Great Saint Kanakdas – थोर संत कनकदास

0
11337

Great Saint Kanakdas – थोर संत कनकदास

Saint-Kanakdas

भारत ही साधू-संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. सर्वच धर्माच्या अनेक साधू संतांनी आपापल्या काळात समाज प्रबोधनाचे कार्य मोठया प्रमाणावर केले. त्यांनी लिहून ठेवलेले साहित्यग्रंथ आजही त्याची प्रचीती देतात. कर्नाटकातील अशाच एका महान संताचा हा संक्षिप्त जीवन आढावा…

संत कनकदास : एक संत, कवी, तत्वेत्ते तसेच रचनाकार म्हणून त्यांची ओळख अवघ्या देशाला आहे. संत कनकदासांचा जन्म सध्याच्या कर्नाटक राज्यातील बाड (ता-शिवार, जि-हावेरी) येथे १५०९ साली एका कुरुबा (धनगर) कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिराप्पा तर आईचे नाव बचम्मा होय. संत कनकदासांचे मूळ नाव हे थिमाप्पा होते. तरुणपणात थिमाप्पांना एक खजिना मिळाला होता,त्याचा त्यांनी स्वतःसाठी उपयोग न करता समाजकार्यासाठी तो देऊ केला. त्याचमुळे थिमाप्पा यांना कनकदास (कनक-सुवर्ण) या नावानी ओळखले जाऊ लागले.

त्यांचे समाजीक एकात्मतेचे कार्य हे खरंच सर्वांना अजूनही प्रेरणादायी असेच आहे. संत कनकदासांनी आपल्या जीवन काळात अनेक कीर्तने, सामाजिक-धार्मिक गीते तसेच रचना रचल्या. त्यातील नलचरीत्र, हरीभक्तीसार, नृसिंहस्तव, रामधन्यचरीत्र आणि मोहनतरंगिनी या त्यांच्या प्रमुख रचना मानल्या जातात. या व्यतिरिक्तही त्यांनी शेकडो कीर्तने तसेच सामाजिक-धार्मिक गीते रचली व समाजीक एकात्मतेसाठीच जीवन अर्पिले.

सदैव लोककल्याणाचा विचार करणाऱ्या संत कनकदासांनी तिरुपती येथे जीवनातील शेवटचे दिवस घालवले. १६०९ मध्ये ह्या महान संताचा, कवीचा, तत्वेत्याचा तसेच एका महान रचनाकाराचा मृत्यू झाला. त्यांचा शारीरिक मृत्यू झाला असला तरीही संत कनकदासांचे वैचारिक रूप आजही जनमाणसांत जिवंतच आहे.

चित्रपट सृष्टीलाही संत कनकदासांच्या विचारांची ओढ लागली नाही असे नाही. दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते डॉ. राजकुमार यांच्या अभिनयाने नटलेला ‘भक्त कनकदास’ हा १९६० सालचा कन्नड चित्रपट त्या काळात अतिशय लोकप्रिय ठरला. तसेच अनेक गीते व नाटके यातून आजही संत कनकदासांचे कार्य समाजापुढे आणन्याचा प्रयत्न सुरूच असतो.

त्याचबरोबर संत कनकदासांच्या कार्याचा एक सन्मान म्हणून कर्नाटक राज्य सरकारने ‘कनकदास जयंती’ रोजी शासकीय सुट्टी जाहीर केली आहे. तसेच त्या दिवशी संपूर्ण राज्यभर सर्वच छोटया-मोठया गावात-शहरांत विविध कार्यक्रमांचे तसेच मिरवणूकींचे आयोजन केले जाते व संत कनकदासांच्या विचारांचा जागर मांडला जातो.

अशा एका थोर संताच्या विचारांचा उपयोग फक्त राज्याच्या अथवा भाषेच्या सीमा न घालता सर्व समाजाच्या प्रबोधनासाठी केला जावा हीच अपेक्षा…!

– मिलिंद डोंबाळे (देशमुख)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here