1BHK Required – Marathi Story

0
343
Marathi Story – 1 BHK Required

Marathi Story – 1 BHK Required

लेखक – मंगेश उषाकिरण अंबेकर

“Urgently Required 1BHK for Couple” रविवारच्या आळसावलेल्या सकाळी, सोफ्यावर उताणा झालेल्या मकरंदने ग्रुपवर आलेला मॅसेज वाचला आणि त्याचे सुस्तावलेले डोळे पूर्ण उघडले.

“आता एवढा मोठा 3BHK असतांना, याला कशाला हवाय 1BHK…. असो कदाचित मित्रासाठी हवा असेल”

आपला खास मित्राला ‘का? कसा? कोणासाठी?’ असा कुठलाच “क” श्रणीतला प्रश्न न करता, मकरंदने काल एका मार्केटिंग ग्रुपवर आलेला “1 BHK available” चा मॅसेज निशांतला लागलीच फॉरवर्ड केला.

“Thanks Makya” निशांतचा लागलीच रिप्लाय आला.

दोन दिवसानंतर कारच्या डिक्कीत काही भांडे टाकतांना निशांत दिसला.

“कसा आहेस रे? काय धावपळ एवढी?” मकरंदने आवाज दिला.

“अरे मक्या, काही विशेष नाही रे?” निशांत फक्त एवढंच बोलून परत आपल्या कामात गुंतला.

“बुक केला रे 1BHK?”

“अरे हो, Thanks for your immediate help, चल थोडा गडबडीत आहे बोलूया निवांत”

“OK Dear” मकरंदनेही त्याची गडबड बघून त्याचा निरोप घेतला.

निशांत खरंतर गडबडीत मुळीच नव्हता; फक्त मकरंद कडून येणाऱ्या पुढ्याच्या प्रश्नापाई त्याने तिथून काढता पाय घेतला. “कोणासाठी हवा होता १ BHK?” या त्याचा पुढल्या अपेक्षित प्रश्नाला त्याच्याकडे उत्तर द्यायचं धाडस नव्हत.

गाडी सुरु केली आणि डोक्यात घोंगावणाऱ्या प्रश्नांसोबत तो निघाला. दोन-तीन किलोमीटरच्या अंतर कापून गाडी एका सोसायटीपुढे येऊन थांबली. सामान लिफ्टने तिसऱ्या मजल्यावर आणले आणि डोरबेल वाजवली.

दार उघडल्या गेलं, किलकिल्या नजरेने सर्व सामानावर नजर टाकत, “हे काय, कळशी आणि पातेलंच आणलं, तुळस नाही आणली?”

“Ohhh, I am really sorry Mumma, उद्या आणतो नक्की.”

“असो….हे उद्या डॉक्टरकडे गेले की घेऊन येतील, उगाच माझ्या नवऱ्याला पळवलं म्हणत मुग्धा मला शिव्या घालेल.”

“हे काय मम्मा, आता मुग्धा कुठून आली इथे”

“वसुदे, बस झालं आता. त्याला आत तरी येऊ दे. अग तुझ्या मनाप्रमाणेच झालं ना आता सर्व.” पप्पा आतून मम्मीवर सौम्य आवाजात कडाडले.

“पप्पा मी येतो, अरु झोपणार नाही मी गेल्याशिवाय” अजून वाद नको म्हणून निशांतने बस्तान हलवले.

“ठीक, दमाने जा.”

“जेवण तरी झालं का?” चिरक्या स्वरात मम्माने विचारले.

“हो, करून आलोय. पप्पा काहीही हवं असल्यास फोन करा, चला निघतो मी आता bye, good night.”

“जपून जा.” या मम्माच्या निरोपावर फार लांबुन “हो” मिळाला.

“वसुदे आता थांबवा आता ही भांडणं.” वसंतराव समजावण्याचा प्रयत्नात होते.

