Marathi Kavita – Tu Gelyavar – तू गेल्यावर
कवयित्री – सौ. विशाखा जेवळीकर
घरातील कर्ता पुरुष गेला की त्याची सगळी नाती खचतात . कोरोना कळात हे प्रकर्षाने जाणवले.कर्ता पुरुष गेल्यावर प्रत्येक नात्यातली पोकळी एका एका कडव्यात संगायचा प्रयत्न…
का रे गेलास निघुन,इतक्यात बाळा दूर
हसू हरपले आता,उठे ऊरात काहूर
गेला आधार हा आता ,झाले जीवन भकास
मायबाप झाले दु:खी,अडे हुंदक्यात श्वास
होता भाऊ पाठीराखा, घाले प्रेमाने तो जेऊ
सूनी भाऊबीज आता, राखी कुणासाठी घेऊ?
रोज वाटते तू दादा आता येशील परत
छोट्या छोट्या गोष्टींसाठी पुन्हा भांडण करत
आले ओलांडून माप, होता हातामध्ये हात
झाले गोकुळ घराचे,केली दु:खांवार मात
सख्या गेलास सोडून कशी मनाला सावरू?
होता संसार दोघांचा कशी एकली आवरु?
दुडूदुडू धावताना बाळ पाहे हा वळून
का येईना आज बाबा मला घ्यायला उचलून?
बाबा तुझी परी झाली अचानक मोठी
येई खेळता खेळता बाबाचेच नाव ओठी
तुलाही होती जगायची भरभरुन ही नाती
थांबवणे तुला नव्हते,कसे कुणाच्याच हाती
दिस जातिल हे आता,मग वर्ष सरतील
तुझ्या आठवांचे मोती माळ गुंफित जातील
— सौ. विशाखा जेवळीकर