लेखिका : रेश्मा दास
संपर्क : rmsans26@gmail.com
विसावा – Marathi Katha Visava
किलकिल्या नजरेने माझ्याकडे पाहत पदराआड काहीतरी लपवत लगबगीनं तिनं स्मशानाची मागची भिंत ओलांडली. कुतूहल वाटावं असंच काहीतरी होतं तिथे. जराही चाहूल लागू नये आशा अलगद पावलांनी सरणासाठी ठेवलेल्या त्या लाकडांच्या ढिगाऱ्याकडे गेले. तिथेच एका ओंढक्याला टेकून जीर्ण झालेल्या लुगड्याच्या पदारातून थरथरत्या हाताने नैवेद्याचा उणा-पुरा घास अधाशासारखा खात बसलेली आजी दिसली.
ह्या दृश्याने मीच एक स्तब्ध ओंढका झाले.
नैवैद्य खावून पुन्हा एक वळसा घालून ते अर्धपोटी पोट अनवाणी पायानं समशानभूमीत शिरलं.
स्मशान मात्र सुसज्ज, जवळ जवळ एक एकरभर जागेत झाडे लावून,फरश्या टाकून,खेळाच्या मैदानात असतात तशा पायऱ्या, त्यावर तात्पुरत्या दुःखी माणसांसाठी भक्कम छत, एका कोपऱ्यात जुना आड, आडाशेजारी दगडी देवळात दगडी महादेवाची पिंड, त्याशेजारी नितांत वाहणारे चार पाण्याचे नळ. दुसऱ्या कोपऱ्यात वीज-दाहिनी – धावपळीच्या जीवनातील इन्स्टंट काम सोबत प्रदूषणाला आराम. –असो—
प्रवेश द्वाराच्या डाव्याबाजूस लाकडासहित अंत्यविधीच्या वस्तूंचा फॅशनेबल सेल.
उजव्या बाजूस तीन बाय सहाचे दोन चौथरे. लोक त्याला विसावा म्हणतात. अम्ब्युलन्स मधून प्रवेशद्वारापर्यंत आणलेले प्रेत विसाव्यासाठी किंवा अंत्यदर्शनासाठी एक दोन मिनीटे तिथे टेकवतात. दहनानंतर परतताना दोन चार दगडाचे खडे पुन्हा विसाव्याजवळ टाकून नमस्कार करून लोक आपापल्या घरी जातात. मला यामागचे शास्त्र माहीतही नाही.
पण पुन्हा भिंत ओलांडून आलेली आजी विसाव्याजवळ मोठ्या झाडाच्या बुंध्यामागे बसली. तासाभरानंतर कोणीतरी राख झालेल्या चितेजवळ एक आणि विसाव्याजवळ एक असा नेवेद्य ठेऊन गेला. कानोसा घेत आजीने विसाव्याच्या चौथऱ्यावरचा नैवेद्य घेऊन बिचकतच खाल्ला. पुन्हा बुंध्यामागे जाऊन बसली.
“ए म्हातारे, उठ इथून. . . . ” झाडू घेऊन आलेल्या सफाईकर्म्याचा आवाज आला. आजी पुन्हा लगबगीने सरणाच्या लाकडांकडे निगुण गेली.
आता न राहून मी सफाईकर्मचाऱ्याला बोलले.
“दादा का ओरडता त्या आजीला?”
त्यावर तो म्हणाला,” अहो मॅडम, ही रोज येते नैवेद्य खाते आणि विसाव्याजवळचे खडे वेचत बसते. ”
मी म्हणाले,” मग तुम्हाला काय त्रास? आणि कोण आहे आजी? इथे का येते?
यावर तो म्हणाला , “आम्हाला कसला आलाय त्रास? कोणी सायबानी बघितलं तर ओरत्याल आम्हालाच. . . . .
मॅडम , या बसा ह्या पायरीवर सांगतो रामकथा ह्या म्हातारीची— हिला तिचं काय बी आठवत नाय. नाव ईचाऱ्यावर ‘रकमा’ म्हणती. मुलबाळ हाय का म्हणल्यावर हाय म्हणती. एक ल्योक हाय. सुरज्या नाव सांगती. सायब हाय म्हणती. पण ‘कुठं,काय, गाव ईचारल्यावर तिला ते आठवत नाय. एक दिवस रात्री अंधारात एक गाडी तिला हितं सोडून गेली.
