ओझं – Marathi Katha Oza

0
1834

Marathi-Katha-Oze

लेखिका – शुभांगी कदम
संपर्क – shubhangikadam1087@gmail.com

ओझं – Marathi Katha Oza

शेवटचं एकदा आरशात पाहिलं…

ड्रेस व्यवस्थित केला आणि विशाखा ने घराबाहेर पाऊल टाकलं, लग्नासाठी मुलगा पाहायला जात होती पण यावेळी मनात तसूरभरही भीती नव्हती.

डिवोर्स नंतर दुसऱ्या लग्नाचा अजून तिने विचारही केला नव्हता अशात मुलगा पाहायला जाणं अस्वस्थ करणार होतं पण तिचा नाईलाज होता.आकाशला ती याआधीही भेटली होती, तिच्या पहिल्या लग्नाच्या आधी.आकाश एकदा पाहायला आला होता घरी तेव्हा त्याचंही लग्न झालेलं नव्हतं, त्यावेळी मात्र आकाशने विशाखाला नकार दिला आणि काही दिवसांनीच दोघांचंही लग्न दुसरीकडे जमलं पण काळाला ते मान्य नव्हतं.काहीच दिवसात दोघांचाही डिव्होर्स झाला होता. पाच वर्षानंतर आज पुन्हा आकाश ने तिला लग्नासाठी मागणी घातली होती.

विशाखा दुसऱ्या लग्नाला तयार नव्हती मात्र घरच्यांच्या आग्रहाखातर आकाशला एकदा भेटावं म्हणून आजचा पाहण्याचा कार्यक्रम…

गर्दीत वाट काढत विशाखा ट्रेन मध्ये चढली. बसायला जागा मिळाली आणि विचार करायलाही.

आकाश…

तिला पाहायला आला होता तेव्हाचा प्रसंग डोळ्यासमोरून पुन्हा एकदा गेला.सकाळची वेळ कांद्या पोह्याची गडबडं सुरु होती. सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली होती विशाखा…

त्याच रंगाची हलकी लिपस्टिक तिचं सावळेपण खुलवत होती.गळ्यात छोटाशी माळ घालून आरशात पाहून हसण्याची प्रॅक्टिस करत होती, कारण मन घाबरलेलं होतं कारणही तसंच होतं तिची साधी नोकरी आणि आकाशचं फार्मसी बँकग्राऊंड प्लस बिसनेस!

बेल वाजली, थोडे मध्यमवर्गीय गृहस्थ आत डोकावले कदाचित आकाशचे वडील असावेत; मागे आकाशची आई होती अन सोबत आकाश.

साधारण सहा फूट उंची असलेला एक गोरापान मुलगा.

प्रचंड कॉन्फिडन्स असणारा.

एकुलता एक मुलगा…

विशाखाच्या घरातल्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. चहा झाला, कांदे पोहे झाले.अतिशय हसते – खेळते वातावरण होते.सगळ्यांची ओळख झाली.

पुढे आकाशच्या बाबांनी आकाशला खुणावले कि, काही विचारायचे आहे का तुला ?

आकाश ने बोलायला सुरवात केली,

“काय करतेस तू? काय शिक्षण झालय तुझं? कुठे नोकरी करतेस? मग तू हेच क्षेत्र का निवडलंस ? ”

तो लागोपाठ प्रश्न विचारात होता विशाखा उत्तरं देत होती काही प्रश्न पुन्हा पुन्हा त्याने इंग्रजीतून विचारायला सुरवात केली. कदाचित त्याला तिचं इंग्रजी किती प्रगल्भ आहे, किंबहुना आहे कि नाही हेच पाहायचं होतं. विशाखा उत्तरं तर देत होती पण त्याचा प्रत्येक प्रश्न तिला अस्वस्थ करत होता. एखाद्या नोकरीसाठी इंटरव्हू घेतात तसेच काहीसे प्रश्न आकाश विचारात होता कुठेही कंफर्ट झोन नव्हता. तिला अपेक्षित असलेला एकही प्रश्न आकाशने तिला विचारला नव्हता. किंवा तिला बोलायची संधीही दिली नव्हती. एक तास कार्यक्रम झाला….

