Marathi article – लोकमान्य, पत्र लिहणेस, कारण कि…….

0
1728

Marathi article – लोकमान्य, पत्र लिहणेस, कारण कि…….

marathi-article-lokmanya

आदरणीय लोकमान्य,

खूप दिवस तुमच्याशी बोलावे असे मनात होते. सद्य परिस्तिथी तुम्हाला ठावूक असणे खरच निकडीचे आहे. तुमच्या सारख्या प्रज्ञावंत, दूरदृष्टी असणाऱ्या, खंबीर आणि लोकमान्यता असणाऱ्या नेतृत्वाची आम्हाला गरज आहे. तुम्ही म्हणाल कि, मग तुमच्यात असा कुणी नाही का? असतील हि, पण कोशात गुरफटून बसले असतील, प्रत्येकलाच दुसऱ्यांनी कुणीतरी हि जबाबदारी घ्यावी असे वाटतय. असो. पण आता तुम्हाला आठवण्याचे कारण म्हणजे गणेशोत्सव. तुम्हीच सुरु केला न हो हा गणेशोत्सव. घरातला उत्सव, सार्वजनिक केल्याचे श्रेय तुम्हाला आहेच. पण दुर्दैवाने आज केवळ उत्सवच उरला आहे, तुम्हाला आम्ही विसरलोच आहोत. मग तुमचे त्या मागचे विचार तर फारच लांबची गोष्ट आहे.

मला वाटते, तुमचे विचार न कळताच, केवळ तुमच्याप्रमाणे कृतीचा, किंवा तुम्ही सुरु केलेल्या परंपरा, केवळ सांस्कृतिक किंवा धार्मिक म्हणून सुरु ठेवणे कितपत योग्य आहे ? तुमच्या सारख्या महापुरुषांचा आम्ही पराभव केलाय का हो ? . म्हणजेच सगळेच जण असे करत आहेत असे नाही. मुठभर लोक आहेतही, तुमचा सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा अजून हि चालवणारे. पण तरी हि…. तुम्ही म्हणाला होतात कि, देशकार्य हेच देवकार्य आहे. पण सध्या मात्र , देश आणि देव हे दोन्ही शब्द आम्ही मखरात सजवून ठेवले आहेत.
समाजातील सर्व घटकांनी एकत्र यावे. आणि उत्सवाच्या ओढीने ते खरच एकत्र येतील हि, गणेश चरणी वंदन करण्याची हि संधी ते सोडणार नाहीत, आणि याचाच उपयोग करून घेत तुम्ही जनजागृती घडवली. व्याख्याने . पोवाडे , इतर लोककला व अभिजात कलांचा आधार घेत. सत्ताधारी इंग्रज या अश्या उत्सवावर बंदी आणणार नाहीत, याची आपणास पुरेपूर कल्पना होती. म्हणूनच आपण प्रज्ञावंत व दूरदृष्टीचे नेते आहात.

पण आजची परिस्थिती वेगळी आहे, म्हणजे मुठभर मंडळे अजून हि, अशी परंपरा चालवतात . तुम्हाला असे वाटत असेल न कि, आता स्वातंत्र्य मिळाले, मग या उत्सवाची गरज आहे का ? खर सांगायचे तर आहे, जनजागृतीची गरज अजूनही या समाजाला आहे. सर्व सामजिक घटकांपर्यंत आम्ही बऱ्याच मुलभूत गोष्टी पोचवू शकत नाही आहोत. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, गरिबी, बेरोजगारी, निरक्षरता ह्या समस्या तर आहेतच पण समाजात वाढणारी गुन्हेगारी, हिंसा आणि या सगळ्यातच बाहेरच्या शत्रूंनी पुकारालेले आतंकवाद नावाचे युद्ध, यांनी आजही भारतभू त्रस्त आहे.

कुटुंबाबद्दलच ओलावा नाहीये , तर देशप्रेमाचा पूर कुठून येणार हो. खर तर देशप्रेम पण असेल मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी, पण रोजची मीठभाकरी सुद्धा मिळवताना नाकी नऊ येतात अशी परीस्थिती आहे. काही चांगल्या घटना पण होत आहेत, पण त्यांचे प्रमाण, बाकी समस्या पेक्षा कमी आहे,

या सगळ्या पार्श्वभूमीवर असे वाटते कि, तुम्ही केलेला गणेशोत्सव, जर आम्ही तुमचा दृष्टीकोन लक्षात ठेवून साजरा केला तर? तर खरच उपयोग होईल समाजाला आणि या गणेशोत्सव मंडळाबद्दल जनमानसात जी नाराजी व्यक्त होत आहे, त्यांच्या बदललेल्या स्वरूपामुळे ती पण दूर होईल .

