Marathi Kavita – मराठी कविता : गांधारी ग,

0
2569

Marathi Kavita – मराठी कविता : गांधारी ग,

marathi-kavita-gandhari

गांधारी ग,

कसं मॅनेज केलंस स्वत:ला?

संयमाचा इतका कडेलोट

जगण्यातल्या प्रत्येक क्षणात असतांना?

पण ही निवड तुझी स्वत:ची नसावीच

कारण तुझ्या हातात असतं तर,

डोळस पर्यायाचं भवितव्यच कोणतीही आई निवडेल खात्रीनं..

आणि मग अविचाराच्या रस्त्याने गेलेला इतिहास बदलला असता अगं,

विकलांग फक्त शरीर नाही तर मन, बुद्धी आणि आत्माही

सहजीवनातली अनेक सत्यं खरंतर सोबतीशिवाय कोणालाही उमगत नाही.

आणि मग तू जे केलंस, ती मात्र तुझीच निवड होती

विद्रोहाची दाहक ठिणगी तुझ्या जगण्यात सोबत होती.

केलास आयुष्याचा सतत यज्ञ

अखंड धगधगणारी संपूर्ण साधना

येत्या जात्या क्षणांमधला न थांबणारा वादळ-वणवा.

बंद ओठांआड संचीत पेलतांना

डोळ्यावरची पट्टीच सुरक्षित वाटली तुला

पण सांग ना..

आतून उसळणारे अनंत प्रवाह

जीवघेणे भोवरे होऊन

तुझंच अस्तित्व गिळून घेत होते

तेव्हा कसं ग सावरलंस तू स्वत:ला?

मला माहीत आहे,

कदाचित नाहीच आलं तुलाही सावरता

आणि म्हणूनच आमच्या प्रत्येकीच्या मनात

आजही एक गांधारी आहे कुठेतरी

संयमित ओठांनी, मनातल्या मनात धुमसत

स्वीकारलेली वेदना साहते आहे.

आणि गांधारी ग,

प्रत्येकीला एकदातरी लख्खपणे समजतेस तू

आणि तुझी संवेदना

चिरंतन प्रवाही आहे अजूनही तुझी विद्रोह वेदना!

-अनन्या 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here