जाताना आकाश ने त्याच्या आईजवळ निरोप दिला कि विशाखा माझ्याशी काहीच बोलली नाही तिला बोलायचे असेल काही तर मला फोन करायला सांग.

त्याच्या आईने तसे सांगितलेही आणि विशाखाला आणि आकाशचा नंबरसुद्धा दिला. विशाखाने नंबर घेतला पण विशाखा खूप गोंधळली होती,कारण आकाश आणि तिच्या बोलण्यात कुठेही ताळमेळ नव्हता. तिला बोलायलाच काय तर पुरेसा विचार करायलाही आकाशने वेळ दिला नव्हता पण त्याचे आई वडील आणि तिचे घरचे त्यांचं मात्र खूपच चांगलं जमून आलं होत.

काय करावं काहीच सुचत नव्हतं.फक्त मला व्यक्त व्हायची संधी दिली नाही हे एवढं कारण नकार द्यायला पुरेसं असू शकतं काय? एका तासाच्या भेटीत कसं ओळखायचं माणसाला ? खूप प्रश्न विशाखाच्या मनात येत होते आणि निर्णयाचं दडपणही…

एक दोन दिवसांनी त्यांचाच फोन आला कि मुलीची उंची फारच कमी आहे म्हणून आकाश ने नकार कळवला आहे. विशाखाचा काहीच निर्णय झाला नव्हता अजून.त्यात उंचीचं कारण जे आकाशने दिल होत ते नकार देण्यासाठी पुरेसं होतं का ?

खूप संभ्रमात पडली विशाखा…

आज त्याच मुलाला पुन्हा विशाखाशी लग्न करायचं होतं तेही उंचीला न जुमानता. कारण त्याला त्याच्या डिवोर्सच्या अनुभवानंतर एखादी समंजस मुलगी आयुष्यात जोडीदार हवी होती जी त्याला आधार देईल आणि त्याच्या घरातल्यानाही सांभाळेल. दोघेही एकमेकांना सेकंड चान्स देणार होते? कि विशाखाला गृहीत धरलं जात होतं?

समाजाच्या आणि नातेवाईकांच्या दृष्टीने हे लग्न व्हायलाच हवे होते कारण दोघेही डिवोर्स झालेले आणि त्यात आकाशाची चांगली नोकरी एकुलता एक मुलगा. त्याला होकार देण्याशिवाय विशाखाकडे पर्याय नव्हता.

विचारांनी झालेली घालमेल न दाखवता ट्रेन थांबताच विशाखा पर्स सांभाळत खाली उतरली.आकाशचे बाबा घ्यायला आले होते स्टेशनवर. विशाखा त्यांच्यासोबत घरी गेली. आकाश घरीच कॉम्पुटरवर काहीतरी करत बसला होता.

पाच वर्षांपूर्वी भेटलेला आकाश आणि आजचा आकाश…

काय वाटत असेल त्याला. एकदा आपण नकार दिलेल्या मुलीला पुन्हा लग्नासाठी विचारत आहोत ?

विशाखा ने त्याच्याकडे पाहिलं. शांत बसलेला तो. कॉन्फिडन्स होता पण तो उसना आणलेला. आतून पूर्ण खचलेला पण चेहऱ्यावर न दाखवणारा हा आकाश वेगळा होता….

