लेखक: द. कृ. भातखंडे
संपर्क – datta.bhatkhande@gmail.com
आगंतुक – Marathi Katha Aagantuk
वार्षिक परीक्षा नुकत्याच पार पडल्या होत्या. मुळात कला शाखेची विद्यार्थिनी, त्यातून १३वीची परीक्षा आमच्याच महाविद्यालयाची अंतर्गत परीक्षा असल्याने त्याचे फारसे अप्रूप नव्हते. तरीहि परीक्षा संपल्याचा व ‘ मोकळे ‘ झाल्याचा अनुभव विद्यार्थी दशेतल्यानाच जाणवतो तसा तो आम्हा मैत्रिणीनासुद्धा अंगावर येत होता. आता मे महिनाभर रोज भटकणे, गप्पा मारणे, नाटक बघणे, दुपारी निवांतपणे झोप काढणे आणि अशाच अन्य ‘ वेळ घालवणे ‘ नाहीतर ‘ चकाट्या पिटणे ‘ या वर्गवारीत मोडणा-या कामगि-या करण्यात घालवायला मिळणार म्हणून मी जरा खुशीतच होते. संध्याकाळचे ६ वाजले तशी मी जामानिमा करुन, पायात चपला सरकवून, ‘ आई, येते ग ‘ असे आईला औपचारिकपणे ओरडून सांगून घरातून सटकले. बाहेर पडल्यावर अनघा आणि अलका याना वाटेत बरोबर घेऊन आमची ‘ गिरगावकर स्पेशल ‘ ठाकुरद्वार ते प्रार्थनासमाज आणि परत अशी ‘ टेहळणी ‘ सुरु झाली. निरर्थक चिवचिवाट चालूच होता. मॅजेस्टिकच्या आसपास आलो असता तेथे बाजूला ‘ निसर्गदर्शन ‘ करीत असलेला ‘ तो ‘ दिसला. आमची व त्याची नजरानजर झाली. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून मी संकोचून अस्फुट हंसले व नजर वळवली. तरी या २ भवान्यांच्या ते लक्षांत आलेच. अनघा माझा कान धरुन म्हणालीसुद्धा, ‘ अबोली, आम्हाला ” जिजाजी ” पसंत आह बर का!’ अलका उद्गारली, ‘ चला, पहिली विकेट पडली बहुतेक!’ मी त्याना दरडावले, ‘ उगाच कल्पेनेच्या भरा-या मारु नका. पुढे बघून चाला. नाहीतर अडखळून पडाल आणि रस्त्यांत बघ्याना करमणूक होईल. ‘
त्या नजरानजरेनंतर आठवडाभराने मी माझ्या आत्याच्या घरी जाऊन आले व आमच्या घरांत शिरले तर स्वारी तिथे विराजमान झालेली! मी त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करुन आतल्या खोलीत गेले. चहा फराळाने आदरातिथ्य झालेले दिसले. खूप जुनी ओळख असल्यासारख्या त्याच्या गप्पा बाबा व अविदादाबरोबर रंगात आल्या होत्या. आई आंत सैपाकघरात होती तरी तिच्या चेह-यावरसुद्धा मनाजोगता पाहुणा आल्याचा भाव स्पष्ट दिसत होता. थोड्या वेळाने तो उठला व म्हणाला,’ चला, मी निघतो आता! माझ्या अशा आकस्मिक , अनाहूत येण्यामुळे तुमची थोडी गैरसोय झाली असेल, त्याबद्दल मनापासून क्षमस्व!’
बाबा: ‘हो नाही, उलट एक नवी, हवीहवीशी वाटेल अशी ओळख झाल्यामुळे आम्ही खूष आहोत. येत जा केव्हाहि मनाला येईल तेव्हा, तुमच स्वागतच आहे’. ‘
त्याची नजर मला शोधत भिरभिरत होती. पण त्याने ते इतक्या सफाईने निभावून नेले की कोणाला तशी शंकासुद्धा आली नाहीतो झटकन तिथून सटकला.
तो गेल्यावर आई, बाबा आणि दादा यांच्यात या पाहुण्याबद्दल संवाद चालूच राहिला. त्यावरुन महाशय कोणते निमित्त काढून इथे पोहोचले त्याचा काही उलगडा झाला नाही पण त्याचे नाव अतुल आहे , तो देखणा , राजबिंडा, उत्साही, बहुशृत, रसिक आणि आणखी अशाच ब-याच विशेषणांचा धनी असल्याची माझ्या तीनहि निकटवर्तियांची खात्री पटली असल्याची व त्याला आमचे दार कायम उघडे असल्याची स्पष्ट कल्पना आली. मी त्याच्याबद्दल काही उत्सुकता दाखविली नाही तशी बाकीच्यानीहि मला त्याच्याबद्दल आवर्जून काही सांगण्याची तसदी घेतली नाही.