एका दिवशी ऑफिसवरून आलेल्या निशांतला सोसायटीच्या गेटवर मकरंद भेटला. “काकांची तब्यत ठीक ना रे आता?”

“हो, एकदम OK आता, महिना झाला ऑपरेशन करून. हा पण follow up चालूच ठेवायचा सांगितलंय डॉक्टरांनी. ” निशांतने लागलीच उत्तर मांडले.

“ते चालायचं, काळजी घे. By the way तू त्यांच्यासाठी 1BHK रेंटवर घेतला असं कळलं.” शेवटी मकरंदने जो प्रश्न करायला नाही हवा होता तोच निशांत पुढे मांडला.

“हो रे…..त्याचं काय आहे ना….. अरुल फार त्रास देतो…. दोघांना…… त्यामुळे मुग्धाने…. सुचवलं.” निशांतने दिर्घ विचारांती कारण शोधत अडखळत उत्तर मांडलं.

“तसं असलं तर ठीक आहे. त्यांची काळजी घ्यायला हवी. नाहीतरी हल्ली 1BHK, new couple साठी कमी आणि old age साठीच जास्त मागितली जातात.” मकरंद निशांत सोबत मुग्धालाही चांगला ओळखत होता.

निशांतने मकरंदच्या बोलण्याचा रोख ओळखला. चेहऱ्यावर उसनं हसू आणून, “नाही रे नाही” म्हणत त्याचा निरोप घेतला.

निशांत जसा आपल्या घरात आला तशी मुग्धा अरुलला घेऊन, अरुलच्या मित्राच्या बर्थडे पार्टीसाठी बाहेर पडली. त्यांना निरोप देऊन निशांतने दार बंद केले आणि सोफ्यावर टेकला. तितक्यात लाईट गेली आणि घरात अंधार पसरला आणि त्यासोबत पसरली एक अनामिक बोचरी शांतता…

कित्येक दिवसापासून मम्माने मागितलेली तुळस निशांत आजही सपशेल विसरला होता. तो सोफ्यावरून उठला आणि थेट बाल्कनीत गेला. तिथं फक्त दिवा तेवत होता. तडक मुग्धाला फोन केला.

“अग तुळस कुठे आहे?”

“तुळस… ती तर पप्पांनी नेली. तू घरी यायच्या जस्ट दहा मिनिटे घेऊन गेले.”

“तुला सांगावसंही वाटलं नाही, की पप्पा येऊन गेले ते.”

“अरे ते गडबडीत होते आणि मी पण ….विसरले सॉरी.”

निशांत आहे तसाच परत हॉलमध्ये येऊन निपचित सोफ्यावर पडून राहिला. त्याची नजर हॉलच्या काचेच्या दरवाज्यापार बाल्कनीत ठेवलेल्या निरंजनावर गेली. सर्वत्र तिमिर पसरलेला असतांनाही त्या इवलश्या निरंजनाचा प्रकाश संपुर्ण गॅलरीतल्या त्या तिमिरावर भारी पडत होता. घरात आज खरचं कोण पोरकं झालं होतं; तुळशीला प्रकाश देणारा निरंजन? का तुळस?

पण खऱ्या अर्थाने पोरकं झालं होतं, ते म्हणजे निशांतच ते घर. जेथे ना निरंजनासम प्रकाश देणारे नव्हते, ना घराला पूर्णत्व देणारी तुळस होती. विचाराची कालवाकालव निशांतच्या डोक्यात सुरू झाली.

त्या रात्री मुग्धा आणि अरुल बरेच उशिरा परतले. झोपीही गेले पण निशांतला त्या रात्री झोप काही आली नाही. त्याच्या डोक्यात नुसता मकरंदने टाकलेला ओल्ड एजचाच विचार घोळत होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी निशांत आवरून ऑफिसला न जाता थेट मम्माकडे गेला. वसंतराव सकाळीच मेडिकल रिपोर्ट आणण्यासाठी बाहेर पडले होते.

