MarathiBoli Competition 2016 – माझा लढा
वैधानिक इशारा – या कथेतील सर्व कुत्रे काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही जिवंत अथवा मृत कुत्र्याशी संबंध नाही. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
दिवसाची सुरुवात गावाकडे कोंबड्याच्या बांगेने तर शहरात गिरणीच्या भोंग्याने व्हायची. पण गेले काही दिवस मी एक वेगळाच अनुभव घेत होतो. पहाटे पहाटे आमच्या सोसायटीत काही भटके कुत्रे तारस्वरात मैफल जमवायचे. त्यात आमचं घर पहिल्या मजल्यावर. मग काय? झोपमोड नक्कीच. थोडे दिवस सहन केले पण हळुहळू त्याचा त्रास दिवसभराच्या डोकेदुखीने होऊ लागला. ऑफिसच्या कामावर पण परिणाम होऊ लागला. तेव्हा ठरवलं कि या कुत्र्यांचा सोक्षमोक्ष लावायचाच.
वॉचमन कडे गेलो आणी त्याला विचारले “क्या आजकल ये भटके कुत्रे बोहोत आ रहे है सोसायटीमे. उनको भगाते क्यो नहीं?”
तो म्हणाला “हम तो साबजी full time यहि होते है. उपरसे सोसायटी के गेटपेभी लिख्खा है साबजी. DOGS NOT ALLOWED. वो तो पीछेकी दिवारसे कुद्के आते है”
भटक्या कुत्र्यांना इंग्लिश येतं?? मग मागच्या भिंतीवर पण एक बोर्ड लावून टाकूया का ‘DOGS NOT ALLOWED’ चा? माझ्या मनातला प्रश्न मनातच ठेवून मी म्हटलं “आगे से ध्यान देना. कुत्ता अंदर नाही आना चाहिये”
“जी साबजी”
पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. एकदा रात्री पिक्चर बघून उशिरा आलो तेव्हा बघितले हे वॉचमन साहेब मस्त खुर्चीत झोपले होते आणि एक मरतुकड कुत्रं त्याच्या पायापाशी बसून पहारा देत होतं. मी जवळ जाऊन त्या कुत्र्याच्या पेकाटात लाथ मारणार तसं ते जवळच अंधारात कुई कुई करत पळून गेलं. त्याच्या अश्या ओरडण्याचा वॉचमनच्या झोपेवर काडीमात्र परिणाम झाला नाही. मी संतापलो. त्या वॉचमनला झापणार इतक्यात हि म्हणाली “जाऊ द्या हो. तुम्ही एकट्याने ओरडल्याने काही होणार नाहीये. शेवटी कुत्र्याचं शेपुट ते. . वाकडं ते वाकडंच.” मलाही ते पटलं.
दुसऱ्याच दिवशी मी सोसायटीत तक्रार दाखल केली. सोसायटीने सभा घेतली. मी माझे मत सभेत मांडले. ” मित्रांनो. गेले काही दिवस या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे सोसायटीमध्ये. दिवस भर हे सोसायटीत फिरत असतात. सोसायटीच्या आवारात शी करतात. आपली सोसायटी घाण करतात. सोसायटीच्या गार्डनमध्ये फिरत असतात. हे खूप रिस्की आहे. तिथे मुलं खेळत असतात. जर कुणाला चावला तर किती महागात पडेल? मला माहितीये कि सोसायटीमधील काही प्राणी प्रेमी यांना खायला घालतात. पण ते चुकीचे आहे. या कुत्र्यांचे सोसायटीत यायचे सर्व मार्ग बंद केले पाहिजेत. तसेच वॉचमनना पण तश्या सूचना दिल्या पाहिजेत”
सर्वांना माझे म्हणणे पटले. माझे वयस्कर शेजारी म्हणाले ” व्वा. काय छान बोललात हो तुम्ही. एकदम खणखणीत आवाज! मला तर धर्मेंद्रची आठवण आली”
मीही हुरळून गेलो अन म्हणालो “कुत्ते मै तेरा खून पी जाऊंगा . तुम्हे सोसायटीमें आने नही दुंगा” सगळीकडे हशा पिकला.
