होता सोन्याचा संसार – Marathi Katha Hota Sonyacha Sansar

1
2492

Marathi-Katha-Hota-Sonyacha-Sansar

लेखक : अतिश म्हात्रे
संपर्क : atish.mhatre9@gmail.com

सोन्याचा संसार – Marathi Katha Hota Sonyacha Sansar

अतिशय कष्ट आणि मेहनतीने शैलाने आपला संसार थाटला होता. सासरची परिस्थिती अतिशय गरीब. शेतावर तोंडली, कारली आणि पडवळांचे मांडव लावून उत्तम मशागत करून आपला उदरनिर्वाह चालवायचा. शेती आणि मोलमजुरी हा शैला आणि तिचा पती समीर ह्यांचा व्यवसाय. शैला स्वभावाने लाख, उन्हामध्ये अत्यंत कष्ट करत असल्याने थोडी सावळी, अंगाने बारीक आणि उंच, नेहमी नायलॉनची साधी साडी, गळ्यामध्ये काळ्या मण्यांचा एक सर व त्यामध्ये शोभून दिसणारा सोन्याचा डावमणी, कपाळाला गोल मोठी टिकली, चेहरा आणि मेकअप ह्यांची सांगड फक्त लग्नामध्ये जुळली होती, नंतर त्याची कधी गरजच पडली नाही. समजूतदार स्वभाव, घरची परिस्थिती बघून कधीही आपल्या पतिकडे महागडी साडीची अथवा दागिन्यांची मागणी करत नसे.

समीर सुद्धा मनमिळावू स्वभावाचा, अत्यंत कष्टाळू, हसतमुख, सावळा रंग, स्वतःकडे जास्त लक्ष न देणारा, आपल्या पत्नी-मुलांसाठी आणि आईवडीलांसाठी जीवाची तमा न बाळगणारा, आपल्या मुलांना कसलीही कमतरता पडु नये ह्यासाठी नेहमी झटणारा. व्यसन बोलायचं झालं तर दिवसातून कधीतरी तंबाखू तोंडात ठेवायचा… बस्स…!!

ह्या दोघांचा दिवस सकाळी पाच वाजता सुरू व्हायचा. दोघेही खूप कष्ट करत होते आणि कसलीही कुरकुर न करता आपला संसार उत्तमरित्या करत होते. त्यांची मुलगी स्वरा आता दहावीत होती आणि शुभम आठवीत होता. शाळा सुटल्यानंतर हे दोघेही शेतावरच असायचे. दोघेही अभ्यासात अतिशय हुशार. स्वराला दहावीत सत्तर पेक्षा जास्त टक्के मिळवण्यासाठी समीर तिला प्रोत्साहन देत असे.

लग्नापूर्वी शैला आपल्या माहेरी सुद्धा अशीच मेहनती होती. शैलाच्या माहेरची परिस्थिती अतिशय बिकट. त्यामुळे तिकडे सुद्धा फक्त मेहनत करत राहणं हेच तिच्या नशिबात होतं. त्यात  वडिलांना पॅरालिसिसचा आजार असल्याने ते कित्येक वर्षे अंथरुणाला खिळून होते. ३ वर्षे सगळं काही अंथरुणावरच होतं. शैलाने कधीही कुरकुर न करता आपल्या वडिलांची सेवा केली. एके दिवशी अचानक तब्येत जास्त बिघडल्याने वडिलांनी शेवटचा श्वास घेतला. तिची आजीसुद्धा वृद्धापकाळाने अंथरुणाला खिळून होती आणि आपल्या मुलाचं प्रेत आपल्या मरणाआधी पाहील्याने तिला पण हा धक्का सहन झाला नाही आणि काही महिन्यातच आजीसुद्धा हे जग सोडून गेली. एकंदरीत शैलाला माहेरपणापासून जबाबदारी स्वीकारण्याची सवय लागली होती. दोघांची आजारपण तिने काढली होती. आणि त्यानंतर वर्षभरात शैलाचं लग्न ठरलं. आपल्या लग्नामध्ये आपले वडील नसल्याने शैला खूप दुःखी होती, पण आता तिला पुढे दिसत होता तो आपला भावी जोडीदार.. होणारा नवरा.. समीर..!  सासरचा उंबरठा ओलांडून तिने आपल्या नवीन आयुष्यामध्ये प्रवेश केला होता.

