लेखक : मंगेश उषाकिरण अंबेकर
संपर्क : mangeshambekar@gmail.com
दादा म्हणायचं राहून गेलं – Marathi Katha Dada Mhanyache Rahun Gele
दादा स्वतःला आवडणारी राखी स्वतः आणायचा आणि छोटीच्या हातात दायचा. छोटीचे इवले इवले हात राखी घेऊन भावापुढे यायचे. छोटीला अजुन राखी बांधता येत नाही म्हणून भाऊच छोटी समोर हात पुढे करून तिच्या हाताने आपल्या मनगटावर फक्त राखी ठेवुन घ्यायचा आणि नंतर ती राखी आई कडून घट्ट बांधून घ्यायचा. ओवळता येत नव्हते म्हणुन तिच्या लुटपुट्या हातातली थाली पकडायचा आणि स्वतःच ओवाळून घ्यायचा. आदल्या दिवशी बाबाकडून पैसे घेऊन आपल्याकडचे सर्व पैसे टाकून, इतरांच्या बहिणीपेक्षा सगळ्यात सर्वात सुंदर भेट छोटीसाठी आणायचा. एवढा सर्व आटापिटा कश्यासाठी तर फक्त छोटीच्या बोबड्या आवाजातली ‘दादा’ नावाची ती गोड हाक ऐकण्यासाठी आणि ते दादापण जपण्यासाठी. अख्या गल्लीभर दादा नावाचा टेम्भा मिरवायचा.
छोटी पहिलीला होती त्यावेळेस आई वारली. तेव्हापासून बाबाने आणि दादाने तिची सर्व जबाबदारी घेतली. दादा सोबतच दिवस सुरू व्हायचा आणि त्याच्या कुशीतच संपायचा. शाळेपासुन कॉलेजापर्यंत सगळीकडे तिची पाठराखण करायला तो तिच्या सोबत असायचा. ती तशीच सर्व भार त्यावर सोपवुन बिनधास्त जगायची, फुलपाखरं सारखं उडायची. लग्नासाठी कितीतरी नाकार तो त्याच्या माथी घ्यायचा. वेगवेगळी कारण सांगून बाबांना पटवायचा. अखेर मनासारखं राजपुत्र तिने दादाकडे मागितला. कुवतीपेक्षा मोठ्या घरात लग्न लावुन देणं हे बाबांच्या हाताबाहेरच होतं . तरी बाबांनी लग्नासाठी होतं-नव्हतं ते सर्व पणाला लावलं तरी अर्ध्यावरही पोहचु नाही शकले. शेवटी दादाने त्यांना धीर देत, सावकारांकडून कर्ज उचललं आणि छोटीच लग्न एकदम थाटात लावून दिलं. तरीही राजपुत्राचा सुर नावडतीचाच होता. शेवटी पैश्याचा देखावा तो, फाटक्या खिशाने कसा भरणार.
आपल्यापेक्षा गरीब आणि किंचित कमी शिकलेला तिचा दादा का कुणास ठाऊक राजपुत्राला नकोस व्हायचा. नवऱ्याचा दादाबद्दलचा द्वेष हळुहळु छोटीच्या पण अंगात भिनू लागला, म्हणतात ना ‘संगती संग दोष हा’ तेच खर. छोटी ही त्याच्या संगतीत छोटीची कधी राणी झाली ते कळलंच नाही.
लग्नानंतर काही महिन्यातच बाबापण अचानक देवाघरी गेले. दादावर घराची, कर्जाची आणि त्याहूनही मोठी म्हणजे दादा असण्याची जबाबदारी टाकून गेले. बाबांच्या गैरहजेरीत आणि त्यांच्या सम्मान सांभाळत दादा छोटीच्या राजपुत्राला अगदी राजाप्रमाणे वागणुक द्यायचा. दादाच्या वयापेक्षा कितीतरी लहान असणारा राजपुत्र, दादाला कशीही हाक मारो, दादा नेहमी त्याला आदरानेच वागवायचा. पैश्यापाई नव्हे तर छोटीपाई नाही-नाही ते ऐकून घ्यायचा. बाबांना दिलेल्या शब्दांपेक्षा त्याने स्वतःच दादापण जपत त्याने सर्व सोपस्कार केले आणि त्याने त्याच कधी वाईट वाटून नाही घेतलं.