हितंच पत्रयाखाली झोपते. प्रेताबरोबर कुणी अंथरुणं आणली होती जाळायला. तिनं मागून घेतली. नळाखाली पहाटेच अंघोळ करती. ती बघा साडी भिंतीवर वाळतेय तिची. ते्वढाच संसार तिचा. पसा पसाभर पाणी हातानं पिंडीवर टाकती कि येती इथं विसाव्याच्या चौथऱ्याजवळचे खडे गोळा करायला. तो बघा कोपऱ्यात ढीग लावून ठेवलाय खड्यांचा.
कधी एकटीच बसते विस्तव होत जाणाऱ्या चितेजवळ थंडीत गारठलेले हात-पाय शेकायला आणि रडतेही कधी कधी मी बऱ्याचदा तिला डोळे पुसताना पाहिलंय. देत असतो डब्यातली भाकर कधी कधी पण नको म्हणती. तू पोटभर खा म्हणती मला.
खरं सांगू का मॅडम, मला लय वाईट वाटतं बघा. . . . . . ”
डोळ्यांच्या कडा पुसत तो सफाईकर्मचारी त्याच्या कामाला निघून गेला.
माझ्या डोक्यातील विचारांनी चितेसारखा पेट घेतला.
*सरणाच्या लाकडांना टेकून बसणारी जीर्ण हाडं नक्की काय बोलत असतील?*
चितेजवळ हातपाय शेकताना आई-वडील, नवऱ्याच्या प्रेमळ उबेची जाणीव होवून आसवं गाळत असेल.
पसाभर पाणी दगडाच्या देवाला वाहून कधी त्याला पाझर फुटेल? “का ” म्हणून आक्रोश करत त्याला विचारावं असं त्या जीवाला वाटत नसेल?
*भिंतींवरची वाळलेली साडी किंवा विसाव्याचा नैवेद्य वाट पाहतो म्हणून तर ती जगत नसेल*
समशानात येणारा प्रत्येकजण आपले कोणीतरी गेले म्हणून इथे अतीव्र दुःखा ने आक्रोश करत येतो. ह्या माऊलीने कुठे जायचे?
*आणि आक्रोश तरी कशाचा करायचा ? — असलेल्या नसलेल्यांचा की उरलेलं असलेलं आयुष्य नको असल्याचा?*
खरं तर तो पोट-पाठ एक झालेला ताठ गुडघ्यांमधून पांढऱ्या केसांचा ताज घातलेला सुरकूतलेला चेहरा मला खरोखरंच मरणाआधी विसावलेला दिसला .
विसाव्याजवळचे खडे वेचून बाजूला करत कदाचित ती तिच्या अनवाणी पायांना टोचणारे दुःख बाजूला सारत होती.
ध्रुवबाळाला देव दिसला त्याने हक्काची जागा मागितली जिथून कोणी त्याला हकलणार नाही. — आज या आजीनेही विसाव्याची हक्काची जागा मिळवली होती.
शेवटी नावाने रुक्मिणीच होती ती.
तेवढ्यात प्रवेशद्वारासमोरच्या रस्त्यावरून एक गाडी गेली आणि गाडीतील गाण्याच्या त्या ओळी समर्पकता पूर्ण करून गेल्या———
*आप मुंह मांगी दुआ*
*हम अनसुनी फर्याद है*
माझ्या डोळ्यांतून वाहणाऱ्या आसवांनी आणि स्मशानशांततेने हे गाणे गप्पच ऐकले. —-आणि पायऱ्या उतरत मी विसाव्याच्या दिशेने गेले.
पुढे काय झाले हे माझ्यासारख्या पेनातील शाई संपणाऱ्या लेखिकेने स्वतःबद्दल न लिहिणे उत्तम——-
——— ती कामे दिखाऊ भरल्या खिशेवाल्यांची.
——- रेश्मा दास