आता लग्नाला जवळ जवळ सतरा वर्षे होत आली. समीरने थोडेफार पैसे जमा करून सोन्याचं एक छानसं मंगळसूत्र शैलासाठी बनवलं. आपल्या नवऱ्याने दिलेल्या अचानक धक्क्याने ती खूप सुखावली होती. पण ह्याची ईच्छा तिने कधीही केली नव्हती. हळूहळू दिवस बदलत होते. शेतावरचा व्याप थोडा वाढवला होता. मुलांच्या शाळेचा खर्च, घरखर्च हे सगळं करून थोडेफार पैसे बाजूला साठवत होती. आपल्या नवऱ्याच्या नकळत बचत करणे हे उत्तम गृहिणीचं लक्षण असतं आणि तेच शैला करत होती. आता सगळं काही व्यवस्थित चालू होतं. घरात हळूहळू हप्त्यावर नवीन नवीन वस्तू घेतल्या. आता शैलाने आणि समीरने मेहनतीने उभा केलेला संसार सोन्याचा झाला होता. त्याला छान असं रंगरूप आलं होतं. एक नवीन हुरूप घेऊन प्रत्येक दिवसाची सुरुवात होत होती. सगळ्यांना ह्या दोघांचं खूप कौतुक वाटायचं. सुखदुःखात कुठेही जाताना नेहमी दोघे सोबतच जायचे. गाडीवर समीरच्या मागे नेहमी शैला असायचीच. एकमेकाला त्यांची खूप साथ होती.  ती सासू सासऱ्यांची सुद्धा खूप काळजी घायची. सासू-सासरे आणि आपल्या पती-मुलांसोबत ती खूप आनंदात होती. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं.

एक दिवस समीरची अचानक उजव्या बाजूची खालची दाढ खूप ठणकू लागली. मेडिकल मधून दाढेवरच्या गोळ्या आणून तात्पुरता उपाय चालू होता. पण कालांतराने दाढदुखी खूपच वाढल्याने दाढ काढून टाकण्याचा निर्णय घेतला. सकाळी दोघेही लवकर उठले,  नेहमीप्रमाणे तोंडात तंबाखू टाकला, शेतावरची कामे लवकरच आटोपली आणि दुपारी दाढ काढण्यासाठी डॉक्टरकडे गेले. खूप वेळाने नंबर आला. डॉक्टरांनी सगळं चेक केलं आणि त्यावेळी त्यांना कळलं की दाढेच्या मुळाजवळ एक गाठ झाली आहे आणि त्यामुळे दाढ त्या गाठीत घुसली आहे. सध्या दाढ काढता येणार नाही म्हणून पुन्हा काही गोळ्या दिल्या आणि गाठ कसली आहे हे बघण्यासाठी त्यातील थोडं सॅम्पल मुंबईत एक मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. दोन दिवसात रिपोर्ट आल्यावर आपण दाढ काढू असा डॉक्टरांनी सल्ला दिला. शैला आणि समीर खूप चिंतेत होते. त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. दोन दिवस  ह्या विषयावर घरात चर्चासुद्धा केली नाही.