“मम्मा, पप्पा कुठे गेलेत?”

“अरे रिपोर्ट आणायला गेलेत, तू आज सकाळीच कसा ऑफिस नाही का आज.”

“नाही, I mean आहे. पण आज ऑफीसला जायचा मूड नाहीये.”

“का?”

“का.. ते आज अमावस्या आहे ना, त्यामुळे मूड नाही.”

“हे काय आज लहान मुलासारखं.”

“मुळात मी तुम्हाला घेऊन जायला आलोय”

“तूझ्यासाठी पोहे करते, गपगुमान खा आणि जा ऑफिसला. मी काही तिच्या घरात पाऊल ठेवणार नाहीये.”

“आज काहीही होऊ दे, मी तुम्हाला घेऊन गेल्या शिवाय राहणार नाही.” निशांतचा निश्चय बघून मम्माला काहीस गलबलून आलं.

“निशांत कधीकधी फक्त एकच विचार छळतो की आम्ही इमोशनल फुल तर नव्हतो ना. सावत्र मुलगी असती तर ती पण अशी वागली नसती, अशी माझ्या पोटाची मुग्धा माझ्याशी वागली आहे. मुग्धा सहा महिन्याची असतांना, मुग्धाला आणि माझ्या नोकरीला सांभाळत तारेवरची कसरत होऊ लागली होती, म्हणून काळजावर दगड ठेवत मुग्धासाठी पाळणाघराचा विचार पक्का केला. दोन दिवस कसेबसे काढले. शेवटी आपल्या बाळाला असं आपल्यापासून दूर ठेवलं नाही गेलं आणि मी पुढल्या चार दिवसात मुग्धाखेरीज कशाचाही विचार न करता नोकरी सोडली. त्यादिवशी मला खूप वाईट वाटलं, खूप रडले. उगाच स्वतःहून मनाला समजावलं होतं की, आज आपण पाळणा घरात ठेवलं तर उद्या आपली पोर आपल्यासाठीही असाच पाळणाघर शोधणार.

बघता बघता मुग्धाचा शिक्षण झाल, चांगली नोकरी लागली, तुझ्यासारखा घरी एक गुणी मुलगा भेटला, तुमचं लग्न झालं. मुलासारखं जावई भेटला. त्यादिवशी वाटलं होतं मिळवलं सगळं काही. आता आयुष्याकडून काही एक नको.

तुझी आई होती तो पर्यंत मुग्धाचं काम आणि अरुलचा सांभाळ, सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. तुझ्या आईच अवेळी निधनानंतर मुग्धाचं सगळं विस्कळीत झालं. नोकरी आणि मुल यात होणारी तारांबळ मला माहित होती. मुग्धाचं रोजचा त्रागा ऐकून शेवटी आम्ही तुमच्या घरी शिफ्ट होण्यासाठी कव्हीन्स केलं. आज मुग्धाच्या जागी अरुल होता. अरुलला पाळणाघरात राहावं लागू नये म्हणून मी तुमच्या घरी यायचा निर्णय घेतला. वयामानानुसार पूर्वी सारखी बाळाच्या मागची धावपळ होतं नव्हती, पण माझ्याकडून जेवढं झेपेल तेव्हढं मी काम करत होते.

पण मला वाईट तेव्हा वाटलं जेव्हा माझ्याच मुलीला मी तिच्या घरात नकोशी झाली. सुनेला सासूची लुडबुड सहन होत नाही हे एक वेळेस ठीक आहे पण मुलीलाही आईची लुडबुड सहन न व्हावी याचं आश्चर्य वाटल. मुग्धा अशी नव्हती रे कधी!” बोलता बोलता मम्माचे डोळे भरून आले होते. मुग्धा विषयी तिचा राग शांत होत नव्हता.

इतक्या वेळ निशांतने शांतपणे मम्माच सगळं काही ऐकून घेतलं. मम्माच्या डोळ्यातून ओघळणारे पाणी आपल्या रुमालाने पुसत निशांतने मम्माला हळुवारपणे मिठी मारली.