दुसरे दिवशी रविवार होता. उशिरापर्यंत झोपायचा बेत होता. पण कसलं काय? सकाळी सकाळी त्या कुत्र्यांची ओरडा आरडी सुरुच. डोकं उशीखाली खुपसून झोपायचा प्रयत्न केला पण व्यर्थ. मग लक्षात आलं अरे हा तर कुत्र्यांचा आवाज नाहीये. हा तर माणसांचा आवाज आहे. उठून खिडकीजवळ गेलो अन माझी उरली सुरली झोप पार उडालीच. समोर चाळीस पन्नास माणसे माझ्या नावाने हाय हाय ओरडत होती. सर्वात पुढे उभा होता सोसायटीचा सेक्रेटरी!! बरोबर एक दोन पोलिस सुद्धा. माझ्या तोंडचे पाणीच पळाले.
“काय झालंय ?” बायकोचा प्रश्न.
मी निशब्द. काहीच कळेना. मग त्यांच्या घोषणा जश्या नीट ऐकल्या तेव्हा कळलं. प्राणीमित्र संघटनेने माझ्या घरावर मोर्चा आणला होता.
“आता हो काय करायचं?” हिचा पुढचा प्रश्न.
“म म मी बघतो ” मी उत्तरलो.
“अरे अपने घर में कुत्ता भी शेर होता है. बाहर आ.” बाहेरून आवाज येत होते.
खाली गेलो तश्या हाय हाय च्या घोषणा अजून वाढल्या. एक खाकी वर्दीवाला माझ्याकडे येउन म्हणाला “साहेब चांगल्या घरचे दिसता? कशाला पंगा घेऊन राहिलात या कुत्र्यांबरोबर?”
मी धीर एकवटून म्हणालो “जरा यांना शांत कराल का ? मग मी बोलतो. ”
त्याने इशारा करताच सर्वजण थांबले.
मी केविलवाण्या स्वरात शब्द जोडत म्हणालो “हे पहा. म म माझं या क क कुत्र्यांबरोबर काही वैर नाहीये. मला फक्त एवढंच वाटतं की. . ”
माझं बोलून पूर्ण व्हायच्या आत त्यांचा जो म्होरक्या होता तो किंचाळला ” याचं काही ऐकू नका. याने काल कुत्र्यांना धमकी देताना मी स्वतः ऐकलंय. हा त्यांना मारून टाकणार आहे ” पुन्हा घोषणा सुरु.
धर्मेंद्र मला एवढा महाग पडेल असा वाटलं नव्हतं. हतबल होऊन मी त्या पोलीसाला म्हणालो “बघा हो. मी कधी नाकावरची माशीही मारली नाहीये. आम्ही मध्यमवर्गीय. आम्ही काय कुणाला मारणार?”
पोलिस थोडा समजूतदार वाटला. म्हणाला ” साहेब, जाऊ द्या आता. जास्त ताणू नका. सॉरी म्हणून टाका. म्हणजे विषय संपला”
“हो हो बरोबर आहे. माफी मागून टाका. संपवा हे सगळं. माझ्या माहेरी कळलं तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही ” इति सौ. या परिस्थितीतही हि असे विचार कसे करू शकते देव जाणे?
मी धीर एकवटून म्हणालो “ठीक आहे. माझ्या बोलण्याने तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी तुमची माफी मागतो ”
“नाही नाही. यांनी कुत्र्यांचा अपमान केलाय. यांनी कुत्र्यांची माफी मागितली पाहिजे. आणि ती पण लेखी. ” मागून कोणीतरी ओरडलं.
कुत्र्यांची माफी? ती पण लेखी? कोणता कुत्रा ती वाचणार होता? पण सद्य परिस्थितीत मला यावर हसू हि येत नव्हतं. शेवटी त्या जमावाने लेखी माफीचा प्रस्ताव मान्य केला. मला जे सांगतील ते ऐकण्यावाचून गत्यंतर नव्हतं. मुकाट्याने सर्व मान्य करून मी लेखी माफी दिली. ते माफीपत्र सोसायटीच्या नोटीस बोर्डवर लावल्यावरच जमाव पांगला. पोलिस जाता जाता म्हणाला “साहेब जरा सांभाळून वागत जा हो ” म्हणतात ना ‘कुत्र्याचे जिणे अन फजितीला काय उणे’. माझं अगदी तस्सच झालं होतं.