दोन दिवसांनी रिपोर्ट आला. सकाळी दोघेही हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी रिपोर्टबद्दल सगळं काही सांगितलं आणि जी भीती होती तेच झालं. समीरला तोंडाचा कॅन्सर झाला होता………!!!  हे ऐकून दोघेही पूर्णतः शांत झाले होते. शैलाच्या पायाखालची जमीन सरकली, समीरच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर उभा राहिला. आपला सोन्याचा संसार त्याच्या डोळ्यासमोर आला आणि आता माझ्या पत्नीचं मुलाबाळांचं कसं होणार ह्या विचाराने तो रडत रडत खाली बसला. डॉक्टरांनी त्या दोघांना खूप वेळ समजावलं आणि पुढची सगळी ट्रीटमेंट मुंबई येथे टाटा हॉस्पिटलमध्ये करण्याचा सल्ला दिला.ऑपरेशन केल्यावर सगळं काही ठीक होईल. पुढे कसलाही त्रास होणार नाही ह्याची सगळी माहिती डॉक्टरांनी त्या दोघांना दिली. शैला आणि समीरने धीर बाळगून अजून तिन ते चार डॉक्टरांचा सल्ला घेतला, परंतु सगळी कडून एकच निर्णय येत होता आणि तो म्हणजे “टाटा हॉस्पिटल – मुंबई.”

अखेर पुढील उपचाराकरिता मुंबईला जाण्याची तयारी केली. सासू सासरे वृद्ध असल्याने त्यांना थोडीफार कल्पना दिली होती की, दाढीचे ऑपरेशन करण्यासाठी मुंबईला जायला लागणार आहे. घरामध्ये शैलाने साठवलेले दहा पंधरा हजार रुपये घेतले आणि समिरकडची थोडीफार रक्कम घेऊन मुंबईला जाण्याचं नक्की केलं. ह्या सगळ्या जुळवाजुळवीमध्ये एक महिन्याच्या कालावधी उलटून गेला होता. अखेर मुंबईतल्या सगळ्या नातेवाईकांच्या मदतीने टाटा हॉस्पिटल गाठले. कधीही मोठ्या हॉस्पिटलची पायरी न चढलेले हे दोघेही खूप चिंतेत होते. डॉक्टरांची भेट झाली. त्यांनी समीरची पूर्ण मेडिकल चौकशी आणि तपासणी केली आणि भाराभर टेस्ट करायला सांगितल्या.  तिकडे सुद्धा खूप लाईन होती. अखेर तिथे नंबर लागला आणि बरेचसे रिपोर्ट काढले. काही रिपोर्ट आठ दिवसांनी मिळणार होते. एका जवळच्या नातेवाईकाने ते सगळे रिपोर्ट घेतले आणि पुढची भेटीची तारीख घेतली. पंधरा दिवसांनी पुन्हा हॉस्पिटलला जायचं होतं आणि समोर प्रश्न उभा राहिला तो खर्चाचा. तेव्हा शैलाने नवीनच बनवलेलं ते मंगळसूत्र गहाण टाकलं आणि पैसे उभे केले.
आज डॉक्टर सगळा निर्णय सांगणार होते. एक एक रुग्ण त्या खोलीतून बाहेर पडत होता अखेर समीरचा नंबर आला. सगळे रिपोर्ट डॉक्टरांनी तपासले आणि निर्णय दिला.
“बघा, घाबरण्यासारखं काही नाही. कॅन्सर झालेला आहे पण आपण वेळीच जर ऑपरेशन केलं तर ते नीट होईल. पेशंट पहिल्या सारखा चालू बोलू शकेल. परंतु ही फक्त दाढेची शस्त्रक्रिया नसून संपूर्ण हणवटी काढावी लागेल. मुळापासून काढलं नाही तर तो आजार पुन्हा उद्भवेल. डॉक्टर खूप जवळच्या माणसासारखं त्यांना समजून सांगत होते.
हणवटी काढून तिथे समीरच्या डाव्या पायाच हाड लावण्यात येईल आणि समीरच्या मांडीवर शस्त्रक्रिया करून मास काढून गालाला लावलं जाईल. थोड्या दिवस काही खाता येणार नाही पण हळूहळू सगळं नीट होईल. आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करू शेवटी सगळं वरच्याच्या हातात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार शेवटी शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित झाले काही दिवसानंतरची तारीख मिळाली.
शैलाने मन खूप घट्ट केले होते. आणि सावित्रीने जसा सत्यावानाला मोठ्या प्रसंगातून सोडवले होते तसेच करण्यासाठी तिने आता कंबर खचली होती. दोघेही घरी आले. घरच्यांना सगळ्यांना खरी माहिती दिली सगळं ऐकून रडारड चालू झाली. आपल्या बाबांच्या ह्या आजाराबद्दल ऐकून स्वरा आणि शुभम सुद्धा खूप रडत होते. शैलाने सगळ्यांची समजूत काढली आणि डॉक्टरांचा सल्ला त्यांना सांगितला. शैलाला ह्या प्रसंगा मध्ये उभं राहण्यासाठी एवढी शक्ती अचानक कुठून आली ह्याचा प्रश्न पडला होता.

