रामदासांनी म्हटल्याप्रमाणे काही ‘उत्कट, भव्य’ करण्याची फार दिवसांपासून इच्छा होती. मध्यंतरी मेंदूवरचा एक लेख वाचला होता. मेंदूतील काही केंद्रं मानवातील निस्वार्थीपणाला कारणीभूत असतात आणि अशा निस्वार्थी माणसांमुळे जगाचा गाडा सुरळीत चालला आहे असा साधारण या लेखाचा सारांश होता. Wikipedia, Khan Academy, edX यांमुळे मला ते पूर्णतः मान्य होतं. ते वाचल्यापासून अशी केंद्रं माझ्या मेंदूत पण सक्रीय आहेत का हे जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती आणि असावीत अशी तीव्र इच्छाही होती. त्यात माझ्या Facebook Friend चैतन्यने Facebook वर एक अफलातून कल्पना Share केली.Railway tracks स्वच्छ ठेवण्यासाठी काही प्रमाणात प्रयत्न करण्याची. एक प्लास्टिकची पिशवी जवळ ठेवायची आणि कोणी Train च्या खिडकीतून/दारातून काही बाहेर फेकायच्या आविर्भावात दिसताच त्यांना अडवून तो कचरा स्वतःजवळच्या पिशवीत जमा करायचा. मग ती पिशवी किंवा पिशवीतला कचरा केराच्या डब्यात टाकायचा. कल्पना चांगली होती आणि ती राबवण्याचाही मी काही दिवस प्रयत्न केला. पण लवकरच भारतीय लोक अंधश्रद्धाळू, हेकेखोर आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत अतिउदासीन आहेत यावर शिक्कामोर्तब करण्यापलीकडे फारसं काही साधलं गेलं नाही.
थोड्याफार निरुत्साही mood मध्ये असतानाच सुमेधने Facebook वर ज्ञानप्रबोधिनीचा ‘Plastic Recycling उपक्रम‘ event create केला. वेगवेगळ्या विसर्जन ठिकाणी जाऊन तिथे लोक टाकत असलेल्या निर्माल्यातून plastic वेगळं करायचं आणि ते recycling ला द्यायचं असा कार्यक्रम होता. बरेच messages, calls करून मी विसर्जन स्थळ आणि ठिकाण यांची माहिती मिळवली. त्या event चा Co-host असलेल्या निखिलला प्रश्न विचारून भंडावून सोडलं. निर्माल्य हाताने sort करावं लागेल, Gloves मिळणार नाहीत आणि लोक काय वाट्टेल ते टाकतात असं कळल्यावर ‘I don’t want to ruin my hands’ म्हणणारी Scarlett O’Hara माझ्यात अवतरली. माझा निश्चय जरासा डळमळला पण स्वतःच gloves विकत घेतले की झालं अशी मी मनाची समजूत घातली.
उत्साहाने मी यासाठी पूर्वतयारी करायला सुरुवात केली. नवीन gloves विकत घेतले. पण मी मोठ्या उत्साहाने काही बेत केले की ते फिस्कटतात. नेमकं असं काहीतरी घडतं की माझा घोर अपेक्षाभंग होतो. त्यामुळे फजिती होऊ नये म्हणून मी हा event पूर्ण होईपर्यंत लपवून ठेवायचं असं ठरवलं,”Gloves? अचानक?” या प्रश्नाला “भांडी विसळताना हात खरखरीत होऊ नयेत म्हणून” असं साळसूदपणे उत्तर दिलं. त्यामुळे आईने आठवडाभर भांडी विसळायला लावली. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी gloves पहिल्यासारखे राहिले नाहीत आणि मीसुद्धा माझ्या हातांबद्दल निरिच्छ झाले. विसर्जनाच्या दिवशी ते gloves तसेच खिशात कोंबले, आईने खोदून विचारलेल्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरं दिली आणि घरातून सटकले.
नेहमीप्रमाणे रस्ता चुकणे, गोल गोल फिरून त्याच जागी येणे, इष्ट स्थळी पोचून इतरांची वाट पाहत वक्तशीर असल्याचे पाप फेडणे इत्यादी गोष्टी करून झाल्या. मग शेवटी आमची भेट झाली. मी, गायत्री, निखिल आणि गंधार. गंधार आणि निखिल scooter वरून पुढे निघून गेले. मी आणि गायत्रीने पदक्रमण करायला सुरुवात केली. थोड्या वेळातच गंधार आम्हाला घेण्यासाठी परत आला.
