Learn in Marathi – मराठी मधून शिका
मित्रानो,
आज लोकसत्ता मधील गिरीश कुबेर यांचा लेख वाचला, त्यात त्यांनी जगातील ५ मोठ्या कंपन्यांची एकूण संपत्ती भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त आहे असे दाखवले आहे.
अर्थातच या पाच कंपन्या आहेत, १. स्टीव जॉब्स यांनी सुरु केलेली APPLE, २. ल्यारी पेज यांनी सुरु केलेली अल्फाबेट(गुगल) ३. जेफ बेझोस यांनी सुरु केलेली अमेझोन, ४. बिल गेट्स यांची मायक्रोसोफ्ट, ५. मार्क झुकरबर्ग ची फेसबुक.
या सर्वांमध्ये काही गोष्टी साम्य आहे.
१. हे सर्व नव उद्योजक आणि तरुण उद्योजक आहेत.
२. हे सर्व उद्योग कल्पनेतून जन्मले आहेत
३. हे सर्व उद्योग एकाच देशातून सुरु झाले आहेत.
आता यात काय नवीन हे सर्व तर तुम्हाला माहितीच आहे, पण मग प्रश्न हा आहे, १२५करोड पेक्षाही जास्त लोकसंख्या असलेल्या आपल्या भारत देशात अशी कल्पना एखाद्यालाही सुचू नये? आपल्या देशून एकही मोठा उद्योग सुरु होऊ नये? कि आपला जन्मच इतरांनी बनवलेल्या उपकरणांचा लाभ घेण्यासाठी किंवा त्याची सेवा पुरवण्यासाठी झाल आहे हे आपण मनावर पक्क केले आहे.
पण असे नाही आहे, आपल्या देशात सुद्धा असे उद्योगी आहेत, आणि नवीन घडताहेत, पण हा प्रवास खूप कठीण असतो, प्रत्येक जन हा प्रवास पूर्ण करूच शकतो असे नाही. अनेक जन मधेच हा मार्ग सोडून सर्वात सोपा नोकरीचा मार्ग निवडतात. पण या प्रवासातील सर्वात पहिला अडसर म्हणजे भाषेचा अडसर.
कदाचित तुम्हाला हे पटणार नाही, पण
महाराष्ट्रामध्ये एकूण १ करोड पेक्षाहि अधिक मुले मराठी माध्यमात शिक्षण घेतात, हा आकडा हळू हळू कमी होतोय, पण तरीही अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रामध्ये मुले हि मराठी माध्यमातच शिकतात. पण यांनी काय फरकदातो असे तुम्हाला वाटेल. याला कारण आहे मुले हि मराठीत शिकुदे किंवा इंग्रजी माध्यमात ते विचार त्याच भाषेत करतात जी त्यांची बोली भाषा असते. आजही आपण इंग्रजीला एवढे जवळ केले नाही कि आपण संपूर्णने इंग्रजी बोली भाषेचा वापर करू.काही अपवाद असतील.
सांगायचा मुद्दा हाच कि याला कारण आहे आपली शिक्षण पद्धती. पहिले ते दहावी मराठी माध्यम, काही ठिकाणी सेमी इंग्लिश असते. त्यात इंग्रजीची सुरुवात पाचवी पासून, आणि अकरावी पासून सर्व विषय इंग्रजी मध्ये. अरे जो विद्यार्थी एका वर्षापूर्वी इंग्रजी एक भाषा म्हणून शिकत होता, तो आता अचानक सर्व विषय इंग्रजीत कसे शिकू शकतो.
तरीही विद्यार्थी शिकतात आणि चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होतात, कारण ते शिकतात फक्त मार्कांसाठी, इंग्रजी समजत नाही म्हणून मागे राहण्यापेक्षा जे काय समोर येते ते तोंड पाठ करायचे , मार्क मिळवायचे आणि स्पर्धेत टिकून राहायचे.