वेळेनं खूप काही शिकवलं होतं त्याला. आकाशच्या आईने विशाखाचं खूप छान स्वागत केलं. तिला चहा पोहे दिले. बऱ्याच चर्चा झाल्या, पाच वर्षात खूप काही बदललेलं होतं. डिवोर्स नंतर डिप्रेशन मध्ये जाऊन आकाशला हेमॅटोमा चा अटॅक येऊन गेला होता, त्यामुळे त्याच्या चेहऱ्याच्या एका बाजूची हालचाल त्याच्या पूर्ण नियंत्रणात नव्हती. डिवोर्सचं वादळ येऊन गेलं की ते आपल्या सोबत काय काय नेतं हे विशाखापेक्षा दुसरं कोण समजणार होतं. विशाखा त्याच्या समोरच बसली होती. आकाश बोलायला लागला पण यावेळी त्याच्या बोलण्यात प्रश्न नव्हते. त्याच्या बोलण्यात समंजसपणा जाणवत होता.

त्याने विशाखासाठी एक गिफ्ट आणलं होतं ते तिला दिलं, आणि तिला समजावत होता कि

“झालेल्या गोष्टींचा विचार करू नको पुढचा विचार कर” वगैरे …

त्याच्या बोलण्यातून तरी तो या लग्नाला तयार होता हे विशाखाच्या लक्षात आलं होतं पण विशाखाचं काय ??

ती शांतच होती.

तिचं मन कुठेच तयार नव्हतं. पुन्हा लग्नासाठी…

आकाशमध्ये खूप बदल झाला होता पण झालेल्या घटनांनी विशाखाही खूप दुखावली गेली होती. आकाशला पाहून तिला कळलं होतं कि हा आतून खूप खचला आहे, याला खूप मानसिक आधाराची गरज आहे. असं कुणीतरी जे त्याला सावरणारं असेल पण ती विशाखा नक्कीच नव्हती. कारण ती स्वतः डिवोर्सच्या वादळाने हरवलेली होती. तिला शोध होता, तिला शोधून आणणाऱ्या माणसाचा…

दुसऱ्या कुणाला आधार देण्याच्या मनस्थितीत ती नव्हतीच आणि आकाशसोबत आयुष्य तिला अशक्य वाटत होतं. पण त्याला नकार कसा द्यायचा याच ओझं….

कारण तिनं नकार दिला तर घरातले आणि आकाश दुखावला जाणार होता आणि होकार दिला तर ती स्वतः दुखावली जाणार होती…

मोठ्या निर्णयाचं ओझं.

पण ते ओझं त्याच्यासोबत आयुष्य घालवताना वाटणाऱ्या ओझ्यापेक्षा तिला हलकं वाटत होतं. आणि म्हणूनच आकाशला नकार द्यायचा तिचा निर्धार पक्का झाला होता……

ती निघताना आकाशने तिच्याकडे अपेक्षेने पाहिलं ” विशाखा तुझ्यावर कोणताही दबाव नाही तू हवा तो निर्णय देऊ शकतेस. मागच्या वेळी एकदा तुला नकार देऊन मी मोठी चूक केली होती असं मला वाटलं आणि म्हणूनच यावेळी मी माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न केला एवढंच. तुझ्यासारखी समंजस मुलगी माझ्या आयुष्यात आली तर दोघांचेही प्रश्न सुटतील आणि तुझा नकार असला तरीही माझा कोणताच राग नसेल तुझ्यावर तुला तुझ्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा !” ”

आकाशच्या त्या वाक्यांनी विशाखाला भरून आलं कारण …

“आकाश तुलाही तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ! “…

याच्यापलीकडे ती त्याला काही बोलूही शकत नव्हती आणि त्याच्यासाठी काहीही करू शकत नव्हती.

तिचा निर्णय ठाम होता. कोणत्याही खोट्या आशेवर तिला आकाशच्या आयुष्यात जायचं नव्हतं. तिनं सत्य स्विकारलं होतं.

एकदा विशाखाला नकार दिलेल्या आकाशच्या मनावरचं ओझं काळाने रितं केलं असलं तरी आता आकाशला अशा अवस्थेत नकार द्यावं लागल्याचं विशाखाचं ओझं मात्र वाढवलं होत….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here