पुढे गंधार, मध्ये गायत्री आणि मागे मी अशी आमची triple seat वरात निघाली. त्यात मी आणि गायत्री बऱ्यापैकी वजनदार होतो. त्यामुळे मागच्या चाकाची मला काळजी वाटू लागली. पण हळूहळू जशी scooter खड्ड्यांतून उडू लागली तसं हसू येऊ लागलं. पुढे एका छोट्या रस्त्याला लागल्यावर शहरी गोंगाट बंद झाला. शांतता, वेगाने चेहऱ्यावर आदळणारा वारा हे फार सुखद वाटत होतं.त्यात पावसाळा संपत आला असल्याने दोन्ही बाजूंनी हिरवंगार गवत ,मधूनच जाणारा अरुंद रस्ता – एखाद्या खेड्यातून जात असल्यासारखं वाटत होतं. आणि आम्ही triple seat – ‘स्वदेस’ मधल्यासारखे. महत्वाच्या कार्याला निघालेले.
विसर्जन स्थळी आमचं स्वागत करायला निखिल होताच. त्याने केव्हाच त्याचे gloves घातले होते. गंधारने ऐटीत त्याचे हिरवे,डॉक्टर घालतात तसे दिसणारे gloves घातले. मला ‘Grey’s Anatomy’ ची आठवण झाली आम्ही पांढऱ्या १२ रुपयांच्या gloves वर समाधान मानून घेतलं. ज्ञानप्रबोधिनीने gloves ची policy बदललेली पाहून सहर्ष आश्चर्य वाटलं.
एका विस्तृत पृष्ठभागावर विविध प्रकारचा कचरा पसरलेला होता. कुठून सुरुवात करावी असं साशंक नवखेपणे आम्ही हळूहळू कामाला सुरुवात केली. Plastic गोळा करण्यासाठी एक Plasticचीच मोठी पिशवी हातात घेतली आणि ती भरेपर्यंत त्यात Plasticच्या अनेक आकाराच्या पिशव्या टाकायला सुरुवात केली. आम्ही चौघांनी चार ठिकाणी विखरून Plastic गोळा करायला सुरुवात केली. मला ‘परिणीता’ मधलं ‘कस्तो मजा’ गाण्यातलं चहातोडणीचं दृश्य आठवलं.
मग वर्दळ वाढली तसा ‘ताजा’ कचरा यायला सुरुवात झाली. मग आम्ही तिथे पहिल्यापासून असलेला कचरा तसाच सोडून नवीन कचऱ्यावर लक्ष केंद्रित केलं. लोक निर्माल्य म्हणून खरोखर काय वाट्टेल ते फेकत होते. अनेक अकल्पित वस्तूंचा ढिगारा समोर येऊन पडत होता. अन्न- नान सारख्या दिसणाऱ्या पोळ्या, एक पूर्ण भरलेली दुधाची पिशवी(Unbelievable) आणि काही कुजलेली तर काही बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत असलेली फळं. आम्हांला त्याचं काही अप्रूप नव्हतं आणि निर्माल्यात अन्न टाकणाऱ्या लोकांवर टीकासुमने उधळण्यात आम्ही मग्न होतो. पण आजूबाजूला लुडबुडणाऱ्या लहान मुलांना ते अन्न म्हणजे पर्वणी वाटत होती. त्यामुळे निर्माल्य उकरण्यात तेही अग्रेसर होते. निर्माल्यात नाणी सापडत आहेत हे पाहून घंटागाडीच्या जवळ उभ्या असलेल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनाही आम्हाला मदत करायचा हुरूप आला.
थोड्या वेळात शरीर घामाने ओलंचिंब झालं, बटा वेणीतून सुटून वाऱ्याने उडत कपाळावर भुरभुरू लागल्या. इतर वेळी अगदी छान, romantic वाटलं असतं, पण अस्वच्छ gloves घातलेल्या हातांनी त्या मागे सारणं कटकटीचं वाटत होतं. निर्माल्याच्या नवनवीन पिशव्या आल्या की क्षणार्धात, भयंकर वेगाने आम्ही त्यातलं Plastic वेगळ करत होतो. बऱ्यापैकी अनोळखी असूनही आमचं Tuning आणि Co-ordination चांगलं जमलं होतं. घंटागाडीच्या एवढं जवळ राहून कधी काम केलं नव्हतं. सतत वाजत असलेली धार्मिक गाणी, होणाऱ्या announcements- त्यात आमच्या नावांचा special उल्लेख , छान छान कपडे घालून येणारे लोक, बऱ्यापैकी निसर्गाचं सान्निध्य आणि या सगळ्या गोंधळाचा परिणाम होऊ न देता अतिशय एकाग्रतेने काम करणारे आम्ही असं हे छान जमलं होतं- एखाद्या सुंदर चित्रासारखं.