“मम्मा तुम्ही मला कधीच जावई मानलं नाही. नेहमी तुमच्या मुलासारखं मला वागवलं. लग्न झालं तेव्हा तुम्हाला मुलगा भेटला म्हणून तुम्ही सर्वांना सांगत होत्या आणि मी इकडे मनोमनी मला अजून एक आई भेटल्याच्या आनंदात होतो. पण आज मुग्धा मधल्या बदलाचा विषय निघालाच आहे म्हणून तुम्हाला एक मुलगा म्हणून विचारावस वाटतं.”

“मम्मा तुम्हाला माहीत आहे माझी आई कोणामुळे मला सोडून गेली?”

निशांतने केलेल्या प्रश्नांवर मम्मा एकदम गडबडून गेली. निशांतच्या या प्रश्नाच्या उत्तराचा रोख मुग्धाकडे असू नये, म्हणून मम्मा स्वतःला सावरत पदराने आपले अश्रू टिपत शांत झाली. विषय बदलावा म्हणून ती जागची उठून निशांतला म्हणाली “थांब मी तुझ्यासाठी चहा आणते.”

निशांतने मम्माचा हात पकडून परत खाली बसवलं, “नको मला चहा तुम्ही बसा तुम्हाला उत्तर सांगतो. तुम्ही मला जर खरंच मुलगा मानत असाल तर रागावणार नाही.”

निशांतच्या जोरापुढे मम्माचा विषय बदल कमकुवत पडला.

“मम्मा, आई मला फक्त नि फक्त मुग्धा आणि तुमच्यामुळे सोडून गेली. पण तुम्हाला हेही सांगतो मला तुमच्या दोघांबद्दल माझ्या मनात आज काडीमात्र द्वेष नाही.”

मुग्धाने आईची केलेली गैरसोय मम्माला ठाऊक होती. खापर मुग्धावर कधी ना कधी फुटणार ह्याची पण जाणीव होती. पण मुग्धा सोबत स्वतःवर आलेला आळ पाहून मम्माच्या पायची जमिन सरकली, घशाला कोरडं पडली, छातीचे ठोके बाहेरपर्यत ऐकू यावे एवढया जोराने धडकू लागले.अंगातून त्राण निघून गेला. ती डोळे विस्फारून निशांतकडे बघत राहिली. सगळं सुन्न झालं. एकदम जीवघेणी शांतता पसरली.

पुढे कुठलाही चढा सूर न लावता, अगदी हळुवारपणे निशांत मम्मासमोर व्यक्त झाला. “मम्मा, तुम्ही जसं म्हणतात तशी मुग्धा खरचं कधी नव्हती मुळी. पण तुम्हाला आपल्या पोटच्या पोरीतील हा बदल जाणवायला इतका कसा उशीर झाला?

आमचं लग्न होऊन तब्बल वर्ष उलटलं होतं, तो पर्यन्त सगळं सुरळीत चाललं होतं, पण जसजसं मुग्धाचं माहेरी येणंजाणं वाढलं तसतसं सासरी आईसोबत छोट्याछोट्या कारणांहुन कुरबुरी वाढल्या.

मुग्धासाठी तुम्ही जे काही केलं, जे शिकवलं ते मुलीच्या प्रेमापोटी केलं. त्याबद्दल माझ्या मनात कही राग नाही कारण जगात कोणतीच आई आपल्या मुलांचं कदापि वाईट चिंतु शकत नाही. शेवटी आई ही आपल्या मुलांचं हितच जपत असते. पण मुलांचं हित जपताजपता आपण त्यांना आणि त्यांच्या भविष्याला अधू तर करत नाही ना, हे विसरून जाता कामा नये. आणि तुमच्याबाबतीत ‘इथेच माशी शिंकली’. तुमची शिकवण मुग्धाच्या इतक्या अंगवळणी पडली की तिला आईच्या छोट्याछोट्या गोष्टींचा तिरस्कार वाटू लागला.