तीन चार तासांचा खेळ एकदाचा संपला.
मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं वाटत होतं. एका कुत्र्याची नव्हे नव्हे भटक्या कुत्र्याची माफी? श्शी . काय बेक्कार दिवस होता तो. डोकं नुसतं भणभणत होतं. मुलही घरात भांबावून गेली होती. बायकोने घरी गेल्यावर डोक्यावर तेल थापलं.
घरात चूल पेटली नव्हती. बायको म्हणाली “पोरं उपाशी आहेत. काही जेवण पण नाही बनवलंय. हॉटेल मध्ये जायला हि वेळ बरोबर नाहीये. पण जाऊया का ? कदाचित बाहेर गेल्यावर बरं वाटेल”
मी काही न बोलता तयारीला लागलो. आम्ही खाली निघालो. बिल्डींग मधल्या लोकांच्या नजरा चुकवत निघालो स्कूटर काढली. वाटेत सिग्नलवर एका मर्सिडीज मधून एक डॉबरमन ऐटीत माझ्याकडे बघत होता. वास्तविक माझं भांडण या पाळलेल्या कुत्र्यांबरोबर नव्हतच. पण तरीही तो मला माझी खिल्ली उडवत असल्यासारखा भासत होता. तो एका मिनिटाचा सिग्नल मला एका तासासारखा वाटत होता.
मुलं मात्र एकदम खुश होती. आज अनपेक्षित पणे त्यांना हॉटेलमध्ये जेवायची पर्वणी साधून आली होती ना. शेवटी हॉटेलमध्ये पोहोचलो.सूप पिऊन झाल्यावर मी विचारले “काय खाणार?”
धाकटी किंचाळली “मला HOT DOG ”
इथे पण DOG?? माझी तळपायाची आग मस्तकात गेली. अन जोरदार धपाटा बसला तिच्या पाठीत. त्या डॉबरमन वरचा राग भलतीकडेच निघाला. झालं. रडरडीला सुरुवात.
“आता ह्या hot dog चा तुमच्या कुत्र्यांशी काही संबंध तरी आहे का? उगीच रडवलं पोरीला. सकाळ पासून बघतेय डोकं ठिकाणावर तरी आहे का तुमचं ” बायको.
अशा प्रकारे बायकोचा पाढा जो सुरु झाला तो काही संपेच ना.
त्यानंतर आपण तोंड अन डोळे बंद करू शकतो तसे कान बंद करण्याची सोय देवाने का बरं दिली नाही म्हणून मनातल्या मनात देवाला दोष देत राहिलो. अर्थात इथे चूक माझीच होती. पण नकळत घडलं हो असं. काय करणार ? दिवसच खराब होता.
घरी आलो. पण वातावरण निवळलं नव्हतं. घरात अन घराबाहेर सारखीच स्थिती होती. माझी अवस्था ‘धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का’ अशी झाली होती.
वेळ घालवण्यासाठी पेपरात डोकं खुपसलं. जिकडे तिकडे ‘पुरस्कार वापसी’च्या बातम्या! मनात आलं ‘सोसायटीत जो आज अपमान झालाय त्यासाठी आपणही असच काहीतरी केलं तर’. सोसायटीला काय परत करता येईल त्याचा विचार करू लागलो. पण सोसायटीने दिलेला एकमेव महत्वाचा कागद माझ्याकडे होता . तो म्हणजे सोसायटीचे शेअर सर्टिफिकेट !! मग तोही विचार मी केराच्या टोपलीत टाकला.