पण वाईट त्याला तेव्हा वाटलं, जेव्हा राजपुत्राच्या सोबतीत मस्तावलेली छोटी ‘दादा’ म्हणणंही विसरली. नवऱ्याच्या पैशाची नशा,त्याच्या मोठ्यापणाची नशा, त्याला मिळणाऱ्या मानाची नशा तिला अशी काय चढली की ती स्वतःला दादापेक्षा मोठं समजु लागली. दादाने हेही ‘हा छोटीचा अल्लडपणा’ असं समजुन सोडून देत, मोठ्या मनाने कसंबसं पचवलं.
त्यादिवशी रक्षाबंधन होतं, छोटीला त्याच भानही नव्हतं. आपला भाऊ का आला नाही याची साधी विचारपुसही छोटीला करावीशी वाटली नाही. दादाला वाटलं ‘आपण सकाळीच गेलो नाही म्हणून छोटी चिडली असेल आणि त्यामुळे तिने फोन नसेल केला’. दादा संध्याकाळी कामावरून थेट छोटीकडे गेला, नेहमीप्रमाणे त्याने स्वतःला आवडणारी राखी आणि सुंदरशी भेट नेली. तेव्हा घरी कोणीच नव्हतं. दादाने फोन लावला तेव्हा राजपुत्राने उचलला आणि उद्या यायचं सांगितलं. छोटीने तर बोलायचेही कष्ट घेतले नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळीच दादा छोटीकडे गेला. छोटी नुकतीच उठलेली होती. दादाला दारात पाहुन तिला आनंद व्हायच्या ऐवजी राग आला.
छोटी एवढ्यावरच थांबली असती तरी भागल असतं पण राजपुत्राने टोचलेला विषाचा काटा इतका आत रुजला होता की ती सगळं विसरून बसली. ती “दादा” म्हणत नव्हती तरी चाललं असतं पण त्यादिवशी तिने जेव्हा दादाला त्याच नाव घेऊन हाक मारली तेव्हा तो मात्र तुटला. त्याच दादापणचं छोटीने एका क्षणात हिरावुन घेतलं. बाबा गेल्यापेक्षा मोठं दुःख कशाचं झालं असेल तर ह्याचं. दादाच्या कुशीत खेळलेली छोटी अचानकच एकदम मोठी झाली. त्यादिवशी छोटीने केलेली परतफेड पाहुन तो आतुन फार तुटला,आपणच कुठेतरी कमी पडलो म्हणत स्वतःच स्वतःच्या मनातुन खुप उतरला. एवढ्या सगळ्यात छोटीला एका शब्दाने बोलला नाही.
त्या दिवसानंतर सात-आठ महिने होऊन गेले. दादा परत छोटी समोर आलाच नाही. त्याची छोटीच्या घरी कोणती भेट नाही का साधा फोनही नाही. इकडे छोटीला पण त्याची असण्याची वा नसण्याची कोणती गरज भासली नाही.
उणेधूने काढायला जेव्हा सासरचा एकही माणुस उरला नाही तेव्हा राजपुत्राने मोर्चा छोटीकडे वळवला. त्याने तिला छोटया छोट्या गोष्टीवरून नाहक त्रास देणं चालु केलं. लग्नाच्या दुसऱ्या वर्षाअखेरीपर्यंत राजपुत्रच खरं रूप तिच्या समोर येऊ लागलं. त्याचं कायम वासनाधीन राहणं, दोन दोन दिवस घरीच न येणं, काही विचारलं तरी आरडाओरडा करणं, अश्या नसत्या राजवैभवाच्या जाळ्यात अडकलेली छोटी हलकी हलकी बाहेर येऊ लागली.
