Marathi Articles – मराठ्यांनो भविष्यावर बोलू काही
शिवजयंतीचा दिवस आणि मंडळांचा जल्लोष हे ठरलेलं गणित आणि त्यात फोडणी म्हणून कि काय, तोंडावर आलेल्या निवडणुका.
मग काय राजकारण्यांची पैशांची उधळपट्टी आणि मंडळांची हाय-बजेट शिवजयंती.
ऑफिसमधून सुटलो आणि त्याचीच प्रचीती आली.
शिवजयंतीचा सरळ आणि सोपा हेतु,
लाखाचा पोशिंदा, आपला जाणता राजा शिवबाला काळापलीकडे नेऊन,
त्याची जीवनगाथा मराठ्यांच्या पिढ्यानपिढ्यापर्यंत पोहोचावी,
प्रत्येक मराठ्याच्या रक्तात शिवबा दौडावा,
आणि मराठ्यांचा इतिहासच नव्हे तर चाललेला वर्तमान आणि येणारा भविष्यकाळही उज्ज्वल व्हावा
पण जेव्हा एके ठिकाणी ध्वनिक्षेपकाची भिंत शिवारायांपुढे उभी करून त्यापुढे bollywood संगीतावर नाचत,
ह्याच हेतूला पायदळी तुडवणारी मंडळी दिसली तेव्हा तळपायाची आग मस्तकाला गेली.
त्याचवेळी आमच्या धनकवडीच्या बस स्टॉपला पोवाड्यांचे बोल कानावर पडले आणि पावले आपोआप तिकडे वळाली.
शिवजयंतीनिमित्त इकडे मात्र शाहीर मंडळीना बोलविले होते.
महाराजांच्या शौर्याची आणि कार्याची महती आणि त्यातून प्रबोधन हे गणित शाहिरांना चांगलंच जमलं होत.
शिवरायांचे व्यापाराविषयी धोरण, त्यांचे स्त्रीशक्तीविषयी धोरण आणि त्यातून आजच्या समस्यांचे निराकरण.
शिवरायांनी मुघल सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने परत केल्याचे वर्णन,
स्वराज्य निर्माता शिवाला घडविणारी स्त्री शक्ती जिजाऊ, यातून प्रबोधन करणारा शाहीर, संतश्रेष्ठच.
शाहीर आणि सोंगाड्याचा एक संवाद मात्र लय भारी वाटला.
शाहीर : नर आणि मादी म्हणजे संसाराच्या रथाची दोन चाक
सोंगाड्या : आव शाहीर लोकांना समझल, आसच बोला
शाहीर : काव, काय झालं?
सोंगाड्या : शाहीर आजच्या घडीला रथ कुठ दिसतो का?
शाहीर : मग कारचं उदाहरण द्यावं म्हणता?
सोंगाड्या : कार काय आज आहे उद्या पेट्रोल संपल की कारचं रथासारख व्हायचं.
माझ्याकड अनंत काळ टिकल आस उदाहरण आहे.
शाहीर : आणि ते कोणत?
सोंगाड्या : सायकल शाहीर. नर आणि मादी म्हणजे सायकलीची दोन चाकं.
नर म्हणजे पुढचं आणि मादी म्हणजे मागचं चाक(हात झटकून, तोंड वाकड करीत).
शाहीर : आणि ते कस काय?
सोंगाड्या : त्याच आस आहे, हांडेल कुठल्या चाकाला आसत?
शाहीर : पुढच्या
सोंगाड्या : तेच की, म्हणजे पुढच चाक जिकड जातंय, मागच चाक आपल त्याच्या माग माग.
शाहीर आता हे सांगा, काही भार वाहून न्यायाचा झाला तर आपुन carriage वापारतो.
ते कुठ असतं?
शाहीर : मागच्या चाकावर.
सोंगाड्या : तेच की, सगळा भार मागच्या चाकावर, पुढच चाक आपल मोकळ कुठही जायला.
आता सायकल कुठ लावली, तर कुलूप कुठल्या चाकाला लागतं?
मागच्याच कि! पुढच चाक आपल मोकळ कुठही जायला.
शाहीर : तुमचा पुरुषी अहंकार बराच माजलेला आहे राव.
आता तुम्ही एका गोष्टीचं उत्तर द्या.
सायकलला ब्रेक कुठल्या चाकाला आसतो?
तो दोन्ही चाकांना आसतो खरा. पण जर पुढचा दाबला, तर काय व्हतं हे सांगण्याची गरज नाही.
मागच्या चाकाच्या ब्रेक मूळंच, तुमच्या मनमोकळ्या वागण्यानी तुम्ही गोत्यात येऊन तोंडावर आपटत नाही.
त्यामुळ लक्षात ठेवा,
जिजाऊ नसत्या तर शिवबा नसता आणि स्वरज्यही नसतं.
त्यामुळ हे पुरुषी अहंकाराच खूळ डोक्यातून काढा, स्त्री भ्रुणहत्या करू नका.
स्त्री हि अनंतकाळची माता आहे आणि ती नसली तर समाजात अराजक माजल्याशिवाय राहणार नाही.
स्त्री शक्तीचा विजय असो!!!
————————————————————-
फडफड फडफड फडकतो भगवा झेंडा गगनात,
फडफड नाही तडफड हवी मराठी रक्तात,
हर हर महादेव !!! हर हर महादेव !!!