दिवस कसाबसा संपला. माझ्या आयुष्यातला एकमेव काळा दिवस होता तो. दुसऱ्या दिवशी उशीरच झाला ऑफिसला जायला. रात्रभर नीट झोप लागली नव्हती. त्यात सकाळी कुत्र्यांची मेहेरबानी. मग काय? कालचा hang over आजही होता. माझ्या चेहऱ्यावरचे भाव अजयने लगेच ओळखले. अजय माझा जवळचा मित्र. गेले पंधरा सोळा वर्ष आम्ही चांगले मित्र होतो. मला न विचारताच तो गरमागरम कॉफीचे २ मग घेऊन माझ्या डेस्कजवळ आला “काय झालंय? काय प्रोब्लेम आहे ?”
अन माझा कालपासून आवरलेला बांध फुटला. घडाघडा त्याला सर्व सांगून मी मोकळा झालो. तो उठला. खांद्यावर हात ठेवत म्हणाला “टेन्शन नको घेऊस रे. अरे कोणताही लढा म्हंटला कि संकटे हि येणारच. असा खचून नको जाऊस. आपण बघू या काय करायचे ते ” थोडा धीर आला. लढा! माझा लढा!! हा लढा आहे? व्वा. एकदम क्रांतीकारकांसारखं स्फुरण चढलं माझ्या मनात. आम्ही कामाला लागलो. थोड्यावेळाने अजय परत आला. म्हणाला “अरे तू म्युन्सिपालटीमध्ये तक्रार का नोंदवत नाहीस. ते कुत्रे पकडून नेतात”
अरे हो. हे मला का सुचलं नाही. पण सही आयडिया आहे. परत मी त्या कुत्र्यांशी दोन हात करायला तयार झालो. every dog has his day. आली रे आली आता माझी पाळी आली. पण या वेळेला मी जास्त सावधपणे काम करायचं ठरवलं. आठवडाभराची सुट्टी टाकली. मागच्या चुका परत करायच्या नव्हत्या. मी घरी आलो . एक सोसायटीचं लेटर हेड मिळवलं. कसं?? अरे मोहोब्बत और जंगमें सब जायज है. मग त्यावर एक अर्ज लिहिला. दुसऱ्याच दिवशी म्युन्सिपालटीच्या ऑफिसमध्ये गेलो. अर्ज दिला. त्यांना म्हणालो “साहेब यायच्या आधी जर मला फोन केलात तर मी स्वतः तुमच्या मदतीसाठी थांबीन.” साहेब पण खुष झाले.
दोन दिवसांनी फोन आला. मी घरीच होतो. पण मुद्दामून त्यांना दुपारी यायची विनंती केली. तेव्हा सोसायटीमधले सर्वजण ऑफिसला गेले असल्याने कामात अडथळा येण्याची शक्यता कमी होती.
ठरल्याप्रमाणे ते आले. सोसायटीत सामसूम होती. वॉचमन माझ्या सुदैवाने बँकेत गेला होता. रान मोकळं होतं. पंधरा ते वीस मिनिटात त्यांनी कुत्र्यांना पकडून गाडीत टाकलं. एक दोन कुत्रे भिंतीवरून पळून गेले. पण ठीकाय. सात आठ कुत्रे तरी पकडले. हेही नसे थोडके. मी जिंकलो. खूप खूष होतो मी. बायको माझे सर्व प्रताप बघत होती. पण मनातून तीही त्या कुत्र्यांना कंटाळलेली असल्याने शांत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळ शांततेत गेली. शुक्रवारी ऑफिसमध्ये जाऊन मी अजयचे आभार मानले. त्याची युक्ती यशस्वी झाली होती. त्याने खरंच खूप मदत केली होती मला. थोडी मनात भीती होती की सोसायटीत लोकांच्या लक्षात आलं तर लोक विचारतील. पण तसं काहीच घडलं नाही. हे थोडं आश्चर्यकारक होतं पण ते माझ्या पथ्यावरच पडलं. विक एंड पण घरच्यांसोबत एन्जॉय केलं. वातावरण आता निवळलं होतं.