मी विचार करु लागले की कुठून नकळत अस्फुट हसण्याची क्रिया माझ्याकडून घडली आणि आता हा ससेमिरा माझ्या नुसता घरापर्यंत पोचलाच नाही तर तो वाढत राहण्याची सोय करुन गेला. नशीबच हाथ धोऊन पाठीस लागल्याच्ता भावनेने मी अभावितपणे कपाळाला हात लावला व आता हे वादळ टाळायचे कसे या विचारात पडले.
संध्याकाळी मैत्रिणींबरोबर फिरायला गेले तेव्हा त्यानीसुद्धा ‘ तुझा देवदास काय म्हणतो आहे?’ असे विचारुन मला रिंगणात घ्यायचा प्रयत्न केला. त्यावर मी म्हले, ‘ तुमचे काय जातय रिकामी टवाळी करायला? तो शनि माझ्या राशीलाच आलाय मला छळायला! ‘ अलका म्हणाली, ‘ अय्या, म्हणजे तुमची पुन्हा भेट झाली? कशी, कुठे, काय झाल, सांग ना सगळ लौकर! ‘
मी : ‘ सुतावरुन स्वर्ग नको गांठूस! माझी भेट नाही झाली पण तो मात्र द्राविडी प्राणायाम करतो आहे एवढ खर! ‘
अनघा: ‘ अशी कोड्यात नको बोलू बाई! भेट झाली नाही पण राशीला आलाय म्हणजे आम्ही काय समजायच? उगाच उत्कण्ठा ताणू नकोस. सरळ, सोप्या शब्दात काय मामला आहे तो सांग पटकन! ‘
मी : ‘ आज मी आत्याकडून घरी आले तर धूमकेतु आमच्या घरात माझ्या घरच्या मंडळींशी खूप जुनी ओळख असल्यासारखा गप्पा मारत बसला होता. मी त्याच्याकडे न पाहता आत गेले तर कोणाला जाणवू न देता त्याची नजर माझ्या मागे आली. घरचे सगळे खुष आहेत. त्याला पुन्हा यायचा आग्रह करुन झाला आहे. त्याने माझा विषय काढला नसावा कारण घरच्यानीसुद्धा तसा उल्लेख केला नाही. किंबहुना सारा संवाद मला वगळून इतरांचा, तो गेल्यावर, चालला होता. आगंतुकच आहे मेला! ‘
अनघा : ‘ बघ बाई, प्रकरण जरा गंभीरच दिसतय! पद्धतशीरपणे गड सर करायचा प्रयत्न चालू आहे. गडावर फंदफितुरी होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. शह आणि मात असा मामला होणार अस वाटतय! तुझ काही खर नाही आता!
राणी आयती जाळ्यात अल्लद अडकणार हे माझे भाकित ध्यानांत ठेव म्हणजे झाल! ‘
मी : ‘ तुझ्या म्हणण्यात खूपच तथ्य आहे. पण माझी तर बुद्धीच काम करीत नाहीशी झाली आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार तशी अवस्था अनुभवते आहे. सांगताहि येत नाही आणि सहनहि होत नाही म्हणतात तसा प्रकार आहे झाल! ‘
पुढल्या तीन चार महिन्यात त्याच्या आमच्याकडल्या खेपा वाढतच गेल्या. याबाबत माझ्याशी काही बोलावे असे घरच्या कोणालाच आवश्यक वाटत नव्हत किंबहुना माझे अस्तित्व त्या कोणाच्याच खिजगणतीत नव्हत.
त्याने कुठे काय कळ फिरविली कोण जाणे पण आघाडीच्या मराठी दैनिकात माझ्या आईचे पाककलेवरचे लेख नियमितपणे सदर स्वरुपात छापून येऊ लागले. त्यामुळे आई त्याच्यावर निहायत खूष होती. अतुलला कुठे ठेऊ अन कुठे नको असे तिला झाले होते. तिच्या दृष्टीला तो कुटुंबाचा अलिखित सदस्यच झाला होता. त्यामुळे त्याच्या सरबराईत विशेषत्वाने लक्ष पुरवले जाऊ लागले.
तो पठ्ठ्यापण असा बिलंदर की चुकूनहि माझा विषय काढीत नसे. त्याच्या आंतरे कोपि हेतु:ची पुसटशी कल्पनाहि त्याने कधी कोणाला येऊ दिली नाही. या चतुराईला दाद द्यावीशी वाटली मला जरी ती माझ्याविरुद्ध मोहिमेचा भाग होती तरी!
त्याने बाबाना भागभांडवल बाजाराबद्दल अशा काही सूचना वेळोवेळी केल्या की बाबाना लक्षणीय आर्थिक लाभ झाला. मग काय, बाबाना त्याला कसे आणि किती धन्यवाद द्यावेत कळेनासे झाले. त्याची वाखाणणी करायला त्यांची वाणी थकत नाहीशी झाली. त्याच्यावांचून बाबांचे पान हलेनासे झाले. हाहि बुरुज त्याने पुरा काबीज केला हे मला कळून चुकले.
