Marathi Kavita – Baba – बाबा
कवयित्री – श्रीमती रचना रामदास रेडकर
हॅलो, बाबा फोन केला होता का मला
नेटचा प्रॉब्लेम आहे म्हणून डिस्कनेक्ट झाला
तुमच्या पर्यंत रेंज जाते का इकडची
सारखा फोन करते पण बेलच वाजत नाही तुमची
कुठे आहात बाबा आता
शोधत फिरते आहे मी तुम्हाला
तुमचा पत्ताच नाही सापडत
गुगल च्याही मॅप ला
कसे आहात बाबा तुम्ही
झोप लागते का आता तुम्हाला
नेहमी तुमची तक्रार असे
झोपच येत नाही ग मला
कोणता एवढा विचार करता
कोणती कोडी सोडवता आता
वर्तमान पत्रातील कोडी सोडवणे तर
तुमच्या हातचा मळ होता
बाबा आता वेळ आहे का तुम्हाला
आमच्याशी गप्पागोष्टी करायला
नातवंडांना खूप गोष्टी सांगितल्यात
खजिनाच रिता केलात तुमच्या आठवणींचा
काबाड कष्ट केलेत शेतीत
घाम गाळला मातीत
एकनिष्ठ राहिलात
सर्व नाती गोतीत
शिक्षणाचे व्यायामाचे महत्त्व
नाही सांगितलात बोलून
सर्व काही दाखवलेत
ते कृतीतून दाखवून
तुमची साधी राहणी उच्च विचारसरणी
अनुभवले सर्व आणि सर्वांनीच
ताकतीचा केला नाहीत कधी गर्व
सर्वांनाच मदतकरून जिंकलात आयुष्याचे पर्व
सांगत होतात सारखे आईला
फोन लाव ना जरा बायला
बाय येईल का आता घरी?
तिच्या आई बापाला भेटायला
बाय आता सासरी गेली
वेळ काढून ये ना कधीतरी
आंबा माय बापाला
घेऊन जा ना तुझ्या घरी कधी तरी
आई बाबा आई बाबा
करणारे आमचे लेक
विसरलीस का ग तू
माहेरच्या गरिबाच्या घराला
बाबांनी नाही पुरवले कधी तुझे लाड
आणि तुम्ही कधी नाही केलास कशाचा हट्ट
म्हणूनच आयुष्यात उभी आहेस
पाय धरून वाटतं
बाबा, तुमचा हवा होता आम्हाला सहवास
तुमची वाट पाहते दाराकडे लावून आस
पाठीवरती हात आशीर्वादाचा
ठेवाल का कधी या आयुष्यात
विश्वास दाखवून लेकींवर
आत्मविश्वास वाढवलात मुलींचा
आत्मनिर्भर केलात लेकींना
जगण्याची कला पण शिकवलीत बहिणींना
असं कसं बाबा काही न बोलताच
फोन कट केलात
मनातलं सारं बोलायचं
मनातच ठेवून गेलात ……….
श्रीमती रचना रामदास रेडकर ( प्रशिक्षिका)
चारकोप गाव मराठी शाळा कांदिवली(प )