राणी होण्यासारखं सुख फार कमी जणींना लाभतं, पण बऱ्याच राण्यांच्या नशिबी राज्याच मोजकच प्रेम ठरलेलं असतं. राणीच राजवैभव बाहेरून कितीही सुखात्मिक वाटतं असलं तरी शोकांतिकेचे गोचीड बाहेरून कोणाला कधी दिसत नाही. सर्व वैभव राणीच्या पाई रेंगाळत असतं पण राणीला हवा असतो तो फक्त आपला राजा. छोटीलाही हे गोचीड कधी दिसलेच नाही. एक सौभाग्यवती सर्व काही सहन करू शकते पण जेव्हा स्वःताचाच नवरा तिला वाटणीत भेटतो तेव्हा तीच्या सहनशीलतेचा अंत होतो.
सर्वात पहिले तिला आठवण कोनाची आली असेल तर अर्थात दादाची. तिने फोन लावुन पाहिला पण तो नंबर केव्हाच बंद झाला होता, त्याची विचारपुस नातेवाईकांकडे सुरू केली पण त्याचा कोणालाच ठावठिकाणा माहीत नव्हता. शेजारच्यांना विचारलं तेव्हा तिला कळलं की घेतलेल्या कर्जापाई त्याने होत-नव्हतं ते सगळं विकुन, बाबांनी घेतलेली जमेल तितकी आणि जमेल तशी कर्जे फेडली. सावकारच्या उरलेल्या कर्जासाठी अखेर त्याने गाव सोडलं. तो सावकाराच्या राहिलेल्या कर्जासाठी शहरात जाऊन नोकरी करणार होता. पण कोणत्या शहरात आणि कुठे ते कोणालाच माहीत नव्हतं.
छोटी ह्या सर्व गोष्टी ऐकून आतुन पुरती हादरली, दादाने आपल्यापासून किती गोष्टी लपुन ठेवल्या, कर्जाचा तर थांगपत्ताही लागु नाही दिला. त्याच्यावर ओढवलेल्या परिस्थितीचा कणभरही सुगावा लागु नाही दिला आणि आपण त्याला दरवेळेस पाण्यात पाहत पाहिलं, नवरा सांगेल तास त्याच्याशी वागत गेलो, त्याच्या कुवतीबाहेर त्याला नाही नाही ते मागत गेलो. पश्चतापाखेरीज तिच्याकडे काहीच उरलं नव्हतं. छोटीसमोर लहानपणापासूनचा भुतकाळ ओसरून गेला. दादाने लहान लहान गोष्टीत तिच्यासाठी केलेला त्याग आठवला आणि त्याउलट तिला तिचच लग्नानंतर बदलेल वागणं आठवलं. छोटीला स्वतःचीच घृणा वाटावी अशी ती वागली होती. कुठतरी जाऊन स्वतःचा जीव द्यावा इतपत तिची तय्यारी झाली,दादाला तोंड दाखवण्याच्या पण लायकी उरली नव्हती. शेवटची इच्छा म्हणुन एकदाच दादा म्हणत दादाच्या पाई पडुन माफी मागावी.
पण आता दादाचा पत्ता कुठे आणि कसा सापडणार हा तिच्यासमोर उभा राहिलेला मोठा प्रश्न. दादाच्या सगळ्या मित्रांना छोटीने फोन करून पाहिला पण काहीच सुगावा नाही लागला. छोटीच्या डोक्यात वीज चमकावी तशी तिला गावातल्या सावकाराची आठवण आली.
ती थेट सावकाराकडे गेली आणि त्याचा पत्ता विचारला. पण सावकाराकडे पण पत्ता नव्हता. इथेपण तिच्या पदरी निराशाच पडली पण शेवटी सावकाराने तिची व्याकुळता बघुन तिला सांगितलं की तो दर महिन्याच्या नऊ तारखेला पैसे दायला इथे येतो त्यावेळेस तु त्याला भेटू शकते. महिन्याच्या नऊ तारखेला म्हणजे आजपासून ठीक सात दिवसांनी ती दादाला भेटु शकणार होती. त्यादिवशी रक्षाबंधन होत.