आता तिच्या पुढे ‘आ’ वासून प्रश्न उभा राहिला होता तो म्हणजे ऑपरेशन साठी लागणाऱ्या लाखो रुपयांचा. जिथून जमेल तेवढे पैसे व्याजाने घेतले, फंडातून पैसे उचलले आणि एवढी मोठी रक्कम तिने उभी केली. अखेर शस्त्रक्रिया करण्याचा दिवस उजाडला, घरातल्या कुलदेवतेपुढे नमस्कार केला, समीरने आपल्या दोन्ही मुलांना आपल्या मिठीत घेतलं आणि लहान मुलाप्रमाणे ओक्साबोक्शी रडला. ते दृश्यंच जणू मनाला चटका लावणार होतं. नंतर त्याच्या आईने त्याचे डोळे पुसले. तिचे डोळे भरलेलेच होते.  जास्त वेळ न दवडता आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन ते दोघेही मुंबईला निघाले.

समीरच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये सगळी बाकीची तयारी केलेली होतीच. एक दिवस आधीच अँडमिट व्हायचं होतं म्हणून आज त्यांना अँडमिट करून घेतलं. ऑपरेशनच्या सगळ्या पेपरवर शैलाने सह्या केल्या. शैला आणि समीरने त्या रात्री खूप खूप गप्पा मारल्या आणि गप्पा मारता मारता तिथेच डोकं ठेवून शैलाला झोप लागली.  सकाळी ऑपरेशनला नेण्यासाठी समीरला स्ट्रेचरवर झोपवले तेव्हा समीरने शैलाला कडकडून मिठी मारली आणि दोघांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.  सहा तास शस्त्रक्रिया चालू होती. डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे शस्त्रक्रिया नीट पार पडली होती. काही तासाने समीर शुध्दीवर आला. चेहरा पूर्णपणे बांधला होता. मांडीवर आणि पायावर सुद्धा शस्त्रक्रिया झाली होती. द्रवरूप पदार्थ देण्यासाठी घश्यामधून एक नळी काढली होती. त्यामधून वेगवेगळ्या फळांचे रस, औषध दिली जात होती. आता समीरच्या प्रकृतीमध्ये खूप फरक पडत चालला होता. घशातली नळी काढून टाकली. प्रकृतीत होणारी सुधारणा बघून घरी नेण्यासाठी डॉक्टरांनी हिरवा कंदील दाखवल्यावर दोघांना खूप आनंद झाला. मेडिकल मधून सगळी गोळ्या औषधं घेऊन टाटा हॉस्पिटलला शेवटचा टाटा केला.
समीर आपल्या पाखरांना भेटण्यासाठी खूप उत्सुक होता.

आज समीर घरी आला, सगळ्यांना आनंद झाला, नातेवाईकांची घरी रीघ लागली होती. आता त्याच्या प्रकृतीत खूप सुधारणा होत होती. चेहऱ्यावर शस्त्रक्रियेचे व्रण दिसत होते. चेहरा थोडा वेगळाच दिसत होता. आता तो घरी आराम करत होता आणि शैलाने पुन्हा जोमाने कष्ट करायला सुरूवात केली होती कारण लोकांची देणी द्यायची होतीच. खूप मोठ्या प्रसंगानंतर संसाराची विस्कटलेली घडी नीट बसत होती. अश्यातच तीन महिने निघून गेले.  गोळ्या औषध चालूच होती. स्वराची दहावीची परीक्षा संपली. शुभमला सुद्धा शाळेची सुट्टी पडली. दोघेही आईला आता दिवसभर मदत करत होते. ज्या वयामध्ये सुट्टीच्या दिवसात धम्माल करायची असते त्या वयात आपल्या बाबांच्या खांद्यावरचं ओझं कमी करण्याचं काम ही पिल्लं करत होती.