ज्या वेळेस मुलगी आपल्या सासरचे गाऱ्हाणे आपल्या आईसमोर मांडते आणि आई मुलीच्या प्रेमापोटी तिला “सासरी मन जिंकायची कसं?” च्याऐवजी “सासरी राज्य करायचं कसं!” हे शिकवते त्यादिवसापासून मुलीच्या संसाराची खऱ्या अर्थाने वाट लागायला सुरवात होते.

तुम्ही नेहमी मुग्धाला सासुवर विजय कसा मिळवावा? हे शिकवण्यापेक्षा, सासूची लेक कशी बनून राहावं हे शिकवलं असतं तर आजच चित्र काहीतरी वेगळं असतं. ” बोलता बोलता निशांतच्या दिर्घ उसासा सोडला. तेवढ्यात मानखाली घालून शांतपणे ऐकत असलेल्या मम्माने तिच्यावर घेतल्या गेलेल्या आरोपाच खंडण करण्यासाठी निशांतला सौम्य आवाजात एक प्रतिप्रश्न केला.

“निशांत तुला नाही का वाटतं की तुझ्या आईकडून बऱ्याच चुका झाल्यात. मुग्धाला परक्यांसमोर वेळोवेळी अपमान सहन करून घ्यावा लागायचा. हे बघ ज्या वेळेस सासू इतरांसमोर सुनेची बाजू घेऊन, तिच्याकडून झालेल्या चुकांना मोठ्या मनाने पोटात घालते. त्यादिवशी सुनेची मुलगी होते.”

“मान्य आईकडून ही काही चुका झाल्या. नको त्या ठिकाणी नको त्यावेळी मुग्धाला अपमान सहन करावा लागला. पण तुम्हाला नाही वाटतं का, तुम्ही या सहा महिन्यात केलेल्या चुका त्यापेक्षा काही वेगळ्या नव्हत्या. मुग्धाला, तुम्ही तिचा माझ्यासमोर केलेला अपमान, आईने लोकांसमोर केलेल्या अपमानापेक्षा जड वाटतो.

मुळात काय तर मुग्धाचं बदलली आहे ही सत्य परिस्थिती.” निखिलच्या या प्रश्नापुढे मम्मा निरुतरीत होती.

“ज्या व्यक्तीला वाटतं की, ‘कोणतीच सासू ही सुनेची आई बनू शकत नाही’, त्या व्यक्तीला ‘कोणतीच सून ही त्या घरची मुलगी बनू शकत नाही’ हे ही तितकंच खरं का वाटू नये. सासूची आई होणं आणि सुनेची मुलगी होणं हे फक्त नि फक्त परस्परांशी असणाऱ्या अपेक्षांच्या ओझ्यावर आणि मी’पणावर अवलंबून असतं.

‘एकतर मी नाहीतर आई?’ या मुग्धाच्या अटीवर आमचं महिनाभर जोरदार भांडण चाललं. आई माझ्यासोबत नसणं हे माझ्या बुध्दीला अमान्य होतं. दरवेळेस माझं उत्तर ‘आई’असूनही मुग्धा या घराबाहेर पडली नाही. शेवटी या रोजच्या त्रासाला वैतागून आईनेच आम्हाला सोडून एकटं राहायचा निर्णय सांगितला. त्या संध्याकाळी सर्व सामान जमा केलं आणि त्यारात्रीच काळाने तिच्यावर घात केला. कदाचित तिला खरचं कळलं होतं की आपला वेळ संपला आहे.

आई होती तोपर्यंत मी मुग्धाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण तुमच्या शिकवणी पुढे आणि मुग्धापुढे मी हात टेकले. त्यानंतर मला मुग्धाकडून ना कोणत्या अपेक्षा उरल्या ना काही प्रेम. फक्त अरुलसाठी माझा देह या घरात वावरत होता.