दुष्काळाग्रस्तांना मदत करणे व त्यांना इतर जोडधंद्याबद्दल मार्गदर्शन करणे , पर्यावरण व जल संधारण या बद्दल जन जागृती करणे, लहान मोठ्या उद्योग मार्गदर्शना साठी कार्यशाळा आयोजित करणे, प्रशिक्षण देणे, लहान मुलांसाठी विविध स्पर्धा भरवणे, व्याख्याने लोक कला, नाटक यातून सामजिक प्रश्नाची मांडणी करणे, सरकारानि जाहीर केलेल्या विविध योजनांची माहिती विविध सामजिक स्तरात पोचवणे. त्याच सोबत मराठी भाषेच्या वृद्धीसाठी उपक्रम राबवणे, खेडोपाड्यातल्या शाळांना नसलेल्या सुविधा पुरवणे, अनाथ मुलांना व वृद्धाना हि या उत्सवात सहभागी करून घेणे, अश्या किती तरी गोष्टी आपण करू शकतो. विविध कलांना आणि स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणे, असे अनेक उपक्रम करता येतील .

कुणाचा मानाचा , नवसाचा , सर्वात मोठा किंवा उंच, सर्वात जास्त मोठी मिरवणूक अशी स्पर्धा न होता, कुणी किती वेगळ्या पद्धतीने, कल्पकतेने या उत्सवाचा उपयोग जनजागृती साठी केला आहे, याची निकोप स्पर्धा झाली तर , लोकमान्य तुम्हालाही आनंदच होईल न! आणि असे असेल तर वर्गणीदार हि खळखळ न करता, वर्गणी तर देतीलच, पण हेच स्थानिक लोकही, मंडळाशी जोडले जातील आणि खऱ्या अर्थाने सहभागी होतील. अश्याच उत्सव मध्ये एकत्र आल्याने, आपोआपच, जातीभेद , गरीब श्रीमंत , स्त्री- पुरुष असा भेदभाव नाहीसा होतो. गणेशोत्सव मंडळानी, राजकारण न हाताळता, समाजकारण, हेच तुमचे या उत्सवामागचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवले, तर समाजाचे भले तर होईलच , पण तुम्हाला ती खरी आदरांजली ठरेल आणि तुमच्या ऋणातून आम्ही काही अंशी तरी मुक्त होवू. आणि हीच खरी गणेशाची हि पूजा ठरेल, कारण तो ती बुद्धीची, कलेची देवता आहे, शुभ कार्याला आशीर्वाद देणारी आहे. ध्वनी प्रदूषण टाळणे, विजेच्या अवास्तव उपयोग टाळणे, हे करून जर, आम्ही आमच्या मंडळ तर्फे हे असे उपक्रम राबवले तर खऱ्या अर्थाने हा उत्सव सार्वजनिक आणि लोकमान्य होईल

हे सगळे सांगायला तुम्ही परत याल का हो ? कदाचित तुम्ही आमच्या प्रत्येकाच्या मनात आहात, फक्त तुम्हाला शोधून बाहेर काढायचे, तुम्ही तुमच्या विचारांच्या रूपाने आमच्यात आहातच, फक्त तुम्हाला डोळसपणे अनुसरण्याची गरज आहे. मग खऱ्या अर्थानी तुम्ही सुरु केलेली परंपरा आम्ही जपतो आहोत असे वाटेल. तुमच्या साठी इतके तरी केलेच पाहिजे आम्हाला .

तुम्ही जे जे देशासाठी केले त्यामुळे, आम्ही आज स्वतंत्र भारतात राहत आहोत, आता सुजाण नागरिक होण्याची जबाबदारी आमची आहे , आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्यात म्हणजे झाले

बाकी सर्व ठीक

आपल्या देशाची एक नागरिक आणि आपली अनुयायी

– शीतल जोशी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here