एक दिवस अजयला ऑफिस सुटल्यावर पार्टी दिली. घरी यायला जर उशीरच झाला. बायको काहीच बोलेना. पार्टीला उशीर झाल्यामुळे वैतागली असेल कदचित. उद्या सकाळी बोलू असा विचार करून मी झोपी गेलो. तर सकाळी सकाळी परत कुत्र्यांचा गोंगाट सुरु. मी धावतपळत खिडकीपाशी गेलो. तर तेच कुत्रे परत समोर!!!
बायकोला विचारलं ” काय गं हे परत इथे कसे?”
“मला काय विचारताय ? म्युन्सिपाल्टीत जाऊन विचारा” ती भांडी आवरत म्हणाली.
“अगं . ते मी विचारीनच. पण काय झालं ते तर सांग ”
“काही नाही. काल दुपारी म्युन्सिपाल्टीवाले आले आणि कुत्र्यांना परत सोडून गेले”
“पण का? कोण काही बोललं का ? ”
तिने काहीच उत्तर दिलं नाही. मी परत सुट्टी टाकून म्युन्सिपाल्टीत जायचं ठरवलं.
साधारण अकरा वाजता स्कूटर काढली आणि गेलो.
ऑफिसमध्ये तेच साहेब बसले होते.
मी जरा चिडूनच म्हटलं ” साहेब, त्या कुत्र्यांना तुम्ही घेऊन गेला होतात मग परत का सोडलं सोसायटीत ?”
साहेबांना प्रश्न अनपेक्षित वाटला “म्हणजे तुम्हाला नियम माहित नाही काय ?”
“कसला नियम ?”
“अहो सर्व शहरातले कुत्रे इथे आणले तर ठेवणार कुठे ? आम्ही कुत्रे आणतो त्यांची नसबंदी करतो आणि परत जेथून आणले तेथे सोडून देतो” साहेब शिकवणीच्या स्वरात म्हणाले.
“काय? त्यांना मारत नाही?”
” अहो काहीतरी काय बोलताय ? असं कसं मारणार ? आम्हाला कायद्याच्या पुढे काही करता येत नाही ”
“अहो पण म्हणजे पुढची आठ दहा वर्षे ते मरेपर्यंत तिथेच राहणार ? आणि तो पर्यंत आजूबाजूचे दुसरे यायला लागले तर ?”
“मग मी काय करू ? त्यांना माझ्या घरी नेऊ का ?” साहेब आता वैतागायला लागले होते.
“अहो पण नसबंदी ने काय होणारेय. ते कोणाला चावले तर?” मी.
“चावला का ?”
“अहो पण चावणार नाही याची काय खात्री?”
“एक काम करा. जर चावला तर पेशंटला म्युन्सिपाल्टीच्या हॉस्पिटल मध्ये न्या. त्याला तेथे फुकट इंजेक्शन मिळेल” साहेब भडकले
“पण. . ” साहेब तोंडात पान कोंबेपर्यंत मी एवढंच बोलू शकलो.
साहेबांचा पट्टा परत सुरु झाला ” हे बघा. तुमच्या अर्जावर योग्य ती कारवाई झालीय. आम्हाला काय करायचं ते तुम्ही शिकवू नका. सकाळी सकाळी कुठून येतात काय माहित? स्वतःला नियम माहित नाहीत आणि मला शिकवायला निघालेत”
त्या साहेबांच्या पट्ट्यापुढे भिक नको पण कुत्रं आवर अशी अवस्था झाली. जड पावलांनी मी बाहेर आलो. जरा गरगरल्या सारखे वाटले म्हणून बाहेरच्या एका बाकावर टेकलो. इतका वेळ माझी दुरून गम्मत बघणारा चपरासी माझ्या जवळ येऊन बसला. म्हणाला “साहेब. ये इंडिया है. यहां आदमी कुत्तेकी मौत मरेगा तो चलेगा मगर कुत्ता नही मरना चाहिये.” त्याच्याकडे पाहत मी केविलवाणे हसलो अन निघालो. बाहेर आलो. माझ्यासमोर एक काळं कुत्रं तीन पायांवर उभं राहून माझ्या स्कूटरच्या टायरला आंघोळ घालत होतं. मला पाहताच शेपटी हलवत दूर निघून गेलं.
–अमेय मठकर