आई गेल्यानंतर, अरुलला सांभाळण्यात मुग्धाची आणि माझी खूप दमछाक झाली. पण तरीही मुग्धाच्या चेहऱ्यावर मुक्ततेचा आविर्भाव खूप झळकत राहिला. आता कोणाचंच वेसण नको होतं अगदी माझही नाही. मुक्त, स्वतंत्र असणं हा सर्वांचाच अधिकार आहे आणि तो असयालाही हवा.

आई गेल्यावर मुग्धाने अरुलची गाऱ्हाणी तुमच्यासमोर मांडू लागली. ‘मुलीला त्रास नको’ म्हणत तुम्ही इकडे कायमचं येण्याचा निर्णय घेतला. खरं सांगतो, जेवढा मुग्धाला आनंद झाला तेवढाच मलाही. कारण या घराला मोठ्यांचे आशीर्वाद कायम लाभावे हीच माझी इच्छाही होती. पण तुम्ही आलात आणि मुग्धा पूर्णपणे तुमच्यावर विसंबून गेली.

शरीराने स्वतंत्र असणं आणि विचाराने स्वतंत्र असणं यात मुग्धाची घफलतचं झाली म्हणा. काळाचे फासे उलटे पडले. अखेर तुमची शिकवण मुग्धाची लाइफस्टाइल बनली आहे आणि तिला सहा महिन्यातच तुम्हीही नको झाल्या.

आता तुम्हीच सांगा मुग्धा बदलली? का?

माझ्या आईचं जे झालं तस तुमचं होऊ नये म्हणून माझा जीव तुटतोय. आता तुम्हा दोघांना मी गमावू नाही शकणार.”

मम्माच्या डोळे डबडबले होते. एवढं कळून सवरूनही निशांतला तिच्याबद्दल काहीच द्वेष नव्हता हेच तिच्यासाठी लाजिरवाण आणि जिव्हारी लागण्या सारखं होतं.

“मला माफ कर निशांत.खरचं मी नकळत मुग्धाला फार वेगळ्या वाटेवर आणून ठेवलं. तिला सर्व सुख द्यायच्या नादात, मी तुमचा हसता खेळता संसार मोडला. माफ कर पण मी त्या घरात पाय ठेवायच्या लायकीची उरली नाही.”

“Please don’t be sorry mamma तुम्ही प्लिज माफी नका मागू, तुम्हाला खरचं काही वाटतं असेल तर तुम्ही फक्त एक करा.” निशांत मम्माच्या पुढे गुडघ्यावर बसून त्यांचे हात आपल्या हाताने घट्ट धरत बोलला.

“आता अजून काय करू निशांत.” हळव्या स्वरात मम्मा बोलली.

“घरी चला आणि मला माझी पूर्वीची मुग्धा परत करा. हे फक्त तुम्हीच करू शकतात….. निदान आपण अरुलच भविष्य तरी……”

मागून टाळ्यांचा आवाज आला तसं दोघांची नजर दाराकडे गेली. दारात पप्पा भरलेल्या डोळ्यांनी, हसतमुखपणे टाळ्या वाजवत बोलले, “नशीबवान आहेस वसुदे. चला आवरा, मुग्धाची परत पाळणाघरापासून सुरुवात करायला हवी.” मम्मा आणि निशांत आपले ओलावलेले डोळे पुसत-पुसत अगदी खुलून हसले.

निशांतने दुसऱ्या दिवशी सकाळी मकरंदला सहकुटुंब फोटोसोबत एक मेसेज पाठवला, “मक्या, तुम्हां सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा….आणि हो 1BHK Vacant. Thanks”

त्यावर मकरंदने थम्सअप करत मस्तपैकी दोन चमकदार हसऱ्या smiley पाठवल्या.

समाप्त

मंगेश उषाकिरण अंबेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here