मराठीतल्या नायकांना हिंदीत अजिबात भाव मिळत नाही, अशी ओरड नेहमी ऐकू येते. ती बरीचशी खरीही आहे. मराठीतल्या चरित्र अभिनेत्यांना हिंदीत चांगला मान असताना नायक-नायिकांना मात्र कोणी विचारत नाही. पण आता मराठीतला राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता गिरीश कुलकर्णी एका आगामी हिंदी चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारतोय.
हा चित्रपटही ऐरागैरा नसून अनुराग कश्यपसारख्या धाडसी दिग्दर्शकाचा आहे. पण मराठीत आतापर्यंत सोज्वळ, आदर्शवादी भूमिकांमधून दिसलेला गिरीश हिंदीत मात्र ‘अग्ली’ होऊन येणार आहे.‘गँग्ज ऑफ वासेपूर’च्या यशानंतर अनुराग सध्या ‘अग्ली’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात गर्क आहे.
रोनित रॉय, तेजस्विनी कोल्हापुरे यांच्याबरोबरच गिरीश कुलकर्णी यात मुख्य भूमिकेत आहे. अनुरागच्या चित्रपटांमध्ये नावाजलेल्या स्टार्सऐवजी फारसे ग्लॅमर नसलेले, पण कसलेले कलाकार नेहमीच भाव खाऊन जातात. ‘अग्ली’मध्येही ग्लॅमरस कलाकारांऐवजी कसबी अभिनेत्यांच्या निवडीवर भर देण्यात आला आहे. ट्रेजर हंट स्वरूपाचा हा चित्रपट असून, यातल्या प्रमुख कलाकारांच्या भूमिका ब-याचशा निगेटिव्ह शेड्सच्या असल्याचे, अनुरागच्या युनिटमधील खास सूत्राने सांगितले. चित्रपटाची कथा आणि पटकथा कलाकारांनाही सांगण्यात आली नसून चित्रीकरणाच्या प्रत्येक दिवशी थेट सेटवरच कलाकारांना प्रसंग सांगण्यात येत आहेत. चित्रपटातील ‘सस्पेन्स’ टिकवून ठेवण्यासाठी आणि कलाकारांमधील उत्स्फूर्तता जपण्यासाठी अनुरागने ही पद्धत अवलंबल्याचे सांगण्यात आले.
‘गिरीश कुलकर्णी यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेच, पण ही साधीसुधी भूमिका नसून खुँख्वार आहे,’ अशा शब्दांत स्वत: अनुरागनेच गिरीशच्या भूमिकेचं वर्णन केलं. याविषयी गिरीश म्हणतो, ‘अनुरागने ‘गंध’ पाहिला होता. त्यातला माझा अभिनय त्याला आवडला होता. तेव्हाच त्याने हिंदी चित्रपट एकत्र करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तो योग आता आला आहे.’ मात्र, या उपर ‘अग्ली’विषयी तो फारसे बोलायला तयार नाहीत. आपण कराराला बांधील असल्यामुळे याविषयी काही बोलता येणार नाही असे गिरीशने सांगितले.