवडयात तर मी तिच्याकडून चार ड्रेसेस घेतले ! किती गोड हसमुख मेहनती होती गं ती ! काय झालं काय गं तिला ! हार्ट अटॅक आला असं कळलं ! काय ? एवढ्या लहान वयात ? खरच माणसाचं काही काही खरं नाही !

मला प्रचंड मोठा धक्का होता तो ! तसे काही नाते नव्हते तिच्याशी पण तरीही तिच्या सोबत घालवलेल्या त्या क्षणांसोबत नकळत तिच्या स्वप्नांशी माझे नाते जोडले गेले होते ! तिच्या हसमुख मेहनती स्वप्नाळु कष्टांसोबत मनाचे भावबंध जोडून बसले होते ! तिच्या त्या छोटुल्या लेकिसोबतच्या तिच्यानंतर तिचं कसं होणार ह्या काळजीसोबत मीही काळजीत पडले होते ! किती किती नात्यांनी मी जोडले गेले ! तिची स्वप्न इथेच ठेवून गेली ती माझ्या जवळ त्यांचांच आक्रोश माझ्या मनात उमटत होता पण तो तिच्या पर्यन्त कसा जावा ?

जे अवेळी जातात त्यांच्या स्वप्नांचे काय करावे ? त्यांनी योजून ठेवलेल्या प्लॅन्सचे काय करावे? त्यांनी त्यांच्या जीवन डायरीची काही पाने आगाऊच लिहिली असतील त्या पानांचे काय करावे? चटका बसतो जिव्हारी अश्या “अवेळी” गेलेल्यांच्या सरणावरील ज्वाळांचा …. आपण कितीही दुरुन त्यांना पहात असलो तरी ! मग त्यांच्या सोबतच्या अद्वैतांचे काय होते ? ते जळतात आयुष्यभर काळ कितीही
लोटला तरी मध्ये मध्ये आठवत राहते त्यांची सोबत ! कितीही हळुवार असली तरी
चटका देणारीच ….!

किती किती अवघड असते समजून घेणे , एखाद्याचे आपल्यातून अवेळी जाणं….!!

” समिधा “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here