या सात दिवसात, एकीकडे रोज जुण्या गोष्टींच्या आठवणी जगु देत नव्हत्या आणि दुसरीकडे दादाला भेटायची ओढ तिला मरू देत नव्हती. तिची आतुरता अतिउच्च शिगेला पोहचली. कधी एकदा दादा भेटतो आणि ती त्याच्या पाई पडुन माफी मागते, अशी तिची अवस्थता झालेली.
अखेर दादाच्या भेटीची ती नारळी पौर्णिमेची पहाट उजाडली. ती पहाटेपासुन सावकाराच्या घरासमोर एका झाडाआड दबा धरून बसली. तिला दादाच्या भेटी खेरीज कसली भ्रांत उरली नव्हती पण दुपार होऊन गेली दादा काही आला नव्हता. शेवटी तिने सावकाराला विचारपुस करायला सावकाराकडे गेली, पण सावकारानेही नाही म्हणत आपली मान डोलावली. तितक्यात एक सडसडीत बांधा असलेला एक तरुण सावकाराकडे येतांना दिसला. छोटी त्याच्याकडे फार लांबुन बघत होती जसा जसा तो जवळ येत होता तसा दादा असल्याचा भास छोटी होत होता. तो अगदी जवळ आला तेव्हा तिचा पुरता हिरमोड झाला तो दादा नव्हता. छोटी फार निराश झाली.
तो तरुण सरळ सावकारापाशी गेला आणि सावकाराला दादाच नाव सांगुन त्याच्या हातात कर्जाचा हफ्ता ठेवला. छोटीचे कान दादाच नाव ऐकताच टवकारले, ती तडक त्या दोघांपाशी गेली. तिने स्वतःची ओळख दिली आणि आर्ततेने दादाची विचारपुस करू लागली. त्याने पुढे जे सांगितलं ते तिला थक्क करून गेलं. त्याने सांगितलं की, “दादाच सात दिवसापूर्वीच अपघात झाला, त्यात त्याला गंभीर दुखापत झाली, त्याने पाच दिवसापर्यंत मृत्यूशी खुप कडवी झुंज दिली, डॉक्टरांनी सर्वोतोपरी प्रयत्न केलेत त्याला वाचवण्याचे पण ते शेवटी हरले आणि नियती जिंकली. त्याने मला जातांना शेवटचे दोन काम करायचं सांगितलं होतं त्यातला एक सावकाराचा राहिलेला शेवटचा हफ्ता आणि दुसरं म्हणजे महिन्याभरापूर्वी तुझ्यासाठी खरेदी केलेली रक्षाबंधनची भेट त्यासाठी मी इथे आलेलो. आम्ही दोघे रूम पार्टनर होतो. तुझ्या गोष्टी मला तो रोज सांगायचा, खरंच तु फार नशीबवान आहेस तुला असा भाऊ भेटला आणि तो पण ज्याला तुझ्या सारखी बहीण मिळाली, तुझ्यासारख मी पण त्याला दादाच म्हणत होतो.”
छोटीवर तर आभाळच कोसळलं. तिचं अवसान गळुन पडलं, अश्रु थांबायचं नाव घेत नव्हते. अंगात काहीच त्राण राहिले नाही, ती जागची खाली पडली, तिची शुद्ध हरपली. कोणीतरी यावं आणि तिला सांगावं की हे सगळं खोटं आहे पण नियती आपलं काम करून गेली होती. नशिबाने तिला प्रायश्चित करण्याचा पण अवधी नाही दिला. शुद्धीत आल्यानंतर तिने दादाची भेट उघडुन पाहिली त्यात एक भरजरीत सुंदर पैठणी होती आणि त्यावर एक छोटा कागदाचा तुकडा होता. त्यावर फक्त लिहलेलं होतं, “सदैव सुखी रहा, शतायुषी भव”
दादाने आयुष्यभर भरभरून दिलं अगदी देवाघरी जाऊस्तोवर,पण नियती तिला साधं ‘दादा’ म्हणण्याची पण वेळ दिली नाही. शेवटी ‘दादा’ म्हणायचं राहुन गेलं…..
समाप्त