निर्माल्यात पुस्तकांचा एक ढिगारा सापडताच मला हर्षवायूचा झटका आला. मी झडप घालून ती पुस्तकं उचलली ,तिथल्याच एका plastic च्या पिशवीत घातली आणि माझ्या sack मध्ये ठेवली. मधूनच Plaster of Paris चे हत्ती, हरताळकेच्या गौरी, शोभेच्या वस्तू, पंचे,झिरमिळ्या असलेली मखमली कापडं यासारख्या वस्तू सापडत होत्या. त्यातला एक चांगल्या अवस्थेत असलेला पंचा अधूनमधून अगदीच हात खराब झाले तर पुसायला बाजूला ठेवून दिला. आणि दर ५ मिनिटांनी माझा हात आपोआप त्या पंचाकडे जाऊ लागला. हळदी-कुंकू , गुलाल यांच्या न फोडलेल्या पुड्या तर अगणित होत्या. प्रत्येक वेळी Plastic साठी आम्ही त्या फोडल्या की आतल्या हळद/कुंकू/ गुलाल यांचा वाऱ्याशी संगम होऊन विहंगम दृश्य दिसत असे. लवकरच माझ्या Floater चा पुढचा भाग आणि Jeansचा तळाचा भाग पिवळट-गुलाबी रंगात न्हाऊन गेला.
आणि निर्माल्य? ते तर होतंच. कुजण्याच्या वेगवेगळ्या अवस्थेत असलेलं निर्माल्य! अर्धवट कुजून काळपट झालेलं निर्माल्य! त्यामुळे त्याच्या सान्निध्यात असलेल्या plastic च्या पिशव्या सुद्धा काळपट, ओलसर झाल्या होत्या. निखिलने घंटागाडीतच उडी घेतली. दांडीवर बसून तो आतलं निर्माल्य sort करू लागलां. त्याला त्या गाडीत उतरताना पाहून मला त्याच्याविषयी प्रचंड आदर दाटून आला.
आपण काहीतरी महत्त्वाचं काम करतोय अशा जाणीवेने छान वाटत होतं. लोक थबकत होते, उत्सुकतेने प्रश्न विचारत होते. हातात घातलेल्या gloves च्या पांढऱ्या रंगाचा कुठे नावालाही मागमूस नव्हता. ते होळी खेळल्यासारखे रंगीबेरंगी झाले होते. मधेच विसर्जन मंडळातर्फे आम्हाला वडापाव देण्यात आले. पण gloves घालून वडापाव खाणं कठीण होतं. आणि gloves काढून खायला सुरुवात केली तर तेवढा वेळ काम थांबवायला लागलं असतं. त्याला अर्थातच आम्ही कोणीही तयार नव्हतो.आम्ही आमचं काम चालूच ठेवलं.
साधारण १० वाजल्यावर आम्ही काम थांबवलं. जवळजवळ ८-१० मोठ्या पिशव्या भरून plastic आम्ही गोळा केलं होतं. ते घंटागाडीतच वेगवेगळ्या प्रकारे रचून ठेवलं. Plastic चं वजन करून पैसे घेतले. (मला actual recycling process मध्ये सुद्धा भाग घ्यायला आवडलं असतं)निखिल आणि गंधारची हौस भागली नसल्याने ते दुसऱ्या विसर्जन spot वर गेले. मी आणि गायत्री Train ने परत आलो. रस्त्यात गायत्रीशी phone number exchange करण्यासाठी mobile काढला. घरातून १९ missed calls. मी घरातून ४ वाजता निघाले होते आणि आत्ता साडेदहा वाजले होते. मला गोंगाटात mobile वाजल्याचं कळलंच नव्हतं.
घरी आले तेव्हा पाय, कंबर अवघडली होती. आल्याबरोबर Bathroomमध्ये धाव घेऊन गरम पाण्याने शाही स्नान केलं. मग सांगून न गेल्याबद्दल, फोन न उचलल्याबद्दल, उशीरा आल्याबद्दल रीतसर आईबाबांची बोलणी खाण्याचा कार्यक्रम आटोपला.
यातून Exactly काय मिळालं, आयुष्य समृद्ध करण्याइतका अनुभव वगैरे मिळाला का हे मला माहीत नाही. पण हे करण्यात आनंद मिळाला. समाजातल्या वेगवेगळ्या थरांतल्या लोकांशी संपर्क आला. आम्ही फक्त Plasticच वेगळं करत होतो. पण इतरही अनेक वस्तू होत्या ज्या कचऱ्यात असणं योग्य नव्हतं. इतके दिवस बरंच Preaching ऐकलं, केलं गेलं होतं.आज प्रत्यक्ष कृतिशीलता अनुभवायला मिळाली. आणि तेच बहुतेक सर्वात महत्वाचं होतं.
छान काम केलंत. आणि त्याबद्दल तेवढंच छान लिहिलंत !
समाजोपयोगी कार्यात अश्या रीतीने आपला खारीचा वाटा उचलणे ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. नुसतंच बेजबाबदार लोकांच्या नावानी खडे फोडण्या पेक्षा आपण प्रत्यक्ष केलेली काहीतरी कृती निश्चितच कौतुकास्पद आहे.
तुम्हाला अशीच छान कामं करण्याची आणि लिहिण्याची स्फूर्ती मिळत राहो ही शुभेच्छा !!
धन्यवाद. 🙂