डॉ. श्री बालाजी तांबे
Joint Pain Ayurveda
संपूर्ण शरीराला व्यापून असणारा वातदोष शरीरातील प्रत्येक हालचालीचा प्रेरक असतो. वातदोष बिघडला तर शरीरात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी लक्षणे उत्पन्न करू शकतो.
वातदोष शरीरातील प्रत्येक हालचालीचा प्रेरक असतो. अर्थातच, संपूर्ण शरीराला तो व्यापून असतो. जोपर्यंत तो संतुलित असतो, तोपर्यंत आपली कामे व्यवस्थित करत असतो. मात्र, वातदोष बिघडला तर शरीरात निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळी लक्षणे उत्पन्न करू शकतो. उदा. कोठ्यामध्ये वात बिघडला तर त्यामुळे पुढील त्रास होतात –
– मल-मूत्रप्रवृत्ती होत नाही.
– हृदयरोग होतो.
– पोटात वाताचा गोळा अनुभूत होतो.
– बरगड्या दुखतात.
– मूळव्याधीचा त्रास होतो.
संपूर्ण शरीरात वात प्रकुपित झाला तर, त्यामुळे….
– शरीरात कुठेही फडफडल्यासारखे, स्फुरण पावल्यासारखे अनुभूत होते.
– संपूर्ण शरीरातील हाडे असह्य दुखतात.
– सर्व सांधे दुखतात.
गुदभागी वात बिघडला, तर…..
– मलमूत्रप्रवृत्ती अजिबात होत नाही किंवा व्यवस्थित होत नाही.
– पोटात दुखते, गॅसेस होतात.
– पाय, मांड्या, कंबर, पाठ या ठिकाणी वेदना होतात.
– हे अवयव सुकतात, बारीक होतात.
– मूतखड्याचा त्रास होतो.
आमाशयाच्या (खाल्लेले अन्न सर्वप्रथम साठते तो अवयव) ठिकाणी वात वाढला, तर….
– पोट, बरगड्या, हृदय, नाभीच्या भोवती वेदना होतात.
– खूप तहान लागते, घसा कोरडा पडतो.
– ढेकर येत राहतात.
– खोकला येतो, श्वासाची गती वाढते.
कान, नाक, डोळे वगैरे इंद्रियांच्या ठिकाणी वात वाढला तर त्यांची कार्यक्षमता कमी होते किंवा नष्ट होते.
उदा. श्रवणदोष तयार होतो, नाकाने वास येत नाही, डोळ्यांना दिसत नाही.
त्वचेच्या ठिकाणी किंवा रसधातूमध्ये वात बिघडला, तर….
– त्वचा कोरडी होते, फुटते.
– त्वचा निस्तेज होते, काळवंडते, ताणली जाते व पातळ-दुर्बल होते.
– बोटांचे छोटे-छोटे सांधे दुखू लागतात.
– रक्तधातूच्या ठिकाणी वाताचा प्रकोप झाला, तर…
– संपूर्ण शरीरात वेदना होतात.
– सर्वांगात दाह होतो.
– शरीराचा वर्ण बिघडतो.
– वजन कमी होते, खावेसे वाटत नाही.
– अनुत्साह प्रतीत होतो.
– शरीरावर पुरळ, फोड वगैरे येतात.
मांस व मेदाच्या ठिकाणी वातदोष वाढला, तर….
– संपूर्ण शरीराला जडपणा येतो, सुया टोचल्यासारखे वाटते.
– खूप थकवा जाणवतो, मार लागल्यावर शरीर ठणकावे त्याप्रमाणे वेदना होतात.
अस्थी व मज्जाधातूच्या ठिकाणी वात वाढला, तर….
– हाडांमध्ये तुटल्याप्रमाणे वेदना होतात.
– लहानमोठे सर्व सांधे फार दुखतात.
– ताकद कमी होते.
– मनुष्य अशक्त, बारीक होतो.
शुक्रधातूच्या ठिकाणी वात प्रकुपित झाला, तर –
– वीर्यस्खलन होत राहते किंवा अजिबात होत नाही.
– सहसा गर्भधारणा होत नाही, मात्र झाली तरी गर्भस्राव, गर्भपात होतो किंवा गर्भात विकृती येते.
शिरांमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये वात वाढला, तर…..
– शिरा संकोच पावतात किंवा शिरांच्या भिंतीतील स्थितिस्थापकत्व कमी होऊन शिरा विस्तारतात, शिथिल होतात.
सांध्यांमध्ये वात प्रकुपित झाला, तर…..
– संधिबंध शिथिल होतात.
– सांध्यांची हालचाल व्यवस्थित होत नाही.
– सांध्यांवर सूज येते व तीव्र वेदना होतात.