Marathi Story – अधुरी कादंबरी… सुरुवात एका प्रेमाची..
माझ्या स्वप्नात तू, प्रत्येक श्वासात तू, हृदयाच्या स्पंदनात तू, नाहीस तर फक्त जीवनात तू.त्याला आवडलेली ही माझी पहिली चारोळी होती, केशव त्याचे नाव आणि मी राधिका. आम्ही बरीच वर्ष एकत्र शिकलो, पण तेव्हा त्याला माझी ओळख होती का नाही हे माहीत नाही पण मी पाहित्याच नजरेत त्याच्यात गुंतले होते. अतिशय हुशार सगळ्यांचा आवडता आणि गोड स्माइल असलेला मुलगा. सगळ्यांशी त्याची मैत्री होती सगळ्यांमद्धे मिळून मिसळून रहायचं. कुणाच्याही मनात त्याच्या बद्धल द्वेष असूच शकत नव्हता. माझा आणि त्याचा समोरासमोर बोलण्याचा योग तसा कधी आलाच नाही. कॉलेज संपले आणि आमचा त्या न होऊन होणार्या भेटण्याचा काळ ही संपला. चार वर्ष झाली गोरेगाव सोडून मीरा रोड ल शिफ्ट झाले होते मी आणि माझी फॅमिली. पण या चार वर्षात त्याची ती गोड छबी मनातून कधीच नाहीशी झाली नाही. अंतर फार नव्हते पण भेटीचा योग कधी आलाच नाही. कित्तेकदा मी काही न काही कारणाने गोरेगावला जात होते पण प्रत्येक वेळी, प्रत्येक वळणावर फक्त त्यालाच शोधणारी माझी भिरभिरी नजर हताश होऊन परत आली होती.
एकदा माझ्या आजोबांची प्रकृती जरा खालावली होती, त्यांना पहायला म्हणून मी पुन्हा एकदा गोरेगावला गेले होते. फार काही नाही वयानुसार होणारा सांधे दुखीचा त्रास. तरी माझ्या मनात त्यांच्या व्यतिरिक्त एतर काहीच विचार नव्हते. गेल्या चार वर्षात जे झाले नाही ते आता का होईल असा विचार करून मी नाका समोरची वाट धरून चालत होते. पण या वेळी देवाने काहीतरी नक्कीच योजले असावे, मी नजर वर करून पहिले आणि समोर तो उभा होता आपल्या मित्रांच्या घोळक्यात, त्याला असे अचानक पाहून माझा आनंद मनात मावतच नव्हता, क्षणभर तर माझा श्वास थांबला होता, मूर्खा सारखी मी एक टक फक्त त्याला बघत राहिले होते. कदाचित तो ही माला ओळखण्याचा प्रयत्न करत होता, त्याच्यावर खिळलेल्या माझ्या नजरेने त्यांचे ही लक्ष वेधले असावे.
तो तिथेच उभा होता आणि मी पुढे निघून गेले , पण फक्त त्या वळणावरच , कारण आयुष्यात मी पुढे कधी जावुच शकले नाही..
तुला जेव्हा भेटतो तेव्हा, तुला पाहताच रहावेसे वाटते आणि क्षणभर हे आयुष्य पुन्हा पुन्हा जगावेसे वाटते.त्याने लीहेलेली ही पहिली चारोळी कुणासाठी होती हे माहीत नाही पण आमच्या त्या भेटीचा तो क्षण आठवला की नकळत त्याची ही चारोळी माझ्या ओठांवर रेगाळू लागते. माझ्या आयुष्यातला तो एक अविस्मरणीय क्षण, माझ्या अधुर्या कादंबरीची सुरुवात ठरलं.