एकदा सकाळी उठल्यावर समीरची तब्येत थोडी खालावलेली दिसली त्याला उलट्यांचा त्रास होत होता. जवळच असलेल्या एका डॉक्टरकडे त्याला नेण्यात आलं. त्या डॉक्टरांना समीरच्या जुन्या आजाराची माहिती दिली. डॉक्टरांनी त्याची पूर्ण तपासणी केली आणि टॉन्सिलच्या खाली अजून दोन गाठी आल्याचे पाहिले. पुन्हा त्या गाठीचे निदान करण्यासाठी सॅम्पल काढून टाटा हॉस्पिटलमध्ये पाठवले आणि त्या गाठी कॅन्सरच्या असल्याचे निदान झाले. आता शस्त्रक्रिया करून काहीही उपयोग होणार नाही असं सांगितलं गेलं. आता मात्र शैला आतून खूप खचली होती. एकांतात शेतावर खूप रडायची. स्वतःच्या नशिबाला दोष देत होती. परमेश्वराशी भांडत होती. मी कुठे कमी पडले रे देवा..!! असं त्याला टाहो फोडून विचारत होती.

जसे जसे कोणी सांगत होते तसे तसे उपाय शैला आपल्या नवऱ्यासाठी करत होती. आयुर्वेदिक उपाय चालू केले. कोणी एखाद्या नवीन डॉक्टरबद्दल  सांगितले की तिकडे समीरला घेऊन जात होती. आपले प्रयत्न तिने एक सुतभर सुद्धा कमी पडून दिले नाहीत. कर्जाचा बुजबुजाट तिच्या डोक्यावर झाला होता. इकडे समीर सगळ्यांच्या नकळत उशीमध्ये डोकं खुपसून खूप रडायचा. मी गेल्यावर माझ्या बायकोचं कसं होईल? मुलांचं कसं काय? आई बाबा? आजारपणासाठी झालेलं कर्ज? असे सगळे प्रश्न त्याच्या मनामध्ये काहूर निर्माण करत होते. त्यामुळे त्यांची परिस्थिती एकदम खालावत होती.

मे महिन्याचे दिवस चालू होते. ह्या आजाराला आता नऊ महिने होत आले होते. कडक उन्हाळ्यामुळे समीरच्या अंगाची लाही लाही होत असे. स्वभाव चिडचिडा झाला होता. प्रकृती दिवसेंदिवस खूपच खालावत होती. खाणंपिणं कमी झालं होतं. समीर अंथरुणाला खिळून होता, पुन्हा एकदा त्याला बघण्यासाठी घरी नातेवाईकांची रीघ लागली होती. आता समिरला बोलायला सुद्धा त्रास होऊ लागला होता. त्या दिवशी सगळे त्याच्या जवळ बसून होते तो मात्र डोळे उघडे ठेवून फिरणाऱ्या पंख्याकडे बघून रडत होता. शैलाने त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं होतं. तिचा ऊर भरून आला होता. त्याच्या केसांवरून मायेचा हात फिरवत होती. ओ..! काय हवंय का तुम्हाला? काय होतंय? रडताय का? आम्ही सगळे आहोत ना तुमच्या जवळ? ती बघा स्वरा आणी शुभम हाक मारतात तुम्हाला. त्यांना आवाज द्या.. काय ओ? मी काय बोलतेय.. शैलाचे अश्रू त्याच्या गालावर पडत होते. शैलाचा एक हात समीरच्या हातात होता आणि दुसरा हात त्याच्या केसांवरून फिरवत होती. समीरने अश्रू भरलेल्या डोळ्यांनी एक नजर सगळ्यांकडे फिरवली आणि शैलाचा हात जोरात दाबला आणि.. आणि.. शैलाच्या मांडीवर आपला जीव सोडला. अखेर अनेक प्रयत्नाचा शेवट झाला होता समीरची प्राणज्योत मालवली.