या भाषेच्या अडसरा मुळे अनेक विद्यार्थी विषय समजून न घेताच पाठांतर करतात, त्यात त्यांची तरी काय चूक, कारण स्पर्धा तर आपण आधीच लावलेली असते. काही असतात जे इंग्रजीवर प्रभुत्व मिळवतात आणि आणखी पुढे जातात पण यांची संख्या खूप कमी असते.
माझा एक मित्र होता, त्याचे गरेज होते, तो नेहमी नवीन प्रयोग करायचा, नवनवीन परत बनवून गाड्यांमध्ये वापरायचा, पण नगरपालिका शाळेत शिकलेल्या त्याने दहावी नंतर इंग्रजी मुळे बारावीच्या ३ वेळा वार्या करून शेवटी शिक्षणाला राम राम ठोकला. आधी तो वडिलांच्या गरेज मध्ये काम करायचा आता त्याचे स्वताचे अजून एक स्वतंत्र गरेज आहे. आणि तो खुश पण आहे. पण जर त्याला इंग्रजीचा अडसर आला नसता तर? कदाचित आज तो एक ऑटोमोबाईल अभियंता असता. कधी कधी प्रश्न पडतो पुढे सर्व इंग्रजी भाषेतच आहे तर पहिली पासूनच इंग्रजी का नाही शिकवत,किंवा मराठीमाध्यमाच्या शाळा दहावीपुढे मराठीत का नाही शिकवत?
चीन जपान जर्मनि अश्या देशांमध्ये त्यांचे शिक्षण हे त्यांच्याच भाषेत शिकवले जाते, त्यांना इंग्रजी एक भाषा म्हणून शिकवली जाते, फक्त एक भाषा म्हणून, आपल्या देशात ज्याला इंग्रजी येत नाही त्याला अभियंता किंवा डॉक्टर बनण्याचा अधिकारच नाही? हा कोणता न्याय? आणि हे फक्त मराठीचेच नाही तर सर्व प्रादेशिक भाषांचे आहे.
आपला देश हा प्रादेशिक भाषांमध्ये विभागलेला आहे, प्रत्येकाची भाषा वेगळी, अशावेळी आपल्याला आपल्या भाषेत शिकवणारी शिक्षण व्यवस्था गरजेची आहे.
अशी शिक्षण व्यवस्था बनवण्यासाठी मराठीबोली आता प्रयत्न करणार आहे, मराठीबोली मराठी मधून अनेक नवनवीन विषय विद्यार्थ्यांना मोफत शिकवणार आहे. याची सुरुवात संगणकीय भाषांपासून करत आहोत. अभियांत्रिकीचे अवघड प्रमेय किंवा संगणक प्रोग्रामिंग सर्व काही मराठीबोली वर मराठी मधून शिकवण्यात येईल.
यासाठी आम्ही मराठीबोली या नावाने युट्यूब वर एक वाहिनी सुरु केली आहे. https://www.youtube.com/channel/UCrGVTObaHzQBPS5RadaMxuQ या वाहिनीला नक्की भेट द्या.
आत्ता पर्यंत HTML या विषयावरील ५ भाग प्रकाशित झाले आहेत, सोमवार ते शुक्रवार असे रोज एक भाग प्रकाशित करण्यात येतो. इतर अनेक विषयांवर मराठीमधे व्हिडीओ प्रकाशित झाले आहेत. तुम्ही नक्की एकदा भेट द्या. आणि आम्हाला अभिप्राय द्या.
आणि जर तुम्हालाही आपल्या मराठी विद्यार्थ्यांना काही शिकवायचे असेल तर आमच्याशी संपर्क साधा. हे काम आपण सर्वांनी मिळून कराचे आहे. या पुढे भाषेमुळे कोणत्याही मराठी विद्यार्थ्याचे स्वप्न मोडू नये या साठी आपण प्रयत्न करूया.