माझ्या दादाचे प्रेयसी अपर्णा त्याला बधत नव्हती. त्याने त्याच्या परीने तिला वश करण्याची शर्थ केली. पण तिने त्याला कधीच काहीच प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे तो थोडा निराशच झाला होता. पण आमच्या किमयागार नायकाला काहीच अशक्य नसावे असे दिसते ! त्याने काय यक्षिणीची कांडी फिरवली त्याचे त्यालाच ठाऊक, पण काही दिवसांतच अपर्णा दादाच्या प्रियाराधनाला हळूहळू प्रतिसाद देऊ लागली व अखेरीस तिने त्याला होकारहि दिला. त्यामुळे दादाला स्वर्ग हाती आल्याचा आनंद झाला. साहजिकच अतुल त्याच्यासाठी देवदूतच होऊन राहिला. हा बालेकिल्लाहि आमच्या नायकाने हस्तगत केला. दादाचे लग्न ठरले. आता आई, बाबा व दादा याना एकमताने असे वाटू लागले की अतुलला आमच्या कुटुंबाशी नात्याने जोडायला हवा, म्हणजे तो त्यांचा हक्काचा कायमचा आधार बनेल. त्या दृष्टीने त्यानी आडून आडून त्याच्याशी माझ्याशी लग्नासाठी चांचपणी सुरु केली.
एवढे होऊनहि कोणीहि मला थेट त्याच्याशी लग्न करण्याबद्दल चुकूनहि विचारले नाही. त्याने बोलण्याच्या ओघांत त्याची व माझी तोंडओळख ( खर तर क्षणिक नजरओळख म्हणायला हव) असल्याचे सांगितले असूनसुद्धा माझ्या घरच्यानी मला तो मला कधी भेटला, आधी कधी माझ्या बोलण्यात त्याचा उल्लेख कसा आला नाही, अगोदर त्याला पाहिल्याचे त्याना आठवत नाही किंवा मला तो नवरा म्हणून पसंत आहे का अशापैकी कसलीहि पृच्छा वा चौकशी मजपाशी केली नाही याचे मला राहून राहून आश्चर्य वाटत होते.
तोहि असा चाणाक्ष व मुत्सद्दी की त्याने आपल्या कूटनीति कौशल्याची पराकाष्ठा करुन आपली नाकेबंदी करण्याची क्षमता पूर्णपणे पणाला लावली. प्रथम त्याने आईल वश केले, मग वडिलाना आपलेसे केले, नंतर भावालाहि फितूर केले. अशा रीतीने माझ्या सा-या पलायनाच्या वाटा पूर्णपणे सीलबंद केल्या. मला सुटकेचा एकहि मार्ग शिल्लक ठेवला नाही व मला त्याला शरण जाण्याखेरीज गत्यंतर उरणार नाही अशी तजवीज केली. एवढे करुनहि माझ्या आईवडिलानी मांडलेल्या प्रस्तावाला त्याने फारसा उत्साहाने होकार दिला नाही. मी शिकते आहे, शिक्षण पुरे होऊदे , इतकी काय घाई आहे वगैरे सबबी पुढे केल्या. पण माझे आईवडील व दादा यानाच आता दादाच्या लग्नात माझेहि लग्न उरकण्याची व अतुलला नातेसंबंधात अडकविण्याची घाई झाली होती. मग मुलगी दाखवायचा प्रस्ताव मांडल्यावर त्याने सांगितले की तो मला ओळखतो व मीहि त्याला ओळखते त्यामुळे मुलगी दाखविण्याची गरज नाही, शिक्षणाचे म्हणावे तर लग्नानंतर मी मला हवे तेवढे शिकायला त्याची काहीच हरकत नसल्याचे त्याने मोठ्या मानभावीपणाने सांगितले होते. केवळ माझ्या आईवडिलांच्या इच्छेला मान देण्यासाठी, त्याला त्यांचा त्याचा व माझा विवाह करण्याचा प्रस्ताव मान्य असल्याचे त्याने सांगितले होते. एवढे सारे ठरल्यावर माझ्या आईवडिलानी त्यांचा बेत मला सांगितला व त्यांच्या दृष्टीने मुलात नाकारण्यासारखे काही नसल्याने त्यानी लग्न ठरवले असल्याचे व मला पसंत नसल्यास त्याचे सयुक्तिक कारण सांगण्यास सांगितले. अर्थातच त्याला नाकारण्यासारखे कोणतेच सबळ कारण नसल्याने( व मला तो मनातून आवडला असल्याने ) मी मूकसम्मति दिली.
रीतसर आमचे लग्न झाले.
माझ्या मनात आले, केवळ प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून अस्फुट हसण्याचा गुन्हा मी केला, त्याची शिक्षा म्हणून मला हा जन्माचा संबंध पदरी आला. त्यानेहि सरळ माझे प्रियाराधन न करता अशा आडवळणाने मला त्याचा स्वीकार करणे भाग पाडले म्हणून त्याच्यावर रागवावे की त्याच्या या नाटकीपणाला दाद द्यावी व मनाजोगता साथी मिळाला म्हणून देवाला धन्यवाद द्यावे याचा मनाशी निर्णय करता येईना!.