सगळ्यांनी एकदम टाहो फोडला. बा.. बा…!! स्वरा आणि शुभम जोरजोरात रडत होती. समीरची आई आपल्या एकुलत्या एक मुलाकडे बघून खूप रडत होती स्वतःला दोष देत होती. ज्या वयात आपल्याला अग्नी आपल्या मुलाने द्यायला पाहिजे तेव्हा आपणच त्याला अग्नी देणार असा विचार मनात आणून समीरचे वडील एक लहान मुलाप्रमाणे लाकडी खांबाला टेकून रडत होते. एक क्षणात शैलाच्या  सोन्याच्या संसाराची राखरांगोळी झाली होती. शैला समीरच्या प्रेताकडे सतत बघत होती. मध्येच सगळं आठवून जोरजोरात रडत होती. फसवलस रे मला फसवलस…!!
बरोबर दोन दिवसांनी तिच्या लग्नाला अठरा वर्ष पूर्ण होणार होती.  कसं जगणार होती ती पुढचं आयुष्य..! ह्या वेळेला ती काय विचार करत असेल. समीरच्या चेहऱ्यावरून ती सतत हात फिरवत होती. सौभाग्याचं एक एक प्रतीक उतरवलं जात होतं, बांगड्या फोडल्या गेल्या, टिकली काढली गेली, आता गळ्यातला काळ्या मण्यांचा सर सुद्धा तोडून काढला आणि समीरच्या प्रेतावर ठेवला गेला. नवीन मंगळसूत्र एक वर्षभर सुद्धा तिने घातलं नव्हतं. शुभमचे केस काढले गेले त्याच्या हातात मडकं दिलं आणि समीरचं प्रेत उचललं गेलं. पुन्हा एकदा आभाळ फाटल्यासारखा रडण्याचा आवाज झाला. प्रेत उचलल्यावर शैलाला चक्कर आली. आता तिची सगळी जबाबदारी स्वराने स्वीकारली होती. स्वराने आपल्या आईला मिठीत घेतलं. ज्या वयात काहीही कळत नाही त्या वयात शुभमने आपल्या बाबांना मुखाग्नी दिला होता. आजपर्यंत कधी न ऐकलेले आणि न पाहिलेले विधी छोटासा शुभम करत होता. जशी लोकं सांगतील तसं तो करत होता. काय करतोय ह्याची जाणीव त्याला नव्हती. बाबा अशी हाक मारून रडत होता. प्रदक्षिणा झाल्यावर मडकं फुटलं तेव्हा त्यांनी आपल्या जळणाऱ्या बाबांकडे शेवटचं पाहिलं.. दहा दिवस झाले. पिंडदान झालं. अस्थीविसर्जन झालं.. शैलाच्या आयुष्यात मागे राहील होत ते फक्त सासू सासरे, दोन मुलं आणि कर्जाचा डोंगर..

स्वराचा आज दहावीचा निकाल.. ७३% मिळाले… एवढे मार्क मिळालेल्या आनंदापेक्षा आपलं हे यश बघण्यासाठी बाबा नाहीत ह्या विचाराने ती पूर्ण तुटली होती. आज बाबांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. समीरच्या फोटोकडे बघून स्वरा आईला म्हणाली, ” आज बाबा असते तर सगळ्या गावाला पेढे वाटले असते.” माझ्या मुलीला ७३% मिळाले हे घसा फाटेपर्यंत सगळ्यांना सांगितलं असतं. शैलाने स्वराला आपल्या मिठीत घेतलं आणि हार घातलेल्या समीरच्या फोटो कडे बघून भरलेल्या डोळ्यांनी स्मितहास्य केलं.

होता सोन्याचा संसार,  राजा राणीचा दरबार…!!!!

—————–समाप्त—————

अतिश म्हात्रे

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here