इतिहास गुलाम आहे – Marathi Kavita

2
530
Marathi Kavita – Itihas Gulam Aahe

Marathi Kavita – Itihas Gulam Aahe – इतिहास गुलाम आहे

कवी – योगेश सावंत

इतिहास त्यांच्या पायाशी लोळण घेतोय जे जगज्जेते होते
त्यांच्या विजयी पताका काळाच्या अवकाशात डौलाने फडकवत राहतो
पोकळ पराक्रमाचे गोडवे गात रंगून जातो
त्यांच्या पराक्रमाचे दाखले देताना विसरून जातो त्या किड्या मुंग्यांचे बलिदान
ज्यांच्या रक्ताने राजांनी स्वतःचे गौरवगीत लिहिलेय

कित्येक पामर लढता लढता गेले
कित्येक संसार उधळले
म्हातारे पोरके झाले
मुले अनाथ झाली
कित्येक विश्वे उध्वस्त झाली
पण इतिहासाला त्यांचे सोयरे सुतकही नसते
कारण तो असतो गुलाम
ताकदी समोर नतमस्तक होणारा
आणि आजही तो तसाच आहे,
मूठभर लोकांचा गुलाम
जे करोडो लोकांचं आयुष्य उध्वस्त करतात
त्यांना सुंदर भविष्याची स्वप्ने दाखवून
कित्येक आयुष्य चोरून नेतात
एकमेकांचे वैरी बनवून त्यांना लढवतात
इतिहास त्यांचाच आहे गुलाम

इतिहास आजही तसाच आहे
तो टिपणार नाही त्या सैनिकांची व्यथा जो स्वकीयांचे रक्त सांडतोय
त्याला कळणार नाही त्या स्त्रीचे दुःख जी अकारण विधवा झालीय
तो ऐकणार नाही त्या बालकाचा टाहो जो जन्मतः अनाथ झालाय
आणि तो असणार नाही वर्धक्यात साथ द्यायला ज्यांचा पुत्र शहिद झालाय
तो मोठ्या गौरवाने विजेत्यांची मोहर उमटवेल काळाच्या शिला लेखांवर
आणी ते जपून ठेवेल येणाऱ्या पिढीची दिशाभूल करण्यासाठी..

योगेश सावंत

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here