“पणयांगना” – Marathi Kavita
सुहासिनी साजरी ती–काया कनका समान
दिसे विलासी कामिनी–मंद मादक ते ध्यान
डोळे मिटूनी समाधी–जणू अनंग ती मुद्रा
कच सोडूनिया भाळी–संथ पापणी पापुद्रा ..//१//
देही मदंग उभी ती–लपवी अभुग्न थान
लाजे खातर वसन–निरामय असे भान
छंद कटाव कंबरी–अशी सलंग ती छाया
मदगंधा मदनिका–मोहुनिया मस्त माया ..//२//
जात संयमी ललना–अशी येताच वयात
वळूनी पाहे नजरा–बदनाम या जगात
म्हणे कोण ही सुंदरा–कुजबुज ही जनात
वासनेची लाळ घोळे–दंभ पुरुषी मनात ..//३//
देता उपमा शृंगारी–मनोरमा कामायनी
भोग समागमी करे–वारबधू ही सदनी
दीड दमडीच्या गाठी–ओरबाडे चरितही
नाही शाबूत शरम–फाटक्या पदरातही ..//४//
चोळामोळा फार होता–निपचित पडे तनु
गंध घामाचा सुटला–जोम धातूचाच जणू
पुन्हा तोच डाव होतो–अनोळखी येत जातो
उडवीत धन चार–जीव फाडून पहातो ..//५//
काय द्यावा दोष तीस–नरां स्वाभाविक खोडं
कधी पाहिले ना मागे–वळ पाठीवरी फोडं
जाळूनिया कात सारी–लेप पांढरा चढवी
राख चोळून उदरी–दुःख हासून दाखवी ..//६//
जरी विकले शरीर–परी मन आबाधित
खरं सांगावे कोणास–गुदमरून गुपित
लोभतो किती मनास–कस्तुरीचा परिमळ
कोणी घासून पाहिले–दिसला का लाल मळ? ..//७//
हे जग किती खोटे–तिरस्कार का करिता?
चराचरी या नजरा–मग कशास रोविता?
रोज मरते म्हणून–घेते आज श्वास नारी
जगते मरून अशी–दोन घासास लाचारी ..//८//
तुच्छ म्हणवीत सारे–चूल तिचीही पेटते
दोन थेंब दुधासाठी–बाळ भुवरी रांगते
नावं द्यावे किती आता–सरणही करपले
उरली ही काळी माती–सरपनही जळले ..//९//
कधी माय झाली होती–दोर बांधूनी भगिन
तनया ती खेळूनिया–स्वप्न पाहे अर्धांगिन
आज गणिका नी शूला–बोलावता रुपाजीवा
सारा नजरेचा खेळ–कामरुपीच दृष्टिवा ..//१०//
नियतीच तडकली–अशी अभागी रमणी
कलंकित कुलटा की–कसबीन ती जीवनी
भ्याड प्राणी एकसंध–चाळा करुनिया दंग
अस्ताव्यस्त चिती रीती–दिसतेय ती भणंग ..//११//
पणयांगना म्हणोनी–गात आहे नाचवीत
व्यथा एकरूप झाल्या– गिरऊनी लेखणीत
शब्द तोटके आहेत–वेदनाच ही टोचते
कथा अधुरी राहिली–सल मनात बोचते ..//१२//
प्रशांत रोंघे (पवन)
शब्दार्थ :
वेश्या : पणयांगना/वारबधू/गणिका/शूला/कुलटा/कसबीन/रुपाजीवा;
सुहासिनी : सुंदर हसरा चेहरा;
स्त्री : नारी/रमणी/ललना/कामिनी;
कनक : सोने/सुवर्ण
अनंग : कामदेव;
कच : केसं/कुंतल/जटा
मदंग : एक प्रकारचा बांबू
अभुग्न : निरोगी/जो झुकला नाही असा सरळ;
सलंग : अखंड/एकसंध
थान : स्तन/वक्षस्थल;
वसन : वस्त्र/कपडा
निरामय : निर्मळ/सात्विक;
कटाव : व्यवस्थित बांधणी/दौलदार रचना
मदगंधा : मादक गंध असणारी दारू;
मदनिका : एक अप्सरा/मेनकेची कन्या
मनोरमा : मनमोहक;
कामायनी : सुंदर स्त्री
समागम : संभोग;
शरीर : तनु/काया/गात/देह
धातू : वीर्य;
कात : त्वचा/कातडी
दृष्टिवा : नजर;
चिती : बुरसा/बुरशी;
विलासी : शृंगारिक
रीती : चाल/प्रकार;
भणंग : दरिद्री/भिकारी/गरीब/फकीर
चरित : चारित्र्य
[…] http://marathiboli.in/marathi-kavita-panayangana/ […]
[…] स्त्री – Arya द्वितीय क्रमांक – पणयांगाना – Prashant Rongheतृतीय क्रमांक – पाणी पाणी […]